नायं सुखापो भगवान् देहिनां गोपिकासुतः । ज्ञानिनां चाऽऽत्मभूतानां यथा भक्तिमतामिह ॥२१॥

देही म्हणिजे देहाभिमानी । देहाश्रयें तपें साधूनी । अपार सुकृतें संपादूनी । चक्रपाणि आकळिती ॥३९॥
श्रद्धापूर्वक तपोत्कर्षी । श्रमतां लाभे हृषीकेशी । परंतु तैसा न फावे त्यांसी । जैसा यशोदेसी फावला ॥३४०॥
सुतपापृश्नि तपःसाहस्रीं । त्यांचें पुत्रत्वचि अंगीकारी । परी या प्रेमाची केली चोरी । यशोदा घरीं जें भोगी ॥४१॥
सप्रेम तपाची हे गोठी । श्रद्धाविहीन अनंतकोटी । तपश्चर्येच्या संकटीं । नोहे भेटी कल्पांतीं ॥४२॥
श्रद्धा नसतां तपाचा शीण । म्हणाल कासया करील कोण । तरी ये आशंकेचें वचन । कीजे श्रवण चतुरांहीं ॥४३॥
सकाम प्रेमा अभ्यंतरीं । धरूनि दुर्घट तपें करी । तें अभ्यंतर जाणे हरि । इतरां परी हें न कळे ॥४४॥
वरकलीं उतरे जितुकी वाणी । तितुकें मोल होय सुवर्णीं । तेंवि सर्वज्ञ चक्रपाणि । तपाचरणीं परीक्षी ॥३४५॥
इहलोकींचा विषयस्वार्थ । देखोनि भुलें ज्याचें चित्त । तयासी सप्रेम परमार्थ । श्रीसमर्थ न ओपी ॥४६॥
कोणी ऋद्धिसिद्धि प्रेमें । कोणी अमुत्रभोगकामें । कोणी भुलले मोक्षधामें । ज्ञानावगमें पैं एक ॥४७॥
सकाम तपश्चर्या ऐशा । करिती भुलोनि फळाभिलाषा । तेणें पात्र होती क्लेशा । श्रीपरेशा न पवती ॥४८॥
उत्तम सकामा हे प्राप्ति । अधमकामीं नरका जाती । त्याची कासया व्युत्पत्ति । वृथा ग्रंथीं वाढवूं ॥४९॥
हिरा परीक्षिजे घणीं । मित्र परीक्षिजे व्यसनीं । शूर परीक्षिजे रणीं । स्त्री निर्धनीं परीक्षिजे ॥३५०॥
साधु परीक्षिजे सोमें । धीर परीक्षिजे नियमें । यति परीक्षिजे संयमें । विरक्त परीक्षिजे हेमें ॥५१॥
साधु परीक्षिजे क्षोभें । उदास परीक्षिजे लोमें । पुंश्चळी परीक्षिजे प्रलोभें । भूमि कोंभें परीक्षिजे ॥५२॥
सुकृती ओळखिजे सत्कर्में । शत्रु ओळखिजे सवर्में । भक्त जाणिजे निष्कामप्रेमें । शील स्वधर्में लक्षिजे ॥५३॥
निष्काम सप्रेम भक्तीपाशीं । ऋद्धि सिद्धि मुक्ति दासी । सकाम गुंतती दासीपाशीं । कैंची त्यांसी प्रतिष्ठा ॥५४॥
म्हणोनि तपाच्या संकटीं । भगवत्प्राप्ति परम कष्टीं । भगवत्प्रेमाची हे पुष्टि । ते शेवटीं दुर्लभ ॥३५५॥
असो तपस्वियांची गोठी । ज्ञानिये निरभिमान जे सृष्टीं । साधनचतुष्टयरहाटी । अपरोक्षपुष्टि पावले ॥५६॥
अभ्यासाचेनि दीर्घयत्नें । ब्रह्मतादात्म्यनिरभिमानें । विघ्नबाहुल्यें उल्लंघणें । चित्सुख होणें तेव्हां कीं ॥५७॥
तों विघ्नाचे पेटती पूर । क्षोभें खवळती नर सुर पितर । आंगीचे षड्वैरी महाक्रूर । ते विकार उपजविती ॥५८॥
तथापि सोसूनि इतुके कष्ट । समाधिसमरसलाभें स्पष्ट । चित्सुख पावे तेंचि श्रेष्ठ । प्रेमोत्कर्ष दुर्लभ ॥५९॥
एवं तपोध्यानसमाधिवंता । दुर्लभ आकळणें भगवंता । तो एथ आकळे भक्तिमंता । सुखें क्रीडतां अक्लेशें ॥३६०॥
षड्गुणैश्वर्य अविच्युत । तो हा श्रीकृष्ण गोपिकासुत । दांवां उखळीं बांधोनि घेत । केवढें अद्भुत प्रेमाचे ॥६१॥
यथाधिकारें श्रीभगवान । फावे एथें नाहीं आन । त्यामाजी भक्तिप्रेमा गहन । तें व्याख्यान हें केलें ॥६२॥
म्हणसी बांधला जो उखळीं । झाला निबद्ध वनमाळी । तरी हे तें व्याख्यान हें केलें ॥६२॥
जे नातळे विभक्तपणें । ते दशेतें म्हणणें । तेथें कोणा बांधलें कोणें । हें परवणें अचोज ॥६४॥
प्रेमें एकांच्या बांधला । असतां एकांच्या वचनाला । तैसाचि एका साच करूं गेला । मुक्त एकाला करावया ॥३६५॥
यशोदेनें बांधला उखळीं । तो नारदोक्ति रज्जु मोकळी । करूनि मुक्तीची नव्हाळी । ओपी ते काळीं गुह्यकां ॥६६॥
हे ऐकोनि शुकाची उक्ति । श्रवणीं सादर परीक्षिति । कैंचि कैशी नारदोक्ति । उत्सुकचित्तीं परिसावया ॥६७॥
हें देखोनि शुकाचार्य । लावी कथेचा अन्वय । कीजे श्रोतीं तो अभिप्राय । श्रवणालयनिवासी ॥६८॥

कृष्णस्तु गृहकृत्येषु व्यग्रायां मातरि प्रभुः । अद्राक्षीदर्जुनौ पूर्वं गुह्यकौ धनदात्मजौ ॥२२॥

कृष्ण बांधोनियां उखळीं । गृहकृत्यासी यशोदा बाळी । व्यग्र देखोनि तये काळीं । करी वनमाळी तें ऐका ॥६९॥
भूतभविष्य वर्तमान । अबाधित त्रिकालज्ञ । यास्तव प्रभु हें अभिधान । बादरायण बोलिला ॥३७०॥
तो भविष्य श्रीअनंत । पूर्वीं गुह्यक धनदसुत । ते हे यमलार्जुन पैं एथ । पूर्ववृत्तांत अवलोकी ॥७१॥

पुरा नारदशापेन वृक्षतां प्रापितौ मदात् । नलकूबरमणिग्रीवाविति ख्यातौ श्रियाऽन्वितौ ॥२३॥

विवरूनि पाहे जगदीश्वर । म्हणे हे कुबेराचे उभय कुमार । मणिग्रीव नलकूबर । चरांचर यां जाणे ॥७२॥
श्रियायुक्त धनदसुत । तेणेंचि गुणें मदोद्धत । नारदशापें द्रुमता प्राप्त । पूर्ववृत्तांत आलोची ॥७३॥
शापसामर्थ्य नारदाचें । तेणें वृक्षता पावले साचे । शापविमोक्षण तयांचें । कृपालोचें अवलोकी ॥७४॥
हे कथेचा प्रश्न पुढती । दशमाध्यायीं करील नृपति । शुक सांगेल ते यथामति । भाषाव्युत्पत्ति कथिजेल ॥३७५॥
तये कथेचे ग्राहक । सभाग्य श्रोते पुण्यश्लोक । अवधान देऊनि कथापीयूख । साठी सम्यक करीं तूं ॥७६॥
एका जनार्दनाचिये सांते । भरिजे दुकानीं आइतें । कृष्णदयार्णव अनुचर होतें । प्रभु स्वसत्ते उमाणवी ॥७७॥
इति श्रीमद्भागवत । महापुराण परमामृत । अठरा सहस्र प्रमाणमापित । श्रीशुकोक्त व्याख्यान ॥७८॥
परमहंसाची संहिता शुद्ध । त्यामाजील हा दशमस्कंध । शुकपरीक्षितीचा संवाद । अध्याय विशद हा नवम ॥७९॥
इतिश्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां दधिनिर्मंथनदामोदरबंधनं नाम नवमोऽध्यायः । श्रीकृष्णार्पणमस्तु । श्लोकाः ॥२३॥
टीकाओव्या ॥३७९॥ एवंसंख्या ॥४०२॥ ( नऊ अध्याय मिळून ओवीसंख्या ५३८७ )

नववा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : April 28, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP