प्रासंगिक कविता - प्रसंग १

समर्थ,hindi,pad,ramdas,samarth,पद,रामदास,हिन्दी


( शके १५५४ मध्यें पंचवटीस श्रीरामनवमीच्या उत्सवांत श्रीसमर्थ पुराण सांगत असतां म्हणाले कीं, अशोकवनांतील फुलें पांढरीं होतीं; त्यावर बटुरूपानें बसलेल्या मारुतीरायांनीं उत्तर केलें कीं, फुलें तांबडीं होतीं. तेव्हां उभयतांचा बराच वाद झाला; पुढें फुलें तांबडीं कीं पांढरीं हें पाहाण्यासाठीं मारुतिराय स्वतः अशोकवनांत गेले व पाहातात तों फुलें पांढरींच. इतक्यांत बिभीषणाची व त्यांची भेट झाली. आपल्या येण्याचें कारण मारुतीरायांनीं सांगितलें; तेव्हां उभयतांनाहि समर्थांच्या बुद्धिचातुर्याचें मोठें कौतुक वाटलें. अशा प्रज्ञावंत भगवद्भक्ताची भेट व्हावी अशी बिभीषणानीं इच्छा प्रकट केली; श्रीसमर्थ तीर्थयात्रा करीत रामेश्वरीं गेले तेव्हां त्यंस मारुतीनें लंकेंत नेऊन बिभीषणाची ही इच्छा पूर्ण केली. ह्या प्रसंगीं श्रीसमर्थांनीं पुढील अभंग केला अशी प्रसिद्धि आहे. )

अभंग
धन्य हें नगर धन्य बिभीषण । धन्य वरदान समर्थांचें ॥१॥
समर्थांच्या कृपें वर हा पावला । चिरंजीव जाला कल्प एक ॥२॥
कल्प एक वस्ती लंकेमाजीं जाण । मारुति रक्षण जयालागीं ॥३॥
जयालागीं कृपें समर्थ हनुमंता । उपासना स्वतः राघवाची ॥४॥
राघवाचे कृपें भेटी याची जाली । लंकादेवी आली भेटीलागीं ॥५॥
भेटीचा हा लाभ मारुतीच्या संगें । पुष्पाचिया योगें लाभ जाला ॥६॥
लाभाचाहि लाभ मारुतीप्रसंगें । समर्थांचा योग येणेंकरितां ॥७॥
येणें जालें येथें प्रदक्षिणायोगें । समर्थांचा संग म्हणौनियां ॥८॥
म्हणौनियां विनंती ऐका लंकापति । लोभ फार चित्तीं असों द्यावा ॥९॥
असूं द्यावी आतां कृपा दासावरी । दास हा निर्धारीं मनीं चिंती ॥१०॥
मनींचा हा लोभ फार असों द्यावा । लोभायोगें सेवा घडो मज ॥११॥
मज घडो मुक्ति राघवाची भक्ति । उभय पदप्राप्ती म्हणोनियां ॥१२॥
म्हणोनियां धन्य आपणां म्हणवी । दास म्हणे पदवी तुम्हांकरितां ॥१३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP