अध्याय २९ वा - श्लोक १२ ते १५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
राजोवाच :- कृष्णं विदुः परं कांतं न तु ब्रह्मतया मुने । गुणप्रवाहोपरमस्तासां गुणधियां कथम् ॥१२॥
राजा म्हणे जी वाशिष्ठप्रवरा । बादरायणि परम चतुरा । मानसवनजा संशयवारा । अळुमाळसा झगटला ॥७३॥
तेणें वक्तृत्वस्वातीघन । वर्षत असतां तव मुखगगन । चंचलतेस्तव अमृतकण । जाती विखरोन न थरतां ॥७४॥
प्रश्न ऐकोनि ममोदित । निवांत कीजे संशयवात । तेणें वक्तृत्व अमृतावाप्त । पूर्ण संतृप्त होईन ॥१७५॥
तरी पतिपुत्रादि जगद्ब्रह्म । भावनामात्र भेदभ्रम । तितुकेन प्राणी भोगिती कर्म । अज्ञानरजतमसंवलित ॥७६॥
अज्ञानरूपअविद्यावरण । वास्तव ज्ञानें न होतां क्षीण । मोक्ष न पवती प्राणिगण । हा निश्चय पूर्ण वेदांतीं ॥७७॥
तेंवि अज्ञाना पशुपजाया । परम लावण्य श्रीकृष्णकाया । देखोनि भाळल्या रमावया । नेणोनि अव्यया परब्रह्मा ॥७८॥
परम सुंदर हा परपुरुष । कृष्ण नेणोनि श्रीपरेश । जारबुद्धी विषयाभिलाष । धरितां गुणपाश कां तुटले ॥७९॥
पतिपुत्रादिप्रपंचभजनें । मोक्ष न पविजे प्राणिगणें । जारबुद्धी कृष्णध्यानें । केंवि बंधनें निर्मुक्त ॥१८०॥
जारबुद्धि विषयप्रवाहीं । कामासक्ता कृष्णदेहीं । त्यांच्या विषयवासना कैशा पाहीं । विषयापासूनि निरसल्या ॥८१॥
इतुके शंकेच्या निरसना । केली स्वामीसि प्रार्थना । निःसंशय निरूपणा । करितां श्रवणा सुख वाटे ॥८२॥
श्रीशुक उवाच :- उक्तं पुरस्तादेतत्ते चैद्यः सिद्धिं यथागतः । द्विषन्नपि हृषीकेशं किमुताधोक्षजप्रियाः ॥१३॥
शुक म्हणे गा कुरुपुंगवा । तुवां प्रश्न केला बरवा । निरूपिजेल तो पर्येसावा । वसों नेदावा संशय ॥८३॥
‘ तव पुरस्तात् मया एतदुक्तं ’ । राया तुजपुढें हें म्यां कथिलें । कोण्या एक्या योगें भलें । कृष्णीं मानस संलग्न जालें । तरी फावलें अमृतत्व ॥८४॥
परमद्वेषें शिशुपाळाचें । कृष्णीं मानस जडलें साचें । तेंचि कारण अमृतत्त्वाचें । सिद्धी गेलें त्यालागीं ॥१८५॥
द्वेषित होत्साताही चैद्य । हृषीकेशातें ध्यातां सत्य । अपवर्ग लाधला अनवद्य । मा गोपी वंद्य कां नवह्ती ॥८६॥
जारबुद्धि या सप्रेमभावें । अधोक्षजीं रंगल्या जीवें । असतां कैवल्य कां न लभावें । येथ संशय संभवे कोण पां ॥८७॥
पतिपुत्रादि जगद्ब्रह्म । ते अविद्यासंवृत गुणसंभ्रम । मनःकल्पित करणानुक्रम । विषयीं सुखतम प्रतिभासे ॥८८॥
कृष्ण केवळ हृषीकेश । हृषीकसमुच्चयाचा ईश । अनावृत जो उत्तम पुरुष । निर्विशेष परब्रह्म ॥८९॥
योगमायाअंगीकारें । नटला स्वजनप्रेमानुसारें । तथापि कोण्हाही प्रकारें । सन्निधिमात्रें मोक्षद ॥१९०॥
शिवब्रह्मादि जो अक्षगण । ज्याहूनि अर्वाक् जयांचें ज्ञान । यालागीं अधोक्षज हें अभिधान । विपश्चिज्जन बोलती ॥९१॥
येथ गोपींचा विशेष कायी । हो कां कोण्ही मनुष्यदेही । त्याच्या कल्याणार्थ पाहीं । सगुण निर्गुण तनुनाट्य ॥९२॥
नृणां निःश्रेयसार्थाय व्यक्तिर्भगवतो नृप । अव्ययस्याप्रमेयस्य निर्गुणस्य गुणात्मनः ॥१४॥
अविद्याअनावृत्त भगवत्तनु । येर संवृत अवघा जनु । तो जन व्हावया निरावरण । भगवद्भजन द्योतिले ॥९३॥
गुणनियंता श्रीभगवंत । येर अवघे गुणसंवृत । भगवद्भजनें होती मुत्क । हा इत्थंभूत सदुपाय ॥९४॥
गुणसंवृता जनाप्रति । भजनालागीं भगवन्मूर्ति । निर्गुणाची सगुण व्यक्ति । जे श्रुतिस्मृतिनिर्दिष्ट ॥१९५॥
श्यामराजीवलोचन । पद्मायताक्ष मयंकवदन । चतुर्बाहु आजानुपीन । सरळ सोज्वळ सुकांत ॥९६॥
मुकुट कुंडलें मेखळा । श्रीवत्स कौस्तुभ आपादमाळा । केयूरांगदें बाहुयुगळां । कंबुकटकें मुद्रिका ॥९७॥
विद्युद्भासुर पीतांबर । कांसे कसिला मनोहर । चरणीं बिरुदांचा तोडर । वांकी वाळे नूपुरें ॥९८॥
रातोत्पलनिभ चरणतळें । सामुद्रिकें सोज्वळ सफळें । घोटीव वर्तुळ सुतेजाळें । नखशशिकळा सपीयूपा ॥९९॥
कंजारिकंबुकौमोदकी । आयुधें शोभती चौहस्तकीं । निषंगशार्ङ्गनंदकप्रमुखीं । विराजमान विश्वदृक् ॥२००॥
वस्त्राभरणीं सालंकृत । करुणावत्सल कमलान्वित । सपार्षद सोपस्कृत । विभूतियुक्त विदितात्मा ॥१॥
अप्रमेय जो निर्गुण । त्याची व्यक्ति ऐसी सगुण । भजतां भंगी अविद्यावरण । विशुद्धज्ञान प्रकाशी ॥२॥
स्वजनमोक्षणाकारणें । राया निर्गुणा सगुण होणें । येरवीं असतां पूर्णपणें । भव निस्तरणें दुर्घट पैं ॥३॥
पार्थिवादिभगवद्व्यक्ति । करूनि भक्त जे जे भजती । त्यांसि अक्षय सायुज्य मुक्ति । मा कृष्णचिन्मूर्ति परब्रह्म ॥४॥
गोपी केवळ अमरांगना । वंदूनि विरंचीची आज्ञा । बल्लवी होऊनि मर्त्यभुवना । भगवत्तोपणा पातल्या ॥२०५॥
म्हणोनियां त्या पुरुषोत्तमा । नैसर्गिक लाहोनि प्रेमा । जारभावें वांछिती कामा । आत्मारामा अमराद्या ॥६॥
कां तेंवि चिन्मात्र तनूच्या ठायीं । शत्रुषट्कात्मकप्रेमें पाहीं । हृदय निबद्ध केलें जिहीं । त्या लवलाहीं तन्मयता ॥७॥
म्हणोनि प्राकृत देहधारी । तैसा नव्हे हा निर्विकारी । त्याची मूर्ति अभ्यंतरीं । कोण्या प्रकारीं संचरतां ॥८॥
कामं क्रोधं भयं स्नेहमैक्यं सौहृदमेव च । नित्यं हरौ विदधतो यांति तन्मयतां हि ते ॥१५॥
काम म्हणिजे विषयाभिलाषें । आसक्ति धरितां दृढमानसें । अचिंत्यवस्तुसामर्थ्यवशें । सायुज्य आपैसें घरनिघें ॥९॥
हो कां कोण्ही एक काम । कामूनि भजतां मेघश्याम । परमपुरुषार्थ होय सुगम । जडतां प्रेम भगवंतीं ॥२१०॥
जारविरहकामासक्ति । केवळ प्रेमाची अभिव्यक्ति । गोपी तदर्थ अमरयुवति । ब्रह्मवरदोक्ती अवतरल्या ॥११॥
क्रोधावेशें भगवन्मूर्ति । कवळूनि राहे अविसर स्मृति । मग त्यां कैंची पुनरावृत्ति । भवनिर्मुक्ति न मगतां ॥१२॥
तृणजळु कां भिंगुरटी । भयें सदैव चिंतितां पोटीं । तद्रूपता उठाउठीं । लाहे गोठी हे तैसी ॥१३॥
भगवद्भयें मानस वेधे । तैं निजसुरेंचि सांडिजे भेदें । मग अक्षय कैवल्य साधे । हें कां शब्दें शंसावें ॥१४॥
पुत्रादि कोना एका स्नेहें । भगवद्विग्रह कवळितां मोहें । मग त्या अपवर्ग अपैता नोहे । हें बोलों न लाहे विनिर्गमें ॥२१५॥
तैसाचि संबंध कोण्ही एक । होऊनि भगवंतीं पडतां ऐक्य । तो तेव्हांचि उत्तमश्लोक । होय चित्सुख सामरस्यें ॥१६॥
अथवा उच्चनीचयोनि । कोणी एक जन्मोनि प्राणी । निःसीम प्रेमा भगवद्भजनीं । तैं निर्वाणीं समरसता ॥१७॥
इत्यादि कोण्ही एक्या भावीं । अजस्र प्रेमा वासुदेवीं । जडतां तन्मयता पावावी । हे अचिंत्य दैवी योगशक्ति ॥१८॥
N/A
References : N/A
Last Updated : May 03, 2017
TOP