तृतीय पटल - योगानुष्ठानपद्धतिर्योगाभ्यासवर्णन ५
महायोगी आदिनाथ श्रीमहादेव विरचित " शिवसंहिता " हा ग्रंथ देवी पार्वतीने विचारलेले प्रश्न व त्या प्रश्नांना श्रीशिवांनी दिलेली उत्तरे या प्रश्नोत्तरांच्या रूपाने अवतरित झाला आहे.
श्रीशंकर म्हणतात हे देवी पार्वती ! आता मी क्लेश नाहीसे करण्याकरिता प्राणवायूचे साधन सांगतो. यामुळे या संसारचक्रात प्राप्त होणार्या रोगांचा निश्चितपणे नाश होतो. याचा अर्थ असा की, साधन करताना साधकाने मानसिक व शारीरिक दृष्ट्या निरोगी किंवा स्वस्थ असणे आवश्यक आहे. तो जर असा नसेल; तर साधनात त्याचे चित्त लागणार नाही. या करिता श्रीशंकर रोगनाशक उपाय कथन करीत आहेत.
ज्यावेळी बुद्धिमान् साधक जीभ टाळूच्या मुळाशी चिकटवून प्राणवायूचे सेवन करील अर्थात् या प्रकाराने प्राणवायू तोंडाने आत घेऊन नाकाने सोडील त्यावेळी त्या साधकाच्या सर्व रोगांचा नाश होईल. ( जिभेचे पुढील टोक पुढील दाताच्या टाळूच्या टोकाला चिकटवून सर्व जीभ टाळूला चिकटवावी व नंतर तोंड किंचित् उघडे ठेवून श्वास आंत घ्यावा व नाकाने तो सोडावा. असे रोज सकाळ संध्याकाळ केले म्हणजे शरीर निरोगी राहते. )
प्राणापान विधिविधान जाणणारा साधक कावळ्याच्या चोचीसारखा तोंडाचा आकार करून म्हणजे कावळ्याच्या चोचीप्रमाणे ओठ लांब करून शीतल वायूचे पान करतो तो साधक निश्चितपणे मुक्तीला योग्य होतो. यालाच शीतली प्राणायाम म्हणतात.
जो साधक नित्य ( वर कथन केलेल्या ) विधीप्रमाणे रसासहित वायूचे पान करतो त्याचे सर्व रोग, श्रम, दाह व वृद्धावस्था इत्यादींचा शीघ्र नाश होतो. याचा अर्थ असा की, अशा प्रकारे तोंडाने वायू आत घेऊन तो नाकाने सोडण्याचा अभ्यास करणार्या साधकाचे सर्च रोग नष्ट होतात अर्थात् कोणताही रोग त्याच्या जवळ फ़िरकतही नाही.
जीभ वर करून म्हणजे ती उलटी करून किंवा फ़िरवून ब्रह्मरंध्राच्या मार्गात नेऊन अर्थात् खेचरी मुद्रा करून जो योगी चंद्रापासून पाझरणार्या अमृतरसाचे पान करतो तो साधक योगी निश्चितपणे एक महिन्यात मृत्यूला जिंकतो. याचा अर्थ असा की, खेचरी मुद्रा करणारा साधक दीर्घजीवी होतो व तो मृत्यूला घाबरत नाही.
खालील दाताने राजदन्ताला दाबून धरून जो साधक त्याच्या छिद्रातून विधीपूर्वक वायूपान करतो म्हणजे खालील दात वरील दातांशी दाबून धरून ओठ किंचित् विलग ठेवून वायू आत ओढून घेतो आणि नंतर नाकाने सोडतो व त्याचवेळी अर्थात् ही क्रिया करीत असतानाच कुंडलिनी देवीचे ध्यान करतो तो सहा महिन्यात कवी होतो.
वर सांगितलेल्या काकीमुद्रेच्या विधीने जो साधक दोन्हीही संध्यांमध्ये म्हणजे सकाळी व संध्याकाळी सुषुम्नानीडी चालू असताना अर्थात् इडा व पिंगला या दोन्ही नाड्यांमधून प्राण समान रीतीने वाहत असताना कुण्डालिनीच्या मुखाने ध्यान करीत प्राणवायूचे पान करतो त्याचा क्षयरोग नाहीसा नाहीसा होतो.
जो बुद्धिवान् योगी कावळ्याच्या चोचीसारखी मुद्रा करून दिवसा व रात्री प्राणवायूचे पान करतो त्याचे सर्व रोग निश्चितपणे नाहीसे होतात. अशा योगीसाधकाला दूरचा शब्द श्रवण करण्याची शक्ती व दूरदर्शनाची क्षमता प्राप्त होते. या प्रमाणेच सूक्ष्म वस्तू पाहण्यासही तो समर्थ होतो. ॥९०॥
जो मेधावी साधक दातांनी दात घट्ट दाबून धरून हळूहळू वायुपान करील अर्थात् शीतली प्राणायाम करील आणि जीभ वर करून अर्थात् खेचरी मुद्रेने अमृतपान करील तो मृत्यूला लवकर जिंकेल.
जो योगी - साधक कर कथन केलेला शीतली प्राणायामाचा अभ्यास सहा महिने पर्यंत प्रत्येक दिवशी निष्ठेने करील तो सर्व पापांपासून मुक्त होईल व त्याच्या सर्व रोगांचा नाश होईल. जर त्याने हा अभ्यास एक वर्षभर केला; तर तो निश्चितपणे मृत्यूला जिंकतो. या करिता योगसाधन करणार्या मुमुक्षू साधकाने अत्यंत प्रयत्नाने किंवा चिकाटीने या साधनाचा उपयोग करावा. जर अशा प्रकारे या शीतली प्राणायामाच्या साधनाचा तीन वर्षपर्यंत अभ्यास केला; तर तो साधक निश्चितपणे साक्षात् भैरव म्हणजे शंकर होतो. याचा अर्थ असा की, शंकरासारखे सामर्थ्य त्याला प्राप्त होते. या बरोबरच त्याला अणिमादि अष्टसिद्धींची प्राप्ती होते आणि सर्व भूतगण स्वत:हून आपोआप त्याच्या ताब्यात येतात.
जर जीभ वर करून अर्थात् खेचरी मुद्रा लावून योगी त्या अवस्थेत अर्धाक्षणही राहिला तर तो रोग, मृत्यू व वार्धक्यादि सर्वांपासून एका क्षणात मुक्त होतो किंवा या सर्वांचा नाश होतो. याचा अर्थ असा की, खेचरी मुद्रेच्या द्वारा स्वल्प अमृतपान घडले, तरी साधक अमर होतो.
श्रीशिव म्हणतात, हे देवी पार्वती ! जो साधक जिभेला प्राणासहित पीडीत करून म्हणजे खेचरीमुद्रा लावून त्याचवेळी प्राणसंयमन करून ब्रह्मरंध्रात ध्यानात स्थिर होईल त्याचा मृत्यू होऊ शकणार नाही, हे माझे नितान्त सत्य आहे.
अशा प्रकारच्या शीतली प्राणायामाच्या योगाभ्यासाने साधक योगी दुसरा कामदेवच होतो अर्थात् कामदेवासारखा रूपलावण्ययुक्त होतो आणि क्षुधा, तृषा, निद्रा व मूर्च्छा या गोष्टी त्याच्या ठिकाणी उपस्थित होत नाहीत अर्थात् या गोष्टींची पीडा साधकाला होत नाही.
अशा प्रकारच्या विधिविधानाने शीतली प्राणायामाचा योगाभ्यास करणारा योगी संसारातील सर्व दु:खांपासून किंवा आपत्तींपासून मुक्त होऊन तो आपल्या स्वत:च्या इच्छेप्रमाणे आचरण करण्यास समर्थ होतो. याचा अर्थ असा की, सर्वतंत्रस्वतंत्र असा योगी कोणत्याही प्रकारच्या आपत्तीत सापडत नाही. अशा रीतीने अभ्यास करणार्या योग्याला पुनर्जन्म येत नाही व तो कोणत्याही प्रकारच्या पापपुण्यात लिप्त होत नाही. तो दिव्य लोकात विचरण करण्यास समर्थ होत असल्याने देवदेवतांच्या बरोबर अनन्तकालपर्यंत आनंदाने राहतो. याचा अर्थ असा की, साधक योगी सर्व प्रकारे सामर्थ्यसंपन्न होऊन सर्व दिव्य गोष्टींची प्राप्ती करून घेतो.
जरी योगासनांचे खूप प्रकार असले म्हणजे ८४ लाख आसने असली; तरी त्यातील चौर्याऐशी आसने प्रमुख आहेत. त्यातही जी चार आसने अत्यंत प्रमुख आहेत ती कथन करतो. सिद्धासन, पद्मासन, उग्रासन व स्वस्तिकासन ( अशी या चार प्रमुख आसनांची नावे आहेत. ) याचा अर्थ असा आहे की, सर्व आसनांमुळे नाडीशुद्धी होत असली; तरी वरील चार आसने अत्यंत सरळ, सोपी व उपयोगी असल्याने त्यांच्या द्वारा प्राणवायू सहजतेने वश होऊन त्यासाठी अधिक कष्ट करावे लागत नाहीत आणि सुषुम्नानाडी शीघ्रतेने वश होते. ॥१००॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP