अध्याय ५६ वा - श्लोक १ ते ५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
श्रीशुक उवाच - सत्राजितः स्वतनयां कृष्णाय कृतकिल्बिषः । स्यमंतकेन मणिना स्वयमुद्यम्य दत्तवान् ॥१॥
सत्राजित या नामें राजा । कृतापराधें पावोनि लज्जा । तत्परिहरणीं निजात्मजा । गरुडध्वजा दे मणिसहित ॥३९॥
सत्राजित म्हणसी कोण । तरी वृष्णिपुत्र सुमित्र जाण । अनमित्र सुमित्राचा नंदन । त्याचा निघ्न आत्मज पैं ॥४०॥
दोघे निघ्नाचे नंदन । सत्राजित आणि प्रसेन । विष्णुपुराणींचें हें कथन । संशयापन्नीं तें पहावें ॥४१॥
एवं सत्राजित प्रसेन । हे महाभोजकुळींचे यादव जाण । द्वारकेमाजीच वसतिस्थान । सूर्याराधन दृढ नेम ॥४२॥
हें ऐकोनि कुरुमराळ । विवेकचंचूनें दुग्धजळ । श्रवणपात्रीं जो प्राञ्जळ । निवडी केवळ पयग्रहणा ॥४३॥
तेणें ऐकोनि मुकुळित कथा । सविस्तर श्रवणीं धरूनि आस्था । बादरायणीतें झाला पुसता । एकाग्रता तें ऐका ॥४४॥
राजोवाच - सत्राजितः किमकरोद्ब्रह्मन्कृष्णस्य किल्बिषम् । स्यमंतकः कुतस्तस्य कस्माद्दत्ता सुता हरेः ॥२॥
राजा सर्वज्ञ विचक्षण । बादरायणीतें संबोधून । ब्रह्मनिष्ठत्वें म्हणे ब्रह्मन् । करीं व्याख्यान प्रश्नांचें ॥४५॥
श्रीकृष्णासीं दुष्टाचरित । काय आचरला सत्राजित । त्यासि स्यमंतक कोठोनि प्राप्त । कृष्णा किमर्थ तनया दे ॥४६॥
इत्यादि प्रश्नांचें व्याख्यान । करावया शुक सर्वज्ञ । प्रवर्तला तें सावधान । श्रोतीं होऊनि परिसावें ॥४७॥
श्रीशुक उवाच - आसीत्सत्राजितः सूर्यो भक्तस्य परमः सखा । प्रीतस्तस्मै मणिं प्रादात्सूर्यस्तुष्टः स्यमंतकम् ॥३॥
असो स्वभक्ता सत्राजिताचा । जिवलग सूर्य सखा साचा । त्याकारणें स्यमंतकाचा । प्रसाद सूर्यें समर्पिला ॥४८॥
सूर्यभक्त सत्राजित । असता झाला जगीं विख्यात । त्याकारणें संतोषभरित । मणि आदित्य समर्पी ॥४९॥
द्वारकेबाहेरी सिंधुस्नान । करूनि स्तविला सहस्रकिरण । प्रसन होतां प्रकाशमान । आपणासमान करीं म्हणें ॥५०॥
प्रियतम स्नेहाळ भक्तावरी । होवोनि स्यमंतक दिधला करीं । त्या मणीची प्रकाशथोरी । भास्करापरी भ्राजिष्ठ ॥५१॥
स तं बिभ्रन्मणिं कंथे भ्राजमानो यथा रविः । प्रविष्टो द्वारकां राजंस्तेजसा नोपलक्षितः ॥४॥
स्यमंतकमणीच्या प्रसादलाभें । सत्राजित ऐश्वर्यक्षोभें । दाटला मानी दिवि दिव्यशोभे । देवेंद्र न लभे निज तुळणा ॥५२॥
तदाढ्यत्वें न माय कोठें । निज गौरवाचिये हुटहुटे । द्वारावतीमाजी तो पेठे । दैवें बळिष्ठें नियोजिला ॥५३॥
मणिभूषण तें धरूनि कंठीं । द्वारकेमाजी स्वधामवाटीं । प्रविष्ट होतां जनांच्या दृष्टी । किरणकोटि रवि गमला ॥५४॥
कोणा न कळे मानव ऐसा । दृष्टि जडल्या मणिप्रकाशा । सत्राजिताचा आकृतिठसा । जनमानसा तर्केना ॥५५॥
तं विलोक्य जना दूरात्तेजसा मुष्टदृष्टयः । दीव्यतेऽक्षैर्भगवते शशंसुः सूर्यशंकिताः ॥५॥
द्वारकाजनीं लक्षिला दुरून । तंव तेजें वंचिले त्याचे नयन । द्यूत क्रीडतां श्रीभगवान । कथिती येऊन त्यापाशीं ॥५६॥
जनीं भाविला सहस्रकिरण । तैसेंचि सभास्थानीं येऊन । करिते झाले निवेदन । तें सज्जन परिसोत ॥५७॥
N/A
References : N/A
Last Updated : May 09, 2017
TOP