अध्याय ५६ वा - श्लोक ६ ते १०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
जना ऊचुः - नारायण नमस्तेऽस्तु शंखचक्रगदाधर । दामोदरारविंदाक्ष गोविन्द यदुनंदन ॥६॥
नरायतना नारायणा । तुज नमो गा जगज्जीवना । शंखचक्रगदाब्जधारणा । जलजेक्षणा गोविन्दा ॥५८॥
यदुकुलगगनोद्भवनवघना । यादवदवयवाननलशमना । यदुवनजीवना आप्यायना । यदुनंदना यदुवर्या ॥५९॥
इंद्र दमिला गोवर्धनीं । हे कीर्ति ऐकिली होती जनीं । वरुण भजला नंदानयनीं । हेही करणी जन जाणे ॥६०॥
गुरुसुत अर्पूनि भजला यम । प्राशूनि पावक केला शम । कुबेराचा पुरविला काम । तनययुग्म उद्धरूनी ॥६१॥
एवं देवाधिदेव कृष्ण । जाणोनि दर्शना सहस्रकिरण । आला ऐसें कथिती जन । संबोधून बहुनामीं ॥६२॥
नमस्कारूनि वदती वाणी । तें तूं ऐकें कोदंडपाणि । कौरवान्वयभूषणमणि । बादरायणि संबोधी ॥६३॥
एष आयाति सविता त्वां दिदृक्षुर्जगत्पते । मुष्णन्गभस्तिचक्रेण नृणां चक्षूंषि तिग्मगुः ॥७॥
जनपद म्हणती भो श्रीकृष्णा । प्रत्यक्ष सविता सभास्थाना । देखावया तुझिया चरणां । स्वयें येताहे पैल तो ॥६४॥
त्रिजगद्गोगोप्ताबिंद ऐसें । तूतें जाणोनि निज मानसें । तव पददर्शनाचिये आशे । तिग्मप्रकाशें रवि आला ॥६५॥
तीक्ष्णगभस्तिचक्रेंकरून । झांकोळले जनांचे नयन । पाहों इच्छितों तुझे चरण । काय म्हणोन तें ऐका ॥६६॥
नन्वन्विच्छंति ते मार्ग त्रिलोक्यां विबुधर्षभाः । ज्ञात्वाऽद्य गूढं यदुषु द्रष्टुं त्वां यात्यजः प्रभो ॥८॥
भो भो स्वामी पंकजनाभा । तव सान्निध्यसुखवालभा । त्रिजगीं सुरवर दर्शनलाभा । बहुतेक तव भा गिंवसिती ॥६७॥
मार्गमाणा श्रुति स्मृति । तो तूं यदुकुळीं गूढस्थिति । नटला आहेसी मनुष्याकृति । जाणोनि गभस्ति येत असे ॥६८॥
तूतें पहावयाकारणें । गभस्तीचें येथें येणें । ऐसें भाविजे आमुच्या मनें । जाणिजे सर्वज्ञें प्रभुत्वें ॥६९॥
श्रीशुक उवाच - निशम्य बालवचनं प्रहस्यांबुजलोचनः । प्राह नासौ रविर्देवः सत्राजिन्मणिना ज्वलन् ॥९॥
सत्राजित हा नामसंकेत । प्रथमश्लोकीं अकारान्त । इये श्लोकीं तो हलंत । शब्द वर्तत द्विविध हा ॥७०॥
अष्टौ व्याकरणसंपत्ति । छपन्न कोश संज्ञास्मृति । सर्वज्ञ पूर्ण आम्नायार्थी । शुक व्यासोक्ती निवडला ॥७१॥
तो हें श्रीमद्भागवत । शुक वाखाणी निगमोदित । श्रोते सर्वज्ञ तेथींचा अर्थ । पदपदार्थें अनुभविती ॥७२॥
शुक म्हणे गा कौरवपाळा । अज्ञान जनही समान बाळा । बालिशांच्या ऐकोनि बोला । हरि हांसिला आश्चर्यें ॥७३॥
अखिलद्रष्टा अंबुजनयन । सर्वसाक्षी सर्वाभिज्ञ । बोलता झाला हास्य करून । काय वचन तयांसी ॥७४॥
अहो हा सूर्य नोहे सहसा । तुम्ही लक्षूनि तत्प्रकाशा । भाविला चंडकिरण ऐसा । कोण कैसा नुमजोनी ॥७५॥
मणिभूषणें द्योतमान । तुम्हीं भाविला देव म्हणोन । परी हा सत्राजित आपण । द्वारकाभुवन प्रवेशला ॥७६॥
कंठाभरणीं स्यमंतक । ज्वलत्किरणीं गमे अर्क । जाऊनि पहा पां सम्यक । मनीं निःशंक होवोनी ॥७७॥
ऐसें कथी जंव चक्रपाणि । तंव तो प्रवेशे आत्मसदनीं । पुढें वर्तली जैसी करणी । तेही श्रवणीं अवधारा ॥७८॥
सत्राजित्स्वगृहं श्रीमत्कृतकौतुकमंगलम् । प्रविश्य देवसदने मणिं विप्रैर्न्यवेशयत् ॥१०॥
सत्राजित निजमंदिरीं । प्रवेशिला आनंदगजरीं । तया गृहासी ऐश्वर्यथोरी । शुकवैखरी अनुवादी ॥७९॥
आधींच सदन श्रीमंडित । विशेष कौतुकें उत्साहभरित । मंगळें केलीं जेथ समस्त । वेदपारंगतद्विजवचनीं ॥८०॥
ऐशिये सदनीं प्रवेशोनी । देवतायतनीं स्यमंतकमणि । स्थापिला द्विजांच्या हस्तें करूनी । त्याची करणी अवधारा ॥८१॥
N/A
References : N/A
Last Updated : May 09, 2017
TOP