प्रासंगिक कविता - प्रसंग ८
समर्थ रामदासांनी हिन्दी भाषेत रसाळ पदे लिहीली आहेत.
( शके १५८२ चे सुमारास पौषमासीं श्रीसमर्थ परळीहून चाफळास येत असतां वाटेत पाली येथें खंडोबांच्या जत्रेंत दोघां शाहिरांचा फड पडून दोघे एकमेकांवर चढ करीत होते. समर्थांनीं त्या दोन्ही पक्षांत म्हटलें कीं, आम्ही तुम्हां दोघांवर चढ टाकतों. त्याचें उत्तर तुम्ही दोघेहि मिळून द्या; त्यावेळीं पुढील डफगाणें म्हणून त्या शाहिरांस समर्थांनीं निरुत्तर केले. )
किती पृथ्वीचें वजन । किती अंगुळें गगन ।
सांग सिंधूचें जीवन । किती टांक ॥१॥
वायुसरिसे उडती । सांग अणुरेणु किती ।
लक्ष चौर्यांसी उत्पत्ति । रोम किती ॥२॥
किती आकाशींचा वारा । किती पर्जन्याच्या धारा ।
तृण भूमीवरी चतुरा । सांग किती ॥३॥
सर्व सरितांची वाळु । सप्तसागरींची वाळु ।
किती आहे ते हरळू । सांग मज ॥४॥
बीजें वडीं आणि पिंपळीं । किती आहे भूमंडळीं ।
सर्व धान्यांची मोकळी । संख्या सांग ॥५॥
अठरा भार वनस्पती । भूमंडळीं पानें किती ।
फुलें फळें जाती किती । सांग आतां ॥६॥
जें जें पुसिलें म्यां तुज । तें तें सांग आतां मज ।
अनंतर ब्रह्मांडीं बेरीज । किती जाली ॥७॥
सांग माझें डफगाणें । कां तें सोडीं जाणपण ।
देहबुद्धीचें लक्षण । सोडवीन ॥८॥
श्रोतीं व्हावें सावचित । आतां सांगतों गणित ।
सर्व आहे अगणित । सत्यवाचा ॥९॥
रामदासाचे विनोदें । सोडा अहंतेचीं ब्रीदें ।
मग सर्वही स्वानंदें । सुखी राहा ॥१०॥
N/A
References : N/A
Last Updated : December 09, 2016
TOP