“ मसालेदार ! ताजा चिवडा ! ”
हेच त्याचे नेहमीचे शब्द आणि हीच त्याची नेहमीची वेळ. संध्याकाळी पाच साडेपाचाच्या दरम्यान असा हा रोज आमच्या गह्रासमोरून जात असतो. पायात फाटकी वहाण, तीही नेहमीच असते असे नाही ! सतरा ठिकाणी शिवलेले मळकट धोतर, अंगात गुंड्या तुटलेला सदरा, डोक्याला काळी मेणचट झालेली टोपी, आणि हातात तो चिवड्याचा डबा. वय, चाळिशी उलटली असेल किंवा नसेल.
पण थांबा ! घराशेजारी आलाच तो ! ऐकलेत ? -
“ ए ! इकडे, इकडे ये ! थांब रे ! बाबा, हाक मारू ? घ्यायचा ना चिवडा ? ”
“ काही नको ! रोज उठून काय मेला तो घ्यायचा चिवडा ! ”
“ असू दे ग ! पोर आहे ! दे रे एक दोन पैशांचा चिवडा ! ”
अर्थात हे कोण बोलले, ते सांगायला नकोच. आई, बाप, आणि एकुलते एक सहा सात वर्षांचे मूल ! कृष्णाबाई ही सखारामपंताची तिसरी बायको, आणि बापू हा एकच एक त्यांच्या जिवाचा आधार. बापूचे वडील हे येथील स्टेशनवर पार्सल् क्लार्क आहेत.. नोकरी बरीच वर्षे झालेली. साठ सत्तर रुपये पगार. अवांतर रोजची काही वर मिळकत. सत्तेचे दोनखणी दुमजली घर ! कोणाचे एकं ना दोन !
“ रोज उठून मेला तो चिवडा खायचा ! आजारी पडशील ना ? शाळेत जायला नको, काही नको ! ”
“ नाही जात जा ! ”
हे उलट चिरंजीवाचे मातुःश्रीस उत्तर ! पहा कसा दारात ऐटीत उभा आहेत तो !
परवापासून त्या माडीच्या खिडक्या बंद आहेत !
का बरे ? सखारामपंत आजारी तर नाहीत ? - असतील. कारण साठीच्या जवळजवळ आलेले; शिवाय दम्याची व्यथा. सकाळी डॉक्टर येऊन गेले, संध्याकाळीही येऊन गेले, आणि आताही - दहा वाजले. दाराशी मोटार उभी आहेच.
थांबा, शेजारचे ते गणपतराव मोटारीपाशी उभे आहेत. त्यांनाच जाऊन हळूच विचारू काही तरी भानगड दिसते आहे !
“ सखारामपंच अत्यवस्थ आहेत ! श्वास लागला आहे. ”
“ असे ! तरीच कृष्णाबाई सारख्या डॉक्टरकडे - ”
इतुके आमचे कुठे बोलणे होते तोच -
“ अरे बाप्या ! आता तुझे कसे रे होईल !! ” हे हृदयभेदक उद्गार आणि त्यांच्याबरोबरच तो मातेचा हंबरडा !
गेले सखारामपंत !
आजचा पाचवा दिवस. बिचार्या कृष्णाबाईचा आणि आपल्या बापूचा सगळाच आधार तुटला ! त्याला काका मामा कोणी आहेत म्हणावे, तर तेही नाहीत ! नाही म्हणायला एक मावशी आहे. आजच सकाळी ती सोलापुराहून आली आहे. पण तिचा तरी काय आधार ? कारण सोलापुरास कोणी प्रसिद्ध वकील आहेत, त्यांच्या येथे ही स्वयंपाकाला असते ! कृष्णाबाईंची ही वडील बहीण.
आणि बापू ? बापूचे हे हसणे गेल, दारात उभे राहण्याची त्याची ती ऐट गेली, सगळे काही गेले ! दिवसभर दारात उभा आहे. आणि सारखा त्या पिंपळाकडे, आणि मारुतीच्या देवळाकडे पहातो आहे !
“ चिवडा ! मसालेदार ! चिवडा ! ”
पहा ! आलाच तो रोजचा चिवडेवाला ! त्याच्या ओरडण्यात किंवा पोशाकात, कुठे म्हणून फरक नाही !
मग फरक कशात पडला आहे ?
झपझप पावले टाकीत तो पहा बापूच्या दारासमोर आला. आता ? -
“ मसालेदार ! ताजा चिवडा ! ”
असे म्हणून त्याने किंचित् थबकल्यासारखे केले, आणि सहज बापूकडे पाहिले, आणि उलत बापूनेही, त्याच्याकडे पाहिले. पण हूं की चूं नाही आणि पाहिले तेही क्षणभरच ! आता इतक्यात देवळातली घंटा वाजली, तेव्हा त्याची नजर तिकडेच फिरली आहे !
इकडे “ मसालेदार ! मसालेदाssर ! ” म्हणत चिवडेवाला मुकाट्याने निघून गेला.
‘ मासिक मनोरंजन ’ एप्रिल १९२४