अंक दुसरा - प्रवेश तिसरा

नाट्याचार्य देवलांच्या ’ संगीत मृच्छकटिक ’ ह्या नाटकाचा पहिला प्रयोग सन १८८७ सालीं ’ ललितकलोत्सव मंडळी ’ नें, पुणें येथें आनंदोद्भव नाट्यगृहांत केला.


संवा० : आर्ये , ज्याअर्थी तूं माझ्यावर एवढा उपकार केलास, त्याअर्थी प्रत्युपकार म्हणून जी कला माझ्यापाशी आहे ती तुझ्या दासीजनाला शिकवितो.
वसंत० : आर्या , ज्याच्याकरतां ही कला शिकवायची त्याची शुश्रूषा आपण केलीच आहे; तशीच पुढें करावी म्हणजे झालें .
संवा० : ( मनांत ) हिनें तर आपल्याला झिडकारालें , आतां प्रत्युपकार कसा
करावा ! ( उघड ) आर्ये , माझा तूं अपमान केलास , तर आतां मी जती होतो.
वसंत० : आर्या, असें साहस करुं नये.
संवा० : जो निश्चय झाला तो काही ढळवायचा नाही. ( इकडे तिकडे
फिरुन) इतके दिवस द्युतकार होतों म्हणून रस्त्यातून हिंडायची लाज वाटत असे ; आतां भर राजमार्गातून उघड्या बोडक्यानेसुध्दां हिंडायची भीति नाही.
नमो बुध्दाय. ! ( पडद्यात गलबला होतो. )
संवा० : ( ऐकून ) काय म्हणतां ? वसंतसेनेचा स्तंभभंजक हत्ती
मत्त होऊन सुटला आहे, तर मग तो जाऊन पहावा तरी -- अथवा हत्ती पाहून आपल्याला काय करावयाचें आहे ? आपला जो निश्वय झाला तो ढळावयाचा नाही. ( जातो . )
( शिपायाचा वेष घेतलेला हर्षयुक्त कर्णपूरक येतो. )
कर्णपूरक : कोठें , कोठें आहे आर्या वसंतसेना  ?
मद० : अरे ए दांडग्या , तूं इतका बावरलास कां ? ताईसाहेब तुझ्यासमोर असून पहात नाहींस, आणि कोठें आहे - कोठें आहे म्हणतोस हें काय ?
कर्ण० : ( वसंतसेनेला पाहून ) आर्ये , तुला प्रणाम करतो.
वसंत० : कर्णपूरका, तुझ्या मुखश्रीवरुन तूं फार संतोषांत आहेस असें दिसतें .
कर्ण० : आर्ये , तूं या कर्णपूरकाचा पराक्रम नाही पाहिलास ? घालविलीस संधि.
वसंत० : अरे , असा पराक्रम तरी कोणता केलास ?
कर्ण० : आज असें झालें . तुझा खेळावयाचा जो स्तंभभंजक नावांचा दुष्ट हत्ती , तो मत्त होऊन , सांखळदंड तोडून , महाताला मारुन , राजमार्गांत आला. तेव्हां , अरे धावां , पळा , पोरें उचला घरावर चढा , झाडावर चढा , नाहीतर प्राणास मुकाल, अशी चोहोकडें एकच ओरड झाली. त्या दुष्ट हत्तीनें पायातींल पैंजण , तोरड्या , गळ्यांतल्या रत्नांच्या माळा तोडून फेंकून दिल्या ; आणि दांत, पाय, सोंड यांनीं , प्रफुल्लित अशा उज्जयिनी नगराचा विध्वंस मांडला व राजमार्गातून जाणारा एक जती गांठला. त्याचा दंडकमंडलू फोडून तोंडातल्या थुंकीने त्याला भिजवून टाकिलें आणि दांतांनी त्याला उचलून घेतले. हें पाहताच , अरेरे ! जती मेला, अशी चोहोंकडें एकच ओरड झाली.
वसंत० : ( घाबरुन ) अग बाई ! मग ?
कर्ण० : आर्ये , घाबरुं नकोस. पुढचा वृत्तांत तर ऐक . तो मत्त गज , एका दांतावर तुटका सांखळदंड व एका दांतांवर तो जती घेऊन चालला , असे पाहून या कर्णपूरकांने, छे -छे, आर्येच्या अन्नानें पुष्ट झालेल्या दासानें , लोहाराच्या दुकानातून एक पहार घेतली आणि त्या दुष्ट गजाला हांक मारली.
वसंत० : मग पुढें ?
कर्ण० : मग विध्य पर्वताच्या अति उच्च शिखरासारख्या त्या गजाला पहारेचा प्रहार करुन त्याच्या दांतांच्या संधीत सांपडलेल्या तो जती सोडविला .
वसंत० : शाबास ! कर्णपुरका , खरा पराक्रम केलास !
कर्ण० : त्या वेळेस, शाबास ! कर्णपुरका ,शाबास ! असे म्हणत सारी उज्जयिनी नगरी माझ्याभोवती मिळाली . तेव्हां , जशी नावेत गच्च मनुष्य भरावी , तशी माणसांची तेथे गर्दी झाली. त्या दाटीत एक पुरुष होता. त्यांने कर्ण , कंठ , मनगट , इत्यादि जी भूषणांची स्थाने ती चांचपून , तेथे काहीं नाही असे पाहून आकाशाकडे दृष्टी लावून दीर्घ श्वास सोडला व अंगावरला शेला काढून माझ्या अंगावर फेंकिलां ; तो हा पहा.
वसंत० : कर्णपुरका , त्या शेल्याला जाईच्या फुलांचा वास आहे का पहा.
कर्ण० : आर्ये , माझ्या नाकांत हत्तीच्या मदाचा गंध शिरला आहे . यामुळे
मला वास येत नाही.
वसंत० : बरें त्यावर कोणाचे नाव आहे का पहा.
कर्ण० : यावर नांव आहे , पण मला वाचता येत नाही.
वसंत० : आण इकडे पाहूं . ( शेला घेऊन वरचें नाव वाचून ) अगबाई, यावर चारुदत्ताचे नाव आहे.  ( शेला पांघरते. )
मद० : कर्णपुरका हा शेला ताईसाहेबांच्या अंगावर चांगला शोभतो नाहीं ?
कर्ण० : चांगला शोभतो, पण कोणाचा हा ?
वसंत० : कोणाचा ! कर्णपुरका , या शेल्याबद्द्ल मी तुला दुसरें काही देतें .
( कंकण देतें . )
कर्ण० : ( कंकण घेऊन मुजरा करतो. )
मद० : ( त्याच्या कानांत ) हा शेला श्रेष्ठ चारुदत्ताचा समजलास !
कर्ण० : ( मदनिकेला ) आतां मात्र हा शेला ताईसाहेबांच्या अंगावर चांगलाच शोभतो !
वसंत० : कर्णपुरका , हल्ली तो पुरुष कोठें आहे बरें ?
कर्ण० : या - याच रस्त्याने गेला.
वसंत० : मदनिके --
माडिवरी चल ग गडे जाउं झडकरी ॥
पाहूं सदय दानशूर मूर्ति ती बरी ॥धृ०॥
मी अधीर दर्शनासी फार अंतरी ॥
होईल सुख मजसि तया पाहिल्यावरी ॥१॥ ( जातात. )

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP