अध्याय ६३ वा - श्लोक ६ ते ९
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
बाणार्थे भगवान्रुद्रः सपुत्रैः प्रमथैर्वृतः । आरुह्य नंदिवृषभं युयुधे रामकृष्णयोः ॥६॥
बाण रक्षावयाकारणें । षड्गुणैश्वर्यपरिपूर्णें । पुत्रेंसहित पार्वतीरमणें । केलें धावणें ते काळीं ॥७१॥
सकळ सृष्टीतें रडविता । म्हणोनि रुद्र हे नामप्रथा । वृषभीं वळघूनियां त्वरिता । प्रमथें सहित पातला ॥७२॥
बाण घालूनि पाठीसीं । स्वयें प्रवर्तला युद्धासी । परजूनियां शस्त्रास्त्रांसी । रामकृष्णेंसी संघटला ॥७३॥
युद्ध मांडिलें परमाद्भुत । सपुत्र शंकर सहित प्रमथ । यादववीर प्रतापवंत । कोण कोणातें पडखळिती ॥७४॥
परस्परें ते वीरवरगणीं । सावध होवोनि परिसा कर्णी । श्लोकद्वयें बादरायनि । घाली श्रवणीं भूपाचे ॥७५॥
आसीत्सुतुमुलं युद्धमद्भुतं रोमहर्षणम् । कृष्णशंकरयो राजन्प्रद्युम्नगुहयोरपि ॥७॥
कुंभांडकूपकर्णाभ्यां बलेन सह संयुगः । सांबस्य बाणपुत्रेण बाणेन सह सात्यकेः ॥८॥
तारकसमरासमान तुमुल । सुतराम म्हणिजे अवंचकशील । परमाद्भुत युद्ध प्रबळ । झालें विशाळ समरंगीं ॥७६॥
जें ऐकतां अद्यापिवरी । सकंप रोमांच येती शरीरीं । समरांगणीं शङ्करहरि । भिडती निकरीं परस्परें ॥७७॥
यादवसैन्य शंकर मारी । देखूनि श्रीकृष्ण त्या पाचारी । प्रद्युम्न लोटला षण्मुखावरी । कठोरप्रहारीं हाणिताती ॥७८॥
प्रमथपुंगव कूपकर्ण । कुम्भाण्ड बाणाचा प्रधान । त्या दोघांहीं संकर्षण । समरांगणीं पडखळिला ॥७९॥
झुंजार बाणासुराचा पुत्र । त्यावरी लोटला साम्ब वीर । जो कां जाम्बवतीचा कुमर । समरीं अपर प्रळयाग्नि ॥८०॥
शङ्कर आला समराङ्गणा । युद्धीं हांकिलें रामकृष्णां । वीर दाविती आंगवणा । आवेश बाणा न सांवरे ॥८१॥
प्रचंडावेशें बाणासुर । ठोकूनि आला यादवभार । त्यावरी लोटला सात्यकिवीर । कार्मुकीं शर सज्जूनी ॥८२॥
ऐसे अनेक प्रमथगण । त्यांवरी यादव रणप्रवीण । लोटले त्यांचें द्वंद्वशा कथन । लिहितां भुवन अल्प गमे ॥८३॥
यालागीं द्वंद्वशा कथिले वीर । तयांवरूनि जाणिजे अपर । कासया कीजे बहु विस्तार । श्रोते चतुर समजती ॥८४॥
हरिहरांचें दारुण युद्ध । परंतु धर्मासि जें अविरुद्ध । तें पहावया निर्जरवृंद । आला विशद तो ऐका ॥८५॥
ब्रह्मादयः सुराधीशा मुनयः सिद्धचारणाः । गंधर्वाप्सरसो यक्षा विमानैर्द्रष्टुमागमन् ॥९॥
हंसविमानीं चतुर्मुख । आदिकरूनि सनकादिक । ब्रह्मनिष्ठ नारदप्रमुख । आले कौतुक पहावया ॥८६॥
देवयानीं पुरंदर । सवें वेष्टित अमरभार । पहावया हरिहरसमर । आले सत्वर बाणपुरा ॥८७॥
द्वादश आदित्यांचा गण । विश्वेदेव सिद्ध चारण । वसु साध्य सुपर्वाण । आले मुनिजन तपोनिधि ॥८८॥
मुख्य सप्त महर्षिप्रवर । अपर अठ्यायशीं सहस्र । विमानयानीं ऋषींचा भार । पातले समग्र बाणपुरा ॥८९॥
तैसेचि समस्त लोकपाळ । यक्ष गंधर्व अप्सरामेळ । हरिहराचें युद्ध तुमुल । आले केवळ विलोकना ॥९०॥
असो विस्तार सांगों किती । गगनीं दाटल्या विमानपंक्ति । हरिहर भिडती कवणे रीती । तें तूं भूपति अवधारीं ॥९१॥
N/A
References : N/A
Last Updated : May 10, 2017
TOP