चार वाजण्याचा सुमार असेल. नुकताच मी अण्णासाहेबांकडे आलो होतो. समोरच एका उंचशा काळ्या पेटीवर काही तरी ते लिहीत बसले होते. पेटीच्या अलीकडे तक्क्याला टेकून तिथेच पडलेल्या वर्तमानपत्रांपैकी एक घेऊन मी चाळू लागलो.
“ लबाड ! कुठे गेला होतास रे इतका वेळ ? अण्णा, हा पहा आपल्या मन्या आला ! ”
“ आला ना ? आण वर, कमे ! आणि म्हणावे मास्त आले आहेत, चहा आणा लवकर ! ”
“ आले मास्तर ? मास्तर तुम्ही आलात ? ” असे म्हणत, आपल्या चिमुकल्या हातांनी त्या मांजराला घट्ट पोटाशी धरून अण्णासाहेबांची कमा - सहा किंवा सात वर्षांची असेल - धावत - धावत, हसत - हसत, आपल्या वडिलांजवळ आली, आणि “ हा घ्या मन्या ! ” असे म्हणून तिने ते मांजर खाली सोडले. तेही लागलीच त्यांच्या मांडीवर जाऊन बसले ! आणि -
“ अण्णा, तुम्ही लिहीत आहात ना ? ते तो वाकडी मान करून वाचतो आहे पहा कसा ! ” हसत, नाचत टाळ्या वाजवीत कमला म्हणाली.
“ हो ना ! ” म्हणून त्यांनी हसत हसत आपले पत्र संपविले, ते टिपले, आणि पाकिटात घालून त्यावर ते पत्ता लिहू लागले. सहज मन्याच्या पाठीवरून त्यांनी हात फिरवला, तो तो मोठ्या ऐटीने मजकडे पहात गुरगुरू लागला !
इकडे भाईने - कमीचा हा वडील भाऊ - चहाचे दोन कप आणून पेटीजवळ ठेवले.
“ चल रे खाली जाऊ प्यायला ! मन्या, दूध हवे ना तुला ? ”
भाईबरोबर कमी खाली जाऊ लागताच, मन्याची स्वारी अण्णासाहेबांच्या मांडीवरून उठली आणि म्यांव म्यांव करीत तिच्या मागे खाली गेली.
चहा घेत घेत मी म्हणालो, “ पांढरे स्वच्छ असून मोठे छान मांजर आहे बुवा - कुठे मिळाले तुम्हाला हे ? ”
“ आमची एक जुनी मोलकरीण होती. इतकी की, तिने मलासुद्धा खेळवले होते ! तिने हे आमच्या कमीकरिता खेळायला म्हणून आणले. आले तेव्हा अगदी लहान होते. ”
“ पण मांजर मोठे छान आहे ! ”
आठ पंधरा दिवस होऊन गेले. नित्याप्रमाणे फर्ग्युसन् कॉलेजजवळील टेकडीच्या बाजूला फिरावयाला जावयाचे म्हणून अण्णासाहेब कपडे घालण्याच्या बेतात होते.
तेव्हा सहज मी विचारले “ आज कमी कुठे दिसली नाही हो ? ”
“ सकाळपासून तिची तब्येत बरोबर नाही आहे. ”
“ काय, होते आहे काय तिला ? ”
“ विशेष काही नाही, साधा हिवताप दिसतो आहे ! पण..... मला वाटते, आज फिरायला नयेच जाऊ झाले. घरीच गप्पा मारीत बसू. तुम्हाला कुठे जायचे नाही ना ? ”
“ छेः, तसे काहीच नाही ! ” इतके मी म्हणतो आहे तोच, अंगातले कपडे काढून ठेऊन, अण्णासाहेब मागच्या माडीत, कमी निजली होती तिथे गेले.
अर्धा पाऊण तास होऊन गेला. काळोख अधिकाधिक पडू लागल्याकारणानं हातातील पुस्तक मी खाली ठेवले.
इतक्यात अण्णासाहेब आत आले, आणि म्हणाले, “ मास्तर, कमीला ताप चढतो आहेसे वाटते. आपले डॉक्टरांना आणावे हे बरे. घरात दुसरे - तिसरे कोणी नाही आहे, तेव्हा बुधवारातून आमच्या डॉक्टरांना घेऊन येता ? बर्फ आणायला मी शांतारामाला पाठविलाच आहे ! तुम्ही डॉक्टरांना घेऊन या ! ”
“ ठीक आहे. मी हा निघालोच .”
जिना उतरणार तो दारातून सहज आत नजर फेकली. कमीची आई लक्ष्मीबाई दिवा लावीत होत्या, आणि उशाशी - कमीच्या उशाशी पहातो तो तिचा मन्या !
दवाखान्यात शिरताच डॉक्टर तिथे दिसले. क्षणाचाही विलंब न करता आम्ही दोघे टांगा करून घरी आलो. येताना “ बोळात टांगा कसा न्यायचा ! ” म्हणून टांगेवाल्याने थोडीशी तक्रा केलीच.
घरात शिरल्यावर जिन्यातच आम्हांला “ आई ! आई ! ” असे कण्हणे ऐकू आले. बॅग ठेऊन डॉक्टर कमीजवळ गेले, व तिला तपासू लागले. तिथे कमीची आई, आजी, मावशी वगैरे बसली असल्याकारणाने मी पुढच्या माडीत येऊन उभा राहिलो.
डॉक्टर चांगले पंधरा वीस मिनिटे तिथे होते. नंतर पुढच्या माडीत आले, आणि आपल्या बॅगमधून स्पिरिट लॅंप वगैरे इंजेक्शनचे सामान काढू लागले. शांतारामाने - अण्णासाहेबांच्या धाकट्या मुलाने - पेटविलेल्या स्पिरिट लॅंपजवळ पाण्याचे भांडे आणून ठेवले. तोच -
“ कमे ! ” असा आतून हुंदका ऐकू आला !
खिशातला रुमाल काढून डॉक्टर डोळे पुशीत मला म्हणतात , “ इतका कसा एकाएकी ताप वाढला हा ! एकशे सात - आठ टेंपरेचर ! आहे काय हे - ”
“ तासा - दोन तासातच झाले हे ! सहाच्या सुमारास नव्हते काही भिण्यासारखे ! आम्ही तर रोजच्याप्रमाणे बाहेर फिरायला निघालो होतो ! ”
एक दोन मिनिटांनी डॉक्टर पुनः आत कमीजवळ आले, आणि इंजेक्शन करू लागले. मी दारातच उभा राहून कमीकडे पाहू लागलो. तिचे कण्हणे सारखे चालूच होते. जवळच भोवताली तिचे वडील, मातुःश्री, आजी वगैरे सचिंत - डोळे पुशीत - बसली होती.
आणि उशाशी ? - तिचा तो आवडता मन्या !
मनात म्हटले, “ मांजर असून काय एखाद्या जाणत्या माणसासारखा तिथे बसला आहे हा ! ” मला मोठे चमत्कारिक वाटले !
आणि कमी !
त्या दिवशीच रात्री ती अकराबाराच्या सुमारास सगळ्यांचे जीव होरपळून नाहीशी झाली ! खरोखर ! मुलगी किती गोड म्हणून सांगू ! लक्ष्मीबाई तर सारख्या गहिवरून म्हणत असतात, की, “ कमी आपली वीज होती वीज ! क्षणभर चमकली, अन् चटका लावून नाहीशी झाली ! ”
पुढे एक दिवस गेला, - दोन गेले - चालले कालचक्र फिरत !
कमीला जाऊन सहा सात दिवस झाले असतील. नक्की आठवत नाही आता. रोजच्याप्रमाणे मी पुढच्या माडीत पाऊल टाकणार, तो माझी नजर मागच्या माडीत गेली. तिथे काय दिसले असेल मला ?
हळूच अण्णासाहेबांना खुणावले. ते उठून जवळ आले. आणि एक दोन मिनिटे स्तब्ध - अगदी स्तब्ध - काय दिसत होते ते पाहत आम्ही दोघे उभे राहिलो !
एक मोठा सुस्कारा सोडून परत आत आल्यावर अण्णासाहेब मला म्हणतात “ हे असे सारखे मधूनमधून चालले आहे त्याचे ! ”
“ असे ? ”
“ आपला नकळत येतो आणि आणि अशा प्रदक्षिणा घालून - इथे हुंग, तिथे हुंग करून - सारखा त्या जागेकडे टक लावून पहात बसतो ! आम्ही कोणी हाका मारल्या तर, आला तर आला, नाही तर नाही. असेच करतो आताशा ! फारसे खाणे पिणे नाही. सकाळी चहाच्या वेळेला कुठेही असला तरी हटकून यायचा तो ! पण आताशा तेही नाही. एक तिथे तरी बसलेला असतो, नाही तर समोर तिथे भिंतीवर तासन् तास बसून रहातो ! ती गेल्यापासून - तो पहा आलाच ! ”
“ ये ! मन्या ? ” कंठ दाटून येऊन अण्ण्साहेबांनी त्याला जवळ बोलाविले ! पण नाही ! कोणीकडेही न पहाता हळूच खिडकीतून तो नाहीसा झाला !
याही गोष्टीला महिना पंधरा दिवस होऊण गेले.
काही कामामुळे एक दोन दिवस अण्णासाहेबांकडे बिलकुल मला फिरकायला झाले नाही. म्हणून दुसर्या दिवशी रविवार असल्यामुळे सकाळी असल्यामुळे सकाळी आठाच्या सुमारास मी तिकडे गेलो. वळकटीला टेकून, ब्लॅंकेट पांघरून ते सचिंत पडले होते.
इकडे तिकडच्या गोष्टी निघाल्यावर, बोलता बोलता सहज मी म्हटले, - का विचारावेसे वाटले कुणास ठाऊक ! - पण विचारले खरे, “ अण्णासाहेब, आताशा आपला मन्या कुठे दिसत नाही हो ? ”
“ हो, बरे विचारले ! मोठे विलक्षणच आहे बोवा ! ”
तेव्हा मी चकित होऊन त्यांच्याकडे पहातच राहिलो !
ते म्हणाले “ अगदी पहाटेचा सुमार ! मी अर्धवट झोपेत होतो, किंवा अर्धवट जागा असेन ! इतक्यात मला मन्याचे ओरडणे ऐकू आले ! अगदी... चांगले ऐकू आले ! तेव्हा खडबडून उठलो - दोन दिवसात मुळीच दिसला नव्हता तो ! - आणि खिडकी उघडून त्याला हाकाही मारल्या मी, पण कुठे काही दिसेना ! इतक्यात - मघाशी खालून आमची मोलकरीण सांगत आली, की, मन्याला तर कालच संध्याकाळी गळ टाकून, बोडसांच्या विहिरीतून काढला म्हणून ! ”
‘ मासिक मनोरंजन ’, जानेवारी १९२५