[ दुर्गा व कोंडाऊ, मुलगा खेळांत गुंतला आहे. ]
दुर्गा -- कधीं नाहीं कधीं सर्वांचा शेवट हा व्हायचाच. आतां दिसतें तें म्हणजे घटकेनें दिसेल असा कांहीं नेम नाहीं. जें एकदां गेलें तें गेलें. म्हणून म्हणतें, कीं राजा काय नि रंक काय ? सर्वांची एकच वाट शेवटीं. यमाच्या दरबारांत लहान, थोर, सगळे, सारखेच, सगळ्यांना एकाच तराजूनें जोखायचें. श्रीमंती न् गरिबी या जगापुरतीच मेली. देवा ! या पापिणीचे डोले कधींरे मिटतील ! या जाचांतून मी एकदां कधींरे सुटेन ? तुला का या हतभागिणीची कींव येत नाहीं ? एकदां आपल्याजवळ घेऊन जा म्हणजे सुटलें बाबा ! ( रडूं लागते. ) पण तिथें जर का माझ्या सासर्यासारखाच कोणी निर्दय कारभारी असला तर मग आटपलेंछ ! पण देवाच्या घरीं तसें नाहीं व्हायचें. त्याला मीन् माझा सासरा दोघेंही सारखींच.
कोंडाऊ -- बाईसाहेब, असें काय बरें ? मन अम्मळ घट्ट केलें पाहिजे.
दुर्गा -- दगडापेक्षां दिखील घट्ट केलें आहेग. पण सगळ्यांनींच मला झिटकारून टाकावें, असें मीं मेलें पातक तरी कोणतें केलें आहे; तूं सांग बरें ? देवाच्याच मनांत माझे विनाकारण हाल करायचे एवढेंच; पण त्याला तरी मी काय म्हणून बोल लावतें ? पूर्वजन्मींचें माझेंच कांहीं पातक उभें राहिलें असेल तर तें भोगलें पाहिजे. अगदीं निमूटपणें भोगलें पाहिजे. असो, देवा ! तूं दीनांचा दयाळू आहेस म्हणून तुझ्यापाशीं पदर पसरून मागतें कीं, माझे तूं पाहिजे तितके हाल कर, पण माझ्या अनाथ लेंकरावर तुझ्या कृपेची सावली असूं दे. माझें म्हणून त्याच्या आजासारखी तूंही त्याची छळणूक करूं नकोस. एवढी भिक्षा मला घातलईस म्हणजे माझे कांहीं अधिक मागणें नाहीं. ( सुस्कारा टाकून ) मी मेली म्हणतें, पण तसें कुठलें व्हायला ! ( रडूं लागते. ) पायगुणांची पडलेंना मी ! ज्याच्यावर म्हणून माझें वारें पडेल त्याचें कध्धीं चांगलें व्हायचें नाहीं. कोंडाऊ तुझीच पाहिनास गोष्ट. तूं माझ्याजवळ राहिलीस, म्हणून माझ्यासारखेच तुझेही हाल चालले आहेत कीं नाहींत ! हीच जर दुसरी कुठें असतीस तर सुखांत असतीस.
कोंडाऊ -- भलतेंच कांहीं तरी. माझे मुळींच हाल होत नाहींत. यापेक्षा जरी आपल्यावर वाईट प्रसंग आला तरी मी आपल्यास सोडायची नाहीं. मरेपर्यंत तुमचीच चाकरे करीन.
दुर्गा -- बरं बाई. तुझ्याही नशिबीं कष्ट सोसायचे आहेत म्हणून तुला अशी बुद्धि होते. कोंडाऊ, तुला खरेंच सांगतें कीं, आजपर्यंत मीं जीं दु:खें भोगलीं त्यांच्या जर मला विसर पडेल तर पुढच्याबद्दल मी काडीइतकी दिखील काळजी करायची नाहीं. पण काय करूं ग ! माझ्या मनांत नाहीं नाहीं त्या भलत्या विचारांनीं एकच गोंधळ करून टाकला आहे. बघावें तिकडे मेला अंधार दिसतो ! आशा धरायला मेली जागाच उरली नाहीं. ( इतक्यांत काळ्या येतो. त्याच्याकडे पाहून ) काय बाबा ! तुला पाठविलें होतें त्याचें काय करून आलास !
काळ्या -- त्ये काय इचारू नगा बाइसाब ! काय फ़िसाकल्यावानी झालं. त्यो मंजी आदुगर मारवाड्याचा बाप ! नराम बोलून कस त्ये त्याला ठाव बी न्है इचिभन. मला बगन्याबरूबर वागावानी गुरकावूनच आला बगा अंगावर ! तवा मी बी वाइसा न्येट केला, म्होर हकडल तकडल जरा रडगान लागूनशेनी मला म्हन्ला - जा बाईला जाऊन सांग मागल्या डागिन्यावर आतां एक कवडी बी गावायची न्है. व्होवा असल पैसा तर दुसरा आनुन् ठ्येव तवा मिळल म्हनाव ! इचिभन ! सावकार म्हन्त्याती पन मांग है बगा बाईसाब. चोरावानी डोळा लावतुया मान्सावर !
दुर्गा -- समजलें. त्याच्याकडे काय आहे दोष ! माझेंच फ़ुटकें नशीब माझ्या हात धुवून पाठीशीं लागलें आहे हें ! घरांत अठरा विसवे दरिद्र, बाहेर देणेंदारांचें देणें, नशिबाचे हे असें दिवे लागले आहेत, नी मेली आशा कसलीच उरली नाहीं ! आतां माझी दशा तरी काय होणार देवा ( डोळ्यांतून पाणी काढते. ) नाहीं म्हणायला ही एक आंगठी उरली आहे. इतकें दिवस त्यांची आठवण म्हणून प्राणापलीकडे जतन करून ठेविली होती; पण जळ्ळी या पोटाची आग विझवायला ती देखील विकण्याची पाळी येऊन ठेपली ! जा बाबा काळ्या ही आंगठी घेऊन जा नी सावकारापाशीं ठेव. सगळ्यांनींच सोडलें. मग ही तरी कशी राहील ! ( काळ्या जातो. ) ( दुर्गा मुलास म्हणते ) बाळ्या ! कां आलास बाबा माझ्या पोटीं. तूं जन्माला आलास, तेव्हां सुद्धां मला इतके कष्ट झाले नाहींत; पण आतां तुझ्या मायेमुळें मला फ़ार कष्ट होतात. माझ्या मरणाच्या भीतीपेक्षां तुझें पुढें कसें बोईल ही मला मोठी भीति पडली आहे. ( कोंडाऊस ) पण तो कुठें माझ्याकडे पाहतो आहे ? खेळाच्याच नादांत दंग होऊन गेला आहे. माझ्या पोटांत काय वणवा पेटला आहे तें त्याच्या गांवीं देखील नाहीं ! आणि तेंच बरें आहे बाबा ! ( क्षणभर त्याच्याकडे संचितपणें पाहून ) खरोखर अशा विचारांनीं मला खुळ लागेल. बरें, विचार करून तरी काय उपयोग ? सुख नाहीं तें नाहीं, नी जिवाला उलटा त्रास मात्र अधिक होतो. ( इतक्यांत काळ्या धांवत धांवत येतो. )
काळ्या -- लई वंगळ येळ येऊन्शेनी ठ्येपली बाइसाब ?
दुर्गा -- अरे असें झालें तरी काय ?
काळ्या -- आंगठी घेऊनशेनी मी त्या सावकाराच्या घराकड निगालों इतक्यांत वाटमंदीच त्यो मला भ्येटला त्येच्या बरुबर दुसरबी दोग तीग हैती. आपुन् घरी हैसा का म्हुन् मला इचारल. मी बी हैती ह्मंतल. तवा मला ह्मोरं घालून माज्या मागून येऊन खालीं आंगनांत उब र्हायल्याती. कोतवाल्च शिपाईबी हैती बरुबर. ह्मोर कंचा इचार ?
दुर्गा -- विचार कसलान् काय कसलें घेऊन बसलास ? मेलें व्हायचें असेल तें होईल. कपाळीं लिहिलें असेल तितकें भोगलें पाहिजेना ? ( इतक्यांत तुळाजीराव येतो. )
तुळाजी -- वयनी! ज्यानें तुझ्या जन्माची माती माती करून टाकली त्या निर्दत बापाच्या पोटीं मी उत्पन्न झालों म्हणून तुला वयनी या नांवानें हांक मारायची सुद्धां मला लाज वाटते! मी कसा आहें व बाबांचें हें निंद्य आचरण मला कितपा आवडतें याची तुला खात्री अचेलच. मीं होऊन तें सांगितलें पाहिजे असें नाहीं. बरें अडचणीच्या वेळीं माझा कांहीं तुला उपयोग होण्यासारखा आहे कां ? ( ती बोलत नाहीं असें पाहून ) बाबांचा मला विशेष संताप यायला आणखी एक कारण झालें आहें. तें कोणतें म्हणशील, तर आजचा हा वाईट प्रसंग तुझ्यावर येणार हें त्यांना पूर्वीपासून ठाऊकासून, त्यांनीं मला तुझ्यापासून जामीन होऊं नकोस म्हणून अगदीं निक्षून सांगितलें आहेो. काय करू ! मी मोठ्या पेंचांत सांपडलों आहें. तुला प्रसंगीं उपयोगी पडूं, कीं बाबांची मर्जी सांभाळू? हें तुला विचारतों. बाकी मला वाटतें कीं, या कामीं बाबांचा सल्ला अगदीं कुचकामाचा आहे.
दुर्गा - भाऊजी, माझ्यावर तुमचें इतकें लक्ष आहे हेंच मी फार समजते. आतां माझें तुम्हाला सांगणें इतकेच कीं , त्यांनी मामंजीचे मन दुखविलें तर केवढा अनर्थ झाला हें लक्षात आणा. नी तुम्ही तरी तसे करु नका. नाही तर माझ्यासाठी तुमचें मात्र नुकसान होईल.
तुळाजी० -तें खरें . बाबा एवढयावरुन माझें नुकसान करायला मागें पुढे पाहायचे नाहीत ही मला खात्री आहे. पण अशा वेळी जर मी तुझ्या उपयोगीं पडलो नाहीं तरं तू मला काय म्हणशील ? ( इतक्यात खालीं गलबला होतो .)
दुर्गा - भाऊजी , कुणी काही म्हणत नाहीं. तुम्ही उगीच माझ्याकरीतां संकटात पडूं नका.
तुळाजी० - बरे अगोदर ते खाली ओरड्त आहेत त्यांना दोन शब्द सांगून बघतो. तोंपर्यत तूं काही तोड काढू ठेव. ( असें म्हणून जातो)
दुर्गा - आतां कसली कपाळाची तोड काढूं ! दैवच काय करील तें करील. मरणालासुध्दा मी भीत नाही. होय तर काय मेलें ! अगबाई ! ते आले वाटतें काळ ! ( कोंडाऊ , दुर्गा, मुलगा सर्व आतल्या खोलीत जातात. )