श्रीसच्चिदानंदाय नमः ।
नमो सर्वग सर्वात्मका । विश्वरूपा विश्वव्यापका । सुलभस्वजना पादोन्मुखा । भ्रांतिच्छेदका ध्वांतारि ॥१॥
सर्वशब्दें पृथग्भाव । ब्रह्मामि हा स्वानुभव । तद्गतप्रत्यय तूं स्वमेव । तुजवीण माव जड मिथ्या ॥२॥
जो तूं सर्वग प्रत्ययरूपी । तो सर्वात्मा विश्वव्यापी । एकात्मज्ञप्तीच्या आटोपीं । त्रिजग जोपी सर्वज्ञ ॥३॥
तया ईश्वराचें दाक्षिण्य । तें तव कृपेचें स्वरूप जाण । येर्‍हवीं प्रवृत्तीवांचून । निवृत्ति कोठून त्या स्फुरती ॥४॥
प्रवृत्तिस्फुरण प्रपंचोन्मुख । तदनुगतत्वें जें सुख दुःख । तदुपशमवीं कृतविवेक । निवृत्ति सम्यक ती नांव ॥५॥
तिये निवृत्तीमाजीवडी । पूर्वसिद्धांत दिपक्षसवडी । प्रबोधप्रक्रिया तुझी रोकडी । मोडी आवडि विषयांची ॥६॥
तयां निर्विषय होतियां । माजि अधिकारप्रक्रिया । जाणूनि तदुचित बोधावया । सद्गुरुराया समर्थ तूं ॥७॥
सविवेक अनुतापें संतप्त । त्यांसी प्रबोधूनि सिद्धांत । निरसूनियां मिथ्या द्वैत । दुःखातीत तूं करिसी ॥८॥
विषसुखाची घ्यावया चवी । सविश्वासें रमले भवीं । बिडिश भक्षितां मीन जेंवि । जाले तेंवि दुःखभाक् ॥९॥
ऐसे विषयभोगासक्त । दुःख भोगूनी पश्चात्तप्त । जाणोनि स्वपादशरणागत । कर्माभिरत त्यां करिसी ॥१०॥
त्यांची पोखूनि विषयासक्ति । दावूनि आमुष्मिक सुखावाप्ति । सत्कर्मफलोन्मुखप्रवृत्ति । बोधिसी श्रुति तदुचित ॥११॥
मग ते पूर्वपक्षानुसार । धरूनि श्रुतीचा आधार । इहामुत्रार्थनियमपर । कर्मीं तत्पर वर्तती ॥१२॥
इहलोकींचे भोग क्षणिक । सुखप्रलोभें अपार दुःख । अक्षय भोगावा सुरलोक । कर्में अचूक आचरती ॥१३॥
मग ते कर्ममर्यादेसाठीं । यथेष्टाचरणीं पडे तुटी । आचारव्यवहारपरिपाटीं । उमजे गोठी सदसद् ॥१४॥
विधिनिषेधप्रायश्चित्त । विवरिती होऊनि अतंद्रित । तैं ते निर्मळ होती नितांत । मग वेदान्त प्रिय म्हणती ॥१५॥
ब्रह्मांडमय जरी विराटपुरुष । त्याचे अवयव लोक अशेष । कोण्या कर्में गुदींचे केश । मस्तकासी अधिष्ठिती ॥१६॥
कोण्या सुकृतें पदांगुळिका । होऊं शकेल पैं नासिका । एवं आदिपुरुषा एका । वृथा लोकावाप्ति गमे ॥१७॥
जीवचैतन्या लोकावाप्ति । हेही गमे अवघी भ्रांति । भूतां गुणांची पडल्या बुंथी । उमटे नाती जीवदशा ॥१८॥
जीवदशा असती खरी । तरी ते प्रविष्ट लोकांतरीं । होऊनि सुरवरांमाझारी । ऐश्वर्यथोरी पावती ॥१९॥
एवं पूर्वपक्षींच्या श्रुति । इहामुत्रार्थीं प्रलोभिती । जोंवरी रजतमांची भ्रांति । तंव संसृति साच गमे ॥२०॥
जंववरी निद्रेचें अधिष्ठान । तंववरी साच स्वप्नभान । जागृत जालिया मिथ्या स्वप्न । अपरोक्षज्ञान तेंवि भवीं ॥२१॥
तथापि स्वामीची बलिष्ठ युक्ति । बोधूनि इहामुत्रप्रवृत्ति । फलप्रलोभें कर्मासक्ति । लावोनि भ्रांति निरसिली ॥२२॥
इहामुष्मिक मिथ्या फळ । परी ते चित्तशुद्धिच केवळ । एतद्द्वारा कर्म सफळ । नोहे निष्फळ तवाज्ञा ॥२३॥
केवळ ज्यांसी तमाची बुंथी । त्यांची अलोट विषयासक्ति । म्हणोनि भोगिती भवदुर्गति । तव पदप्रणति न रुचोनी ॥२४॥
संसृतिसंतापें संतप्त । चौर्‍यांशीं लक्षयोनि भ्रमत । अध्यात्म अधिदैव अधिभूत । सदा आहळत त्रितापीं ॥२५॥
त्यांसी भ्रमतां अनेक योनि । ओसंतितां दुःखश्रेणी । अवचट लागल्या तुझ्या चरणीं । स्फुरे त्यां मनीं जिज्ञासा ॥२६॥
तव पदभजनीं दृढ विश्वास । होतां निरसती अशेष दोष । न करितां अतिकर्मक्लेश । होय निःशेष चित्तशुद्धि ॥२७॥
एवं तुझेनि कृपापांगें । भवभ्रमाचें ध्वांत भंगे । म्हणोनि ध्वान्तारि नामलिंगें । स्तविलें प्रसंगें तें क्षमिजे ॥२८॥
आतां आरब्धकथातंतु । अक्रूरें रविजासलिलाआंतु । जैसा देखिला श्रीभगवंतु । तैसा साद्यंत निरूपिला ॥२९॥
तो एकूणचाळिसावा अध्याय । संपतां अक्रूरा अष्टभाव । झाले मग तो वासुदेव । तवी तो भाव अवधारा ॥३०॥
कृष्ण ईश्वरांचा ईश्वर । जाणोनि स्तवितसे अक्रूर । सगुण निर्गुण द्विप्रकार । तो हा समग्र चाळिसावा ॥३१॥

N/A

References : N/A
Last Updated : May 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP