अध्याय ६३ वा - श्लोक १६ ते २०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
कुम्भाण्डः कूपकर्णश्च पेततुर्मुसलार्दितौ । दुद्रुवुस्तदनीकानि हतनाथानि सर्वतः ॥१६॥
बळरामाचिये शरीरीं । बाण लागती कवणेपरी । शलभ जैसे मेरूवरी । हेमंतशिशिरीं संघटती ॥६२॥
कुम्भाण्डकूणकर्णांचे शर । न गणूनियां लाङ्गलधर । मस्तकीं ओपूनि मुसळप्रहार । समरीं सत्वर लोळविले ॥६३॥
संकर्षणाच्या मुसळघातें । कुम्भाण्डकूपकर्णांचे माथे । फुटूनि भडभडा वाहती रक्तें । पडिले प्रेतें होवोनियां ॥६४॥
तया दोघांचें प्रचंड सैन्य । समरीं भंगलें नाथहीन । प्राणधाकें सांडूनि रण । दिगंतीं संपूर्ण पसरलें ॥१६५॥
येरीकडे बाणकुमरें । साम्बा नोकूनि न्यूनोत्तरें । विंधिता झाला सहस्रशरें । चमत्कारें गर्जोनी ॥६६॥
तंव तो जाम्बवतीचा बाळ । बाणीं बाण तोडूनि सकळ । रथ सारथि अश्व चपळ । मारिले तत्काळ शरघातें ॥६७॥
धनुष्य तोडोनि पाडिलें क्षिति । बाणतनय केला विरथी । मग तो गदा घेऊनि हातीं । साम्बाप्रति धाविन्नला ॥६८॥
येरें सवेग तीक्ष्ण शरीं । गदा छेदिली वरच्यावरी । बाणकुमर उरीं शिरीं । भेदूनि समरीं पाडियला ॥६९॥
सारणावरी प्रधानकुमर । अष्टही करिती शरांचा मार । येरें छेदूनि त्यांचे शर । शिरें सत्वर उडविलीं ॥१७०॥
बळरामाच्या माराभेणें । पळतां देखूनि आपुलीं सैन्यें । रथ सवेग लोटिला बाणें । क्रोधें दारुणें उठावला ॥७१॥
विशीर्यमाणं स्वबलं दृष्ट्वा बाणोऽत्यमर्षणः । कृष्णमभ्यद्रवत्संख्ये रथी हित्वैव सात्यकिम् ॥१७॥
कुम्भाण्ड आणि कूपकर्ण । समरीं पडिले गतप्राण । रामकृष्णीं त्रासिलें सैन्य । देखोनि बाण प्रज्वळला ॥७२॥
अवगणूनिं युयुधानातें । कृष्णासम्मुख एक्या रथें । धांवता झाला क्रोधें बहुतें । तें नृपातें शुक सांगे ॥७३॥
धनूंष्याकृष्य युगपद्बाणः पंचशतानि वै । एकैकस्मिञ्शरौ द्वौ द्वौ संदधे रणदुर्मदः ॥१८॥
महा आवेश चढला आंगीं । नेत्रद्वारा उसळे आगी । धनुष्यें पांचशतें समरंगीं । सहस्रां हस्तीं सज्जियलीं ॥७४॥
एकैक चापीं दोन दोन शर । एकसंधानीं शर सहस्र । लघुलाघवें चमत्कार । दावूनि असुर गर्जिन्नला ॥१७५॥
आंगीं चढला रणदुर्मद । म्हणे कृष्णातें सावध । मजसीं करीं निर्वाण युद्ध । दावीं प्रसिद्ध आंगवण ॥७६॥
मानवांमाजी प्रताप तुझा । जंव न भेटे झुंजार दुजा । स्फुरणें दाटल्या माझिया भुजा । भिडें पैजा तूं मजसीं ॥७७॥
सैन्यें मारिसी फलकटें । तेणें शौर्यें न मासी कोठें । दावी परतूनियां मुखवटें । वेठें उद्भटें पुरुषार्थें ॥७८॥
एक संधानें सहस्र शर । सवेग वर्षे बाणासुर । बाणीं कोंदलें अंबर । यादववीर थरारिले ॥७९॥
बाण सुटती घनदाट । प्रळय विजांचे कडकडाट । समरीं पवना न फुटे वाट । हृदयस्फोट सुरासुरां ॥१८०॥
देखोनि बाणासुराचा यावा । शंका उपजली यादवा । म्हणती स्मरा बळकेशवां । दैत्यलाघवा लक्षूनी ॥८१॥
तिये समयीं जनार्दन । शार्ङ्गशिंजिनी टणत्कारून । निषंगांतूनि काढिला बाण । जैसा कृशान प्रळयींचा ॥८२॥
तानि चिच्छेद भगवान्धनूंषि युगपद्धरिः । सारथिं रथमश्वांश्च हत्वा शंखमपूरयत् ॥१९॥
प्रतिसंधानीं सहस्र शर । दैत्य वर्षे निरंतर । एकेचि संधानें श्रीधर । तोडि सत्वर ते अवघे ॥८३॥
कोट्यनुकोटि दीपहारी । नाशी प्रचंड वातलहरी । कीं पर्वत पेटला तृणाङ्करीं । विझवी सुरसरी क्षणमात्रें ॥८४॥
तेंवि असुराचे सायक । धनुष्येंसहित यदुनायक । सवेग छेदूनि एकें एक । दाविलें कौतुक सुरासुरां ॥१८५॥
बाणरथींचे अश्व चपळ । मारिले शरघातें तत्काळ । सारथियाचें छेदिलें मौळ । भंगिला समूळ रहंवर ॥८६॥
अश्वेंसहित सारथि वधिला । बाणीं रहंवर चूर्ण केला । बाणासुर विरथ झाला । कृष्णें स्फुरिला पाञ्चजन्य ॥८७॥
ऐकूनि कृष्णाच्या शंखस्फुरणा । जयरवें गर्जे यादवसेना । प्राणधाकें बाणपृतना । प्रमथगणासह पळती ॥८८॥
तये समयीं कैटभारि । बाणा बांधूं पाहे समरीं । विरथ निःशस्त्र सहसा न मारी । क्षात्रविचारीं परायण ॥८९॥
आसुरी विद्या बाणमाता । कोटरानामीं जे विख्याता । देखूनि बाणाची अवस्था । पावली तत्वता तें ऐका ॥१९०॥
तन्माता कोटरा नाम नग्ना मुक्तशिरोरुहा । पुरोऽवतस्थे कृष्णस्य पुत्रप्राणपरीप्सया ॥२०॥
भयानक नग्नवेष । मुक्त लोहित मस्तकीं केश । बाण घालूनियां पृष्ठीस । आला कृष्णास ठाकुनी ॥९१॥
स्वपुत्र बाणासुराचे प्राण । वांचवावयाचे इच्छेकरून । सवेग कृष्णापुढें येऊन । ठाकली नग्न कोठरा ॥९२॥
नग्न शरीर मोकळें भीस । सम्मुख येतां हृषीकेश । पाहों नये नग्नवनितेस । म्हणोनि अश्व परतवी ॥९३॥
N/A
References : N/A
Last Updated : May 10, 2017
TOP