कृतागसं तं प्ररुदंतमक्षिणी कषंतमंजन्मषिणी स्वपाणिना ।
उद्वीक्षमाणं भयविव्हलेक्षणं हस्ते गृहीत्वा भिषयंत्यवागुरत् ॥११॥

हस्तीं सांपडला भगवान । सापराध करी रुदन । पसरी नेत्रींचें अंजन । नेत्रधर्षण करूनी ॥३३॥
ऊर्ध्व पाहे मातृवदन । भयविव्हळ फिरवी नयन । त्या कृष्णातें भेडसावून । करीं धरून निर्भत्सीं ॥३४॥
प्रकर्षेंसि रुदन करी । तेणें दणाणिली व्रजपुरी । मिळाल्या व्रजींच्या गोपनारी । केली घाबरी यशोदा ॥२३५॥
तंव तो हरि ग्लानि करी । डोळे फिरवी भयविकारीं । यष्टिभेणें अंग चोरी । वारिती नारी यशोदे ॥३६॥
यशोदे तुजला काय झालें । भयें दचकेल झणें तान्हुलें । भाग्य तुझें उदया आलें । तेणें देखिलें हें दैवें ॥३७॥
लेंकुरें तितुकीं आळी करिती । याचा विस्मय करणें किती । परी तूं निष्ठुर कैशी चित्तीं । यष्टिघातीं ताडिसी ॥३८॥
ऐशी ऐकूनियां बोली । यशोदा मनीं चाकाटली । इहीं कृष्णाची आळी साहिली । मी माउली क्षोभलें ॥३९॥
कडाफोडी करी नगरीं । परी कोणी क्षोभा न येती नारी । एकदिवशीं करितां घरीं । मी अंतरीं सक्षोभा ॥२४०॥
हांसती गौळणी मज या सकळ । यशोदे परदुःख शीतळ । आजि जाणवला गोपाळ । तुझा बाळ तुजलागीं ॥४१॥
मज वारिती व्रजींच्या अबळा । कृष्ण तों माझे पोटींचा गोळा । म्हणोनि कळवळी वेल्हाळा । पाहे डोळां हरिवदन ॥४२॥

त्यक्त्वा यष्टिं सुतं भीतं विज्ञायार्भकवत्सला । इयेष किल तं बद्धुं दाम्नाऽतद्वीर्यकोविदा ॥१२॥

ऐशी अतिस्नेहाळ जननी । परम मोहें कळवळूनी । बालक भयभीत जाणोनी । द्रवे मनीं वात्सल्यें ॥४३॥
मग टाकोनि हातींची यष्टि । कृष्ण धरूनि मणगटीं । बांधों इच्छी त्या गोरटी । नेणे पोटीं हरिमहिमा ॥४४॥
जैशीं प्राकृतें लेंकुरें । माता बांधिती जेंवि निकुरें । तैशी गोकंठपाशदोरें । बांधों करें प्रवर्तली ॥२४५॥

न चांतर्न बहिर्यस्य न पूर्व नापि चापरम् । पूर्वापरं बहिश्चांतर्जगतो यो जगच्चयः ॥१३॥

यशोदा नेणे श्रीकृष्णमहिमा । तो पांचा श्लोकीं नृपोत्तमा । स्वयें निरूपी शुक महात्मा । जो परमात्मा समसाम्य ॥४६॥
शुक म्हणे गा नृपाग्रणि । अपरिमित चक्रपाणि । त्यासी साबडी हे गौळणी । दांवें घेऊनि बांधितसे ॥४७॥
कडबा मोजिती रज्जुमानें । तैसें रज्जुमाजि ज्या सांठवणें । तयां पदार्थां बांधणें । रज्जुबंधनें घडेल ॥४८॥
जें सांपडे दांव्या आतौतें । दावें बाहेरोनि त्या सभोंवतें । दामबंधन घडे त्यातें । तरी तें एथें असेना ॥४९॥
अंतर्बाह्य नाहीं ज्यासी । सर्वव्यापक सर्वदेशी । यशोदा पुत्र मानी त्यासी । जो हृषीकेशी जगदात्मा ॥२५०॥
स्थाणु अथवा महागिरि । परी दिशा भोंवत्या पदार्थमात्रीं । तैसा पदार्थ नोहे हरि । जो दामाभीतरीं सांठवे ॥५१॥
जरी विशाळ द्रोणाचळ । पुच्छीं सांठवी अंजनीबाल । तैसा नोहे हा गोपाळ । दिग्मंडळ ज्यामाजी ॥५२॥
पूर्वं अपर दक्षिणोत्तर । अध ऊर्ध्व बाह्यांतर । एतद्वर्जित जगदाधार । निर्विकार अविभाग ॥५३॥
जो जगाचें बाह्यांतरीं । पूर्वपश्चिमयाम्योत्तरीं । अधोर्ध्व जो चराचरीं । सर्वांपरी जग ज्यांत ॥५४॥
सिंधुगर्भीं नारीकेळ । बुडोनि सहसा न धरी तळ । अधोर्ध्व सभोंवतें त्यासि जळ । म्हणाले गोपाळ तेंवि जगा ॥२५५॥
नारीकेळ जळेंशी भिन्न । तैसा नव्हे जगज्जीवन । जगेंशीं जगदात्मा अभिन्न । जग होऊनि जग व्यापी ॥५६॥
आपणामाजीं स्वप्नींचे जन । आपुल्या संकल्पें निर्मून । त्यासि व्यापक आपुलें ज्ञान । जेंवि तेज आपणची ॥५७॥
तरी कां जीवांसी बंधन । म्हणाल तरी हा भ्रमचि गौण । मिथ्या अविद्यावेष्टण । भेदभान नाथिलें ॥५८॥
तेणें भ्रमलें चराचर । हा सत्य संकल्प ईश्वर । करी भ्रमाचा परिहार । लीलाचरित्र नटनाट्यें ॥५९॥
म्हणाल पूर्वचैतन्यीं हें घडे । केंवि लागे कृष्णाकडे । तें पूर्णत्व ऐशिये क्रीडे - । माजि निवाडें प्रकाशी ॥२६०॥

तं मत्वाऽऽत्मजमव्यक्तं मर्त्यलिंगमंधोक्षजम् । गोपिकोलूखले दाम्ना बबंध प्राकृतं यथा ॥१४॥

मणगटीं धरूनि ओढी हरि । दांवें घेऊनि येरें करीं । उखळीं बांधों तो आदरी । प्राकृतापरी विश्वात्मा ॥६१॥
तो अव्यक्त नाकळे व्यक्ति । तेणें घेतली मनुष्यबुंथी । स्वपुत्र मानूनि तो ते सती । होय बांधिती उखळासी ॥६२॥
अक्षज ज्ञान ज्याहूनि अध । म्हणोनि अधोक्षज म्हणती वेद । तो हा श्रीकृष्ण प्रसिद्ध । मायाबद्ध करूं पाहे ॥६३॥
रक्षा मानूइ हुताशन । करूं जातां संस्पर्शन । दाहकत्वें प्रकटे पूर्ण । तेंवि भगवान ऐश्वर्यें ॥६४॥
बाळ मानूनि बांधों पाहे । तेथ आश्चर्य वर्तलें काय । पूर्ण ऐश्वर्य प्रकट होय । कैसें काय तें ऐका ॥२६५॥

तद्दाम बध्यमानस्य स्वार्भकस्य कृतागसः । द्व्यंगुलोनमभूत्तेन संदधेऽन्यच्च गोपिका ॥१५॥

बळें बंधना तोडितां । झणें करपद पावेल व्यथा । म्हणोनि उदरीं कृष्णनाथा । बांधी माता स्नेहाळ ॥६६॥
उखळ बांधोनि एकसवा । कृष्ण बांधों गेली दांवां । दोन अंगुलें उणें तेव्हां । झालें माधवा तें दांवें ॥६७॥
कृतापराध जो भगवान । मातृकरें बध्यमान । त्यासि द्व्यंगुल दावें न्यून । होतां आन त्या सांधी ॥६८॥
सांधिलें तेंही अंगुलें दोन्ही । न्यून देखोनि पुनः जननी । आणीक सवेग घेऊनी । दावें सांधूनि बांधितां ॥६९॥

N/A

References : N/A
Last Updated : April 28, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP