अध्याय १९ वा - श्लोक १ ते ५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
क्रीडासक्तेषु गोपेषु तद्गावो दूरचारिणीः । स्वैरं चरंत्यो विविशुस्तृणलोभेन गह्वरम् ॥१॥
शुक म्हणे गा उत्तरातनया । रामें प्रलंब मारिलिया । व्रजीं अद्भुत ऐकोनियां । परमाश्चर्य मानिती ॥२६॥
पुन्हा कोणे एके दिवशीं । गोधनें गोपाळ रामकृष्णाशीं । जाते झाले काननासी । उत्साहेंशीं क्रीडत ॥२७॥
कोणी म्हणती प्रलंबहनना । उपरी तेचि दिवशीं गोधना । चारितां वरपडलीं अडराना । त्या कारणा अवधारीं ॥२८॥
अलौकिक कृष्णखेळ । देखोनि गुंतले गोपबाळ । न करितां धेनूंचा सांभाळ । झाले केवळ क्रीडासक्त ॥२९॥
त्यांच्या मोकाट गाई रानीं । दुरी संचरल्या आडरानीं । कोमळ तृणातें भुलोनी । गह्वरवनीं प्रवेशल्या ॥३०॥
अजा गावो महिष्यश्च निर्विशंत्यो वनाद्वनम् । ईशीकाटवीं निर्विविशुः क्रंदंत्यो दावतर्षिताः ॥२॥
शेळ्या मेंढ्या गाई महिषी । सांडूनि भांडीरकाननासी । वनांतरीं प्रवेशासी । करित्या झाल्या सैराट ॥३१॥
ईषीका म्हणिजे दर्भ विशेष । जेथ सजळ भूप्रदेश । तेथ पावोनि अभिवृद्धीस । अग्रीं सरस लसलसिती ॥३२॥
उष्णें वाळोनि गेलें तळीं । कणसें उधळती व्योमां धवळीं । मुंजावनें ग्रीष्मकाळीं । विरसें मोकळीं कडकडित ॥३३॥
श्वापदाकुळ महाघोर । नाहीं पश्वादिसंचार । ईषीका वाढली अपार । तेथ धेनु सत्वर रिघाल्या ॥३४॥
द्विगुणी त्रिगुणी धेनूहून । सरळ वाढलें लंबायमान । मुंजाटवीं ईषीकातृण । धेनु मग्न त्यामाजीं ॥३५॥
सरळ वाढली सर्व ईषीका । कोमळ आडव्या फुटल्या शाका । त्यांच्या स्वादें धेन्वादिकां । हांव अधिका प्रवेशीं ॥३६॥
स्वादा भुलोनि ईषीकारण्यीं । भरतां ग्रीष्मीं तापल्या किरणीं । मार्ग नुमजे न मिळे पाणी । आक्रंदोनि तळमळिती ॥३७॥
तंव ते वनीं दावानळ । शुष्कतृणें पेटला प्रबळ । तयावरील तीव्रानिळ । झोंबतां तळमळ धेनूंसी ॥३८॥
वायुवेगें वणवा धांवे । धेनूपर्यंत पावे न पवे । तंव येरीकडे गोप आघवे । पाहती थवे धेनूंचे ॥३९॥
तेऽपश्यंतः पशून् गोपाः कृष्णरामादयस्तदा । जातानुतापा न विदुर्विचिन्वंतो गवां गतिम् ॥३॥
दचकोनि म्हणती एक गडी । खेळां गुंतलीं पोरें वेडीं । गाई भरल्या अरडी दरडी । धांवा तांतडीं हुडकारे ॥४०॥
हें ऐकोनि समस्त । झाले पश्चात्तापवंत । म्हणती खेळीं गुंतलों भ्रांत । धेनु वनांत विखुरल्या ॥४१॥
धेनु पाहती भंवतें रान । त्याचि सरिसे रामकृष्ण । स्वयें असोनि सर्वज्ञ । नेण होऊन वर्तती ॥४२॥
एक चढती टेंकावरी । एक वळघले उच्च शिखरीं । एक वेंधूनि तरूवरी । धेनु दुरी न्याहाळिती ॥४३॥
एक धांवती गिरिकंदरीं । एक पाहती पूर्व अखरीं । एक धांवले गांवखरीं । यमुनातीरीं जलाशयीं ॥४४॥
तंव रामकृष्णादि बुद्धिमंत । विचाराची कथिती मात । धेनु चरल्या फिरल्या जेथ । ते पदवी घेत चलारे ॥४५॥
मग ते धेनूंचे मागोवे । घेत चालिले गोप आघवे । कुकारे घालिती घेऊनि नांवें । दीर्घरवेप्लुतमानें ॥४६॥
तृणैत्सत्खुरदच्छिनैर्गोष्पदैरंकितैर्गवाम् । मार्गमन्वगमन् सर्वे नष्टाजीव्या विचेतसः ॥४॥
धेनुकळपाच्या दळवाढें । खुरीं तुडविलिया चेंपडें । दातीं तृणें केलीं खुरटें । पाहोनि वाटे धांवती ॥४७॥
कोणें वितृण भूमिभाग । तेथ उमटले पाहती माग । तेणें पंथें करूनि लाग । अतिसवेग धांवती ॥४८॥
म्हणती जित्रबें गोधनें गेलीं । तेव्हां जीविकाचि राहिली । मरणावांचूनि कुटुंबें मेलीं । हे चिंता जाकळी गोपाळां ॥४९॥
मुंजाटव्यां भ्रष्टमार्गं क्रंदमानं स्वगोधनम् । संप्रपय तृषिताः श्रांतास्ततस्ते संन्यवर्तयन् ॥५॥
ऐसे सचिंत गोपाळ । धेनुमार्गें उतावीळ । हुडकितां कडतर ग्रीष्मकाळ । तेणें सकळ संतप्त ॥५०॥
हृदयीं चिंतेची आहळणी । बाह्य तापले भवार्ककिरणीं । धांवत श्रांत सर्वां करणीं । इच्छिती पाणी सुखाचें ॥५१॥
तंव तें नाडळे विषयवनीं । मनें गुंतलीं गोगोधनीं । कृष्ण त्यांमाजीं असोनी । कूटस्थपणीं त्यांसरिसा ॥५२॥
आत्मप्राप्तीचा भ्रष्ट मार्ग । साधन गोधनाचा वर्ग । मुंजारण्यामाजीं साङ्ग । क्रंदतां दीर्घ परिसती ॥५३॥
भ्रष्टमारें महा अडचणी । गोधनें शिरकलीं मुंजारण्यीं । आक्रंदतां दीर्घ ध्वनीं । ऐकतीं कर्णीं गोपाळ ॥५४॥
ऐकोनि गाईंचा करुणास्वव्र । समीप धांवले सत्वर । परंतु मुरडावया नव्हे धीर । उष्णें तीव्र पोळले ॥५५॥
तृषें जाऊं पाहती प्राण । गोधनें वळावयालागून । नोहे गडियां आंगवण । जाणूनि कृष्ण कळवळिला ॥५६॥
N/A
References : N/A
Last Updated : May 01, 2017
TOP