रस्ता
( आनंदराव व तुळाजीराव येतात. )
आनंद० -- दुर्गाचें व तुमच्या वडिलांचें बोलणें झालें तें तुम्हीं सर्व ऐकलें म्हटलेंत, म्हणून विचारतों. त्या बिचारीची दुर्दशा पाहून किंवा त्या पोरक्या लेंकराकडे पाहून तुमच्या बाबासाहेबांच्या मनाला कांहीं द्र्व आला का ? ( तुळाजीराव वाईट तोंड करून नकार दर्शवितो. ) नाहीं ! तुमच्या मुद्रेवरून कांहीं सुचिन्ह दिसत नाहीं. तुम्हांला तर त्या दोघांबद्दल वाईट वाटतच असेल म्हणा, परंतु तुमचे वडील - जाऊं द्या, तुमच्याकडे बघून मी गप्प बसतों. खरोखर तुम्ही त्यांचे चिरंजीव शोभत नाहीं ! तोंडावर तारीफ़ करावी असें नाहीं, पण तुमच्यासारखा जिवास जीव देणारा वर तारीफ़ करावी असें नाहीं, पण तुमच्यासारखा जिवास जीव देणारा मित्र दुसरा मिळणें कठीण.
तुळाजी० -- हें काय परस्पर आहे. मला तरी तुमच्यासारखा मिळेल का ? नाहीं ! आतां आमच्या बाबांच्यासंबंधानें गोष्ट काढलीत म्हणून सांगतों. आमच्या वाड्यांत पोरकें पोर अथवा अनाथ बायको या शब्दांचा अर्थच ठाऊक नाहीं ! मग तसें जर कुणी आलें तर द्रव कुणाला येणार ! पण त्याबद्दल तुम्ही बाबांना दोष लावूं नका. कारण त्यांचा असा ग्रह झाला आहे कीं, त्या साडेसातीबरोबर लग्न केलें म्हणून चंद्रराव लढाईंत पडले. पण जाऊं द्या, वाटाघाट मला कशाला पाहिजे ! उगीच स्नेहांत मात्र व्यत्यय यायचा. तुम्ही माझ्या जिव्हाळ्याचे मित्र आणि ती माझी सख्खी भावजय ! तेव्हाम उभयतांचेंही हित व्हावें म्हणून मीं या कृत्यांत इतकें मन घातलें आहे. दुसरें कांहीं कारण नाहीं.
हित व्हावें ! आणि तें उभयतांचेंही ! छे छे छे छे !! तिला तुम्ही म्हणतां त्याप्रमाणें बिकट प्रसंगांत गांठून आपलें हित साधून घ्यावें असा माझा बिलकुल उद्देश नाहीं बरें । तिची दुर्दशा करण्यांत तुमच्या बाबांचा कांहींतरी मतलब असेल. पण माझें तर उलटें असें आहे कीं, तिचें सुख तें माझें सुख. म्हणून ज्यायोगानें तिला सुख होईल तें मला कर्तव्य. समजलांत !
मग मी तरी तेंच म्हणतों. बाबांनीं तिचे हाल चालविले आहेत हें पाहून देवाशपथ मला फ़ार वाईट वाटतें. पण करूं काय ? माझा कांहीं इलाज चालत नाहीं. त्यांना तर मी अक्कल शिकवायला जायचा नाहीं. तरी सहज बोलतां बोलतां दोनतीनदां निरनिराळ्या तर्हेनें गोष्ट काढली होती कीं, हें करणें लौकिकांत बरें दिसत नाहीं. नांवाला बट्टा, शिवाय अमक्या अमक्याच्या सुनेची अशी स्थिति झाली, अशी चोहोंकडे कुजबुज होऊं लागलेली माझ्या कानावर आली. असें, आनंदराव पुष्कळ सांगून पाहिलें; पण आमचे बाबा काय विचारतां ? जें एकदां डोक्यांत शिरलें तें शिरलें. मग तें ब्रह्मदेवाच्या बापालासुद्धां निघायचें नाहीं ! तरी मी म्हणतों कीं, जें झालें तें एका अर्थानें बरेंच झालें. कसें ? तर या स्थितींत ती आहे तोंपर्यंतच तुमचें काम साधायचें असलें तर साधेल.
पुन: आपलें तेंच ! मी तुम्हांला सांगितलें ना, कीं मी असा नामर्दपणा पत्करायचा नाहीं. त्यांतून ती आहे खंबीर मनाची बायको ! ती या हालाला मुळींच जुमानीत नाहीं !
हेंच तें ! आनंदराव ! अशा नाजूक कामाला इतका धार्मिकपणा काय उपयोग बरें ! अहो, ‘ येन केन प्रकारेण ’ आपलें साधून घ्यावें, आणि मग पाहिजे तितका धार्मिकपणा दाखवीत बसावें. हें पहा, असा एक साधारण नियम आहे कीं, भिडस्त, अब्रूला भिणार्या अशा बायका, प्रसंगांत सांपडल्या असल्या म्हणजे बहुतकरून तेव्हांच वश होतात.
( आवेशानें ) होत असतील. पण त्यांचें मला काय ? अशा रीतीनें तिला वश करून घ्यायचें हें काम माझ्या हातून प्राण गेला तरी व्हायचें नाहीं. माझी इच्छा पूर्ण झाली नाहीं तरी बेहेत्तर आहे. मरेपर्यंत नुसत्या आशेवरच दिवस काढीन. स्वसंतोषानें तिनें आपला देह मला अर्पण केला तरच मी त्याचा स्वीकार करीन व त्यांतच मला भूषण आहे. नाहीं तर प्रसंगांत गांठून फ़सवून - नको नको ! मला तें कर्तव्यच नाहीं !
द्या सोडून ! तुम्हांला बरें वाटेल तसें तुम्ही करा, पण मीं जें सुचविलें तें केवळ स्नेहभावानें सुचविलें, एवढें ध्यानांत ठेवा म्हणजे झालें.
तें झालें. त्याविषयीं मला शंकाच नाहीं. बरें, जातों आतां उशीर झाला.
पुढें भेट ?
अहो, नेहमींचीच आहे. ( जातो. )
( तो गेला असें पाहून आपल्याशीं ) शेंपूट आणि शिंगें नाहींत ! बाकीं खरा बैलोबा ! आम्हांला झालें तरी असलींछ देवमाणसें उपयोगीं पडतात ! तूं पाहिजे त्या मार्गानें तिला वश करून घे, माझा कार्य भाग साधला म्हणजे झालें. तुझा स्वभाव मी पक्का ओळखून आहें. तूं जसजसा आपल्या मनाचा थोरपणा दाखवीत जाशील तसतसा माझ्या मसलतीला जोरच येणार ! बरें, आतां अगोदर आमच्या भावजयीकडे जाऊं; कारण, पदरांत माप पडेपर्यंत तिच्याही तोंडावर मला वरचेवर साखर पेरली पाहिजे ! करतां काय ? ( जातो. )