मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री माधवनाथ दीपप्रकाश|
विंशतितम किरणः

दीपप्रकाश - विंशतितम किरणः

Shri Madhavnath Maharaj (1857–1936) was a Hindu saint, of Karvi, Chitrakoot, Madhya Pradesh, who continued the Nath Sampradaya of the famous Navnaths in India.


श्री सद्गुरुनाथाय नमः --
जयजयाजी योगीनाथा । मज तंव मंदिरीं नेई आतां । करी दासाची इच्छा तृप्त । सद्गुरूराया ॥१॥
संत म्हणती तव मंदिराचा । मार्ग कठिणतर साचा । भोंवतीं कंटक नाड्यांचा । एक पश्चिम मार्ग ॥२॥
यमनियमांचा गड मोठा । तो चढावा पुरता । मग लागेल तुज ओटा । पायर्‍यांचा ॥३॥
असती त्यातें सहा पायर्‍या । मध्यें कुंडलिनीचा पहारा । ती न जाऊं देई परां । ओळखीविण ॥४॥
ओळखीचा भेटतां जीव । ती येई त्यासह । दाखवोनी मंदिर सर्व । आणी तुजसमोर ॥५॥
ज्या असती सहा पायर्‍या । त्यांत षट्चक्रांचा मोठा पसारा । त्या उल्लंघितां सार्‍या । जाई त्रिकूट ओट्यावरी ॥६॥
मग लागे ब्रह्मद्वार । जें तंव मंदिराचें द्वार । तेथें जातां नाद सुस्वर । अनाहताचे ॥७॥
प्रथम वाजे गा दुंदुभीनाद । मग वेणू वीणा नाद । त्यानंतर एकतारी गोड । वाजते गा ॥८॥
मग तुझे दर्शन होतां । ध्येयही विसरे ध्याता । मी तूं एक ही वार्ता । स्थिर होई ॥९॥
ऐशा तुझ्या मंदिराची शोभा । मज दाखवी कमलनाभा । कर जोडोनी नाथसुत भा । विनंति करी ॥१०॥
या विशंतितम किरणांत । सांगेल योगविद्या नाथ । ती आचरितां खचित । योगेश्वर होय ॥११॥
परि या क्रियांचें आचरण । न करावें सद्गुरुवांचून । नातरी अपक्रिया होऊन । तनु क्षीण होय ॥१२॥
अपक्रियेनें कुजे शरीर । क्षयाचा होतो विकार । म्हणोनि विनवीं वारंवार । आळवीं सद्गुरुसी ॥१३॥
केवळ ग्रंथ परिशीलनें । योगविद्या न बाणे । सद्गुरुवांचूनी दैन्यवाणे । होईल बापा ॥१४॥
असे योगाचा मार्ग सुलभ । परि सद्गुरुवांचून तो दुर्लभ । म्हणोनि जाणता । सद्गुरु - सांब । आधीं शोधावा ॥१५॥
सद्गुरुवांचूनी मार्ग नाहीं । गुरूविणें मोक्ष नाहीं । सद्गुरुवाचुनी नसे कांहीं । परमार्थ तंतू ॥१६॥
राम कृष्ण साक्षात् ईश्वर । परि तेही गुरुपदीं तत्पर । सद्गुरुविणें न झाला होणार । जीवनमुक्त ॥१७॥
श्रोते म्हणतील हांसोनी । मग दीपप्रकाश किरणीं । योगांगाची लेखणी । किंनिमित्त ॥१८॥
व्हावी योगाची प्रबल आशा । म्हणोनी दावितों रूपरेषा । जो करील निश्चये अभ्यासा । तो होईल योगीराणा ॥१९॥
योगांत येती अनेक संशय । ग्रंथपठणें त्यांचा होई क्षय । अथवा ज्यास लागेल लय । तेजातील सद्गुरुपदीं ॥२०॥
पठणें होईल चिंतन । मग निदिध्यास लक्षण । धरितां सद्गुरुचरण । योग साक्षात्कार । मिळे ॥२१॥
श्रीनाथ म्हणती विनायका । तो सद्गुरु सांगें त्या साधका । तूं ज्या शरीरें इच्छिसी योग बालका । त्याचें वर्णन करीन ॥२२॥
तव शरीराचें प्रमाण । शहाण्णव अंगुलें जाण । कोणी म्हणती हात साडेतीन । जाण बाळा ॥२३॥
ईशासम - रचनाकार । नाहीं कोठें किमयागार । बहात्तर कोटी दहा हजार । दोनशें एक नाड्या ॥२४॥
या साडेतीन हातांच्या पुतळ्यांत । सांठवी अनंत श्री अनंत । हें कथितों मी शरीरशास्त्र । नव्हे कवि कल्पना ॥२५॥
सर्व नाड्यांची एक जननी । सुषुम्ना नाडी ईशरूपिणी । तिला असती मुख्य दोन नंदिनी । ईडा आणि पिंगळा ॥२६॥
वायुस्थानाचे वरी । दोन अंगुलें प्रमाण धरीं । तेथें पोकळी साजिरी । त्यांत मांसपिंड ॥२७॥
शास्त्रें त्यासी म्हणती कंद । तोच सुषुम्नेचा मूळकंद । पाठीचा कणा ज्यास मेरूदंड । शास्त्रीय नांव ॥२८॥
त्यांतून जाई वेल्हाळी । ब्रह्मारंध्रीं स्थिर झाली । सवें ईडा पिंगला घेतली । सुषुम्नेनें ॥२९॥
एकशें सात मर्मस्थानें । या देहांतरीं जाणे । जेथें छेदितां शस्त्रानें । मृत्यू वा असाध्य रोग ॥३०॥
एकशे ऐंशी असती सांधे । नव शत स्नायूंचे कठडे । वर्णावें तितुकें थोकडें । देहवर्णन ॥३१॥
आतां वायूंची स्थानें । दाखविलीं त्रयोदश किरणें । प्राण अपान व्यान उदान समान । हें मुख्य पांच ॥३२॥
अपानें मलमूत्र विसर्जन । आवेशें करी त्याग व्यान । उदान करी शरीरोत्थान । प्राण सर्व शरीरीं ॥३३॥
या प्राणाची चलनशक्ती । समान वायूची गती । उपप्राणाची वसती । वाचावी उक्तकिरणीं ॥३४॥
शरीराची रचना सर्व । सांगती वसिष्ठ मुनिराय । गर्भोपनिषदीं भाव । अवश्य वाचावा ॥३५॥
अशा या नरदेहांत । चक्रें असती बहुत । परि त्यांत सहा प्रख्यात । सहस्त्रदल सातवें ॥३६॥
षट्चक्रावरी नाथ बालक । करी एक पद्य प्रासादिक । तें मुखोद्गत करोनी आवश्यक । चिंतनीं ठेवावें ॥३७॥
या चक्राचें करितां पूर्ण चिंतन । तेथील देवतेचें दर्शन । साक्षात् दिसेल ही खूण । निश्चयेसी ॥३८॥
या प्रत्येकाचा जप करावा । सद्गुरुपासोनी उमज घ्यावा । मग वायू भेदून ठेवा दावील गा ॥३९॥
या एका पद्यांत । चक्राचीं नामें यथार्थ । स्थल दल मातृका दैवत । ऋषिबीज आणि वर्ण ॥४०॥
तैसी शक्ति आणि जपसंख्या । दिलीं असती बालका । न करी आलस्य साधका । मुखोद्गत करावया ॥४१॥

षट्चक्रवर्णन - ( चाल - हरिची भगिनी म्हणे सुभद्रा )
( यांत प्रत्येक चक्राचें नांव, स्थल, दल, मातृका, देवता, ऋषि, बीज, वर्ण शक्ति आणि जपसंख्या इत्यादि आलीं आहेत )

श्री योगाभ्यानंदपदांबुजीं शुभंकरारे मनराया ।
निर्मल निश्चल होऊनि पाहीं षट्चक्रांतर्गत काया ॥धृ.॥
मूलाधारी वारिजपत्रें संचतुष्कें चक्र असे ।
वं शं षं सं चार मातृका तेथें श्री गनपति विलसे ॥४२॥
ईश्वर ऋषि ऐं बीज रक्तसे शक्ति डाकिणी वास करी ।
जपतां षट्शत संख्या घेशील तूं तद्दर्शन सुख लहरी ॥४३॥
लिंगस्थानीं पीत साजिरें षट्दल युत स्वाधिष्ठान ।
वं पासुनि लं असति मातृका जें विधिचें आधिष्ठान ॥४४॥
भानु ऋषी सावित्री देवी शक्ती क्लीम् बीजा सहिता ॥
जपतां षट्साहस्त्र तयातें सरली तव भवभय चिंता ॥४५॥
नाभिस्थानीं दशदल गोलक मणिपुर डं फं बीज युत ।
नीलप्रभाशाली श्रीविष्णू तेथ विहरतो सुखदाता ॥४६॥
पवन ऋषी श्री शक्ति दशांगुल भूषित ऐं बीजें केलें ।
षट्सहस्त्र जपुनि भगवंता मार्ग आपुला कंठि बळें ॥४७॥
हृदयाकाशीं चक्र अनाहत द्वादशदलिचें बहु धवल ।
तेथें केला वास शिवानें घेऊनि कंठाक्षर माळ ॥४८॥
इंद्र ऋषी श्री उमाशक्ती बीज षट्दलापरि साचे ।
षट्साहस्त्र जपातें करूनी मग निधान घे परिसांचें ॥४९॥
कंठी शोभे विचित्र रंगी विशुद्ध षोडश स्वर सहिता ।
जीवात्म्याने त्यास आणिली अनुपमशी रे उज्वलता ॥५०॥
शक्ति अविद्या अग्नि ऋषी हं बीज असें या चक्राचें ।
सहस्त्र जप करूनी पद चढ रे चिदानंद - सोपानाचें ॥५१॥
भृकूटीं आज्ञाचक्र द्विदल जें रविशशिसम झळके बघ रे ।
स्वयंसिद्ध परमात्मा तेथ ‘ हं क्षं ’ मालालंकृत रे ॥५२॥
परमहंस ऋषि माया शक्ति ग्लीम् बीजाची घन छाया ।
मनराया रे ! सहस्त्र जपुनी ऐक्य करी जीवा शीवा ॥५३॥
सजस्त्रदल शिरी नानावर्णीं ज्ञान ऋषी सद्गुरुदेव ।
तेथे शिरतां चिच्छक्ती मग घेसि खरा तूं स्वानुभव ॥५४॥
नानाध्वनिचे आगर सोहं बीज अहंकारा मूल ।
सहस्त्र जपुनी परब्रह्म श्रीसद्गुरुचें बघ स्थल विमल ॥५५॥
एकवीस साहस्त्रसहाशत अजपाजप स्वासोच्छ्वासी ।
करी स्वसूर्योदय पर्यंतहि त्वरित आपणा ओळखासी ॥५६॥
ऐशा पश्चिमपंथे जातां सकल वासना वारूनिया ॥
श्रीमाधवयोगेन्द्र निजपदा दाविल मग कळवळुनीया ॥५७॥
आतां ब्रह्मांडीचीं चक्रें । जी पद्यीं गुंफली नाथबालकें । ती ही सांगेन कौतुके । मुखोद्गत करावया ॥५८॥

ब्रह्मांडींची चक्रे ( साक्या )

श्रीयोगींद्रें सदय माधवें वाराया भव - चक्रें ।
कथिली व्युत्पत्तीसह आम्हा ब्रह्मांडीची चक्रें ॥५९॥
प्रथम सुशोभे त्रिकूत गोलक लिंग तदिय आचार ।
ब्रह्मा भक्त ऋषी भूऋग्वेद् वाक् वैखरि साचार ॥६०॥
वर्ण सुपीत रजोगुण देहस्थूल जागृतीऽवस्था ।
सलोकता मुक्तीचें आगर अकार विश्वावर्ता ॥६१॥
द्वितीय चक्र श्रीहाट लिंग गुरु विष्णू भक्त ऋषी आप ।
यजुर्वेद मध्यमावाणि नव मौक्तिक वर्ण प्रताप ॥६२॥
सत्व गुणी तनु सूक्ष्म अवस्था स्वप्न तेज अभिमानी ।
असे मातृका उकार मुक्ती सलोकता बहु मानी ॥६३॥
गोल्हाटाचें गोलक गोचर नंतर हर शिव लिंग ।
रूद्र भक्त श्रुति सामवेद ऋषि तेज श्वेत तद्रंग ॥६४॥
तमोगुणी पश्यंतीवाचा कारण देह अवस्था ।
सुषुप्ति प्राज्ञाभिमानि मातृका मकार मुक्ती सरूपता ॥६५॥
औटपीठ वायुर्षी जंगम लिंगहि ईश्वर भक्त ।
वेद अथर्वण शुद्ध सत्व गुण विद्युद्वर्णासक्त ॥६६॥
तूर्याऽवस्था परा प्रत्यगात्माभिमानी जाण ।
देह महाकारण ॐकारप्रिय सायुज्य निधान ॥६७॥
भक्त सदाशिवयुक्त भ्रमरगुंफेचें चक्र प्रसाद ।
आकाशर्षी सूक्ष्मवेद हो वाणि परात्पर शुद्ध ॥६८॥
कृष्णवर्ण गुण सगुण उन्मनीऽवस्था देहज्ञान ।
ज्ञानात्मा मातृका अर्धमात्रा कैवल्य पूर्ण ॥६९॥
परब्रह्म श्रीब्रह्मरंध्र हें चक्र शेवटीं सजलें ।
ज्यातें गाता नेति नेति श्रुति देव मुनीवर वदले ॥७०॥
महालिंग ऋषि परम पुरूष परमात्मा भक्त परेश ।
आत्मवेदाचा अनुभवही बहुवर्णांचा कोश ॥७१॥
निर्गुण गुण आनंद तनू स्थिर चर साक्षि महात्मा ।
ब्रह्म मात्र मातृका पूर्णता मुक्ति स्वयं परमात्मा ॥७२॥
या षट्चक्रांची जपसंख्या । पद्यीं कथिली बालका । आजपाजपानें देखा । करावी गा ॥७३॥
आजपाजपाचें विधान । सांगेल सद्गुरू आपण । सोहं मंत्राचे शिक्षण । सोहं मूर्तीच देईल ॥७४॥
पूर्वीसांगितलेला कंद । त्यापासून कमलनाल प्रसिद्ध । तोसप्तधातूंनी वेष्टित । जाहला असे ॥७५॥
कमलनाल हें देहाचें मूळ । तयाच्या मध्यभागीं चक्रविमल । जणूं रथाचें चक्र गोल । द्वादश आरांचे ॥७६॥
तया नाभिचक्र म्हणती । जीवात्मा फिरे तया भोंवती । ज्यायोगें सृष्टीची पेटी । सहज उघडी होई ॥७७॥
आतां या देहाची मूल स्वामिनी । जी शक्ति कुंडलिनी । तीच ब्रह्माची मूर्ति मनीं । जाणिजे पां ॥७८॥
मूलाधार चक्राचे वरी । नाभिचक्राखालीं सुंदरी । बसली वांकुडी सर्पापरी । जाहली निद्रित ॥७९॥
भूमि जल तेज वायू हे चार । आकाश मन बुद्धि अहंकार । जी भगवंताची ‘ अपरा ’ नामक नार । तीच कुंडलिनी ॥८०॥
प्राणवायू टाळूंतुनीं । जया दशमद्वार म्हणती मुनी । इच्छी ब्रह्मपुरीं जावें झणी । मुक्त व्हावया ॥८१॥
त्या वायूचा मार्ग सुषुम्ना । तिच्या तोंडाशीं कुंडलिनी जाण । ती न जाऊं देई कवणा । मार्गीं जाहली निद्रित ॥८२॥
योगसाधनें प्राण होई चलित । तैं आदिशक्ति होई जागृत । व्यापुनी सर्व शरीरांत । जाई इष्त स्थलीं ॥८३॥
ती अत्यंत प्रज्वलित । जणूं शेष समर्थ । करावें तियेला चलित । हेंच योग्याचें कार्य ॥८४॥
आतां योगाचे प्रकार । तुज सांगेन जे चार । हठयोग दुसरा राजयोग । मंत्रयोग आणि लययोग ॥८५॥
या सर्वांत राजयोग श्रेष्ठ । त्याचें वर्णन संक्षिप्त । तुज सांगेन हें शास्त्र । महामुनि प्रणित जें ॥८६॥
चित्ताचा निरोध करून । परब्रह्माशीं करावें संलग्न । यासी योग म्हणती सर्वज्ञ । हेंचि जाण तव कार्य ॥८७॥
तुज कथिले म्यां चार योग जाण । ते राजयोगींच असती संलग्न । या योगांचीं अंगें अष्टपूर्ण । तींही अवधारावीं ॥८८॥
यम नियम आसन । प्राणायाम प्रत्याहार जाण । सहावें धारणा सातवें ध्यान । आठवी समाधी ॥८९॥
या एकेक अंगाचें वर्णन ऐक चित्त देऊन । नातरी विपरीत अनुमान । करशील गा ॥९०॥
पालथ्या घटावर पाणी । ऐसी न करीं विपरीत करणी । यम नियमांचे भेद ऐकुनी । घेईं आधीं ॥९१॥
यमाचे प्रकार पांच । अहिंसा सत्य अस्तेय साच । ब्रह्माचर्य अपरिग्रह हाच । शेवटीं गा ॥९२॥
अहिंसा या व्रताचें पालन । तूं करीं गा रात्रंदिन । घेऊं नको कोणाचा प्राण कदाकाळीं ॥९३॥
अहिंसा करी शत्रानें । किंवा वाक् - ताडणे । अथवा अपशद्वीं बोलणें । हीं हिंसा होय ॥९४॥
सर्वांशीं मधुर बोलावें । सर्वांवरी प्रेम करावें । सर्व आपणांत पहावें । हीच अहिंसा ॥९५॥
आतां यमाचें अंग दुसरें । जयास म्हणती वचन खरें । तें सांभाळीं निर्धारें । शिष्य्रराया ॥९६॥
सत्यावांचुनि साक्षात्कार । तुज कदापि नाहीं होणार । मंडूकोपनिषदचें सार । सत्य हेंच ॥९७॥
सत्य हा स्वर्ग सोपान । सत्य ही भवाब्धीची नौका जाण । सत्यावांचुनी पावन । पदार्थ नसे गा ॥९८॥
अस्तेय हें तिसरें काम । करूं नको चौर्य कर्म । काया वाचा मनोधर्में । चोरी सोडावी ॥९९॥
कोणी खेळती जुगार । कुणी करिती शर्यती थोर । कोणी करोनी नाना प्रकार । पुष्ट होती ॥१००॥
कुणी म्हणती रंगभूवर । नाचुनी घेऊं द्रव्य अपार । बांधू तयाचें मंदिर । परि ती चोरी ॥१॥
ऐसे चोरीचे नाना प्रकार । हे कार्याचे हानिकर । न करीं रे स्वीकार । या चोरीचा ॥२॥
फसवुनी जन जनार्दना । लुटावें द्रव्य जाणा । ती न केवळ चोरीच जाणा । परि दरोडेखोरी ॥३॥
आतां चवथें ब्रह्मचर्य । जो प्रमुख यमोपाय । तो रक्षाया करीं निश्चय । तव मनाचा ॥४॥
न रहावें स्त्रीमंडळांत । न करावें भाषण व्यर्थ । जेणें विषयीं होईल चित्त । ऐसे वर्तन सोडावें ॥५॥
न पहावे नाटक तमाशे । हे विषयाचे दूत ऐसे । तुज नरकीं नेतील परिसें । पुत्रराया ॥६॥
या युगींचा प्रकार विचित्र । नाटयीं रेखिती संतांचें चित्र । कटु कारलीं केली शर्करायुक्त । परि तीं कटूच ॥७॥
उडदामाजीं काळें गोरें । निवडणें कठीण बारे । यास्तव या विषयाचें वारें । लागूं नेदीं ॥८॥
पुरूषासम स्त्रियेसही । या व्रताची मात्रा पाहीं । पर पुरूषाचा संग कदाही । करूं नये ॥९॥
दुर्दैवाने जी अबला । वैधव्यानलें पोळली बाला । तियेनें या व्रताला । राखावें कडक ॥११०॥
जी संसारसुखातें मुकली । तिने घ्यावी योग किल्ली । उघडावी भ्रांतीची जाळी । योगशक्तीनें ॥११॥
धरोनी अहर्निश विरक्तता । घ्यावें गा योगपंथा । तीच होईल देवता । निश्चयेंसी ॥१२॥
ब्रह्मचर्याचें पालन । करावें साधकें पूर्ण ।  नातरी गृहस्थाश्रम जाण । स्वीकारावा ॥१३॥
नैष्ठिक ब्रह्मचर्य त्यासी । वदलें असे शास्त्रीं । तें स्वीकारूनी हर्षी । साधावा यो ॥१४॥
गृहस्थाश्रम जरी घेतला । तो मुकतां नियमाला । त्यास योग पारखा झाला । जाण बाळा ॥१५॥
विषयीं साधक योग करील । तो त्वरित विलया जाईल । जैसें फुटक्या घटीं जल । राहणार नाहीं ॥१६॥
बिंदुरक्षणें चित्ताचा जय । त्वरित होईल हा निश्चय । तरी न होऊं द्यावा क्षय । शक्तीचा रे ॥१७॥
आतां अपरिग्रह हा शेवटीं । तूं साधावा यम निश्चितीं । न घ्यावें पर - दानाप्रति । कदाकाळीं ॥१८॥
न सेवावीं परान्नें । सदा अयाचित राहणें । प्रसंग पडतां भिक्षा मागणें । परि दान घेऊं नये ॥१९॥
हरिश्चंद्र होता भूपाल । केला विश्वमित्रें छळ । परि न सोडिलें शील । सत्वशीलानें ॥१२०॥
सहस्त्ररश्मी सूर्य तळपला । पाणपोईचा मठ भेटला । निर्मल शीत जल - संजय सांचला । परि घेतला नाहीं बिंदूही ॥२१॥
आतां नियमाचे ऐका नियम । शौच संतोष तप उत्तम । स्वाध्याय प्रणिधान नाम । पांच असती ॥२२॥
शौच म्हणे बाह्यांतर शुद्धी । आधीं करावा प्रातर्विधी । मग अंतःशुद्धीसाठीं साधीं । हटयोग क्रिया ॥२३॥
धौति बस्ति तैसी नेती । त्राटक नौली कपालभाती । त्यायोगें नाड्या शुद्ध होती । अंतरींच्या ॥२४॥
धौतीनें आंतडीं धुवावी । बस्तीनें अपानीं क्रिया करावी । मग गजक्रियेनें पहावी । साक्षात गणेशमूर्ती ॥२५॥
नाकडोळयांची रंध्रें नेती । स्वच्छ करील ही कृती । नेत्र रोगाची व्यथा पुरती । जाई या क्रियेनें ॥२६॥
त्राटकाची क्रिया सहज पहावा नेत्रीं सद्गुरुराज । एक दृष्टींत दृष्टी ठेवीं तुज । मग कळेल गा ॥२७॥
नौली ही पोटाची क्रिया । मंदाग्नी नेई विलया । कपालभातीनें श्वास सखया । करी लोहार भात्यासम ॥२८॥
ऐशा शुद्धीच्या क्रिया सहा । तुवां आदरें कराव्या । परि सद्गुरुवांचुनि राया । करणें योग्य नसे ॥२९॥
तुज माझें प्रत्यहीं सांगणें । न करीं गा गुरुविणें । होईल अपाय पुस्तकानें । करणी करितां ॥१३०॥
संतोष हें दुसरे लक्षण । जें मिळेल त्यांत समाधान । न हालवी वृत्तिस्थान । कदाकाळीं ॥३१॥
संतोष हें मोठें ऐश्वर्य । यापुढें तुच्छ राजवैभव । निस्पृहासी जगत् सर्व । तृणासम ॥३२॥
करावा प्रभूचा आश्रय । तो करील सहाय्य । मग तरंगाचें काम काय । वृत्तीवरी ॥३३॥
तो दयाघन बहु समर्थ । सर्वांस देई यथोचित । दुराचारियांही नित्य । पाही करूणदृष्टीं ॥३४॥
संतोष हा तितिक्षेचा प्रिय पती जाण साचा । कोसळला पर्वत संकटांचा । तरी संतोष ॥३५॥
निजकार्यी येवो जय । अथवा होवो पराजय । परि संतोष ठेवितां अढळ । होईल कार्यसिद्धी ॥३६॥
आतां तप हा नियम तिसरा । तूं साधीं गा कुमारा । नाना व्रतांचा घेई थारा । यथाशक्ति ॥३७॥
शीतोष्णादि द्वंद्वे सहन । करिती एक अनुष्ठान । ग्रीष्मीं पंचाग्निसाधन । शरदी बसावें जलसंचयीं ॥३८॥
पर्जन्यकाळीं अंगणांत । बसावें प्रेमें त्वा नित्य । घ्यावा पर्जन्य स्वस्थ । अंगावरी ॥३९॥
परी साध्य तेंची करावें । आपुलें सामर्थ्य बघावें । गुरुसेवेचें व्रत बरवें । सर्वांहुनी ॥१४०॥
गुरुसेवे ऐसें तप श्रेष्ठ । नाहीं नाहीं गा अन्यत्र । सेवेचे प्रकार पूर्व किरणांत । कथिले असती ॥४१॥
तपाचे प्रकार अनंत । श्रीकृष्णें कथिले गीतेंत । सप्तदशम अध्यायीं प्रगट । झाले असती ॥४२॥
निष्काम कर्म हें सात्विक । राजसें मिळे स्वर्गादिक । तामसें प्राप्त होई नरक । जाण बाळा ॥४३॥
स्वाध्याय हा नियम चवथा । करावा जप सर्वथा । श्रीगुरुनें तो सांगतां । अधिक फल ॥४४॥
सद्गुरुमुखें मंत्र घ्यावा । तो अंतरी जपावा । तेणें मनाचा पुंडावा । मंदावेल ॥४५॥
जपाचे प्रकार दोन । मानस आणि उच्चारण । मानस जपाचें विधान । महाश्रेष्ठ ॥४६॥
सर्व विधि करीत असतां । मानसीं नाम जपतां । सहज समाधीचा गुप्त ठेवा । तया मिळे ॥४७॥
या जपाचें सर्व विधान । पुढें मी विशद करीन । जपीं ठेवितां ध्यान । अधिक फल असे ॥४८॥
ईश्वरप्रणिधान शेवटचा नियम । तूं चित्तीं ठेवी शिष्योत्तमा । सद्गुरु भक्तीचें घेई धाम । सुमंगल ॥४९॥
नवविधा भक्ती करावी । उपासना न सोडावी । भक्तीविण कार्यसिद्धी न व्हावी ॥ हा नियम ॥१५०॥
ऐशा यमनियमांचा गड चढतां । तुज देव भेटेल आयता । असे सुलभ पुढील रस्ता । केवळ वायूचा ॥५१॥
तुझ्या पश्चिमेची वायू लहरी । तुज घेऊन जाईल मंदिरीं । ती चिंता सद्गुरुनाथ करी । तूं राहीं अचल ॥५२॥
आतां झाला बहुत काल । सायं संध्येची होई वेळ । पुढील किरणीं सांगिजेल । सर्वयोगांगें ॥५३॥
श्रीनाथ आणि विनायक । तेवी दुसरे सद्गुरु बालक । कराया आपुलें अन्हिक । सोडिती आसन ॥५४॥
श्रीनाथसुत चोपदार । दरबार बरखास्तीचा पुकार । करितां श्रोतृवृंद थोर । सोडिती आसन ॥१५५॥
इति श्रीमाधवनाथ दीपप्रकाशे नाथसुत विरचिते अष्टांगयोगवर्णनं नाम विंशतितम किरणः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP