क्षौमं वासः पृथुकटितटे बिभ्रती सूत्रनद्धं पुत्रस्नेहस्तुतकुचयुगं जातकंपं च सुभ्रूः ।
रज्ज्वाकर्षश्रमभुजलत्कंकणौ कुंडले च स्विन्नं वक्त्रं कबरविगलन्मालती निर्ममंथ ॥३॥

जयेची स्नेहाळ कृपादृष्टि । सुभ्रू यशोदा गोरटी । गोरस घालूनि देहघटीं । सार निवडी निर्मथनीं ॥६९॥
जिचे कटिभाग रम्य पृथुळ । वरी अमूल्य परिधान पट्कुल । सूत्रनद्ध कांची सोज्वळ । रत्नझळाळ जडिताचे ॥१७०॥
सबळ मथनीं रज्जु धरणें । श्रमोत्पत्ति । आकर्षणें । झणत्कारिती करकंकणें । कर्णभूषणें डोलतीं ॥७१॥
पदर खोम्विला परवंटीं । कंचुकी बिरडां पडली गांठी । कृष्णस्नेह दाटला पोटीं । तेणें दृष्टि उन्मळित ॥७२॥
नयनीं कोंदलें ध्यानसुख । श्रमें सघर्म शोभे मुख । भूमीं पुष्पाचा अभिषेक । मंथनीं मस्तक डोलवितां ॥७३॥
दोहीं हस्तीं करितां मंथन । तेणें सर्वांग कंपायमान । पुत्रस्नेहें द्रवलें मन । दुग्धें स्तन पाझरती ॥७४॥
सप्रेम श्रीकृष्ण जे जे गाति । तेथ प्रकटे श्रीकृष्णमूर्ति । प्रत्यक्ष जननी ते यशोदा सती । गातां श्रीपति कळवळिला ॥१७५॥
भाविकांचें अभ्यंतर । जाणोनि प्रकटे जगदीश्वर । यशोदा सप्रेमें निर्भर । स्तनीं पाझर सूटले ॥७६॥

तां स्तन्यकाम आसाद्य मथ्नंतीं जननीं हरिः । गृहीत्वा दधिमंथानं न्यषेधत्प्रीतिमावहन् ॥४॥

शुक म्हणे गा परीक्षिति । ऐशी मंथितां यशोदा सती । अंतर जाणोनि कमळापति । सप्रेमगती पातला ॥७७॥
रवी कवळोनी दोहीं करीं । कलभाषणें मंथना वारी । यशोदेतें धरूनि पदरीं । स्तन्य मुरारि मागतसे ॥७८॥
मंथितां जननी खोळंबूनी । रवीदंड हस्तें कवटाळूनी । प्रीति वाढवी आळी करोनी । पुरवी आयणी प्रेमाची ॥७९॥
प्रेमाथिलें फल दल जल । तोषें स्वीकरी भक्तवत्सल । पान्हा देखोनि उतावीळ । प्रार्थी गोपाळ मातेतें ॥१८०॥
यशोदेचे स्तनीचें पय । शुद्ध विभाग आपुला होय । मंथनीं निषेधूनियां माय । मागे लवलाहें प्रेमपान्हा ॥८१॥

तमंकमारूढमपाययत्स्तनं स्नेहस्नुतं सस्मितमीक्षती मुखम् ।
अतृप्तमुत्सृज्य जवेन सा ययावुत्सिच्यमाने पयसि त्वधिश्रिते ॥५॥

मग बैसोनि सादर धरणीं । अंकीं घेऊनि चक्रपाणि । स्नेहें द्रवला पान्हा स्तनीं । तो पाजी जननी कृष्णातें ॥८२॥
एक मुखीं घालूनि स्तन । दुसरा करतळीं कवळून । करीतां सप्रेमें प्राशन । पाहे वदन यशोदा ॥८३॥
तंव ते आनंदें गोरटी । चित्सुखीं उपरमोनि गेली दृष्टि । अष्टभावांची अंगीं पुष्टि । पाहे जगजेठी हे दशा ॥८४॥
मग म्हणे तो नाटक । जंववरी अद्वैत अघट । तंववरीच प्रेमसुख । सांवरी नावेक ते दशा ॥१८५॥
होतां प्रभूची इच्छामात्र । यशोदा उघडूनि पाहे नेत्र । कृष्णें दाविलें चरित्र । तें विचित्र अवधारा ॥८६॥
पुत्रस्नेहें माझ्या ठायीं । यशोदा सप्रेमभजनें देहीं । देहस्मृति न लाहे कांहीं । केवळ विदेही हों पाहे ॥८७॥
जळें लवण द्राव धरी । घृतनवनीता उष्ण विघुरी । भक्तवत्प्रेमा भ्रांति हरी । चित्सुख करी उत्कर्षें ॥८८॥
वस्तुमहिमा हा जाणोनी । प्रेमोत्कर्षें सावरूनी । संसारचरित्र चक्रपाणि । यशोदे नयनीं दाखवी ॥८९॥
कृष्णीं प्रेमा एकाग्र आहे । तोचि पदार्थीं गुंततां मोहें । यशोदा द्वैतें कवळिली राहे । तो उपाय योजिला ॥१९०॥
यशोदा जंव उघडी नेत्र । तंव चुलीवव्रील दुग्धपात्र । उतोनि चालिलें सत्वर । लोभें अंतर कवळिलें ॥९१॥
एक प्राशिलाचि नाहीं स्तन । दुसरे स्तनीं पान्हा पूर्ण । अतृप्त स्तनींचा काढूनि कृष्ण । दुग्धा लावूनि धांविली ॥९२॥
अतृप्त स्तनींचा काढिला हरि । झाली दुग्धास्तव घाबिरी । कृष्ण हांसे अभ्यंतरीं । म्हणे संसारीं गुंतली ॥९३॥
सांडूनि मत्प्रेमाची सुधा । संसारविषयें वेधिली दुग्धा । सारासार नेणें मुग्धा । म्हणोनि क्रोधा हरि दावी ॥९४॥
घरीं दुग्धाची वाणी कोण । मज हे अतृप्त सांडून । दुग्धासाठीं कळवळून । धांवे आपण यशोदा ॥१९५॥


References : N/A
Last Updated : April 28, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP