अध्याय २९ वा - श्लोक २१ ते २५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
दृष्टं वनं कुसुमितं राकेशकररंजितम् । यमुनाऽनिललीलैजत्तरुपल्लवशोभितम् ॥२१॥
ऐसें ऐकोनि भगवद्वचन । कोपें स्पर्शिलें त्यांचें मन । मग त्या करूनि तिर्यग्वदन । सचकितनयन विलोकिती ॥४३॥
ऐसें इंगित देखोनि हरि । म्हणे तुमचिये अभ्यंतरीं । पहावी काननकौतुकपरी । म्हणोनि रात्रीं जरी आलां ॥४४॥
तरी देखिलें कीं हें वन । सुपुष्पित शोभायमान । विशेष पूर्णशशांककिरण । मंडित शोभन सुरुचिर ॥२४५॥
यमुनासलिलावरून अनिळ । सीतळ सुखतम अतिमंजुळ । तेणें तरुपल्लव चंचळ । दावी झळाळ शशिज्योत्स्ना ॥४६॥
ऐशिये शोभाढ्य कांतारी । सुखरुचिरता नेत्रद्वारीं । पाहतां फावली स्वानंदलहरी । इतर संसारी नेणती ॥४७॥
यालागीं तुम्ही धन्यतमा । पाहोनि वनश्रीविश्रामा । तोषलां आतां जाऊनि धामा । यथोक्तकर्मा आचरिजे ॥४८॥
तद्यात मा चिरं गोष्ठं शुश्रूषध्वं पतीन्सतीः । क्रंदंति वत्सा बालाश्च तान्पाययत दुह्यत ॥२२॥
आतां क्षणभरी येथ न वसा । जाइजे सत्वर निज निवासा । कीजे स्वपतींची शुश्रूषा । स्वजन संतोषा पावविजे ॥४९॥
लेंकुरें वासुरें आक्रंदती । तान्हपा गाई हुंबरती । तुम्हीं जाऊनि सदनाप्रति । त्यांसि विश्रांति अर्पावी ॥२५०॥
लेंकुरा देऊनि स्तनपानें । गोवत्सांचीं समाधानें । शीघ्र करावीं पयदोहनें । साधुआचरण साध्वी हो ॥५१॥
इत्यादि वचनें गोपिकांतें । प्रबोधूनियां रमाकांतें । पुढतीं त्यांच्या इंगितातें । मन्मथतातें निरखिलें ॥५२॥
अथवा मदभिस्नेहाद्भवत्यो यंत्रिताशयाः । आगता ह्युपपन्नं वः प्रीयंते मयि जंतवः ॥२३॥
तंव त्या क्षुब्धा मनोरथभंगें । पहाती सेर्ष्य वक्रापांगें । जाणोनि त्यांच्या मानसाजोगें । वचन श्रीरंगें बोलिलें ॥५३॥
त्याचा अभिप्राय कळल्या वरी । म्हणे तुम्ही स्नेहाळ नारी । माझ्या ठायीं मानसदोरी । बळें गुंतोनि कर्षिलां ॥५४॥
जेंवि सरिता निस्तरणारा । अभीष्ट जाणें हें परपारा । परी तो वाव्हणियाच्या बळात्कारा । सरितापुरा वशवर्ती ॥२५५॥
कां सर्वां प्रियतम तारुण्य । तदर्थ करितां ही कारुण्य । परी बळिष्ठ काळाचें नैर्घृण्य । दे दाटून जारठ्य ॥५६॥
तेंवि साध्वी हो स्वधर्मासक्ता । सदाचारें गृहीं वर्ततां । माझ्या ठायीं गुंतल्या चित्ता । मद्वश होत्सात्या पातलां ॥५७॥
जैसा कोण्ही साधुनर । त्यांसि होतां भूतसंचार । तन्नियंत्रित दुर्विकार । नानाप्रकार जेंवि करी ॥५८॥
ऐकोनि गायना माझिया । तुम्ही सुभगा यंत्रिताशया । वना आलां हें आश्चर्या । कारण प्राया न मनीं मी ॥५९॥
येथ आलां हें उत्तम केलें परप्सरें विलोकन घडलें । दर्शनाचें सुख पावलें । तुम्हांतें माझें मज तुमचें ॥२६०॥
माझ्या ठायीं जंतुमात्र । प्रियत्वें भजताती सर्वत्र । तुम्ही केवळ मत्प्रेमपात्र । हें प्रेम विचित्र नैसर्ग्य ॥६१॥
असो माझ्या ठायीं प्रेमा । धरूनि उबगलां स्वजनधामा । तोक्मा रुक्मा वर्ष्मललामा । त्यजिलें शर्मा वैषयिका ॥६२॥
तें मज प्रिय झालें सर्वही । हे वेधकता माझ्याचि ठायीं । यदर्थी तुमचा अपराध नाहीं । परी रहस्य कांहीं परिसावें ॥६३॥
माझ्या ठायीं विश्वासतां । मी जरी न कथीं तुमच्या हिता । तरी दोषवैषम्य माझिये माथां । यालागीं तत्त्वतां कथितसें ॥६४॥
जेणें इहलोक प्रशस्त । परलोकही अव्याहत । तो जो स्वधर्म तुमचा उचित । निगमप्रणीत अवधारा ॥२६५॥
जें कां स्त्रियांसि विहिताचरण । भोगमोक्षांचें साधन । तिहीं श्लोकीं श्रीभगवान । करी व्याख्यान तें ऐका ॥६६॥
भर्तुः शुश्रूषणं स्त्रीणां परो धर्मो ह्यमायया । तद्बंधूनां ज्या पवित्र नारी । त्यांसि पतिसेवन संसारीं । उत्कृष्टधर्म नियमिला ॥६७॥
ते पतिशुश्रूषा म्हणाल कैसी । नोहे मायिका जारिणी ऐसी । रक्षूनि भर्त्तार मानसासी । ज्या परपुरुषीं विचरती ॥६८॥
पतिमानसरक्षणासाठीं । वरिवरी वदती रुचिरा गोष्टी । परपुरुषाचा प्रेमा पोटीं । दुष्टा कपटि दुश्चरिता ॥६९॥
सौभाग्यद्रव्यें सुभूषिता । वस्त्राभरणीं सालंकृता । भर्तारअभिरंजनीं मात्र निरता । सप्रेमसुरता परपुरुषीं ॥२७०॥
तैशा न होती साध्वी नारी । सबाह्य विशुद्ध सदाचारी । भगवद्बुद्धि निजभर्तारीं । ज्या संसारीं अभिरमती ॥७१॥
त्या ईश्वराच्या ऐश्वर्यशक्ति । कीं शुद्धसत्त्वाच्या सन्मय मूर्ति । कीं सत्यज्ञानामृताच्या व्यक्ति । ज्या शुभ सती अमायिका ॥७२॥
तयाच्या व्रताचरणानुसार । साध्वी स्त्रियांहीं स्वभर्तार । निष्कापट्यें अतितत्पर । सत्य साचार भजावा ॥७३॥
ऐसा भर्तृशुश्रूषणें । उत्कृष्ट धर्म स्त्रीकारणें । आज्ञापिला नारायणें । वेदवचनें विख्यात ॥७४॥
सासू श्वंसुर देवर भावें । तत्पितृव्यादि आघवे । परिचर्येनें तोषवावे । भर्तारसेवे अनुलक्ष्यें ॥२७५॥
दासदासी प्रजापोष्यें । लालन पोषण सुखसंतोषें । करितां न शिविजे हर्षामर्षें । स्त्रियांसि उत्कर्षें हा धर्म ॥७६॥
तुम्ही ऐका वो कल्याणी । भर्तार न म्हणावा दुर्गुणी । साम्य मानूनि नारायणीं । व्रताचरणीं तोषविजे ॥७७॥
दुःशीलो दुर्भगो वृद्धो जडो रोग्यधनोऽपि वा । पतिः स्त्रीभिर्न हातव्यो लोकेप्सुभिरपातकी ॥२५॥
शील ज्याचें परम दुष्ट । पदोपदीं पाववी कष्ट । क्रूर कर्कश जो कनिष्ठ । तर्ही तो वरिष्ठ नारीसी ॥७८॥
दुर्भग दुर्दैव भिकारी । कवडी नाहीं ज्याचे पदरीं । अन्नवस्त्राविण संसारीं । विकळगात्री क्षुत्क्षाम ॥७९॥
बिजवर तिजवर चतुर्थ वृद्ध । विश्व देखूनि मानी विरुद्ध । परुषभाषणी परम क्रुद्ध । संततिसंबंध सापत्न्य ॥२८०॥
बैसतां उठतां अपान वाजे । विकळेंद्रियत्वें न धरी लाजे । वयोवैषम्यें भर्ता न सजे । तथापि भाजे सुपूज्य ॥८१॥
खोकी वोकी क्षणक्षणा । बोले दुरुक्ति चणचणा । ऐकोनि पिशुनाची प्रेरणा । करी ताडना तात्सर्यें ॥८२॥
थुंके मुते हागे घरीं । लांछन लावूनि छळना करी । ऐसा जाची परोपरी । कां परदारी कुटिलात्मा ॥८३॥
तथापि पतिव्रतेसि तो पूज्य । निष्कापट्यें परम भज्य । सदन दाही तर्ही सज्य । जेंवि कां साज्य हविभोक्ता ॥८४॥
कां जड जैसा मृत्पिंडमात्र । परंतु भासे सचेतनगात्र । करणज्ञानासि अपात्र । दारुयंत्र चेष्टतां ॥२८५॥
कीं अंधापुढें चित्रकथा । करितां त्यासि अनभिज्ञता । कां बधिरागानीं उपजे आस्था । जे श्रवणें अर्था न फवोनी ॥८६॥
असो करणज्ञानविकळ । जातमात्र जैसें बाळ । जर्ही अवयव दिसती चपळ । परी ते विकळ व्यवहारीं ॥८७॥
कीं जागृतचि सुषुप्तिग्रस्त । तैसा प्रज्ञाप्रकाशीं अस्त । पिशाच मूर्च्छित भ्रांतोन्मत्त । असतां कांत ऐसाही ॥८८॥
नुपेक्षिजे पतिव्रता । सेविजे मानूनि रमाभर्ता । अंतरीं वैषम्य नुपजतां । सायुज्यता ते लाहे ॥८९॥
अथवा रोगें परमरुग्ण । कुपथ्यशील व्यसनीं मलिन । उपदंशादि गद दारुण । सन्निधान करितां दे ॥२९०॥
तर्ही तो स्वतनूचिये परी । उपचारिजे व्रतस्था नारी । कां जो निर्धन सर्वांपरी । अनुपकारी गुदरोम ॥९१॥
अर्थधन पदार्थधन । चर्महर्म्यधान्यधन । यशोविद्यातपोधन । जो निर्धन सुकृतादि ॥९२॥
ऐसा निर्धन केवळ भर्ता । म्हणोनि न टकिजे पतिव्रता । निष्कापट्यप्रेमें भजतां । परमपुरुषार्था लाहिजे ॥९३॥
ज्या वांछिती उत्तमगति । पतिव्रता ज्या सुभगा सती । इत्यादि दुर्गुणीं युक्त पति । तर्ही त्यांप्रति अत्याज्य ॥९४॥
परंतु न व्हावा पातकी । ज्ञानिभ्रष्ट बहिष्कृत लोकीं । पतित जाणोनि वर्णात्मकीं । घटस्फोटें त्यागिला ॥२९५॥
स्वर्नस्तेयी सुरापानी । गुरुतल्पग विप्रहननी । न कंटाळे मातृगमनीं । तत्सौजन्यीं महापापी ॥९६॥
इत्यादि महापातकीं लिप्त । जाणोनि केला जो बहिष्कृत । पतिव्रतेसि भर्ता त्यक्त । येर अत्यक्त उपदोषी ॥९७॥
विषयबुद्धी पतितोषण । यदर्थी पुंश्चळीच विचक्षण । निरभिलाषें तनुवाङ्मन । निर्वाणभजन सतीचें ॥९८॥
काया न चोरी दास्याचरणीं । पतिनिंदा नायके कानीं । सेर्ष्या क्षुब्ध न पाहे नयनीं । न वदे वाणी गुणदोष ॥९९॥
बाहीं जलधीचें लंघन । किंवा पायीं वळघिजे गगन । वदनीं मेरूचें चर्वण । हें अघटितघटन हो शके ॥३००॥
परंतु भर्ताराची आज्ञा । लंघनीं युगांत जीच्या प्राणा । अवस्थात्रयीं जे पतिविना । अन्यचिंतना न स्पर्शे ॥१॥
सत्पुत्र सच्छिष्य कां पतिव्रता । सद्गुरु पिता अथवा भर्ता । इत्यादि नियमीं सप्रेमता । पावती भजतां अपवर्ग ॥२॥
म्हणोनि तुम्ही कल्पनाकामा । आपुलाल्या जाऊनि सद्मा । मदुक्तिसाम्य न करूनि छद्मा । भाविजे पद्माप्रियभर्ता ॥३॥
कुलस्त्रियेसी उपपति करणें । अनुपयोगी बहुतां गुणें कृष्ण निरोपी गोपींकारणें । विषदलक्षणें तीं ऐका ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : May 03, 2017
TOP