अध्याय २९ वा - श्लोक ३६ ते ४०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
यर्ह्यंबुजाक्ष तव पादतलं रमाया दत्तक्षणं क्कचिदरण्यजनाप्रियस्य ।
अस्प्राक्ष्म तत्प्रभृति नान्यसमक्षमंग स्थातुं त्वयाऽभिरमिता बत पारयामः ॥३६॥
तरी ऐकें गा अंबुजनयना । तुझिया पदतलावलोकना । अनंत वेळां लाहूनि जनना । रमलों नाना स्वपतींशीं ॥१४॥
जर्ही भोगिले संसारपति । विषयाभासें न मने तृप्ति । तव पदपल्लवदर्शनावाप्ति । भाग्यें युवति लाधलों ॥५१५॥
येर्हवीं तुझें श्रीपादकमळ । कमलाउत्साहक केवळ । तेंही क्कचित कोण्हे वेळ । सर्वकाळ अप्राप्य ॥१६॥
रमेसि नियमूनि दिधला क्षण । तेचि क्षणीं ते पदसेवन । करूनि मानी आपणा धन्य । पदाब्जेक्षणसौभाग्यें ॥१७॥
तो तूं कोण्हा एक्या योगें । भूभारनिरसनप्रसंगें । अनंतजन्मींच्या सुकृतभाग्यें । प्रिय सर्वांगें वनचरां ॥१८॥
नादसुखें वेधती कोण्ही । कोण्ही लक्ष्यें लक्षिती नयनीं । कोण्ही मानसीं ध्याती ध्यानीं । कोण्ही वदनीं यश गाती ॥१९॥
ऐसे ऐकैक वेगळ्या आंगी । भजन आकळिती सप्रेममार्गीं । येथ अरण्यजना सर्वांगीं । निःसंगसंगी प्रियतम तूं ॥५२०॥
ऐसिया अरण्यजनप्रिया । देखत्या जालों तुझिया पायां । जरी क्कचित्सुकृतक्रिया । अल्पा उदया क्षणमात्र ॥२१॥
क्षणमात्रही तव पदतळां । देखत्या जालों सप्रेमळा । आणि तुवां आमुच्या हृदयकमळां । निज इंगितीं रमविलें ॥२२॥
तुझिया गानें संभाषणें । भ्रूविक्षेपनिरीक्षणें । सविलास अपांगमोक्षणें । अभेद रमणें अनुभविलें ॥२३॥
सुरतस्मरण रतिकीर्तन । सहचरक्रीडा गुह्य भाषण । ईक्षण संकल्प उद्योग पूर्ण । क्रिया आचरण आठवें ॥२४॥
सुरत भूमिका इया अष्ट । सप्तधा रमविलों आम्ही स्पष्ट । तेणें जालों ज्या संतुष्ट । त्या नचखों कष्ट भवयोग ॥५२५॥
जेव्हां भोगिलें तवांघ्रिसुख । तैंहूनि भवसुखीं जालों विमुख । देहबुद्धीचा मोडूनि अंक । विषया सम्मुख न ठाकों ॥२६॥
सहस्रदळींचें अमृतपान । प्राशिलें लाहोनि राकारमण । ते केंवि सेविती स्वाधिष्ठान । पुढती परतोन प्रियत्वें ॥२७॥
तेंवि तुच्छ जे विषयाभास । ते काय पुरविती आमुची आस । यालागीं सापेक्ष रमा ज्यास । अधरामृतास त्या पाजी ॥२८॥
तव पदसौभाग्य अति विचित्र । ब्रह्मादि सभाग्य सुर सर्वत्र । अपेक्षेचे होती पात्र । त्यांमाजि किंमात्र वधूगणही ॥२९॥
श्रीर्यत्पदांबुजरजश्चकमे तुलस्या लब्ध्वापि बक्षसि पदं किल भृत्यजुष्टम् ।
यस्याः स्ववीक्षणकृतेऽन्यसुरप्रयासस्तद्वद्वयं च तव पादरजः प्रपन्नाः ॥३७॥
तुझिया वक्षःस्थळाच्या ठायीं । सापत्नभावरहित पाहीं । स्थानसंपन्न असतांही । पुन्हा लक्ष्मीही सकाम ॥५३०॥
तुळसी सेवी चरणकमळ । तिसी पदरज लाभले अमळ । लक्ष्मी म्हणे मज वक्षःस्थळ । न रुचे केवळ कोरडें ॥३१॥
शोकें मेला दशरथ पिता । हृदय न द्रवेचि तत्त्वता । अनारस वनीं त्यजिली कांता । परम कठिनता हृत्कमळीं ॥३२॥
सीता आक्रंदे नानापरी । हृदय न द्रवेचि तिळभरी । देवकीवसुदेव कारागारीं । त्यागूनि कांतारीं क्रीडतसे ॥३३॥
भवविरक्त शरणागत । देखोनि त्यांचा होय आप्त । त्यांच्या पोष्याचा आकांत । देखोनि हृदयांत द्रवेना ॥३४॥
ऐसें कठोर हृदयस्थान । मज जोडलें असपत्न । तुळसी सेविजे श्रीचरण । अक्षयकल्याण ज्यां योगें ॥५३५॥
चरणशौचोद्भवा गंगा । भुवनत्रयाधनिदाघभंगा । कलिमलमथनीं पीयूषौघा । सुकृतामोघा प्रसविती ॥३६॥
पदरज वंदिती सुरवर । हृदयीं ब्राह्मणलत्ताप्रहार । पादार्चनें तुलसी सधर । मज हें कठोर हृत्कमळ ॥३७॥
ऐसी लक्ष्मी हृदयवासा । विटोनि तुळसेशीं सापत्न्यईर्ष्या । चाळी सकाम पदरजलेशा । परमपुरुषा ज्या तुझिया ॥३८॥
समस्तदेवकीं सेविलें असतां । परी न पवेचि जे सामान्यता । ऐसी अमोघ सौभाग्यता । तव पदरजाआंतौती ॥३९॥
पदरजवाहिनी सरित्प्रवरा । सेव्य चराचर नीचतरां । तथापि वरिष्ठां विधिहरसुरां । कल्याणसारा स्पृहणीय ॥५४०॥
ना तरी जीवन मशकादि सर्व । सेविती लहान थोर जीव । म्हणोनि न पवेचि गौणत्व । वरगौरव अमृतत्वें ॥४१॥
तेंवि पदरज सर्व सेवकीं । सेविलें अभीष्टार्थकामुकीं । उणीव न पडे गौरवामुखीं । स्वसुखोद्रेकीं अगाध ॥४२॥
नर सुर मुनिवर पुरंदर । दैत्य दानव विधिशंकर । ब्रह्मांडवासी लहानथोर । तपश्चर्यापर सर्वदा ॥४३॥
म्हणसी सुकृता जैं सीग चढे । तैं कृपेनें आम्हांकडे । अल्प ही लक्ष्मीची दृष्टि पडे । ऐसें जोडे कैं भाग्यें ॥४४॥
म्हणोनि तयाचे प्रयास । इच्छूनि जयेचा कटाक्ष । सर्वीं सर्वत्र सर्वांस । ते श्रीही सापेक्ष पदरजा ॥५४५॥
तैशाच आम्हीही रानटा । जात्या गौणा अबळा घुरटा । परंतु तव पदरजलंपटा । झालों अदृष्टाचेनि बळें ॥४६॥
आम्हां तव पदशरणागतां । तव गायनें मन्मथतप्तां । नुपेक्षूनियां कमलाकांता । करीं सनाथा निजदास्यें ॥४७॥
तन्नः प्रसीद वृजिनार्दन तेंऽघ्रिमूलं प्राप्ता विसृज्य वसतीस्त्वदुपासनाशा ।
तत्सुंदरस्मितनिरीक्षणतीव्रकामतप्तात्मनां पुरुषभूषण देहि दास्यम् ॥३८॥
वृजिनार्दन या संबोधनें । संबोधिती मृदुभाषणें । कीं हें नाम यथार्थ करणें । आमुचें हरणें दुर्वृजिन ॥४८॥
ऐकोनि क्लेशनाशन नामा । आम्हीं विरहिणी सकामा । टाकूनि आलों तव पदपद्मा । तस्मात् आम्हां नुपेक्षीं ॥४९॥
जैसे तापत्रयसंतप्त । योगी संसारी विरक्त । त्यागूनि येती गृहधनसुत । आम्ही तद्वत पातलों ॥५५०॥
तव दास्याच्री धरूनि आशा । पतिपुत्रालयधनादि पाशां । खंडूनि आलिया उपहासा । न करूनि दास्या देइजे ॥५१॥
कोणें बोलाविलें तुम्हां । जरी तूं म्हंणसी नरललामा । तरी तुझिया सुंदर श्रीमुखपद्मा । पाहतां आम्हां स्मर जाळी ॥५२॥
जया मुखकमळाच्या ठायीं । सुंदर सस्मित ईक्षण पाहीं । पाहतां कामाग्नीची खाई । आमुच्या देहीं प्रज्वळली ॥५३॥
यास्तव तुझें चरणमूळ । टाकूनि आलों उताविळ । तूं सर्वज्ञ श्रीगोपाळ । हरिसी तळमळ निजदास्यें ॥५४॥
दास्यार्पणें आश्वासून । आमुचें मानस निववीं पूर्ण । वृजिनार्दन हें अभिधान । यथार्थ करूनि मिरवावें ॥५५५॥
म्हणसी आपुलालिये सदनीं । पतिसेवनें गृहस्वामिनी । त्या किमर्थ दास्याचरणीं । दासी होऊनि प्रवर्त्ततां ॥५६॥
वीक्ष्यालकाव्रुतमुखं तव कुंडलश्रीगंडस्थलाधरसुधं हसितावलोकम् ।
दत्ताभयं च भुजदंडयुगं विलोक्य वक्षः श्रियैकरमणं च भवाम दास्यः ॥३९॥
तरी ऐकें गा भुवनैकपाळा । लवण सान्निध्य पावतां जळा । जेंवि न रखवें मर्यादवेळा । इच्छी एकवळा द्रवोनी ॥५७॥
हो कां धातूमाजि कठिन । स्वकांताचें सन्निधान । होतां लोह वेधें पूर्ण । चंचळ होऊन अनुसरे ॥५८॥
कठोर पाषाणाची जाति । परी सोमदर्शनें सोमकांतीं । द्रवोनि होय जलोत्पत्ति । हे स्वयंभस्थिति नैसर्गिक ॥५९॥
तेंवि आम्ही पतिव्रता । स्वाश्रमीं स्वधर्मनिरता । ऐकोनि तुझिया वेणुगीता । झालों विरक्ता भवभानीं ॥५६०॥
वेणुध्वनि पडतां श्रवणीं । तेणें मानस आकर्षूनी । तीव्रवेधें आणिलें वनीं । तव दर्शनीं मेळविलें ॥६१॥
भ्रमरभासुर चाचर कुरळ । निडळीं श्रवणीं कुंतळ कुटिळ । कुंडलमंडित गंडस्थळ । श्रीमुखकमळ तद्युक्त ॥६२॥
भ्रू व्यंकटा विलासचलिता । त्रपाद्योतक अपांगसहिता । अधरसुधेशीं मंदस्मिता । पाहतां चित्ता नुरणूक ॥६३॥
व्रजजनासि अभयदान । करूनि धरिला गोवर्धन । अमरां निर्भयता वोपून । केलें मथन क्षीरोदा ॥६४॥
कीं गजेंद्राची देखोनि ग्लानि । अभया उदित सायुधपाणि । कीं रसातळा जातां धरणी । अभयदानी जे बाहु ॥५६५॥
ऐसें तुझें भुजदंडयुगळ । विस्तीर्ण सुपीन वक्षःस्थळ । कमलारतिरसजननस्थळ । देखोनि विव्हळ पैं आम्ही ॥६६॥
सुंदर अवयव सालंकृत । सत्रप गायन स्मित इंगित । देखोनि भावी आमुचें चित्त । दासी समस्त व्हावया ॥६७॥
औपपत्य जुगप्सित । म्हणोनि निंदिसी जारसुरत । यदर्थीं ऐकें आमुचें गदित । इत्थंभूत विवरूनी ॥६८॥
का स्त्र्यंग ते कलपदामृतवेणुगीतसंमोहितार्यचरितान्न चरेत्त्रिलोक्याम् ।
त्रैलोक्यसौभगमिदं च निरीक्ष्य रूपं यद्गोद्विजद्रुममृगाः पुलकान्यबिभ्रन् ॥४०॥
कोमलसंबोधनें म्हणती अंग । तुझें वेणुगीत ऐकोनि सांग । नोहे कोणाचा व्रतभंग । श्रवणीं अनुराग उपजोनी ॥६९०॥
षड्ज ऋषभ आणि गांधार । मध्यम पंचम धैवत स्वर । निषादांत मंद्रतार । मानप्रकार त्रिवसनें ॥५७०॥
स्वरकंपितें मूर्च्छनाभेदें । वेणुगीतामृतकलपदें । तालबद्ध संगीत छंदें । हास्यविनोदें विन्यासें ॥७१॥
न भुलोनि कोणती पतिव्रता । राहे रक्षूनि आर्यचरिता । ऐसी न सृजीच विधाता । जे तव गीता न भाळे ॥७२॥
भूमि सकाम रोमांचित । द्यौ द्रवोनि अमृत स्रवत । समस्त सरिता प्रवाहरहित । पवनीं स्तिमित चंचलता ॥७३॥
भानुबृहद्भानूंची प्रभा । दाहकपणें न चढे क्षोभा । स्वद्योतकता दावी शोभा । गगनगर्भाआंतौती ॥७४॥
स्वाराज्यवैराज्यादि पदें । सांडूनि लक्ष्मी येथेंचि नांदे । ह्रीही विलसे कटाक्षमोदें । सांडूनि नुसधें रौद्रत्व ॥५७५॥
बुद्धि बोधली नादसुखा । परतोनि नोहे विधिसम्मुखा । ज्योत्स्ना रंगली मुखमयंका । अधरपीयूखा भाळोनी ॥७६॥
अमोघ कंदर्पाची कांति । सर्वात्मकत्वें भाळली रति । क्षमादयाशांतिप्रभृति । तरळताती पदपद्मीं ॥७७॥
निर्जर मुनिवर गोप सकळ । त्यांच्या पत्न्या आम्ही केवळ । हरिपदलाभा भूमंडळ । ब्रह्मवरें पावलों ॥७८॥
आतां त्रिजगीं कोण वधु । तव गायनें न पवोनि वेधु । अचल आर्यव्रतस्था शुद्धु । दावी सावधु भवभानी ॥७९॥
मदनमोहना भुलल्या कांता । हें आश्चर्य नव्हे कीं तत्त्वता । पुरुष सकाम वेणुगीता । भुलले तत्त्वता स्थिरचर ॥५८०॥
त्रैलोक्यसौभाग्यनिधान । तें लक्षूनि तव लावण्य । धेनु वृषभ ऊर्ध्ववदन । पुच्छें वाहून तटस्थ ॥८१॥
पुरुषप्रकृति पक्षिजाति । वेणुगायनें तटस्थवृत्ति । भासती लिखितचित्राकृति । वेधकशक्ति हे तुझी ॥८२॥
वीरुध तरुवर वल्लरी । सर्व वेधलीं वनांतरीं । टवकारलीं पुष्पीं पत्रीं । सप्रेमधारीं द्रवताती ॥८३॥
कुरंगेंसहित कुरंगीगण । पसरूनि सुंदर विशाळ नयन । प्राशन करिती तव लावण्य । सबाह्य विसरून तनुभावा ॥८४॥
अजा अविकें व्याघ्र वृक । मशक शशक सर्प वृश्चिक । तरस र्हीस कपि जंबुक । सात्त्विकाष्टक प्रकटिती ॥५८५॥
जेणें तव रूपद्योतना । प्रकटे ऐसिया ऐकोनि गाना । ताटस्थ्य त्रिजगाच्या तनुमना । किमुत अंगना विरहिणी ॥८६॥
आतां निश्चय हाचि हरि । दोष न ठेवूनियां शिरीं । इतुकी प्रार्थना मान्य करीं । जाणोनि किंकरी व्रजललना ॥८७॥
N/A
References : N/A
Last Updated : May 03, 2017
TOP