अंक पहिला - प्रवेश ४ था

नाटक लिहिणे किंवा रंगभूमीवर सादर करणे म्हणजे अवघड कला आहे, शिवाय त्यातील अभिनय जिवंत असावा लागतो.


( जिवाजीराव व मुलगा घेतलेली दुर्गा )
जिवाजी० -- ज्यांनीं तुला माझ्याकडे यायची मसलत सांगितली त्यांनीं तुला खरोखर फ़सविलें. हा नव्हे तुझा रस्ता; जा, नीघ. आलीस तशी चालती हो. डोळ्यांपुढें उभी राहूं नकोस माझ्या. माझ्यापासून तुला कांहीं मिळायचें नाहीं. चल नीघ !
दुर्गा -- मला देखील तुमच्यापासून कांहीं नको. पण मेलें मनुष्य विपत्तींत पडलें म्हणजे त्याला दुसर्‍यापाशीं तोंड वेंगाडणें भाग पडतें. तुम्ही माझें बोलणें शांतपणें ऐकून घ्याल असें मला वाटलें होतें, पण --
जिवाजी० -- पण काय ? काय बोलशील तूं ? किती बोलशील ? तुझ्याअवदसेच्या -- पायगुनानें माझ्यावर अनर्थ कोसळला, माझ्या वृद्धापकाळाचा सर्व आधार तुटला; माझ्या सुखाचें तूं मूलच खणून काढलेंस; या गोष्टी तूं कितीही बडबडलीस, आणि कितीही रडलीस तरी भरून येतील का ?
दुर्गा -- तुमची एकट्याचीच का अशी अवस्था झाली ? माझ्या नाहीं का जन्माचें मातेरें झालें ! ( दु:ख दाबून डोळे पुसते. )
जिवाजी० -- हां, म्हण असें. असें बोललीस तर मोठ्या आनंदानें मी तुझ रडगाणें ऐकून घेईन.
दुर्गा -- एकूण माझी हालअपेष्टा झाली म्हणजे त्यांत तुम्हांला आनंद आहे म्हणायाचा !
जिवाजी० -- आहे म्हणजे ! दुसरी या जगांत मला आनंदाची गोष्टच उरली नाहीं.
दुर्गा -- तर मग घ्या आनंद करुन ! माझा सर्वस्वीं नाश झाला आहे खरा.
जिवाजी० -- बस्स, बस्स ! तुझी दुर्दशा व्हावी हेंच माझें देवापाशीं गार्‍हाणें होतें. तें त्यानें ऐकलें. आतां माझा आत्मा थंड झाला; नाहीं तर मेल्यावर समंध होऊन तुला छळलें असतें. समजलीस ?
दुर्गा -- देवा ! हाच कारे वडिलांचा आशीर्वाद ! जन्माचें सुख तर त्यांच्याबरोबर नाहीसें झालें होतें, पण तसाच कांहीं दिवस जीव वांचविला. आतां मेली तीही आशा उरली नाहीं. कांहीं जवळ होतें नव्हतें तें सगळें या पोटाच्या भरीला घातलें. शेवटीं अगदीं निरुपाय होऊन तुम्ही सख्खे सासरे म्हणून तुमच्या दाराशीं आलें. तुम्हांला जर कांहीं या अनाथ लेंकराची दया आली तर पहा, नाहीं तर - ( रडूं लागते. ) बाळ्या, पड बाबा, आजोबांच्या पायां पड. तुझ्याकडे बघून तरी त्यांना आपल्या मुलाचें स्मरण होऊं दे. ( मुलगा पायां पडावयास जातो. जिवाजीराव रागावून मागें सरतो. मुलगा भिऊन रडूं लागतो. ) मामंजी, मी तुमच्यापुढें पदर पसरतें, या लेंकराकडे पहा. मी नाहीं इतकी माझ्या जिवाची पर्वा करीत, पण हा पोटचा गोळा म्हणून जीव तडफ़डतो हो, काय करूं !
जिवाजी० -- या मुलाबद्दल मलासुद्धां वाईट वाटतें, पण तुझ्या पोटचाना तो ?
दुर्गा -- अरे कपाळा ! असा दावा उगविणें आपल्यासारख्यांना शोभत नाहीं बरें. आपलें नातवंड म्हणून तरी याचा संभाळ करा.
जिवाजी० -- करीन, पण तूं आहेस साडेसाती. तुझें मग त्याला वारेंसुद्धां लागून उपयोगाचें नाहीं; कबूल आहे तुला हें ?
दुर्गा -- काय, कबूल आहे का म्हणतां ? त्याचें मला तोंड दिसायचें नाहीं हें ? नकोग बाई तें ! माझ्या सोन्याकडे पाहून मी इतके दिवस जिवंत राहिलें, आणि आतां जर तुम्हीं त्याला दूर केलात तर माझी काय वाट ? मामंजी ! इतके कसे हो तुम्ही निष्ठुर झालां ? असें असेल तर मी आपली त्याला घेऊन जातें अशी. कुठेंही चार घरें मागून त्याच्या पोटाला घालीन. माझा जीव मला जड झाला आहे, पण माझें लेंकरूं नाहीं मला जड झालें, समजलांत ! ( मुलास पोटाशीं धरते. )
जिवाजी० -- तर हो चालती आपल्या कारट्याला घेऊन; भीक मागून पोटाला घाल कीं कसेंही घाल. चल नीघ.
दुर्गा -- जातें बरें ! चल बाबा. ( मुलग्यास घेऊन ) कांहीं केलें म्हणून दगडाला का पाझर फ़ुटेल !
मुलगा -- आई मला भूक लागली. जेवायला केव्हां घालनालग !
दुर्गा -- चल घरीं घालतें हं. ( असें म्हणून डोळे पुशीत मुलाला घेऊन निघून जाते. )
जिवाजी० -- काळ्या ! ए काळ्या ! ( काळ्या येतो. ) कायरे ए गद्ध्या, तुला, इथें गाढवें राखायला ठेवला होता कारे !
काळ्या -- गाढव कशापायी बाबासाब ! दरवाजा राकीत बसलुया नव्ह का ?
जिवाजी० -- मग ही तुझी काकी कशी आली होती तर आंत ?
काळ्या -- माझी काकी कशाला येतीया हत. त्याच बाईन वरडून वरडून डोक्स उटिवल म्हून् दिंडी उगडून्शेनी भाइर ग्येलो. आन् मी नग नग म्हन्तुया तरीबी बेगुमान आंत घुसली. धादा सांगितल बगा बाबासाब ! तवा ह्यांत माजा कंचा अन्याव बर !
जिवाजी० -- तिला आंत येऊं नकोस म्हणून तूं दहादां सांगितलेंसना ! ठीक केलेंस ! असा असावा हुषार चाकर ! बरें आतां तिच्या घराकडे जा आणि सांग कीं मी त्यांच्याकडून आलों आहें. चार घरें जास्ती मागून माझ्याही पोटाची तजवीज कर म्हणावें. जा, मला तुझ्यासारख्या मगरूर चाकराची जरूर नाहीं. पुन: हा उंबरा चढलास तर पाय मोडीन सांगून ठेवतों. ( काळ्या ‘ का बाबासाब ’ करीत असतां जिवाजीराव त्याचें बोचकें व कांबळें त्याच्या अंगावर फ़ेकून देतो, व आपोआप जात नाहीं असें पाहून त्याच्या रट्याला धरून त्यास बाहेर घालवितो. तो गेल्याअर पुटपुटत दरवाजा लावून घेतो. )
( अंक पहिला समाप्त )

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP