तृतीय पटल - सिद्धासनकथनम्
महायोगी आदिनाथ श्रीमहादेव विरचित " शिवसंहिता " हा ग्रंथ देवी पार्वतीने विचारलेले प्रश्न व त्या प्रश्नांना श्रीशिवांनी दिलेली उत्तरे या प्रश्नोत्तरांच्या रूपाने अवतरित झाला आहे.
योगवेत्त्या साधकाने डाव्या किंवा उजव्या पायाची टाच योनीस्थानी म्हणजे गुदा व लिंग यांच्या मध्यभागी शिवणीवर दाबून घट्ट बसवावी. नंतर दुसर्या पायाची टाच लिंगाच्या मूलस्थानापाशी येईल अशी ठेवावी व भ्रूमध्यात दृष्टी निश्चल किंवा स्थिर करावी. नंतर जिंतेंद्रिय होऊन म्हणजे इतरही सर्व इंद्रिये संयत किंवा वश करून शरीर सरळ - ताठ करून म्हणजे पाठीचा कणा सरळ किंवा ताठ ठेवून व वेगवर्जित किंवा वेगरहित होऊन बसावे. याचा अर्थ असा की, सर्व शरीर व इंद्रिये ही भोगासाठी स्वभावत: ओढ घेत असल्याने त्यांना एक प्रकारचा वेग अर्थात् बहिर्मुखता प्राप्त झालेली असते. यासाठी साधनाला बसताना मन व शरीराला कोणत्याही प्रकारे भोगवासनेचा वेग, आवेश किंवा उत्तेजना येणार नाही याची काळजी घेऊन बसावे. सिद्धांनाही सिद्धी देणार्या या आसनाला सिद्धासन असे म्हणतात.
अशा प्रकारे सिद्धासनात बसून साधनाभ्यास करता करता योगाने उपस्थित होणारी निष्पत्ती अवस्था म्हणजे ज्ञानावस्था अत्यंत लवकर प्राप्त होते. या करिता वायू किंवा वश करण्याचा अभ्यास करणार्या साधकाने सिद्धासनावर बसून नेहमी साधनाभ्यास करावा. या साधनाच्या प्रभावाने साधक संसारसागर ओलांडून परमगती अर्थात् मोक्ष किंवा मुक्ती प्राप्त करतो. या भूतलावर सिद्धासनासारखे सर्वश्रेष्ठ व अत्यंत गुप्त असे दुसरे आसन नाही. या आसनाच्या नुसत्या ध्यानानेही योगी सर्व पापांपासून मुक्त होतो. याचे तात्पर्य असे आहे की, हे आसन अत्यंत उपयोगी व तत्काल फ़ल देणारे आहे. हे आसन सिद्ध झाल्यावर योग्याला सर्वप्रकारच्या लाभाची किंवा ऐश्वर्याची प्राप्ती होते.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP