अध्याय ५६ वा - श्लोक २१ ते २५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
तमपूर्व नरं दृष्ट्वा धात्री चुक्रोश भीतवत् । तच्छुत्वाऽभ्यद्रवत्क्रुद्धो जाम्बवान्बलिनां वरः ॥२१॥
परम विकराळ महाद्भुत । देखतां बाळक अकस्मात । आक्रंदोनि मूर्च्छागत । सळोनि पडत ज्यापरी ॥७९॥
तैसीं आस्वलें श्वापदजाती । पर्वतीं विवरीं ज्यांची वसती । अपूर्व देखोनि नराकृति । धात्री अवचिती आक्रंदे ॥१८०॥
ऐकोनि धात्रीचा आक्रोशगजर । सक्रोध धांविला ऋक्षेश्वर । बळिष्ठांमाजि बळिया वीर । जो अवतार ब्रह्म्याचा ॥८१॥
कळीकाळाचा प्रसूतिपवन । लागतां विपरीत क्रियाचरण । तेंचि प्रत्यक्ष प्रवर्तमान । ऐका दुश्चिह्न उदेलें ॥८२॥
पिता विष्णु तो वासुदेव । पुत्र ब्रह्मा जो ऋक्षराव । पित्यापुत्रांमाजि माव । युद्ध अपूर्व मांडिलें ॥८३॥
पुत्र उन्मत्त नोळखे पिता । आंगीं बळाची उद्धतता । जाणोनि पुत्राची योग्यता । तदनुरूपता येरू नटे ॥८४॥
वृद्ध पिता बळिष्ठासी । जाणोनि दंडी स्वपुत्रासी । तेंवि पुराणपुरुष नववपूसीं । जाम्बवतासीं युद्ध करी ॥१८५॥
स वै भगवता तेन युयुधे स्वामिनात्मनः । पुरुषं प्राकृतं मत्वा कुपितो नानुभाववित् ॥२२॥
आपुला स्वामी श्रीभगवंत । तेणेंसीं तो जाम्बवत । प्रतापक्षोभें युद्ध करीत । पुरुष प्राकृत मानूनी ॥८६॥
कोधाचिये भरला भरीं । ऐश्वर्याची तेणें थोरी । जाणोनि प्राकृत पुरुषापरी । समकेसरी संघटला ॥८७॥
आस्वलयुद्धाची परिभाषा । वश्य होवोनि क्रोधावेशा । सर्वकौशल्यें जगदधीशा । तो त्यासरिसा युद्ध करी ॥८८॥
द्वंद्वयुद्धं सुतुमुलमुभयोर्विजिगीषतोः । आयुधाश्मद्रुमैर्दोर्भिः क्रव्यार्थे श्येनयोरिव ॥२३॥
द्वंद्वयुद्धा पेटले दोन्ही । साह्य नाहींच कोणा कोणी । दोघां विजयाची शिराणी । निकरेंकरूनि संघटती ॥८९॥
परम तुमुल निर्वाण युद्ध । दोघे वीर महाप्रसिद्ध । करिते झाले तो प्रबंध । कोण प्रबुद्ध वदों शके ॥१९०॥
क्रव्य म्हणिजे आमिष जाण । तदर्थ भांडती जैसे श्येन । परस्परें घेऊं पाहती प्राण । तैसे दारुण भिडताती ॥९१॥
जैसें विस्तीर्ण पाताळ । तैसें जाम्बवताचें बिळ । वृक्ष वल्ली जळ पुष्कळ । अतिसोज्वळ श्रीमंत ॥९२॥
ऐसिये स्थळीं प्रचंड बळी । दोघे युद्ध करिती सळीं । निघे उपटती पाताळीं । वर्षाकाळीं घन जैसे ॥९३॥
जाम्बवतें अकस्मात । कृष्णहृदयीं मुष्टिघात । वोपूनि पाडिला व्यस्तखस्त । मूर्च्छागत करूनियां ॥९४॥
जैसा द्यूतकाराचा भाव । प्रथम आपण हारवी डाव । तैसा मूर्च्छित पडला देव । आस्वला हांव दुणावली ॥१९५॥
हांवे चढोन जाम्बवत । पुन्हा ओपितां मुष्टिघात । क्रुष्ण लागह्वें धरूनि हात । आंसडूनियां पाडिला ॥९६॥
झोंकासरसा तोंडघसी । सवेग आदळला पृथ्वीसी । जानू ललाट घ्राणमुखासी । रक्तप्रवाह लागले ॥९७॥
तेणें थरारिला ऋक्ष । म्हणे हा बलिष्ठ योद्धा दक्ष । उठोनि घेतला प्रचंड वृक्ष । तेणें कंजाक्ष ताडिला ॥९८॥
वृक्षप्रहार पडतां शिरीं । कृष्णें धरिला वरचेवरी । हिरोनि घेतला बलात्कारीं । आस्वलाशिरीं ताडावया ॥९९॥
तेणें उसळोनि सवेगें । ऋक्षें वांचविलीं निजाङ्गें । शतधनुष्यें सरोनि मागें । बळें अभंगें आवेशला ॥२००॥
उपडुनि घेतला प्रचंड ताल । सक्रोधें जैसा प्रळयकाळ । हृदयीं ताडूनियां गोपाळ । केली विशाळ गर्जना ॥१॥
कृष्णें चुकवूनि तालघात । वृक्षें ताडिला जाम्बवत । मूर्च्छित पाडिला एक मुहूर्त । पुन्हा नधरत क्षोभला ॥२॥
मग राहोनि दूरच्या दुरी । वृक्ष टाकिले सहस्रवरी । कृष्णें वारिले वरिच्या वरी । घाव शरीरीं नादळतां ॥३॥
वृक्षें वृक्षां वारी हरी । देखोनि ऋक्ष कोपला भारी । राम स्मरोनि अभ्यंतरीं । मग पाथरी अभिवर्षे ॥४॥
म्हणे माझिया प्रतापापुढें । न थरे कुंभकर्ण बापुडें । म्यां लंकेचे पाडिले हुडे । केलें वेडें मज येणें ॥२०५॥
म्हणोनि टाकी शिळा धोंडी । गगनीं उफाळे दुपांडीं । घोष गाजवी ब्रह्मांडीं । दे मुरकुंडी धरावया ॥६॥
येरू वृक्षहस्तें करोनी । धोंडी झोडूनि पाडि धरणी । आस्वल आंगीं जडतां दुरूनी । वृक्षें लक्षूनि झोडिला ॥७॥
तो साहोनि वृक्षघात । सवेग उसळला गगनांत । विशाळ शीळा घेऊनि त्वरित । निक्षेपित हरिमाथां ॥८॥
कृष्णें मस्तकीं पडतां शिळा । वृक्ष हातींचा विसर्जिला । वरच्या वरी धरिली हेळा । तेणें ठोकिला ऋक्षपति ॥९॥
ऋक्षप मारी जे जे पाषाण । वरच्या वरी ते धरी श्रीकृष्ण । तेणें आस्वला करी ताडन । निर्भय पूर्ण स्वस्थानीं ॥२१०॥
प्रथम त्रिरात्र लटापटी । दहा दिवस वृक्षकाठी । सप्तरात्र शिळावृष्टि । अंगसंघट्टी याउपरी ॥११॥
शिळायुद्धीं नावरे हरि । जाम्बवत क्षोभला भारी । मुष्टिघातें हृदयावरी । ताडिला हरि वज्रवत् ॥१२॥
कृष्णें साहोनि मुष्टिघात । लघुलघवें मारिली लात । उलथोन पाडिला जाम्बवत । विचकोनि दांत पद खोडी ॥१३॥
आपुला भक्त हें जाणिनि हरि । मदगर्वातें मात्र परिहरी । वांचूनि जेवें सहसा न मरी । दैत्यापरी क्षोभोनी ॥१४॥
ऋक्ष मूर्च्छना सांवरोनि । झेपावला कव घालूनी । मुष्टि मारिली कृष्णमूर्ध्नी । येरें वदनीं ताडिला ॥२१५॥
मग परस्परें मुष्टिप्रहार । करिते झाले निरंतर । मुसळीं पृथककंडनपर । जेंवि सत्वर वधूयुग्म ॥१६॥
मुखीं मस्तकीं उरीं शिरीं । पृष्ठग्रीवाकटिकर्पूरीं । नितंबदेशीं जानुजठरीं । मुष्टिप्रहारीं ताडिती ते ॥१७॥
कटाकुक्षिवक्षस्थळीं । नासाचिबुकीं कर्णीं कपोळीं । स्कंधीं दंतीम नेत्रयुगळीं । मर्मस्थळीं वज्रमुष्टि ॥१८॥
प्रजनीं वृषणीं पायुरंध्रीं । जंघागुल्फीं पदपदाग्रीं । सक्थिबस्तिनाभीवरी । करपदप्रहारीं हाणिताती ॥१९॥
पृष्ठवंश अंस ऊरु । मणिबंधादि देश अपर । लक्षूनि निकरें मुष्टिप्रहार । ताडिती वर्जपडिपाडें ॥२२०॥
अष्टौ रात्र महाघोर । अंगसंघट्टनद्वंद्वसमर । परस्परें मुष्टिप्रहार । महाक्रूर संग्राम ॥२१॥
आसीत्तदष्टाविंषाहमित्यरेतरमुष्टिभिः । वज्रनिष्पेषपरुषैरविश्रममहर्निशम् ॥२४॥
एवं अट्ठावीस अहोरात्र । युद्ध केलें घोर विचित्र । विद्युत्पातासम कठोर । मुष्टिप्रहार परस्परें ॥२२॥
जैसीं विंध्याद्रीचीं शिखरें । इंद्र भंगी वज्रप्रहारें । तैसीं उभयतांचीं गात्रें । भंगतीं निकरें मुष्टितळीं ॥२३॥
अट्ठावीस अहोराती । न लावितां नेत्रपातीं । युद्ध केलें ऐसिये स्थिती । अविश्रमगती परस्परें ॥२४॥
तया युद्धचा फलितार्थ । जय पराजय कोणा प्राप्त । तोहि ऐका देऊनि चित्त । मूळश्लोकोक्त संक्षेपें ॥२२५॥
कृष्णष्मुटविनिष्पातनिष्पिष्टांगोरुबंधनः । क्षीणसत्त्वः स्विन्नगात्रस्तमाहातीव विस्मितः ॥२५॥
कृष्णमुष्टीचे निष्ठुर प्रहार । वज्राहूनि अतिकठोर । लागतां ऋक्षाचें सर्व शरीर । झालें चकचूर निष्पिष्ट ॥२६॥
ऊरुबंधनें प्रौढसंधि । बाहू कूर्परादि मणिबंधीं । कळा लागल्या बंधोबंधीं । जानुजघनीं गुल्फादिकें ॥२७॥
ढिले झाले सर्व सांदे । उतरोनि गेलें आढ्यत्वमांदें । सर्वाङ्ग व्यापिलें प्रबळ तोंदें । आस्वल मोदें सांडवलेरं ॥२८॥
दुःकें धैर्या झाला भंग । स्वेदें डबडबिलें सर्वाङ्ग । सुटला मदगर्वाचा संग । मग श्रीरंग ओळखिला ॥२९॥
जाम्बवताचे मुष्टिप्रहार । कृष्णाआंगीं लागतां क्रू । त्याणें त्याचेच भंगले कर । अभंग श्रीधर सर्वात्मा ॥२३०॥
जितुकें जळ वर्षें सागरीं । तो तें आत्मत्वें स्वीकारी । कीं घट मठ पर्वत पृथ्वीवरी । अभेदें धरित्री जड न मनी ॥३१॥
इन्धनीं आच्छादितां वैश्वानर । इन्धनेंचि होय प्रचुरतर । तेंवि श्रीधर जगदाधार । शक्ति समग्र चेतविता ॥३२॥
जाम्बवताचें जितुकें बळ । कृष्णाआंगींचेंचि तें केवळ । तेणें कृष्ण होय विकळ । हें बोलणें वोफळ मूर्खाचें ॥३३॥
घटाकाशें गिळिजे मठ । कीं मठाकाशा ब्रह्माण्डघोंट । न करवे तेंवि वैकुंठपीठ । न पवे कष्ट ऋक्षबळें ॥३४॥
श्रीकृष्णाच्या मुष्टिप्रहारीं । परम वैकल्य ऋक्षशरीरीं । विस्मय पावोनि अंतरीं । विचार विवरी हृदयांत ॥२३५॥
मजसारिखा वीर वरिष्ठ । उचलूं शके ब्रह्माण्डघट । मुष्टिप्रहारें मेरु पीठ । करीन घोंट सिंधूचा ॥३६॥
कीं शेष काढूनि पाताळीं । सोडूनि देईन गगनबिळीं । भूगोल सांवरीन करतळीं । अतुलबळी मज ऐसा ॥३७॥
ऐसा गर्व माझ्या आंगीं । त्या मज भंगिलें समररंगीं । मजहूनि बळिष्ठ या भूभागीं । कोण हा जगीं मज मीनला ॥३८॥
मजहूनि याचें प्रचंड बळ । सामान्य नर नोहे केवळ । विस्मित होत्साता प्राञ्जळ । त्रैलोक्यपाळ हाचि गमे ॥३९॥
एवं विवरूनि अंतःकरणीं । म्हणे हा प्रत्यक्ष कोदंडपाणि । बोलता झाला नम्रवाणी । बद्धपाणि नतमूर्धा ॥२४०॥
पूर्ण परिचय भगवंतातें । दावूनि म्हणे तुज म्यां निरुतें । जाणितलें त्या संकेतातें । श्रीअनंतें परिसावें ॥४१॥
N/A
References : N/A
Last Updated : May 09, 2017
TOP