अध्याय ४० वा - श्लोक १ ते ५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
अक्रूर उवाच - नतोऽस्म्यहं त्वाखिलहेतुहेतुं नारायणं पूरुषमाद्यमव्ययम् ।
यन्नाभिजातादरविंदकोशाद्ब्रह्माऽविरासीद्यत एष लोकः ॥१॥
अगा हे श्रीकृष्णा मी तूंतें । नमस्कारितों सप्रेमचित्तें । झणें तूं म्हणसी बाळकातें । वृद्धें तातें न नमावें ॥३२॥
अक्रूरा तूं आमुचा चुलता । केंवि लेंकुरा न मिसी आतां । ऐसें न म्हणावें भगवंता । तूं तत्त्वता आदिपुरुष ॥३३॥
तूं अनादि अजरामर । व्यवरहित अव्ययतर । अनादिनिधन तूं अक्षर । अखिल चराचर प्रसवता ॥३४॥
जीं कां जगदखिलकारणें । तुजपासून त्यांचें होणें । यदर्थीं शंका न लगे करणें । सर्वज्ञपणें प्रभुवर्या ॥३५॥
तूं म्हणसी तो नारायण । अखिल जगाचें आदिकारण । तरी तोचि तूं हा प्रत्यक्ष कृष्ण । हें मम मन जाणतसे ॥३६॥
अमृत म्हणोनि वाणिजे अन्न । ब्राह्मणा सूर्याचें उपमान । अग्निसमान सक्रोधजन । तेंवि नारायण मज म्हणसी ॥३७॥
तरी हे तैसी नोहे उपमा । सत्यचि तुझिया नाभिपद्मा - । पासोनि जन्मला जो कां ब्रह्मा । तो भूतग्रामा आदिहेतु ॥३८॥
तयापासूनि अखिल लोक । जगत्कारण पृथक् पृथक् । तोही मोकळा विवेक । ऐकें सम्यक् सर्वज्ञा ॥३९॥
भूस्तोयमग्निः पवनः खमादिर्महानजादिर्मन इंद्रियाणि ।
सर्वेंद्रियार्था विवुधाश्च सर्वे ये हेतवस्ते जगतोऽङ्गभूताः ॥२॥
जितुकें अखिल चराचर । त्यासि भूमीचा आधार । भूमीवेगळा व्यवहार । कोणे ठायीं जगाचा ॥४०॥
मृद्धटाचें उपादान । कैसें मृत्तिकेवांचून । स्थूळशरीरें मृत्तिकेवीण । काय हें विवरून पहा पां ॥४१॥
यालागीं पृथ्वी स्थूळकारण । परी न प्रसवे बीजेंविण । तरी तें जगद्वीज जीवन । मुख्य कारण पृथ्वीचें ॥४२॥
तया अपाचें कारण तेज । जाठर माठर आणि आब्ज । तत्कारण तो पवन सहज । प्राणभस्रज नभगर्भीं ॥४३॥
पवनहेतु जें कां गगन । ध्वनि अवकाश आणि शून्य । त्रिविध त्रिगुणात्मक म्हणोन । गगनकारण अहंकार ॥४४॥
अहंकाराचें जें कारण । त्यासी महत्त्वत्त्व हें अभिधान । महत्तत्त्वासी योनि जाण । अव्यक्तसंज्ञ जे अजा ॥४५॥
गुणानुरूप त्रिविध भूतें । कारणसमुचय म्हणिजे त्यांतें । त्यांचे विषय अर्थसंकेतें । शुकें समर्थें बोलिले ॥४६॥
तदभिमानी विबुधचक्र । विष्णुपवनदिगग्निप्रवर । इत्यादि प्रसवती अपार । भौतिकनिकर पृथक्त्वें ॥४७॥
एवं कारणें जियें जगाचीं । तुजपासूनि संभूति त्यांची । जें तूं अखिल ब्रह्मांडाची । सृजनसामग्री मूर्तिमंत ॥४८॥
जरी तूं म्हणसी श्रीमुकुन्दा । मी अधीन यशोदानंदा । योग्य नोहें या स्तुतिवादा । तरी गोविंदा अवधारीं ॥४९॥
त्रिगुणात्मक हे तुझी माया । गुणत्रयातें प्रसवोनियां । योजिलें सृजनावनाप्यया । ते तुज जाणावया असमर्थ ॥५०॥
ऐसें मायाभ्रमलाघव । जें तूं गमसी गोपोद्भव । परंतु स्वरूप जें वास्तव । तें नेणती देवब्रह्मादिक ॥५१॥
नैते स्वरूपं विरजात्मनस्ते ह्यजादंयोऽनात्मतया गृहीताः ।
अजोऽनुबद्धः स गुणैरजाया गुणात्परं वेद न ते स्वरूपम् ॥३॥
मायेपासूनि भूपर्यंतं । जितुकीं कारणें कथिलीं येथ । तीं तुज आत्मया इत्थंभूत । नेणती समस्त जडात्मकें ॥५२॥
कीं तीं अनात्मकें जडें । चेष्टतीं तव सत्ताउजिवडें । यास्तव कारणें म्हणणें घडे । येरवीं उघडें अज्ञान ॥५३॥
अज्ञान म्हणिजे जें नेणणें । तें जडस्वरूप या कारणें । तरी तव वास्तव कवन्या गुणें । जाणों शकती भगवंता ॥५४॥
अव्यक्तादिकें जडें कैसीं । तरी प्रत्यक्ष्यादिप्रमाणें यांसी । दृग्गोचरें अगोचरासी । जाणों कैसीं शकतील ॥५५॥
उपनेत्र जैं नेत्रां लक्षी । पुस्तकवाचका हृद्गत साक्षी । प्रत्याक्षादिप्रमाणपक्षीं । आत्मा अक्षीं तैं गवसे ॥५६॥
अव्यक्तादिकारणनिकर । म्हणसी अज्ञानजडकठोर । मद्रूपावगमीं अधिकार । असे साचार जीवातें ॥५७॥
तरी जो अज कंजोद्भव । समष्टिप्रपंचात्मकजीव । तो ही गौणत्वें ज्ञानानर्ह । मां कैंची हांव व्यष्टिगतां ॥५८॥
अथवा अव्यक्तादिकें जडें । अपणा अथवा तुज निवाडें । जाणों न शकती ऐसें घडे । परी जीवांकडे ज्ञातृत्व ॥५९॥
तरी जीवही जडा प्रपंचाचा । स्वप्रत्ययें सुखदुःखांचा । उभयसाक्षी ज्ञाता साचा । परी निर्गुणाचा अबोध त्या ॥६०॥
ऐसी अक्रूर करूनि स्तुति । पुन्हा शंका मानी चित्तीं । म्हणसी मी दुर्ज्ञेय सर्वांप्रति । तैं पुनरावृत्ति न चुके कीं ॥६१॥
तरी ऐकें जी जनार्दना । अगोचर असतां ही प्रमाणा । कोणा एका मार्गें भजना । सुलभ सज्जना सम्यक तूं ॥६२॥
त्वां योगिनो यजंत्यद्धा महापुरुषमीश्वरम् । साध्यात्मं साधिभूतं च साधिदैवं च साधवः ॥४॥
जीवपरमात्मैक्यबुद्धि । योगमार्गें भजनविधि । योगी भजती तुज निरवधि । तैं परमसिद्धि लाहती ते ॥६३॥
अध्यात्म अधिभूत अधिदैव । इहीं सहित प्रपंच सर्व । विवरूनि साक्षी वासुदेव । सांख्य सदैव उपासिती ॥६४॥
तयां सांख्यां ज्ञाननिरतां । द्वैतविमुखां निजात्मरतां । नित्योपलब्ध अभेदभक्तां । तैं संसृतिवार्ता त्यां कैंची ॥६५॥
एवं साधुत्वें साधुभजना । सुलभ सर्वदा साधुजना । म्हणसी सकामा विषयमग्ना । दुर्लभ कीं नामप्राप्ति ॥६६॥
तयांसही तरणोपाय । जो त्वां निर्मिला होऊनि सदय । तया मार्गाची लाहोनि सोय । ते तव पाय आश्रयिती ॥६७॥
जाणोनि तयाचा अधिकार । कर्म ज्ञान द्विप्रकार । मार्ग बोधिला तो मुनिवर । कथी साचार दों श्लोकीं ॥६८॥
त्रय्या च विद्यया केचित्त्वां वै वैतानिका द्विजाः । यजंते विततैर्यज्ञैर्नानारूपापराख्यया ॥५॥
वैतानिक जे कर्मयोगी । तूंतें भजती विविधा लिंगीं । ते तूं म्हणसी भेदभंगीं । अर्पे स्वर्गीं देवांतें ॥६९॥
इंद्र वरुण वायु अग्नि । इत्यादि पृथक् देवता यज्ञीं । सांग सायुध सर्वाभरणीं । अमराभिधानीं तुज यजिती ॥७०॥
इंद्रवरूनप्रमुखसूक्तें । पूर्णैश्वर्यें स्तविती त्यातें । पृथक्सर्वेश्वर कैंचे येथें । तुज एकातें तें स्तवन ॥७१॥
प्रयागीं कां हरिद्वारीं । काशीक्षेत्रीं कां दर्दरीं । महिमा स्तवितां पृथगाकारीं । गंगा दुसरी नोहे कीं ॥७२॥
किंवा अनेक पदार्थमात्रीं । पादत्राणादि सूत्रीं वस्त्रीं । कांचनयोगें महिमा भारी । तो पृथगाकारीं हेमाचा ॥७३॥
तैसाचि श्रुति म्हणे जो परम । प्रकृति पुरुष इंद्राग्नियम । मित्रावरुण सूर्यसोम । पूर्णकाम तूं आद्य ॥७४॥
ऐसें जाणोनि करिती यजनें । अथवा सकाम पृथगभिधानें । परी तुज पावती तेणें भजनें । सर्वात्मपणें तव तुष्टि ॥७५॥
कर्मयोगी ऐसे भजती । ज्ञानयज्ञें एक यजिती । ऐका तयांची व्युत्पत्ति । शुक संकेतीं जें वदला ॥७६॥
N/A
References : N/A
Last Updated : May 07, 2017
TOP