दुर्गाचें घर
[ मुलगा मांडीवर घेतलेली दुर्गा व आनंदराव बोलत असतांना पडदा उघडतो. ]
दुर्गा -- आनंदराव, तुम्ही कां बरें उगीच माझी पाठ पुरवितां ? मी कीं नाहीं चहूंकडून अगदीं नाडून गेलें आहें. माझ्या जीवाची खरोखरच ओढाताण झाली आहे. तेव्हां तुम्हांला मी आतां काय देऊं ? काय उरलें आहे माझ्यापाशीं ? तुमचे माझ्यावर खंडोगणती उपकार झाले आहेत. एखादा भाऊ देखील आपल्या बहिणीचा अशा विपत्तींत इतका समाचार घ्यायचा नाहीं ! मित्रांनीं सोडलें, मैत्रिणींनीं टाकलें, नातेवाईकांनीं दूर केली ! अशा प्रसंगी तुम्हीं या अनाथ लेकराच्या आईचा इतका समाचार घेतां हें का थोडें झालें ? ( डोळ्यांतून पाणी काढते. )
मुलगा -- आई, ललतीस ग कां ?
दुर्गा -- माझें. नशीब खोटें म्हणून रडतें बाळा ?
आनंद० -- पण यांत मी विशेष तें काय करतों ? कोणालाही स्नेहधर्म पाळलाच पाहिजे.
दुर्गा -- होय ? म्हणूनच मेलें मला वाटतें कीं, स्नेहभावानेंच स्नेहभावाची फ़ेड करावी. पण काय करूं ? भिकारीण पडलें ना ? यासाठीं सांगतें, माझा लोभ सोडून देऊन सुखांत नांदा.
आनंद० -- सुख ! तुमच्यावांचून मला सुख कसें होणार बरें ? मीं जो द्रव्यसंचयाचा एवढा खटाटोप चालविला आहे, तो तरी या आशेवर कीं, तुम्हीं आम्हीं मिळून कधीं तरी त्याचा उपभोग घेऊं.
दुर्गा -- तुमचें बोलणेंच आतां मला ऐकून उपयोग नाहीं. ( तोंड फ़िरविते. )
आनंद० -- अस्सा, अस्सा आज सात वर्षें अस्सा मी तुमच्या नादांत गुंतलों आहें, व माझ्या कमनशिबानें माझी इच्छा जरी पूर्ण झाली नाहीं तरी तुमच्या नादांतच मरेपर्यंत दिवस काढीन. असेंच समजा कीं, माझा तुम्हीं अंगीकार करीपर्यंत मी जिवंत काय आणि मेलों काय एकच.
दुर्गा -- हीं भाषणें मला आतां अगदीं विषासारखीं कडू लागतात. नको, नको ! बाळ्याच्या तोंडाकडे पाहिलें म्हणजे पूर्वींचें सगळें डोळ्यांपुढें उभें रहातें, आणि ‘ माझ्यामागें तूं या जगांत इतके दिवस राहिलीस कशी ? ’ असें म्हणून मला ते रागेंच भरतात कीं काय, असें वाटतें. ( मुलाचें चुंबन घेते. ) बाळ्या ! मी तरी काय करूं बरें ! मला सुख कां वाटतें यांत ?
आनंद० -- झालें ! इथें बोलणेंच खुंटलें ! असें कांहीं तरी तुमचें दु:खाचें बोलणें ऐकलें म्हणजे आशेची चटकन् निराशा होते; पण चमत्कार हा कीं, माझें मन अधिकाधिक वेधून जातें. तुमच्या लग्नापूर्वी मी तुम्हांला नुसत्या या दृष्टीनें पहात होतों, व तेवड्यावरूनच त्य वेळीं माझ्या मनांत तुमच्याविषयीं लोभ उत्पन्न झाला होता. पण तेव्हांपासून तुमच्याच चिंतनामुळें व नित्य सहवासाच्या योगानें तुमच्या सद्गुणांचा अनुभव येत गेल्यामुळें, मला आतां असें वाटूं लागलें आहे कीं, त्या वेळची ती केवळ कामवासना होती. परंतु आतां तिला प्रेमाची व विचाराची भर पडली आहे. सध्यां तुमच्यावर आकाशच कोसळल्यासारखें झालें आहे. तथापि माझें तुमच्यावरचें प्रेम चंद्रकलेप्रमाणें नेहमीच वाढतेंच आहे.
दुर्गा -- तुम्ही नाहीं ना ऐकत ? हें पहा माझ्यासाठीं जर तुमच्या मनांत कांहीं थोडी कळकळ असेल, तर कृपा करून हें असलें भाषण एकदम बंद करा कसें ? माझ्या मनांतून सासर्याला भेटायला जायचें आहे. पहातें एकदां नशिबाची परीक्षा करून. म्हणून म्हणतें, तुम्ही चला आतां.
आनंद० -- मी कांहीं नको म्हणून आग्रह करीत नाहीं; पण सासर्याला भेटून कांहीं फ़ायदा होईल असें मला तर दिसत नाहीं. खर्चाला पाहिजे असेल तर माझ्यापाशीं कां नाहीं मागत बरें ? खरेंच म्हणतों, अडचण आहे कीं काय ?
दुर्गा -- मीं सांगितलें ना एकदां, कीं मनाचा संशय एकदां मी फ़ेडून घेणार. होय, नाहीं तर नाहीं. पण मेली रुखरुख् नको मागून.
आनंद० -- बरें तर, येतों मी. (असें म्हणून निघून जातो. )