दीपप्रकाश - पंचम किरण
Shri Madhavnath Maharaj (1857–1936) was a Hindu saint, of Karvi, Chitrakoot, Madhya Pradesh, who continued the Nath Sampradaya of the famous Navnaths in India.
श्रीसद्गुरुनाथायनमः --
माझ्या जीवीच्या जिवलगा । सद्गुरुनाथा येईगा । तुजवांचोनी माझी तगमग । जाणार नाहीं ॥१॥
देवा ! तूं निर्गुण मी सगुण । कैसे आळवूं तुज शब्दांनीं । जे पाहूं जाती तुझी खूण । तुझ्यांतचि व्राम पावती ॥२॥
नको नको तें रूप निर्गुण । मी सगुणींच रमेन । सगुणध्यान हें माझें निधान । सगुणपूजा हें साधन ॥३॥
जेथें सारें अगोचर । तेथें काय करितील शब्द चार । तुझा शून्याचा बाजार । ठेवी तुझ्याच जवळी ॥४॥
तूं होतां शून्यातीत । तुज मौन्याचे अलंकार उचित । कांहीं न करणें हेंचि स्तोत्र । कांहीं न वदणें ही तव पूजा ॥५॥
ऐशा नकारार्थी माझें मन । कधीं न होई रममाण । यास्तव मी तुज आणीन । हृदय - चौरंगीं ॥६॥
हृदयाचा केला रंगमहाल । त्यांत पसरली चक्र गादी मृदुल । सुषुन्मेचा लोड विशाल । ईडापिंगला - उशा ठेविल्या ॥७॥
लाविल्या वृत्तींच्या हंड्या सुंदर । चित्त - चितारीच्या तसबीरा । वायु घाली शीतसा वारा । तेज लावी रोषनाई ॥८॥
आकाशानें केलें छत । आप देई जलशीत । करी प्रकृति पक्कान्न स्वादिष्ट । आतां येई सत्वर ॥९॥
तूं न येसी जरी धांवून । होतील सारे खिन्न । जे स्वेच्छेनें आपुलें दर्शन । घ्यावया आले असती ॥१०॥
धांव धांव रे सद्गुरुनाथा । सोडी सोडी शून्यावस्था । करी पूर्ण मनोरथा । नाथसुताच्या ॥११॥
प्रसन्न वदनें सद्गुरुनाथ । घेई रूप माधवनाथ । वसे हृदयभुवनांत । म्हणे गाई तुझें गाणें ॥१२॥
नाथ बसला दरबारीं । नाथसुत घेऊन एकतारी । एकाच तालसुरावरी । करी चरित्र गायन ॥१३॥
एकतारी ही श्रीनाथ । गायन ही श्रीनाथ । गायक ही अंशभूत । सर्वत्र नाथ भरला हो ॥१४॥
गतकिरणीं श्रीनाथ । आले चित्रकूट नगरांत । पुढील प्रसंग परिसोत । सर्व श्रोते महंत ॥१५॥
श्रीविठ्ठलनाथ महायोगी । देवूनी जन्म माधवालागीं । होती स्वस्वरूपमार्गीं । देहींच विदेही ॥१६॥
परी श्री विश्वनाथमुनी । गादीवरी बसविला त्यांनीं । जो पूर्वाश्रमीं प्रपंच साधुनी । करी परमार्थ ॥१७॥
पांच वर्षें राहिले विश्वनाथ । मग धरिती विठ्ठलनाथपंथ । वर्ष एक गादी तिष्ठत । नाथाविण ॥१८॥
मग विचार करिती ग्रामवासी । बोलवावें पांच कुमारांसी । तयांची नांवें लिहून समाधीपाशीं । टाकूं या आदरें ॥१९॥
बोलवूं एक अज्ञ कुमारा । तद्धस्तें उचलवूं एकसरां । तोची न्याय मानूं खरा । सकल जन ॥२०॥
श्रीविठ्ठलनाथें आधीं । हेंचि कथियलें आवडी । त्यांची आज्ञा सांडितां गोडी । सर्व जाईल ॥२१॥
बाळकृष्णपंत असती पुजारी । होता या कृत्याचा अधिकारी । म्हणोनी प्रेमें पाचारी । माधवास आदरें ॥२२॥
आले इतर चार कुमर । त्यांत माधव दिसे सुंदर । जन म्हणती हाचि ईश्वर । चित्रकूटीचा दिसे ॥२३॥
विष्णुपंचायतनीं विष्णु । किंवा नक्षत्रांमाजीं चंद्र आपणु । अथवा शिशुमाजीं ध्रुव तान्हू । तैसा माधव शोभत ॥२४॥
देखोनी माधवाची स्नान संध्या । आश्चर्य वाटे महाबुधा । म्हणती दशवर्षाचें बाल हें सिद्धा - । ऐसी कृति करी ॥२५॥
बोलणें शर्करेहूनी गोड । हंसणें जणूं फुल्ल अरविंद । हा बाळ नव्हें प्रबुद्ध । महायोगी ॥२६॥
आश्चर्य करिती नागरिक जन । म्हणती पाहूं कैसा नंदन । बघोनी मानिती धन्य । आपणासी ॥२७॥
कोणासी न करी बहु भाषण । कोणाहि न वदे कटु वचन । न दावी बाळलीलेचें अद्भुतपण । कोणासीहि ॥२८॥
सर्वांसी आवडे माधव । माधव हा सर्वांचा जीव । परी चिठ्ठ्यांचा काय प्रभाव । म्हणोनी वाट पाहती ॥२९॥
उगवला मंगल जन्म - दिन । मंगल ध्वजारोपण । नाथ जन्मकाळीं जैसे भुवन । तैसे आज श्रृंगारिलें ॥३०॥
नगरवासी उत्सुक होती । पहावया नाथांची प्रचीती । म्हणती चिठ्ठींत माधवनाथमूर्ति । सत्य येईल ॥३१॥
आले ग्रामीचे सकल पंच । टाकिती चिठ्ठ्यांचा संच । उचली बाळक वर्षें पांच । तों माधवनाम देखिलें ॥३२॥
झाला टाळ्यांचा गजर । नाचती लहान थोर । म्हणती शुद्ध बीजापोटीं रुचिर । फळ लाभले गा ॥३३॥
सोडून सकल गृहधंदा । धांवत येती प्रेमी प्रमदा । म्हणती पाहूं चला आनंदा । आज बसला गादीवर ॥३४॥
जैशा धांवती व्रजनारी । कुंजवनीं बघाया श्रीहरी । तैसी झाली करवी नगरी । नाथरूपीं निमग्न ॥३५॥
सकळ माता मिळोन । नाथा घालिती अभ्यंगस्नान । कोणी करिती आरती हर्षून । कोणी उटी लाविती ॥३६॥
देखोनी ऐसे आनंद सोहळे । मथुरामातेचें हृदय उचंबळे । प्रेमाश्रू - मोती निघाले । टपटप गळती गालावरी ॥३७॥
मग भरजरीचीं वस्त्रें । देती ते नाथ भक्त । शिरीं भरजरीचा मुकुट । टोपाकार ॥३८॥
रत्नमुद्रिका करांगुलींत । कंठी कंठा रत्नयुक्त । कानीं शोभती बाळ्या प्रभायुक्त । कुंडलाकार ॥३९॥
ऐशा थाटांत येई स्वारी । बसविला नाथ गादीवरी । ठेविती नांव प्रेमें भारी । माधवनाथ हें ॥४०॥
छत्र चामर शिरावरी । ढाळिती चवरी अबदागिरी । जयजयकारें गर्जना करी । भालदार ॥४१॥
सनई वाद्यें गजर । वाजविती कुशल कारागिर । वांटली सर्वांसी साखर । आनंदानें ॥४२॥
पेशव्यांचे वंशज थोर । तेवीं अन्य स्थलींचे सावकार । पातलें तेथे सपरिवार । करावया साजिरा प्रसंग ॥४३॥
मग काढोनी वेष भरजरी । नाथ घेई फकीरी । शैलीशृंगी कौपीन वरी । अनुग्रहाकारणें ॥४४॥
जाई त्वरें विवरांत । करी ‘ अलख ’ शब्द अवचित । होई शून्यावस्थेंत । तोच अनुग्रह ॥४५॥
झाला नाथांचा कार्यभाग । मिळाले सर्व सिद्धींचे अंग । करी विदेहीपणें योग । कोणा तत्व कळों नेदी ॥४६॥
कधीं करी भोजन । कधीं उपवास दुग्धपान । कधीं केवळ जलपान । ऐसा होई नियमातीत ॥४७॥
सदा राहीं वृत्तीत दंग । न पाही मायिक ढंग । श्रीव्यंकटेशाचा संग । आवडे सदा ॥४८॥
जन घालिती भरजरी वस्त्रें । परी टाकोनी दिधलीं श्रीनाथे । घाली कौपिन वा शुभ्रवस्त्रें । राहे उघडा ना तरी ॥४९॥
जन अर्पिती नानाभूषणें । परी तीं त्याज्य केली प्रभूनें । गळां तुळाशीमाळा हे लेणें । घाली तुळशीचा स्वामी ॥५०॥
जन गादी उशा टाकिती । परी नाथा तेथें कंटक लागती । शुभ्र कामळीं वा पोतीं । घेई बसावया ॥५१॥
जन प्रसाद द्यावा म्हणती । परी हा प्रसादांतचि राहे निश्चितीं । जन करितां भावें आरती । न थांबे क्षणभर ॥५२॥
लोक तर्किती अनन्य । नाथ तर्के सदा अन्य । जनांनीं धरितां पूर्व दिशा जाण । नाथ जाई पश्चिमेसी ॥५३॥
ऐसा उलट मार्गी नाथ । बघोनी होती जन शंकित । कोणी म्हणती वेडा सत्य । कोणी ज्ञानवेड म्हणती ॥५४॥
मायिक जन आशेनें म्हणती । हा प्रथम दिसला आम्हास सुमति । म्हणोनी तया गादीची प्राप्ती । करोनी दीधली गा ॥५५॥
परी आतां हे विचित्र चाळे । बघोनी हृदय पोळिलें । कोण्या भूतें यांसी झडपिलें । कळेना हें ॥५६॥
ज्ञानी म्हनती भूत नव्हे दुसरें । श्रीविष्ठलनाथचीं संचरे । हा उद्धारक होईल साचोकारें । मनी शंका न ठेवा ॥५७॥
परी नाथदेव आपुले मनीं । ज्ञानी अज्ञानी सम मानी । प्रत्युत्तरा न देतां जाई पळोनी । भलतीकडे ॥५८॥
परिजनांनीं ठरविला वेडा पूर्ण । कोणी तत्त्व न जाणे पूर्ण । म्हणती करूं द्यावें विचक्षण । स्वस्थ बसोनी पहावें ॥५९॥
नाथांची दत्तक जननी ठकूबाई । बहु खिन्न होई हृदयीं । म्हणे काय ही जनांची चतुराई । वेडा बालक गादीवरी ॥६०॥
आतां यास एकचि उपाय । करावा बालाचा विवाह । त्या योगें राहिल पाय । गेहींच याचा ॥६१॥
विवाहाचा खोडा पायीं । घालितां सोडील वेड बाई । करील संसार लवलाही । राखील संस्थानासी ॥६२॥
विवाह हा मायेचा सूत्रधार । करी प्रपंच - नाटक साचार । खेळवी जगत् - रंगभूमीवर । नाना पात्रें ॥६३॥
दाखवी नाना देखावे । देई सुखदुःखाचे हेलकावे । भ्रमवी चित्त लवलाहे । साधकाचें ॥६४॥
नाथमाता ऐसा विचार । करोनी पाचारी सत्वर । सखारामबापूजी कारभार । पाहे मंदिराचा ॥६५॥
उभयतांसी रूचली ही युक्ति । मग गुप्तपणें प्रयत्ना करिती । परी हें जाणिलें अंती । नाथदेवें ॥६६॥
ज्याची सदा अंतरीं वस्ती । जो पाहे अंतरींच सृष्टी । तो पाहुनी ही विचारसृष्टी । अंतरीं दचकला ॥६७॥
मनीं म्हणे आलें हे विध्न । याचें केलें पाहिजे निरसन । आतां स्थानत्यागावांचून । न दिसे उपाय दुसरा ॥६८॥
राही अंतरीं सावधान । ठरवी पलायनाचा दिन । कोणा न कळे ही खूण । जयांची बाह्य - दृष्टी ॥६९॥
ऐकोनी द्विजांची सावधान वाणी । जेवीं समर्थ निघाले वनीं । तेवीं संसाराची लोढणी । टाकाया निघे माधव ॥७०॥
पेशव्यांचें आप्त जोग । तयांचा करवीस असे बाग । तेथील गुंफेचा करी संग । नाथ एके दिनीं ॥७१॥
होती गुंफा भयंकर । कोणी न जाती तेथें पौर । नाथा रूचलें हें मंदिर । वस्ती कराया ॥७२॥
तेथें राहीं दिवसभर । साधी समाधियोग चतुर । होता गगनीं अंधःकार । निघें फळमूळें खावया ॥७३॥
इकडे करवीस झाला हाहाःकार । म्हणती कोठें गेला योगीवर । पाठविती पायदल स्वार । शोधावया ॥७४॥
परी जवळी असतां नाथनिधान । कोणां न सांपडे तो योगभूषण । सर्व भ्रमांत पडती जाण । विचित्र नाथकृति ॥७५॥
ऐसे भ्रमतां कांहीं मास । सायंकाळीं निघे योगीश । तो अवचित दिसला जोगास । नाथदेव ॥७६॥
जोगांनीं केला नमस्कार । म्हणे कोठें वसतां योगीवर । आम्हास सोडोनी वनचर । व्यर्थ कां होतां ॥७७॥
तुम्हाविण ओस नगरी । स्वामी ! चला वेगे मंदीरीं । मी आणतों शिबिका चवरी । न्यावयासी ॥७८॥
हंसोनी म्हणे श्रीनाथ । माझा वास चित्रकूटीं नित्य । कां पडतां व्यर्थ भ्रमांत । डोळे उघडोनी पहा ॥७९॥
तों विराटरूप घेतलें । जोग मानसीं बहु भ्याले । नाथें आश्वासन दीधलें । घेती बालरूप ॥८०॥
आज्ञापिती त्या भक्तास । द्वादश - वर्षें होतां खास । येईन निश्चयें करवीस । चिंता मनीं न करावी ॥८१॥
परी कोणा न सांगावी ही मात । नातरी होईल आयुष्यघात । होती तेथेंच गुप्त । योगीराय ॥८२॥
विचार करिती आपुलें मनांत । आतां येथें राहणें अनुचित । पूर्वज नाथांचें दर्शनार्थ । जाऊं म्हणे योगेश्वर ॥८३॥
कांसे कसिली लंगोटी । हातीं घेतली बोचरीं लोटी । सवें एक घडी कंबलाची । फाटकें धोतर दुसरें ॥८४॥
शैलीशृंगी ठेविली गुप्त । पुन्हां न घेई कधी नाथ । निघे बंगाल प्रांतात । श्रीमच्छिंद्र दर्शना ॥८५॥
हेलरापट्टण प्रांतांत । श्रीमच्छेंद्रनाथ मूर्तिमंत । पाहण्यानें पाहतां निश्चित । भेटेल सकलांसी ॥८६॥
मग शिरे गौडबंगालीं । आमुचा नाथ गौडबंगाली । माया - नदीतीरीं पाहिली । चौरंगीनाथ मूर्ति ॥८७॥
मग शिरला महाराष्ट्रांत । जें संतसजनांचें क्षेत्र । भागवत - धर्म गंगेचा स्त्रोत । वाहे आधीं जेथुनीं ॥८८॥
महाराष्ट्र ही कामधेनु देवी । जैसा जैसा भक्त तिला सेवी । तैसें तैसें फल देई । संतोषोनी ॥८९॥
विद्या - वैभव शौर्यभाव । परमार्थांचें निधान सर्व । जी मिरवी प्रेमें गर्व । सर्व कलांचा ॥९०॥
बगोनी जियेचें बुद्धि - भांडार । दीपती सारे जन इतर । जी क्षणांत होई सुकुमार । क्षणांत वज्रापरी ॥९१॥
येथेंच पुंडलिक वरदाता । नांदे श्रीपांडुरंग तत्वतां । दावी प्रत्यक्ष सायुज्यता । नाम घोषें ॥९२॥
येथेंच अवतरली ज्ञानेश्वरी । जिची अचल राहे माधुरी । येथेंच तुकाराम वस्ती करी । अभंगरूपें ॥९३॥
याच महाराष्ट्र - भूमीवर । होती सारे म्लेंछ जर्जर । ज्यांनी धर्मावरी कहर । केला मत्तपणें ॥९४॥
उत्तरप्रांतीं करोनी बंड । आले येथे यवन उदंड । परी केला तयांचा बीमोड । महाराष्ट्र - भूनें ॥९५॥
ही महाराष्ट्र - कामधेनु । जेव्हां छळाया येई यवनु । जाहली तैं क्रोधायमानु । आपटी पुच्छ आपुलें ॥९६॥
काढिला वीरभद्र शिवराय । त्यांते करी समर्थ सहाय्य । यवनाची झाली हाय - हाय । पळतीं दाही दिशा ॥९७॥
समर्थें धर्म - राजकारण । यांसी दीधलें रूप अभिन्न । ठायीं ठायी मठ स्थापोन । निज सांप्रदाय वाढविला ॥९८॥
येथें श्रीतिलक देव । करीं नव - नवलांचे कार्य । भगवद्गीतेचा परिचय । देई भारतासी ॥९९॥
कर्मयोगी गीता केली । स्वयें आचरणी आणिली । आमरणांतही सेविली । मायभूमि ॥१००॥
याची महाराष्ट्र भूमींत । बाललीला करी माधवनाथ । महाराष्ट्र माता परम पवित्र । साष्टांगें नमन तियेला ॥१॥
ऐशा पुण्य - भूमींत नाथ । भेटावया गोरक्षनाथा । बत्तीस शहाळे ग्रामांत । आला अवचित ॥२॥
मग जाई मोगलाईत । कन्नडपर्वतीं गहनीनाथ । तेथूनियां ज्ञाननाथ । आळंदीसी पातला ॥३॥
मग त्र्यंबकेश्वरी निवृत्ती । निवृत्तीरूप नाथ जाती । तेथून पुनरपि चित्रकुटीं । येती भेटावया ॥४॥
सत्यामलापासून गुप्तनाथ । वसती चित्रकूट पर्वतांत । तयांसी वंदी सद्गुरूनाथ । मनोभावें ॥५॥
जी सर्व पूर्वजांची ज्योति । जेथें सर्व नाथ समावती । जे एकाच स्थानीं दिसती । ज्या प्रभूसी ॥६॥
तो दाही दिशा फिरतां । आश्चर्य वाटेल श्रोतृचित्ता । ही शंका निरसीन आतां । श्रोतयांनों ॥७॥
अहो आत्मतत्त्व हें सर्व दूर । जळीं स्थळीं पाषाणीं सुंदर । परी ज्या भूमिकेंत संचार । तैसें कार्य तयांचें ॥८॥
तो आत्मा जाई नरदेहीं । त्यास तैसीच क्रिया करणें पाहीं । हा सिद्धांत ठसविणें हृदयीं । अत्यादरें ॥९॥
श्रीराम केवळ पूर्णावतार । परी सीता नेतां दश - शिर । करी रूदन रघुकुलकुमर । बालकापरी ॥१०॥
काष्ठ पाषाणादिकां भेटे । म्हणे माझी सीता येथें । अथवा पहावें श्रीकृष्णलीलेतें । नवलापरी ॥११॥
म्हणोनि माझा सद्गुरूनाथ । करी कृति जी नरदेहा उचित । फिरे चारही धाम पवित्र । स्वैरपणें ॥१२॥
कधी अग्निरथीं कधीं पायीं । आनंदें नथ जाई । कोणा कदाहि न कष्टवी । राहे अयाचित ॥१३॥
करोनी मोल मजूरी । दुग्धपानें उदरपूर्ती करी । आश्चर्य करिती नरनारी निःस्पृहपण बघोनी ॥१४॥
चित्रकूटाहुनी श्रीनाथ । जाई हिमपर्वतांत । जेथें वसे कैलासनाथ । प्रत्यक्षपणें ॥१५॥
अंगीं हिम - विभूति सुंदर । मस्तकांतुनी वाहे गंगेची धार । ध्यानस्थ बैसला भोळा शंकर । अवश्य रूप हें बघावें ॥१६॥
ऐशा श्री हिमगिरींत । राहे अर्ध - तप - पर्यंत । काय आचरिलें तेथ । हें कोणाही ना कळे ॥१७॥
नाथसुत विनवी देवा । मज तेथील समाचार सांगावा । येरू म्हणे एकमेवा । तेथेंच म्यां जाणिलें ॥१८॥
होतां वर्षें द्वादश । येई पुनरपी चित्रकुटास । करी गणेश - बागेंत रहिवास । माधवनाथ ॥१९॥
जोगासी कळतां हें वृत्त । आले बागेंत धांवत । विनविती चलावे वेगें समर्थ । निज मंदिरीं ॥१२०॥
आपुली आज्ञा प्रमाण । झाली द्वादश वर्षे पूर्ण । सांभाळावें नाथ संस्थान । त्वरित महाराजा ॥२१॥
आता दुरी कराल जरी आपण । करूं येथेंच देहविसर्जन । नका अंत पाहूं दयाघन । नाथराया ॥२२॥
चला चला हो त्रिपुरारि । सर्व तिष्ठत असती द्वारीं । भक्तकाम पुरवा सत्वरीं । भक्तवत्सला ॥२३॥
देखोनी भक्ताचें हृदय । कळवळला नाथ सदय । म्हणे पाहून तुमचा भाव । मज येणें भाग पडे ॥२४॥
परी मी तेथे सतत राहीन । ऐसें न देई अभिवचन । तेंहिं अवश्य म्हणोन । आणिती मिरवीत ॥२५॥
येतां मंदिरीं नाथ । फुललें सर्वांचे वक्त्र । म्हणती आमुचा आनंदनाथ । आज प्रकटला प्रत्यक्ष ॥२६॥
उदया येतां वासरमणी । जैशा पुष्पकलिका फुलती वनीं । रजनींचें दुःख विसरूनी । सोडिती हास्यगंध ॥२७॥
तैसें सर्वांचे हृदय - कमल । आज जाहलें प्रफुल्ल । प्रभुचरणीं होती अचल । क्षणमात्र ॥२८॥
शुक्लपक्षीं चित्रकूटांत । आले श्रीमाधवनाथ । कीर्ति - शुक्लेंदूची ज्योत । वाढली येथोनी ॥२९॥
पुढील कथेचा विस्तार । नाथ पाहील कारभार । होईल गादीचा सूत्रधार । निजबळें ॥१३०॥
इतुकें सर्वहि करून । शेवटीं जाईल सोडून । उद्धराया भक्तजन । करील स्वैर संचार ॥३१॥
श्रीनाथ ही कामधेनु । तच्चारित्र्य हें दुग्ध मानूं । भावाग्नीवरी ते ठेंवून । आणूं पक्क दशेसी ॥३२॥
तयांत चित्त - तरंग हे तांदूल । शिजवुनी करूं मृदुल । मग भक्ति - शर्करा रसाळ । मेळवूं आदरें ॥३३॥
ऐसी खीर करूं प्राशन । मिळवूं मोक्षपुष्टी आपण । षड्रिपूंची दाणादाण । होईल सहजची ॥३४॥
परी हे सर्व कामधेनूपाशीं । प्रेमें आळवूं तियेसी । ती नेईल हेतू सिद्धीसी । नाथसुताचा ॥१३५॥
इति श्रीमाधवनाथदीपप्रकाशे नाथसुतविरचिते चित्रकूटसंस्थानारोहणं नाम पंचम किरण समाप्तः ॥
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP