नाटक संपायला जवळ जवळ तीन वाजले. गर्दी तर काही पुसूच नका. धक्काबुक्की करीत मार्ग काढणे माझ्यासारख्याला थोडेच जमते आहे ? तेव्हा किर्लोस्कर नाटकगृहाच्या आतल्या बाजूला माझी चांगली पंधरावीस मिनिटे तरी मोडली असती,. शिवाय काही केल्या पायच लवकर माझे निघेनात तिथून !
बाहेर पडलो, आणि नानावाड्याला वलसा घालून बिनीवाल्यांच्या वाड्यापाशी आलो. सावकाश मजेत चाललो होतो. वेळ रात्रीची. वाराही छान सुटलेला, आणि चांदणे तर असं काही बहारीचे पडले होते की, वा रे वाः ।
“ खरंच ? नाटक किती झकास झालं नाही ? ” असे म्हणून चार पावले पुढे असलेले गृहस्थ थांबले आणि चालू लागले मजबरोबर. साधा पोशाख, मध्यम उंचीचे, जवळजवळ माझ्याच वयाचे होते म्हणायचे.
मी म्हटले, “ वा ! हे काय बोलणं ! अहो नाटक तर झालंच चांगल, आणि गाणं ? ” यावर लगेच ते म्हणतात, “ ते तर काही पुसूच नफा ! किती मन लावून, आणि काय जीव तोडून गाणं हो हे ! ”
“ खरं आहे. ” मी म्हणालो, “ असं क्कचित् ऐकायला सापडतं ! ”
“ पुन्हा आश्चर्य हे की, नाटक हे इतक्या वेळा होऊन गेले आहे ना ? पण गर्दी काही कमी नाही ! ‘ स्वयंवर ’ म्हटलं, की लहान मोठे जीव कसे भराभरा गोळा होतात ! मग काय इतकी त्यात जादू... ”
मी म्हणालो, “ नाटकात म्हणण्यापेक्षा त्यतल्या गाण्यात म्हणा हवी तर ! अहो, त्याचंसुद्धा वेड काही कमी नसतं ! एकदा का ते जडलं, की मग जिवंतपणीच काय, मनुष्य मेल्यावर सुद्धा... ”
हे ऐकताच तो गृहस्थ काय पण दचकला !
“ का ? का बरे दचकला ? ”
लगेच तो हसून म्हणतो, “ बरोबर आहे ! म्हणता ते अगदी खरं आहे. माझंच उदाहरण घ्या की... ”
इतके होते आहे, तो फुटक्या बुरुजावरून शनवार मारुतीकडे जाणार्या रस्त्यापाशी आम्ही आलो.
ते म्हणाले, “ तुम्हाला कुणीकडे... इकडे बावडेकरांच्या वाड्याकडे का जायचं आहे ? ”
“ नाही. या रस्त्यानं समोरच मला मारुतीच्या पाठीमागं जायचं आहे. ”
“ तसं असले तर फारच छान ! ” ते म्हणाले, “ मलाही तिकडेच... ओंकारेश्वरच्या बाजूला जायचं आहे. ”
“ ओंकारेश्वराच्या बाजूला ? ” मी विचारले, “ आपलं नाव काय बरं ! ”
पण त्याने सांगितलेले नाव ऐकताच मी अंमळ घोटाळ्यात पडलो. मनात म्हटले, “ या नावाचा मनुष्य, मला वाटतं, चार वर्षांपूर्वी... एका भयंकर अपघातात... ”
“ का ? विचारात कसल्या पडला ? ” असे किंचित् घाबर्या घाबर्या म्हणत तो चालूच लागला.
पाठोपाठ मीही निघालो. पुढे दोघेही आम्ही पहिल्याप्रमाणे सावकाश चालू लागलो. दोन तीन मिनिटे कोणीच काही बोलले नाही !
ते म्हणाले... “ ‘ स्वयंवर ’ नाटक हे आपल्या पुण्याच्या रंगभूमीवर नुकतेच आलं होतं तिसरा... किंवा चौथा प्रयोग असेल शनिवारची रात्र होते येवढी गोष्ट मात्र नको; मी आणि... बायको असे उभयता आम्ही नाटकाला गेलो. तिकिटे बर्यापैकी काढली होती, आणि बसलो होतो तेही जवळ जवळच... ”
असे म्हणून क्षणभर ते थांबले, हातरुमाल काढून त्यांनी डोळे पुसले, आणि सांगू लागले पुढे, “ गर्दी अलोट, आणि नाटक खूपच रंगत चाललं होतं. कृष्णचरित्र आणि तेही इतक्या गोड कंठानं आणि जिवाभावानं गायलेलं. ऐकणाराचं अंतःकरण कसं अगदी भरून चाललं होतं ! रुक्मिणीचं एक पद चाललेलं, तेव्हा ते आमच्या राणीसरकारांना कितपत आवडतं आहे हे पाहण्याकरिता मी वळलो मात्र, तो काय सांगू तुम्हाला ! डोळे असे किती भरून आले होते तिचे... ! ”
“ होतं बुवा असे ! ” मधेच मी म्हटले, “ खरं गाणं म्हणतात ते मला वाटतं अशालाच. ”
“ तशीच ती दिसतही किती प्रसन्न होती ! तेच... तेच गोड चित्र दिसावं, जवळ ती असल्याचा भास व्हावा, म्हणून तर इतका जीव टाकीत मी पुनः पुन्हा... ! ”
पुढे बोलवेचना त्यांच्याने मारुतीने दर्शन घेऊन आम्ही ओंकारेश्वराकडे वळलो. आमच्याशिवाय दुसरे तिसरे कोणी नव्हते रस्त्यात.
“ झालं ! ” पुन्हा ते सांगू लागले. “ ऐकावं तिकडं मग ज्याच्या त्याच्या तोंडी या ‘ स्वयंवरा ’तली पदं. आम्हीही, वरचे अर ग्रामोफोनवर लावीत असू ती गाणी. पण... काय असेल ते असो, नाटक पाहून आल्यापासून तिला चैनच पडेनासं झालं ! बरं, घरात म्हणावं तर काही कमी नव्हतं. सगळं तिच्या मनाजोगं होतं. असं असून... ”
मारुतीमागील तिवाढ्यावर आलो, आणि थांबलो तिथे आम्ही. मधोमध रस्त्यात उभे होतो.
“ इथं रहाता का तुम्ही ? ” माझ्या घराकडे बोट करून ते म्हणाले, “ झालंच बरं का माझं पुढं.. त्या दिवसापासून बायको जी कोमेजत आणि खंगत चालली ती काही केल्या म्हणून... विचार विचारून रडकुंडीस आलो मी ! पण तिचं तिलाच जिथं उलगडेना, तिथं ती बिचारी काय सांगणार दुसर्याला ! अखेरच्या वाताच्या झटक्यात वरचेवर ती म्हणे, ‘ ती पहा ! यमुनेच्या काठी आपले गोपालकृष्ण आणि गोपगोपी खेळताहेत ! कसं गोड गाणं चाललं आहे नाही ? यायचं ना मग तिथं ? - ”
असे म्हणताच तो गृहस्थ काय पण गहिवरून आला ! खांद्यावर हात ठेवून मी समाधान करायला जातो आहे तो चालायलाच लागला.
मीही आमच्या खिडकीकडे, कोणाला तरी हाक मारून उठवायला म्हणून वळलो. पावले दोन पावले गेलो असेन, तो... काय वाटले कुणास ठाऊक ? चटकन् मागे फिरलो आणि ओंकारेश्वराच्या रस्त्याने हळूहळू चालू लागलो.
इकडे तिकडे पहात मनात म्हटले, “ आश्चर्य आहे ! इतक्यात हा गृहस्थ... क्षणा दोन क्षणात गेला तरी कुठं ? आसपासची गह्रं तर बंदच आहेत. काहीच कुठं हालचाल दिसत नाही ! मग हे बुवाजी... आले कुठून, आणि गेले कुठे ? ”
असे म्हणून आजूबाजूला जो नीट न्याहाळून पहातो आहे तो ... जवळून... बरं का ?... अगदी जवळून... कुणी तरी भर्रकन् धावत गेल्याचे... !!
‘ रत्नाकर ’ गंधर्व अंक, जुलै ‘१९३१