अध्याय १९ वा - आरंभ
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
श्रीसदाशिवाय नमः ।
वरद विभो विवर्तजनका । विस्मृतिस्मृतिप्रकाशका । विवर्तेशीं स्वपादभजकां । तमोग्रासका विदितात्मन् ॥१॥
स्वविस्मृतीचें आवरण । पांघरोनि जो मूढपण । अवगोनि वरपडला आडरान । विपरीतज्ञानविक्षिप्त ॥२॥
बिंबें प्रतिबिंबा देखणें । आपणा विसरोनि तें मी म्हणणें । तैसें विषयातें चैतन्यें । भ्रमोनि येणें जीवत्वा ॥३॥
तेथ मनाच्या संकल्पें । प्राणप्रवृत्ति देहात्मरूपें । ज्ञानकर्माच्या साक्षेपें । विषयीं प्रतापें झगटता ॥४॥
मग तृष्णाउष्णें तापल्या रानीं । तन्मात्रजनित सुखाचें पाणी । न पवतां चिंतिती निर्वाणीं । अनेक श्रेणी देवांच्या ॥५॥
ऐसे अभिष्टविषयप्रद । होती सकामभजनें वरद । मोद म्हणोनि देती खेद । उदार निजपदपर्यंत ॥६॥
त्यांचीं पदेंचि नश्वरें । कोठूनि देती अनश्वरें । भज्येंचि बुडिजे भवसागरें । भजक निस्तरे कैसेनी ॥७॥
गुणाभिमानी देवत्रय । सकामभजनें ओपिती विषय । मा इतरांचा पाड काय । आनंदमय करावया ॥८॥
मृगाम्भडोहीं नसोनि जळ । मृगांतें भ्रमवी दिसोनि पघळ । तैसे विषय काम्यकर्मफळ । ते निष्फळ वरदेंशीं ॥९॥
लुटुपुटूच्या खेळाप्रती । सुहृद जे जे जेऊं येती । त्यांची येरझार मात्र रिती । वृथा वदती गौरव तो ॥१०॥
तेंवि वरदेंशीं वरदानें । भवभ्रमाचीं अधिष्ठानें । विवर्तजनका विभुत्वगुणें । तव पदभजनें निरसती ॥११॥
अनंतकोटिब्रह्मांडाच्या पंक्ति । तव तव निमेषामाजीं होती । उन्मेषबोधें लया जाती । विभुत्वशक्ति हे तुझी ॥१२॥
तरी निर्गुणीं निमेष तो कोण । जें स्वविस्मृतीचें अंगीकरण । भ्रमोक्त भेदविक्षेपस्फुरण । विवर्त स्वप्न ज्यामाजीं ॥१३॥
स्वप्नीं बुडोनि तोषरोषें । भ्रमें वोसणे तदावेशें । त्यातें प्रबोध स्वप्रकाशें । विवर्तदशे मुकविसी ॥१४॥
जळीं समरसे जैसें लवण । तैसें स्वपदीं अभेदभजन । देखोनि विवर्तेंशीं ग्रसन । करिशी संपूर्ण तयाचें ॥१५॥
देखोनि अवघे निजात्मस्मृति । मुकोनि वरपडले विस्मृति । तेणें बुडाळे संश्रुति - । माजीं विवर्तीं गुंतोनी ॥१६॥
तया विवर्ताची निवृत्ति । करावया करुणामूर्ति । प्रकटावया स्वसंवित्ति । पूर्णस्थिती अवतरसी ॥१७॥
आडीं अवघडीं पडे जड । तेथ काढूं पवाडे जें सुघड । तैं रज्जु लांबोनि चौपट दृढ । काढी अबुडोनि बुडत्यातें ॥१८॥
जड काढूं जो पवाडला । तो काय म्हणिजे आडीं पडला । विवर्त निरसावया अवतरला । तो तूं दादुला विदितात्मा ॥१९॥
एरवीं कूपामाजीं देखा । देघां प्रवेश तो सारिखा । परी तुज ऊर्ध्व मार्ग ठावुका । येरां मूर्खा अधोगति ॥२०॥
म्हणोनि स्वामी विदितात्मया । तुज नमो जी सद्गुरुराया । वरें आज्ञापिलिया कार्या । निजगौरवें चालविजे ॥२१॥
तंव सद्गुरु म्हणती भलाभला । अवंचकभाव कळों आला । स्वपादभजनप्रेमा तुजला । आम्हीं ओपिला वेतनार्थ ॥२२॥
दशमस्कंधीं एकोणिसावा । अध्याय आतां निरूपावा । आज्ञेसरिसा दयार्णवा । माजी उठावा प्रज्ञेचा ॥२३॥
प्रलंब वधिला अष्टादशीं । पुढें श्रीकृष्ण एकोणिशीं । वणवा जळतां गोगोपांसी । प्राशूनि त्यांसि संरक्षी ॥२४॥
मुंजाटवीचें आख्यान । जेथें दानावळ प्राशून । गोगोपाळां रक्षी कृष्ण । यावरी श्रवण तें कीजे ॥२५॥
N/A
References : N/A
Last Updated : May 01, 2017
TOP