अध्याय ४० वा - श्लोक १६ ते २०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
यानि यानीह रूपाणि क्रीडनार्थं बिभर्षि हि । तैरामृष्टशुचो लोका मुदा गायंति ते यशः ॥१६॥
ऐसा स्वलीलाक्रीडनार्थ । जीं जीं रूपें धरिसी येथ । तिहीं करूनि शोकरहित । गाती प्रमुदित तव यश तें ॥८४॥
यास्तव स्वयेंही दानपति । नमिता झाला अवतारपंक्ति । नृपा निरोपी शुक संकेतीं । तेंचि श्रोतीं परिसावें ॥१८५॥
नमः कारणमत्स्याय प्रलयाब्धिचराय च । हयशीर्ष्णे नमस्तुभ्यं मधुकैटभमृत्यवे ॥१७॥
प्रलय पावल्या सकळ सृष्टि । तया प्रलयाब्धीचे पोटीं । जगत्कारण जे मत्छयष्टि । नमो जगजेठी मत्छरूपा ॥८६॥
नमो यज्ञरक्षणपरा । अद्भुतहयग्रीवावतारा । मधुकैटभहननचतुरा । जगदुद्धारा जगदीशा ॥८७॥
अकूपाराय बृहते नमो मंदरधारिणे । क्षित्यद्धारविराह नमः सूकरमूर्तये ॥१८॥
अकूपार जो सागर । तोही न पुरे सविस्तर । बृहत् म्हणिजे विशाळतर । मंदरधर कमठात्मा ॥८८॥
त्या कूर्मावतारा कारणें । माझें साष्टांगनमन करणें । आणि भू दंष्ट्राग्रें उद्धरणें । सहज क्रीडणें हें ज्याचें ॥८९॥
तया वाराहरुणा हरि । माझें नमन अत्यादरीं । आणि अद्भुत नरकेसरी । निर्भय करी स्वजनातें ॥१९०॥
नमस्तुऽद्भुतसिंहाय साधुलोकभयापह । वामनाय नमस्तुभ्यं क्रांतत्रिभुवनाय च ॥१९॥
सर्व लोकांचा भयापहरण । दुर्धरदैत्यसंहारण । त्या नरहरीस माझें नमन । आणि वामन बटुरूपी ॥९१॥
वामनरूप बलिच्छलनार्थ । त्रिविक्रम त्रिपादभूग्रहणार्थ । उभयात्मका दंडवत । सप्रेमभरित पैं माझें ॥९२॥
नमो भृगूणां पतये दृप्तक्षत्रवनच्छिदे । नमस्ते रघुवर्याय रावणान्तकाय च ॥२०॥
भृगुवंशीं ज्या संभव । तयासि म्हणावें भार्गव । तत्पति तूं वीरवाडव । क्षत्रदावदहनपटु ॥९३॥
दृप्त म्हणिजे उन्मत्त क्षत्री । तद्वन समूळशाखापत्री । कुठारें छेदूनि भू सत्पात्रीं । वेदोक्तमंत्रीं समर्पिली ॥९४॥
तया नमो जी भार्गवा । आणि रघुवर्या श्रीराघवा । रावणांतका महीजाधवा । नमो वासवाहितमथना ॥१९५॥
N/A
References : N/A
Last Updated : May 07, 2017
TOP