दासोपंत चरित्र - पदे ५०१ ते ५२५

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.


यापरी सुरगुरुप्रति । पाकशासन बोले करुन खंती । इकडे सावित्रीउमारमांची स्थिती । पतीस्तव चिंतीती अपार ॥१॥ तत्समयी येऊन देवर्पि । बोले काय त्या तिघ्यांसि । तुमचे पति तरी निश्चयेसि । अनुसूयाघरी बाळ झाले ॥२॥ तिघे होऊन सुकुमार बाळ । तिचे ह्रत्पाळण्यांत करिती खेळ । आतां तुह्मी निजसामर्थ्याजवळ । पूर्ववत करुन आणावे ॥३॥ मी वर्णिता पतिव्रतेचे गुण । ते विषाद भासले तुह्मांकारण । आतां तरी तिचे सामर्थ्य पूर्ण । कळले की तुह्मांसि ॥४॥ तुह्मी तरी देवांगना । तुमचे सत्तेने हे जग जाणा चालतातां परिपूर्ण । तुह्मां तरी काय चिंता ॥५॥ ती तरी ब्राह्मणाची सती । तिचे सामर्थ्य तरी किती । तुह्मी आदिशक्त्या निश्चिति । तुह्मांपुढे ती काय ॥६॥ यापरी मुनीचे विनोदवचन । ते तिघ्या ऐकतां चिंता करुन । पुनरपि पुसती नारदालागुन । उपाय आपण सांगावा ॥७॥ आपुले वचनी विश्वास न करिता । सत्व पाहिले पतिव्रता । त्याचा अनुभव आह्मां आता । सहज सिध्द पै प्राप्त ॥८॥ आह्मां पतिप्राप्तीचा उपावो । सांगावा जी मुनिरावो । यापरी बोलोनि सद्भावो । मुनीसि वंदिती सप्रेम ॥९॥ मग हांसोनि बोले देवर्षि । तुह्मी शरण जावें अनुसूयासि । तरीच पतिप्राप्ति तुह्मासि । होईल सत्य जाणावे ॥१०॥ तीच कृपा करुन पूर्ण । तुह्मां देईल पतिदान । यावीण नसे आणिक साधन । तुमच्या पतिप्राप्तीस्तव ॥११॥ ते तिघे उत्पात्त्यादि व्यवहार । करितां पावून श्रम फार । श्रमनिवारणार्थ निर्धार । बाळ होऊन ते राहिले ॥१२॥ पिऊन तिचे प्रेमदुग्ध । झाले तीते ब्रह्मानंद । पुनरपि यांचे निजपद । हेंही त्यांस नसेचि ॥१३॥ पतिव्रतेचे सद्भावपालनी । क्रीडती सहजानंदे करुनि । यास्तव तुह्मी तिजलागुनि । शरण जावें सद्भावे ॥१४॥ मुनिवचनी करुन विश्वास । निघत्या झाल्या होऊन हर्ष । पातल्या अनुसूयामंदिरात । प्राणनाथाचे प्राप्तीस्तव ॥१५॥ स्वआश्रमा आल्या देवांगना । ऐसे जाणून ऋषिअंगना । या तिंघीसि देऊनि आलिंगना । अंतरगृही पै नेले ॥१६॥ तिन्ही दार उल्लंघून । तिघ्यांसहित प्रवेशली चौथे भुवन । जेथे खेळे आदिनारायण । त्रयमूर्तिरुप सुकुमार ॥१७॥ अनसूयाप्रेमपाळणी । त्रिबाळे पाहतां नयनी । ते तिघ्या करिती विस्मय मनी । हे काय नवल पै असे ॥१८॥ अनसूया केवळ तुर्यारुपिणी । अनुसंधानदोर हाती धरुनि । जो जो ऐसे अनुहतध्वनी । हल्लरु गाती अति हर्षे ॥१९॥ मुखी गाता हल्लरु । वृत्ति झाली तदाकारु । करीत असतां जो जो गजरु । तत्समयी पातले अत्रि मुनि ॥२०॥ महाराज केवळ ज्ञानराशी । पार नसे ज्यांच्या तपासि । तापशांमाजी व्योमकेशी । ऐसे गमतसे मुनि ॥२१॥ ज्यांचे तेज न माये अंबरी । ज्यांचेनि धन्य तेथील धात्री । ज्यांची भार्या अनुसूया नारी । आगळा पतिव्रतांमाजी ॥२२॥ पति आले निज आश्रमा । जाणून ती पतिव्रतोत्तमा । सप्रेम उठून पादपद्मा । नमीतसे स्वानंद ॥२३॥ कांतेस पुसे मुनेश्वर । जो जो शब्दांचा गजर । तुजला कैचे प्राप्त कुमर । हे काय सविस्तर सांग तूं ॥२४॥ येरी मस्तक ठेवून चरणी । प्रेमाश्रूने आभिषिंचूनि । करद्वय जोडून दीनवाणी । वास्तव्य आदि निवेदिले ॥५२५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP