हो, तिथंच. शनवारात नातूंच्या हौदाजवळ जो दुमजली निळा वाडा आहे, तिथंच मी म्हणतो ते नीलकंठराव राहात असतात. वयाने साठीच्या आत बाहेर असतील नसतील. मनुष्य खाऊन पिऊन तसा सुखी आहे. पण बरोबरीचे स्नेहीसोबती म्हणावेत, तर ते काही फारसे कोणी दिसत नाहीथ त्यामुळे शाळेतले काम संपले की, आपले घर बरे, आणि आपण बरे, ही त्यांची नेहमीची वृत्ती.
गेल्या रविवारचीच गोष्ट. दर रविवारी सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान चहाला मी तिथं हजर असायचे हे आमचे ठरलेले. म्हणून दिवाणखान्यात जाऊन, नेहमीप्रमाणे कोटटोपी काढून ठेवली आणि गालिच्यावर ‘ ज्ञानप्रकाश ’ चा अंक पडला होता. तो घेतला आणि वाचू लागलो. जवळच निलकंठराव लहानसे पोथीसारखे काहीतरी वाचीत होते आणि तेही अगदी मनापासून ! तेव्हा दोन तीन मिनिटे तरी ‘ या, बसा ’ पलीकडे काहीच आमचे बोलणे झाले नाही.
“ का तुमचे बापूसाहेब नाही आले वाटते ? ” असे हसत हसत, आणि पुस्तक मिटवीत त्यांनी मला विचारले.
मी म्हटले, “ नसतील आले. ते आपल्या संस्थेचे तहहयात सभासद झाले आहेत तेव्हा आता सारखी कामे. आताच साडेआठच्या सुमाराला - त्यांच्या कार्यकारीमंडाची, मला वाटते, बैठक आहे ! ”
इतके मी बोलतो आहे, तोच माझी नजर नीलकंठरावांच्या चष्म्याकडे गेली, आणि पहातो, तो त्यांचा नेहमीचा चष्मा नाही ! म्हणून सहज विचारले, “ का हो दुसराच चष्मा दिसतो आहे आज ! ”
“ हो ! असे म्हणून किंचित् ते हसले, आणि... चष्मा हातात घेऊन, खिन्न स्वराने... क्षणभराने मला म्हणतात, “ पोराचा नाद झालं ! ”
“ म्हणजे ? मी नाही समजलो ! ”
खुर्चीवर बसले होते ते उठले, आणि जड पावलांनी मी बसलो होतो तिथंच शेजारी आले, आणि “ अरे रामा रे ! ” असे म्हणून, एक मोठा सुस्कारा टाकून खाली बसले !
समोरच भिंतीवरील एका मोठ्या तसबिरीकडे बोट करून मला विचारतात, “ तो फोटो... कुणाचा आहे, ते तुम्हाला ठाऊकच असेल ? ”
“ हो, ” मी म्हटले, “ तुमच्या चिरंजीवांचा ! ”
यावर ते म्हणतात की, “ हाच आमचा बाळू, आठ एक वर्षाच असेल, त्या वेळेच्या या गोष्टी. तेव्हा माझी मिळकत म्हणजे, शाळेतला पगार, आणि शिकवण्यांचे वगैरे धरून, तीसचाळीस म्हणजे शिकस्त ! आपला कसाबसा संसार - ”
“ ही कुठली बाईची, की नगरची हकीकत ? ” मध्येच विचारले मी.
तेव्हा ते म्हणाले, “ नाही, त्या वेळेला पुण्यास होतो मी... असो ! एक दिवस, काय वाटले त्याला कुणास ठाकुक,... सकाळची वेळ, नेहमीप्रमाणे गीतेतला पाठ वाचून - ”
“ ती टेबलावर दिसते आहे तीच का ? ”
“ हो, तीच ती पोथी !... वाचून झाल्यावर जेवायला म्हणून जो उठणार इतक्यात तो माझ्याकडे पहात म्हणतो... ‘ दादा ! तुम्ही हा - हा म्हणजे जस्ताचा - ‘ चष्मा का हो लावता ? सोन्याचा का नाही लावीत ? ’... कधी कोणाचा सोन्याचा पाहिला असेल त्याने, तेव्हा विचारले आपले ! ”
“ अस्से ! मग ? ”
“ मग मीही हसत हसत म्हटले की, ‘... काय करावे बोवा, मी पडलो गरीब ! सोन्याच्या चष्म्याला पैसे फार पडतात ! आणायचे कुठले ? आता... आता तूच मिळवून आणशील, तेव्हा... घालीन बापडा सोन्याचा ! ”
असे बोलताच त्यांचे डोळे... काय पण भरून आले !!
“ झाले ! ” डोळे पुसून पुढे ते सांगू लागले, “ ते तिथे तितकेच राहिले ! पुढे... मला वाटते, तो इंग्रजी दुसरीत किंवा तिसरीत असेल. एके दिवशी कुठलेसे संस्थानिक किंवा दुसरे कोणी तरी - हा ज्या शाळेत होता, ती शाळा पाह्यला म्हणून आले. हा वर्ग पहा, तो पहा, असे करता करता याच्या वर्गात ते आले. आणि विचारले वाटते की, “ पुस्तकातल्या कवितांखेरीज बाहेरचे काही कुणाला म्हणता येते का ? ” तेव्हा कोणी काही फारसे वाटले म्हटले नाही. याच्यावर जेव्हा पाळी आली, तो लागली स्वारी ‘ केका ’तले श्लोक म्हणायला ! पाच झाले, दहा झाले याचा आपला चालला सपाटा ! ”
“ अरे वा ! फारच छान ! ” असे रहावेना म्हणून म्हटले मी !
“ अहो, छान कसले ! पूजा, रामरक्षा किंवा असे काही ‘ केका ’तले श्लोक... बसल्या बाल्या सहज शिकवलेले मी. झाला त्यांच उपयोग ! ”
“ मग पुढे ? ”
“ सगळे... आहे ते पुढेच आहे ! त्याचे ते म्हणणे ऐकले. आणि ते बुवाजी अगदी खूष झाले ! नाव वगैरे विचारले, अन् लगेच खिशातून दहा रुपयांची नोट काढून, बक्षीस म्हणून त्याच्या हातावर ठेवली, आणि पाठीवर हात फिरवून शाबासकी दिली !! ”
पुढे दुसर्याच दिवशी पूजा वगैरे आटपली आणि आता गीता वाचायला बसणार, इतक्यात डबीचे झाकण उघडून पाहातो तो आपला निराळाच चष्मा ! तेव्हा हा आला कुठून ! म्हणून जो विचार करतो आहे -
तोच त्याची आई हसत हसत म्हणाली, “ का, येवढा विचार कसला चालला आहे ? ”
मी विचारले, “ हा चष्मा कोणाचा ? ”
तेव्हा ती अधिकच हसून म्हणाली, “ कोणाचा म्हणजे ? आपलाच नव्हे का तो ? ”
“ छे ग ! माझा कुठला असेल हा ! ” असे किंचित् त्रासून म्हटले मी !
“ बरे तर, बाळूलाच विचाराचे मग ! ” म्हणून तिने त्याला हाक मारली, आणि हसत हसत विचारले की, “ अरे, हा चष्मा कोणाचा ? ”
पण तोही काही बोलेना ! गालातल्या गालात हसत, आपला मुकाट्यानं खाली पहात स्वस्थ उभा.
तेव्हा त्याची आईच कौतुकाने म्हणाली, “ ही... आपल्या बाळूची मिळकत बरं ! काल त्याच्या शाळेत कोणससं आलं होतं. अन् श्लोक चांगले म्हटल्यावरून दहा रुपये याला त्यांनी बक्षिशी दिली ! त्यातला हा... ”
“ खरे का रे !! मग काल कुठं बोलला नाहीस ते ? ”
“ पण आतापर्यंत इकडे कळवायचंच नाही, असंच जर ठरलेलं ! शाळेतून पैसे मजजवळ दिले, आणि मनातलं सगळ सांगितलं त्यानं आपल्या ! सकाळी आज लगोलग गेला, आणि हा आपला चष्मा... सोन्यचा करून ! ”
हे सांगता सांगता त्यांचा कंठ किती दाटून आला म्हणून सांगू !
क्षणभर स्वस्थ... अगदी स्वस्थ नीलकंठराव पडून राहिले.
“ तेव्हा... अशी ही हकीकत ! ” म्हणून पुनः ते सावकाश बोलू लागले, “ बाळू... आमचा तसा चांगला मुलगा ! अभ्यासात जरी हुशारीतला नव्हता, तरी होता आपला बेताचा ! पण स्वभावानं... खरोखरच चांगला ! पण नशीबापुढे... थोडेच चालते आहे आपले ? नव्हता आम्हांला फार दिवस... लाभायचा तो - वयाच्या सोळाव्याच वर्षी... ! ”
“ कशानं इतकं विकोपाला गेलं ? ”
“ कशानं ! काही कुणाला नीट समजलं नाही ! पोटात कायससं झालेलं ! पुष्कळ डाक्टर झाले, आणि इलाज केले, पण नवह्तं झालं चला ! एकुलता एक मुलगा ! गेल्याची आठवण झाली अन् जीव घाबरा होऊन तडफडायला लागला, म्हणजे हा चष्मा लावतो, आणि बसतो ती गीता वाचीत ! तेव्हा असा हा - ” नीलकंठराव गहिवरून म्हणाले, “ अस्सा हा पोराचा नाद !! ”
‘ रत्नाकर ’, नोव्हेंबर १९२६