दीपप्रकाश - अष्टम किरण
Shri Madhavnath Maharaj (1857–1936) was a Hindu saint, of Karvi, Chitrakoot, Madhya Pradesh, who continued the Nath Sampradaya of the famous Navnaths in India.
श्री सद्गुरुनाथायनमः --
जयजयाजी सद्गुरु - विठ्ठला ! भक्त वत्सला भक्त स्नेहाळा । तुझी गाता अगाध लीला । मन होय निर्मल ॥१॥
प्रभू तूं भक्तांचा कैवारी । भक्तांस्तव कष्टसी भारी । करिसी नीच ही चाकरी । भक्तांकारणें ॥२॥
तूं भक्तां कधीं न विसंबिसी । भक्तांस्तव दासी होसी । भक्तां कारणे धान्य ही दळसी । कृपानिधे ! ॥३॥
तूं वैकुंठीचा राजराजेश्वर । लक्ष्मी तुझी दासी सुंदर । तुझा खजीनदार कुबेर । शेष हें सिंहासन ॥४॥
नारदतुंबर स्तुती पाठक । वंदिती सनत्कुमारादिक । नाभिकमलीं ब्रह्मा तोक । करी स्तुति आनंदें ॥५॥
ऐसें तुझे वैभव अपार । परी तें सर्वही करिसी दूर । भक्तांस्तव होसी महार । करुणेश्वरा ॥६॥
न पाहसी भक्तांची जात । अथवा कांहीं कुळ गोत्र । पाहुनी अनन्यभाव मात्र । धांवसी लगबगा ॥७॥
चोखामेळा होता महार । परी त्याच्याघरीं खाशी भाकर । रोहीदास तो चांभार । धूसी कातडीं तया घरीं ॥८॥
दादू खाटिक तो मारेकरी । तयाची सुरी धरिसी करीं । मांस - विक्रय करिसी मुरारी ! । आनंदानें ॥९॥
जनाबाईचीं भांडी घासशी । कर्माबाईची खिचडी खाशी । मिराबाईचें विषही पीशी । देव देवा ॥१०॥
त्वां कबीर म्लेंच्छासवें । गुंफिले गा वस्त्र नवें । तव खेळणें नामदेवें । केलें लीलेनें ॥११॥
नाहीं ऐसी राहिली जात । तेथें तूं न होसी प्रगट । संचार करूनी पशुपक्षांत । रक्षिलें भक्तगण ॥१२॥
ही सेवा केली त्वा गुप्तपणें । न कष्टसी प्रकाशपणें । परी माधवनाथरूपानें । तेंहि पूर्ण केलें गा ॥१३॥
नाथा ! तूं झाडिशी भक्तांचें घर । मापिसी धान्य खंडीभर । पाठीवर घेउनी भार । वाहसी भक्तांचा ॥१४॥
घेउनी अंकावरीं बाला । जेऊंघालिसी दयाळा ! । त्वां स्वयंपाकहि केला । भक्तांकारणें ॥१५॥
बाळांची शय्याहि करिसी । भक्तांचा व्यवहार पाळिसी । भक्तांस्तव नित्यहि कष्टसी । नानाप्रकारें ॥१६॥
भक्तांकारणें घेशी । भक्तांकारणें सोमल खाशीं । भक्तांचे देवी - गोंवर घेशी । कृपाळूपणें ॥१७॥
भक्तांकारणें लोकनिंदा । सहज करिशी योगाभ्यानंदा ! । तुझ्या वात्सल्यास मर्यादा । नाहीं कोठेंही ॥१८॥
तुज ऐसा प्रेमाचा ठावा । मानव - योनींत न सांपडे देवा ! । तूं अतर्क्य हें तत्व जीवा । ठसलें या ॥१९॥
राखाया केवळ मातृवचन । अज्ञातवासहि घेऊन । कष्टाचा मेरू उचलून । घेतला अंगुलीवरी ॥२०॥
गत किरणीं घाट चढून । नाथें केलें पलायन । आतां पुढील अनुसंधान । आदरें परिसावें ॥२१॥
जो त्रिवेणीचा घाट चढून । त्या संगमी करी नित्य स्नान । त्यास दगडाची चढण । तापद कैसी होये ॥२२॥
येसगांव नामें एक खेडें । पाहिलें नाथदेवें पुढें । भगवतीच्या देउळाकडे । गेली दृष्टी प्रभूची ॥२३॥
बाजूस शोभल्या आम्र - पंक्ती । तयाच्या मंजरी फुल्ल होती । नाना पक्षी विहरती । स्वेच्छाचारें ॥२४॥
सुटली सुगंधाची माधुरी । मंदवायु सोडी लहरी । शांती - देवता हास्य करी । एकांत - पतिसवें ॥२५॥
या दांपत्यांचें प्रेम विमल । सरितारूपें वाहे झुळझुळ । त्यांत स्नान करिती कुतूहलें । योगीजन ॥२६॥
बघोनी ऐसें पवित्र स्थान । नाथ जाहले सुप्रसन्न । हेंच प्रभूसी इंद्रभुवन । वाटलेंगा ॥२७॥
तों ऐकिला घंटा नाद । मंगलारतीचा शब्द । उठला मग नौबत वाद्य । वाजवावया ॥२८॥
ऐकोनी त्याचें कौशल्य । गोविंदरावा वाटलें नवल । जे येसगांवचे सकल । सावकार ॥२९॥
पुजार्यास विचारिती । हा कोण कोणाचा निश्चिती । चौघडा वाजवी उत्तम गति । मृदंगापरी ॥३०॥
पुजारी म्हणे ही कुशलता । गुरवावीण न दिसे इतरत्रा । प्रभूसी तैसा प्रश्न पुसता । म्हणे मी गुरवचि ॥३१॥
गोविंदरावें नेलें आश्रमा । बोलविती गांवचा गुरव रामा । म्हणती पाहीं या पुरुषोत्तमा । कलानिधीसी ॥३२॥
तूं गुरवाचा जन्म घेऊन । जाहलासी अजागल स्तन । याची वादन कला ऐकून । तुज लाज वाटेल ॥३३॥
केलें नाथें जलप्राशन । ठेविलें पात्र उलट करून । वेषा ऐसी करी खूण । नांव ठेवी कोंडीबा ॥३४॥
वाजविली नाथें संबल । मृदंग तो करतलमल । भजनानंदें जन सकल । संतुष्ट केलें योगींद्रें ॥३५॥
गांवचे जन मेळविले । गोविंदरावें तयां विचारिलें । कोंडीबा दिसताती भले । शिक्षक आम्हांसी ॥३६॥
येथील गुरुजी झाले पसार । बालें होती खोडकर । दिननिशीं करिती वेडेचार । यांस द्यावें शिक्षण ॥३७॥
घेवोनी सर्वांची अनुमति । करिती नाथदेवा विनंति । सांभाळा आमुच्या शिशुप्रति । देऊं वेतन आपणा ॥३८॥
अवश्य म्हणोनि नाथ । जाहला शिक्षक यथार्थ । दुग्धपान हा पगार घेत । शिकवी शिशुगणासी ॥३९॥
आतां ऐकावें नाथांचें शिक्षण । न हंसावें श्रोतेजनीं । सर्वां शिकवी ॐ लक्षण । आपणहि शिशु होई ॥४०॥
कोणा न कधीं शिक्षा करी । शिस्तीचा आठवहि न धरी । करांगुलीच्या खुणेचा हरी । अर्थ करी भलतैसा ॥४१॥
एक जाऊं पाहे बहिर्दिशेसी । म्हणोनि आला सद्गुरुपासीं । मागे आज्ञा जावयासी । दोन बोटें दाऊनी ॥४२॥
माधवास वाटे तो द्वैतीं । म्हणोनी एक बोट दावी त्याप्रति । म्हणे बैस तुझिया जागेवरती । अद्वैताच्या ॥४३॥
शिष्यें बहुत वेळां ऐसे केले । परी नाथांचें उत्तर पहिलें । तें कोमल बाळ घाबरें झाले । देहधर्म करी तेथेंच ॥४४॥
नाथा सांगति इतर बालें । आपणां अंगुलीनें त्यानें पुसिलें । गुरुजी ! त्वां मुक्त नाहीं केलें । म्हणोनी प्रसंग ओढवला ॥४५॥
मग नाथ सावध झाला । करांगुलीचा पाठ घेतला । स्वहस्तें बालाचा मळ काढिला । निर्मळानें ॥४६॥
राहिला तेथें चार मास । ग्रामीचे जन पावती संतोष । म्हणती कोंडीबा ऐसा पुरुष । ना देखिला वा आयकिला ॥४७॥
मग गोविंदराव करिती विचारू । कोंडिबाचा विवाह करूं । रामाजीची नात वारू । शोभे नोवरी बरीशी ॥४८॥
त्यायोगें कोंडो राहतील । शिशूंचें कल्याण होईल । भजनाचा आनंद थाटेल । बहुत काल ॥४९॥
हा विचार सर्वंसी रुचला । सांगती कोंडोबा नाइकाला । हांजी म्हणोनी आनंद दाविला । वरिवरी ॥५०॥
परी अंतरीं खिन्न झाला । म्हणे प्रसंग हा ओढवला । आतां संपवूं येथील लीला गुरुजीची ॥५१॥
म्यां आधींच वरिली नोवरी । जियेचें नाम चित्कला सुंदरी । करितां कामिनी दुसरी । सवती - मत्सर वाढेल ॥५२॥
नको ऐसें तापद स्थान । म्हणोनी करी पलायन । येथें रोझेंग्रामीं जाण । यात्रेनिमित्त ॥५३॥
जर्जरी जरबक्ष हें नाथांचें स्थान । होते परमहंस आपण । जाहले यवनासी यवन । आर्यासी हंसरूप ॥५४॥
यावनी राज्याची कृति । श्रोतेजन बहुत जाणती । जेथें नियमाची होते आहुती । मदाग्नींत ॥५५॥
म्हणोनी नाथ पीर झाले । परी हिंदुत्व न सोडिलें । उभयतांचे कोड सगळे । पुरविती प्रभु ॥५६॥
रोझें ग्राम हें अत्यंत सुंदर । औरंगझेबाचें अंतिम घर । ताजमहालासम मंदिर । नामें मुकरोबा ॥५७॥
ज्यानें केली कृति कठिण । आर्यधर्मातें छळिलें दारुण । कुटिल कृत्याचा धुरिण । तो एक दस्तगीर ॥५८॥
यवनांनी केला भूवरी कहर । म्हणोनी प्रभू घेई अवतार । शिवरूपें करी संहार । अविंधांचा ॥५९॥
ताजमहाल हा सृष्टीचा रत्नहार । मुकरोबा भासे मोत्याचा सर । अवश्य बघावें चतुर । श्रोतेंजनीं ॥६०॥
भिकनशावली नामक संत । करिती या रोझासी पूनित । देखिला त्यांनीं योगीनाथ । जलाशयीं जातां ॥६१॥
वलीनें घेतली अवचित उडी । म्हणती ‘ भाई कू मिलना ’ आधीं । भेटें रामरहिमांची जोडी । प्रेमभावें ॥६२॥
मग हातांत हात घालुनी । दोघे जाती जरबक्षस्थानीं । परस्परांची गूज कहाणी । सांगती । हास्यरूपें ॥६३॥
रंभापाटील केशवराव । आले होते यात्रेस्तव । देखितां हें दृश्य अभिनव । लज्जित होती मनांत ॥६४॥
प्रभूपदीं ठेविती माथा । क्षमा करावी समर्था । तुज छळिलें न समजतां । नानापरी ॥६५॥
तूं साक्षात् अवतारी । आलासी गा आमुचे घरीं । परी मायेनें वेष्टिलों हरी ! । नाहीं ओळखिलें ॥६६॥
तुझी वाणी सत्य सत्य । आली फळाला खचित । गहूं पिकला अपरिमित । बावन्न मण ॥६७॥
चुकलों आम्ही मूढमती । यावें आमुच्या गृही मागुती । करूं सेवा यथाशक्ति । स्वीकारी ती ॥६८॥
नाथ म्हणती हांसून । मी केवळ धोंडा जाण । माता आमुची पाटलीण । कैसी आहे ॥६९॥
तिला सांगावा दंडवत । न धरावा किंतु मनांत । स्वरुपीं ठेविता एक चित्त । तेथेच मी दिसेन ॥७०॥
घेवोनी निरोप भाईंचा । धरिला रस्ता वेरुळीचा । इंद्रसभा या लेण्याचा । घेई आश्रय ॥७१॥
वेरूळ हें महाक्षेत्र । घृष्नेश्वराचें स्थान पवित्र । ज्योतिर्लिंगाची ज्योत । करी उज्वल प्रकाश ॥७२॥
महेशें आत्मलिंग छेदुनी । टाकिली द्वादश ठिकाणीं । ही कथा श्रीशिवपुराणीं । अवश्य वाचावी ॥७३॥
प्रथम श्रीकाशीविश्वेश्वर । दुसरा ओंकारीं ओंकार । तिसरा श्रीमहांकालेश्वर । उज्जयिनीसी ॥७४॥
वेरूळीं श्रीघृष्णेश्वर । सौराष्ट्रीं सोमनाथ शशिशेखर । भीमातिरीं भीमाशंकर । विराजतो ॥७५॥
परळीचा वैजनाथ । तैसा श्रीनागनाथ । त्र्यंबकेश्वरीं त्र्यंबकनाथ । गोदातिरीं ॥७६॥
हिमगिरीवासी केदार । मल्लिकार्जुन शशिशेखर । दक्षिणेस तिष्ठला रामेश्वर । जगन्नायक ॥७७॥
ज्योतिर्लिंगातें सेवून । अनेक तरले पाषाण । पावला ईश्वरत्व रावण । आत्मलिंग पूजनें ॥७८॥
ऐसा घृष्णेश्वर भोलानाथ । वेरुळीं प्रत्यक्ष वसत । करावा देह पवित्र । दर्शन योगें ॥७९॥
गिरीशिखरें खोदुनी । येथे दर्शविलीं लेणीं । तीं पाहतां मानव प्राणी । चकित होय ॥८०॥
कोणी म्हणती पांडवें केली । कोणी म्हणती हेमाडपंती कोरिलीं । कोणी सांगती निसर्गें निर्मिलीं । ऐसीच गा ॥८१॥
नाकळे उत्पन्न कर्ता । म्हणोनी तर्किती अनंता । अनेक आश्चर्याची माता । भूदेवी ॥८२॥
ऐशा ईशनिर्मित भुवनात । राहिला श्रीमाधवनाथ । चिद्घनानंद स्वामी दर्शनार्थ । आले प्रभुच्या ॥८३॥
ती चिद्घनमूर्ति पाहतां । नाथ पस्तावे आपुल्या चित्ता । मम अज्ञात स्थितीचा आतां । होईल शेवट ॥८४॥
चिद्घन हा मदिय भ्राता । चिद्घन प्रेमाचा निधी तत्वता । हिमालयीचा साह्यकर्ता । स्वामी चिद्घन ॥८५॥
आतां कोठें लपावें । कोठें आम्ही पलायन करावें । ऐसा विचार केला देवेम । तों आले चिद्घन ॥८६॥
भेटलें प्रेमें परस्पर । स्वामी विनवी जोडुनी कर । अज्ञातवसाचें पटल या वेषास । देई अभिवचन ॥८७॥
तूं घेता अज्ञातवास । जनहृदयीं नोहे प्रकाश । सोडी सोडी या वेषास । देई अभिवचन ॥८८॥
स्वामीनें धरिला हट्ट । म्हणती होई गा प्रकाशित । ना तरी अन्न त्यागीन निश्चित । उमज हें मनीं ॥८९॥
मथुरामाता करी घोर । तियेला भेटे एकवार । मग करी आपला संसार । लोकोद्धारी ॥९०॥
समर्थ म्हणे रे स्नेहाळा । तुज पाहतांचि संपला । मम अज्ञातवास सगळा । सोडी हट्ट आपला ॥९१॥
आतां भेटेन मातेस । राहीन तेथें षण्मास । मग करीन निज प्रकाश । वचन हे मानीं ॥९२॥
मग नाथासी वेरूळीचे भक्त । नेती आपुल्या ग्रामांत । तेथें राममंदिरीं नाथ । काढी चित्रें सुंदर ॥९३॥
नाथ जाहला चितारी । नाथ जाहला नगारी । नाथ करी बेलदारी । मृत्तिकेची ॥९४॥
ऐसा विचित्र खेळ प्रभूचा । न लागे अंत मायेचा । कोणा न दावी साचा । आपला अधिकार ॥९५॥
मित्राग्रहें मातृदर्शन । घ्यावया जाई योगभूषण । देवगांवी देवी जाण । होती पुत्रासमवेत ॥९६॥
जैसी वत्साविणें गाय दीन । तैसी माता उदासीन । पुत्रविरहें कंठी प्राण । राहिला सतीच्या ॥९७॥
मातेवाचूनी जगती । न दिसे दुसरी प्रेमज्योति । निर्व्याज प्रेमाची मूर्ति । एकचि माय ॥९८॥
जनकास व्हावा पुत्र विद्वान । पत्नीस आवडे पति सधन । औदार्य वांछिती परिजन । ऐसे आशावादी ॥९९॥
परी मातेचें नव्हें तैसें । ती केवळ वसुंधरा भासे । पुत्र असो भलतैसे । तरी ते प्रिय प्राणाहुनी ॥१००॥
न मानी पुत्राचा किंतु । पुत्र हा तिचा प्रेमतंतु । पुत्रास मानी सकल गोत्र । माय एकचि ॥१॥
जरी पुत्र कुपुत्र निघाला । तरी न पडे न्यूनता प्रेमाला । मग जियेचा पुत्र ईश्वर झाला । तिच्या प्रेमा मोल काय ॥२॥
पुत्रविरहें पडली शरपंजरी । ‘ माधव ’ ‘ माधव ’ ऐसा जप करी । म्हणे केव्हा भेटेल कैवारी । बाळ माझा ॥३॥
माधवबाळ चित्रकूटाहून । कोठे गेला न कळे खूण । झालीं वर्षे द्वादश पूर्ण । बालकासी ॥४॥
माझा सुकुमार बाळ । त्याचे पायीं कंटक रुततील । सूर्यतापे होई विकल । मम मोगरा ॥५॥
न जाई कोठे वाहनावीण । तो पायीं गेला हंसून । ज्याचीं भरजरी वस्त्रें छान । तो उघडा निघाला ॥६॥
ज्याची वाणी बहु मधुर । ज्याचें रूपही मनोहर । वाटे श्रीराम अवतार । मज दुसरा ॥७॥
त्यास दत्तक मातेनें । कोठें दवडिलें दुर्दैवानें । करी वदन दीनवाणे । नाथमाय ॥८॥
विनवी महांकालेश्वरा ! रक्षीं रे माझ्या लेकरा । तुमच्या प्रसादपुप्पांचा चुरा । होऊं न द्यावा ॥९॥
माय बहिणी भूमि माते । तूं रक्षी मम वासरातें । स्वापदांनों ! रक्षणकर्ते । व्हावे मम बाळाचे ॥११०॥
देवी सरिते ! माधवनाथ । असेल जरी तव सेवेत । त्याचें संगोपन यथार्थ । करी वो माये ॥११॥
पक्ष्यानों हो ! माझा बाळ । जेथ जेथ जाईल । निजपक्षांची छाया शीतल । करा तयावरी ॥१२॥
वृक्ष वेलींनों ! तुम्ही उदार । माझ्या बाळासी करावें घर । धेनू मातांनों ! दुग्ध रूचिर । द्यावें बालकां ॥१३॥
ऐसें विनवी सर्व निसर्गाएसे । मथुरादेवी करी नियमासी । परी हें न कळे तियेसी । या सर्वांसी रक्षण बाळाचे ॥१४॥
ज्यानें निर्मिलीं पंचभूतें । तेचि कैसें रक्षती त्यातें । तान्हुल्यानें जैसे पितयातें । सांभाळावें ॥१५॥
परी प्रेमाचा नावरे पूर । तो फोडी बंधारे स्थीर । म्हणुनी माता शोक - सागरीं । बुडाली हो ॥१६॥
आला नाथ एके दिनीं । त्यातें नोळखिलें इतरांनी । परी मातेनें तत्क्षणीं । जाणिलें पुत्रासी ॥१७॥
झाली होती कृश अत्यंत । केवल अस्थींचा पुतळा भासत । म्हणे भेटलें गे माझें रत्न । माधवनाथ ॥१८॥
कोठें होतासी माझ्या सोनुल्या । कोण होतें तव सेवेला । तूं सोन्याहुनी पिंवळा । दिससी नयनासी ॥१९॥
कुरवाळी बहु स्नेहानें । घाली स्नान प्रेमाश्रूनें । विसरली सर्व दुःख मायेनें । देवी ती ॥१२०॥
म्हणे तूं न जाई येथून । जाईल निघोनी हा प्राण । तुज घालिते माझी आण । पुत्रराया ॥२१॥
अंतः चक्षूंनी नाथे देखिलें । तों मातेचें सुख थोडें उरलें । अवश्य म्हणोनी पाळिले । मातृवचन ॥२२॥
पुनरपी पंतोजी होती । शहापूर ग्रामीं वसती । जे देवगांवापासुनी निश्चिती । जवळी होते ॥२३॥
तुळशीराम नामें एक वैश्य शिकविती तयाच्या कुमारास । जगाचें गणित इतिहास । क्षराक्षर ॥२४॥
ऐसे असतां वर्तमानीं । येती एक जोशी तयाच्या भुवनीं । व्यापार्यास म्हणती हंसुनी । तुमचा उदय जवळीच ॥२५॥
होतें तयांचें मुद्गल शरीर । तैसेच तुंदिल उदर । पांघरली शाल जरी पदर । शिरीं कानटोपी ॥२६॥
पंचांग घेती एक्या हातीं । दुज्या करीं तपकीरीची चिमटी । ज्योतिष - भूषण म्हणवीती । आपणांसी ॥२७॥
ऐकोनी तयाची वाणी । नाथ वदला तत्क्षणीं । मज दिसते उलट करणी । भविष्याच्या ॥२८॥
जोशीबुवा करिती पांडित्य । नाथें धरिलें मूकव्रत । जाहले रौप्यदान प्राप्त । जोशीराया ॥२९॥
श्रीनाथें वैश्यासी कथिलें । मज दिन न दिसती भले । या ग्रामासी त्यागणें हें भले । पंचदश दिन ॥१३०॥
परी न रुचलें त्या वैश्यराजा । म्हणें व्यवहार बुडेल माझा । नाथ सांगे दिसे तुझा । योग विचित्र ॥३१॥
माता झाली अत्यवस्थ । म्हणोनी गेला देवगांवीं नाथ । आले तस्कर धांवत । लुटिलें वैश्यासी ॥३२॥
प्रभूचे बोल मनीं उमगलें । वैश्ये दुःख फार केलें । सद्गुरु - वचना नाहीं मानिलें । त्याचें फल हेंचि ॥३३॥
अनुताप तयासी झाला । तुळशीराम देवगांवीं आला । नाथ चरणीं नत झाला । म्हणे मी अभागी ॥३४॥
आतां हें दिव्य चरण । कालत्रयीं न सोडीन । मज रक्षावें रात्रंदिन । म्हणोनी चरणीं लागला ॥३५॥
दया उपजली नाथास । कृतार्थ केलें प्रेमें त्यास । दाखवी परमार्थ व्यवहारास । निजप्रसादें ॥३६॥
कांहीं कालानंतर । माता व्याकुळ झाली फार । योगेंद्राच्या अंकावर । सोडी निजदेह ॥३७॥
नाथें त्वरित समाधि लाविली । आपुली माता आपणांत सांठविली । कलेवराची शोभा केली । बाह्योपचारें ॥३८॥
निघाला तेथुनी दीनानाथ । म्हणे राहिले दोन मास मात्र । होणें लागेल प्रगट । स्वामी वचनानुसार ॥३९॥
श्रोते हो ! तुम्ही चतुर । आतां धरावा थोडा धीर । घेईल नाथ अवतार । प्रगटरूपें ॥१४०॥
मग त्यातें शरण जावें । निजदुःखाचें वृत्त सांगावें । सकल पाश तोडवावे । प्रभु - हस्तें ॥४१॥
पुढील किरणीं अज्ञातवास । पूर्ण करील योगीश । वदवील नाथसुतास । निमित्तमात्र ॥१४२॥
इति श्रीमधवनाथदीपप्रकाशे नाथसुविरचिते अज्ञातवासवर्णनंनाम अष्टम किरण समाप्तः ॥
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP