ता आहूतां भगवता मेघगंभीरया गिरा । स्वनाम्नां निनदं श्रुत्वा प्रतिनेदुः प्रहर्षिताः ॥६॥

धेनु पडिल्या मुंजाविपिनीं । विकळ संवगडे देखोनी । कृपा आली कृष्णमनीं । धेनूंलागूनि तो बाहे ॥५७॥
मेघगंभीरगिरा हरि । धेनु बाहतां करुणास्वरीं । जाणूनि हरीची वैखरी । सुखनिर्भरीं हरिखेल्या ॥५८॥
उच्चस्वरीं वासुदेवें । आळवितीं घेऊनि नांवें । आनंदल्या धेनु जीवें देती गौरवें प्रतिशब्दा ॥५९॥

ततः समंताद्वनधूमकेतुर्यदृच्छयाऽभूत्क्षयकृद्वनौकसाम् ।
समीरितः सारथिनोल्बणोल्मुकैर्विलेलिहानः स्थिरजंगमान्महान् ॥७॥

गाई समीप गोपाळ आले । परंतु श्रमें विकळ झाले । कृष्णवाक्यें आनंदले । कळप हुंबरले धेनूंचे ॥६०॥
इतुक्यामाजीं दावानळ । अकस्मात अतिप्रबळ । भोंवतें वेष्टिलें मंडळ । लागती ज्वाळ आकाशा ॥६१॥
कडकडाटें फुटती ध्वनि । प्रबळ प्रज्वळे एधमानी । चपळ चौताळे शुष्कतृणीं । श्वापदश्रेणीसंहर्ता ॥६२॥
धूम्रध्वज वायुसारथि । वनौकसांच्या क्षयाप्रति । प्रवर्तला तो शलभपंक्तीं । पाडी आवर्तीं जिह्वाग्रें ॥६३॥
तीव्र शरांचीं संधानें तैशीं उल्मुकें दारुणें । करिती नभःपथीं उत्प्लवनें । पुढें काननें पेटविती ॥६४॥
स्फुलिंग उडती कोट्यानुकोटी । पडती वायूच्या झंझाटी । लागतां तृणीं कोरड्या काष्ठीं । भडका उठी सवेग ॥६५॥
हिरण्यकशिपूच्या निर्दलना । असंख्यकोटि नृसिंहसेना । अष्ट दिशा भूमिगगना । व्यापूनि वना चेतविती ॥६६॥
तैसे स्फुलिंग जेथ तुटती । तेथ स्वयंभ भडके उठती । तापें पाषाणलाह्या फुटती । जेंवि सुटती महायंत्रें ॥६७॥
वृक्ष गुल्म लता झाळी । वंश वेत्र शाल ताळी जळतां प्रचंडप्रलयानळीं । होय होळी स्थिरचरां ॥६८॥
सरड पाली सर्प वृश्चिक । नाना यातींचे तृणकीटक । गोमीगणे द्युमसी मूषक । महातक्षक जळताती ॥६९॥
व्याघ्र सिंह रीस वानर । वृक जंबुक मृग सूकर । चितळ सामरें तरस तगर । वनकुंजर शशकादि ॥७०॥
भल्लुर उलूक श्येनपक्षी । शुक सारिका नानावृक्षीं । गृहें सांडोनि अंतरिक्षीं । भ्रमोनि पावकीं पडताती ॥७१॥
चाष भरद्वाज मयूर । चातक कलविंक तित्तिर । काकपिकादि कपोत कीर । लघुलावर शकुंतें ॥७२॥
अनेक गृध्रांचिया जाति । पिंगळे वलगुला सांगो किती । चिमण्या चिडिया पारापति । टिवटिव्यां जळती क्रौंचादि ॥७३॥
स्थावर जंगमा प्रळयकारी । पडली दावनळाची भंवरी । गाई गोपाळां बोहरी । क्षणामाझारीं हों पाहे ॥७४॥

तमापतंतं परितो दवाग्निं गोपाश्च गावः प्रसमीक्ष्य भीताः ।
ऊचुश्च कृष्णं सबलं प्रपन्ना यथा हरिं मृत्युभयार्दिता जनाः ॥८॥

गोपगोधनां नाशहेतु । परिघाकार अकस्मातु । चंडदावाग्नि प्रमत्तु । महद्भूत देखोनि ॥७५॥
गाई आणि गोपाळ सकळ । मानूनियां तो प्रलयकाळ । प्राणभयें अतिव्याकुळ । दिग्मंडळ लक्षिती ॥७६॥
नाहीं रक्षिता ते काळीं । पुढें देखोनियां वनमाळी । कृष्णाभोंवतीं मिळालीं सकळीं । म्हणती सांभाळीं प्रपन्नां ॥७७॥
बलभद्रेंशीं मुकुंदातें । म्हणती रक्षीं दावाग्नितप्तें । तुजविण त्राता नाहीं एथें । शरणागतें सांभाळीं ॥७८॥
तूंचि आमुचा माता पिता । तूंचि आमुचा भ्राता त्राता । तूंच संकटीं संरक्षिता । अनाथनाथा श्रीकृष्णा ॥७९॥
पूर्वीं दुष्टें अघासुरें । गिळिलीं वत्सपवांसुरें । तैं त्वां रक्षिलीं दातारें । कृपासमुद्रें गोविंदा ॥८०॥
कालियविषाचें पिऊनि पाणी । प्रेत होऊणि पडतां धरणीं । कृपामृतें त्वां चक्रपाणि । अवलोकूनि वांचविलें ॥८१॥
आतां आजिचिये आकांतीं । कृष्णा तूंचि आमुची गति । प्राणभयें करुणामूर्ति । काकुळती येतसों ॥८२॥
तेथ दावाग्नि जाळितां राती । तुवां प्राशूनि जगत्पति । गोगोपाळ गोपयुवति । सुखविश्रांतीं पावविलीं ॥८३॥
कुरुचक्रचूडावतंसमणि । मृत्युभयार्तप्राणिगणीं । जेवि चिंतिजे निर्वाणीं । मोक्षदानी श्रीविष्णु ॥८४॥
तैसा करुणास्वरें धेनु । समस्त गोळांचा गण । दावानळें संत्रासून । श्रीभगवान् स्तविताती ॥८५॥

कृष्ण कृष्ण महावीर हे रामाऽमितविक्रम । दावाग्निना दह्यमानान्प्रपन्नांस्त्रातुमर्हथः ॥९॥

आभ्रेडितें आदरार्थीं । कृष्ण कृष्ण आर्तें म्हणती । तुझीं वीर्यें लिहितां क्षिति । हे निश्चिति पुरेना ॥८६॥
तो तूं महावीर्य हरि । सखा आमुचा कैवारी । असतां दावाग्नि जो हरी । दुःखसागरीं आहाळलों ॥८७॥
अमितविक्रमा श्रीबलरामा । तुझा अपार अगाध महिमा । दावाग्नि हा जाळितो आम्हां । पुरुषोत्तमा संरक्षीं ॥८८॥
तुम्ही दोघे असतां जवळी । शरणगतां दावाग्नि जाळी । तुमचा महिमा तये काळीं । अस्ताचळीं स्पर्शला ॥८९॥
ऐसें न करूनियां दोघे । निजैश्वर्यप्रचंडवोघें । विघ्न भंगूनि अवघें । सामर्थ्य वेगें दाखवा ॥९०॥
शरणागतरक्षणार्थ । तुम्ही ऐश्वर्यं समर्थ । प्रकट करूनि स्वसामर्थ्य । महा अनर्थ हा चुकवावा ॥९१॥
आपण असतां समर्थ । स्वजन दिसती अनाथ । तेव्हां ऐश्वर्य होय व्यर्थ । कोण पुरुषार्थ महिमेचा ॥९२॥

नूनं त्वद्बांधवाः कृष्ण न चार्हंत्यवसीदितुम् । वयं हि सर्वधर्मज्ञ त्वन्नाथास्त्वत्परायणाः ॥१०॥

प्रबोधसिंहाचीं लेंकरें । बळें गांजितां भवकुंजरें । कीं सूर्यकिरणें अंधकारें । ग्रासितां नुरे सूर्यत्व ॥९३॥
सच्चित्सुखाची तूं राशि । आम्ही सर्वदा सहवासी । नहों पात्र भवदुःखासी । कृष्णा मानसीं विचारीं ॥९४॥
आम्हां बंधुवर्गीं सकळां । जाळीत असतां प्रलयानळा । तूं देखसी गोपाळा । हें घननीळा अयोग्य ॥९५॥
आम्ही तुझे शरणागत । तुज वेगळा नेणों नाथ । तूंचि आमुचा अर्थस्वार्थ । निजपुरुषार्थ तूं आम्हां ॥९६॥
सर्वधर्मांचें अधिष्ठान । सर्ववेत्ता तूं धर्मज्ञ । तावक जाळितां कृशान । तैं हें न्यून कोणासी ॥९७॥
लेंकुराचें न्यून पूर्ण । अवघा मातेसी अभिमान । कामिनीचें अलंकरण । तें भूषण कांतासी ॥९८॥
स्वकीयांसि होतां ग्लानि । ते स्वामीची मानहानि । सर्वधर्मज्ञालागूनी । काय दुजेनीं सांगावें ॥९९॥
ऐशी बंधुवर्गाची ग्लानि । कृष्णें परिसोनि आपुल्या कानीं । पूर्ण कृपाळु चक्रपाणि । अंतःकरणीं कळवळिला ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : May 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP