अध्याय ६३ वा - श्लोक ३७ ते ४०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


तवावतारोऽयमकुंठधामन्धर्मस्य गुप्त्यै जगतो भवाय ।
वयं तु सर्वे भवतानुभाविता विभावयामो भुवनानि सप्त ॥३७॥

जगाचिया कल्याणार्थ । रक्षावया धर्मपथ । तुझा अवतार हो येथ । हें यथार्थ मी जाणें ॥४९॥
जगत्कल्याण इतुकेंचि न म्हणें । आमुच्या अनुग्रहाही कारणें । सगुण विग्रह तुझें धरणें । आणि पाळणें लोकपाळां ॥३५०॥
आम्हां लोकपाळां पाळिलें तुम्हीं । सप्त भुवनांतें पालूं आम्ही । येथ आशंका न करीं स्वामी । पृथक पाळक म्हणवोनियां ॥५१॥
जरी तूं म्हणसी जनार्दना । पलयमाना समस्त भुवना । समर्थ लोकपाळ तुम्ही पाळणा । तरी मज कां म्हणाल ब्रह्मा ऐसें ॥५२॥
सजातीय विजातीय स्वगत । ब्रह्मीं भेद हे असंभावित । ऐसें म्हणसी तरी हे मात । ऐकें यथार्थ जगदीशा ॥५३॥

त्वमेक आद्यः पुरुषोऽद्वितीयस्तुर्यः स्वदृग्धेतुरहेतुरीशः ।
प्रतीयसेऽथापि यथाविकारं स्वमायया सर्व्गुणप्रसिद्ध्यै ॥३८॥

सजातीयरहित तूं एक । कैसा म्हणसी तरी आइक । केवळ पुराण आदिपुरुष । तोही विशेष अवधारीं ॥५४॥
उप्तत्ति स्थिति आणि संहार । अवस्थात्रयवंत पुरुषमात्र । त्यांहूनि आद्य तूं स्वतंत्र । केवळ सन्मात्र सदोदित ॥३५५॥
प्रकृतिभूत पुरुष म्हणणें । तो तूं तुरीय साक्षी जाणें । न वेंठसी प्रवृत्तिभरणें । याकारणें विशुद्ध तूं ॥५६॥
तोही विशुद्द कैसा म्हणसी । तरी स्वप्रकाशक ज्ञानराशि । जो प्रसवे स्वप्रतिबिंबासी । उपाधियोगेंसी जीवपुरुषां ॥५७॥
अग्निपासून विस्फुलिंग । उपाधियोगें उठती अनेग । तेंवि आत्मस्वरूपीं मायायोग । होतां प्रसंग जीवदशे ॥५८॥
मायायोगें आत्मस्वरूपीं । अनेक जीव व्यष्टिरूपी । सजातीयादिभेदविकल्पीं । पुण्यपापीं निबद्ध ॥५९॥
तूं केवळ अद्वितीय । भेदरहित अप्रमेय । सजातीय विजातीय । भेद अन्वय तुज नाहीं ॥३६०॥
भेद नाहीं कां पां म्हणसी । तूं सर्वांचा हेतु होसी । स्वयें अहेतु निर्विशेषीं । तुज कायसी भेदकुटी ॥६१॥
तूं जरी म्हणसी प्रतिशरीरीं । जीवभेद कवणेपरी । प्रतीतिगोचर होती तरी । तें अवधारीं जगदीशा ॥६२॥
इंधन व्यापूनि हुताशन । दहन पचन प्रकाशन । करी तैसाचि तूंही जाण । प्रकटिसी गुण स्वप्रकाशें ॥६३॥
जीवावच्छिन्न चैतन्यमात्र । स्वप्रत्ययें कवळिसी गात्र । तैं करणज्ञानें विषयपात्र । होसी स्वतंत्र असतांही ॥६४॥
एवं विषयप्रकाशना । जीवभेद अवगसी नाना । येथ तूं म्हणसी भवनिमग्ना । सांसारिकसम मीही ॥३६५॥
ऐसें सहसा न म्हणें हरि । दृष्टान्तरूपें मम वैखरी । वदते तेंही श्रवण करीं । असंसारी बोधावया ॥६६॥

यथैव सूर्यः पिहितश्छायया स्वया छायां च रूपाणि च संचकास्ति ।
एवं गुणेनापिहितो गुणांस्त्वमात्मप्रदीपो गुणिनश्च भूमन् ॥३९॥

मेरूरूप जे सूर्यच्छाया । सूर्याप्रति आच्छादूनियां । अपरदृष्टीच्या ज्ञानविषया । लोपक ऐसी भासतसे ॥६७॥
तथापि मेघच्छायेकरून । सूर्या नोहे तिरोधान । कैसें म्हणसी तें लक्षण । सावधान अवधारीं ॥६८॥
सूर्य स्वच्छायाच्छादित झाला । तर्‍ही प्रकाशी त्या मेघाला । तदंतरितपदार्थाला । स्वआस्तिक्यें प्रकाशी ॥६९॥
सूर्य निःशेष नाहींच होता ।  तरी कें मेघां दावूं शकता । घटमठादिपदार्थां बहुतां । प्रकाशकता मग कैंची ॥३७०॥
तूंही स्वगुणें याचि प्रकारें । जीवात्मदेहात्माहंकारें । छादित अतज्ज्ञ मानिती खरें । परि त्यां न स्फुरें तव तेज ॥७१॥
आच्छादिलें हें जाणती । त्या जाणण्याची प्रकाशशक्ति । पृथक्त्वादि गुणप्रवृत्ति । प्रकाशती तव तेजें ॥७२॥
स्वप्नामाजी कोण्ही मेला । तो मरणाचा प्रकाशक झाला । तेंवि तूं सन्मात्र स्वकार्याला । आवृत गमसी अनावृत ॥७३॥
कोण्ही उन्मत द्रव्य सेवी । तो भुलला उपाधिभावीं । परि मी भुललों हे स्वजीवीं । प्रतीति ठावी कीं ना त्या ॥७४॥
एवं उपाधिअंतर्गत । स्वप्रकाशें सदोदित । आत्मसन्मात्र तूं संतत । तुज कें लिप्त संसार ॥३७५॥
सर्व साक्षी सर्वातीत । असंग अद्वय अनासक्त । त्या तुज संसाराची मात । कोनें किमर्थ वदिजेल ॥७६॥
भूमन् भो भो अपरिच्छिन्ना । तुझा आश्रय मायागुणा । माया भुलवी गौणजना । तुझिया आश्रयें करूनियां ॥७७॥
तवाश्रयें त्रिजग मोही । गुणावृत जीवा संसारडोहीं । बुडवितो तुज संसार नाहीं । म्हणणें कांहीं लागतसे ॥७८॥
तवाश्रयें माया भुलवी जना । द्योतूनि गुणात्मकाभिमाना । कैसी ते तूं जनार्दना । सावधान अवधारीं ॥७९॥

यन्मायामोहितधियः पुत्रदारगृहादिषु । उन्मज्जंति निमज्जंति प्रसक्ता वृजिनार्णवे ॥४०॥

ज्या तव मायेच्या मोहें । मोहितबुद्धि झालें देहें । पुत्रदारधनादिगेहें । दुःखसागरीं बुडताती ॥३८०॥
आपण देहमात्र झाले । धनसुतवनितागृहें मोहिले । तदासक्तीस्तव बुडाले । दुःखसागरीं गुणबद्ध ॥८१॥
वृजिनार्णव हा परम गहन । यामाजी लोकत्रय निमग्न । उफळताति तळीं बुडून । पुन्हा उफळूनि बुडताती ॥८२॥
म्हणाल उफळणें बुडणें कैसें । तरी शुद्धसत्वात्मकर्मवशें । देवयोनि पाविजेत असे । उन्मज्जन तें ऊर्ध्वगति ॥८३॥
पुन्हां पुण्यक्षयाचे अंतीं । निमज्जन ते अधोगति । तिर्यग्योनीमाजी वसती । ते मज्जती अंधतमीं ॥८४॥
वायुपुराणींची संमति । विषर्ययश्च भवति । ब्रह्मत्वस्थावरत्वयोरिति । अधोर्ध्वगति परस्परें ॥३८५॥
ब्रह्मप्राप्ति पावला पूर्ण । म्हणतां पावे आरूढ पतन । कर्मक्षयान्तीं ऊर्ध्वगमन । तिर्यग्जंतु पैं लाहती ॥८६॥
कर्मक्षयान्तीं तिर्यग्जंतु । निःशेष ऊर्ध्वग ब्रह्मीभूत । ब्रह्मनिष्ठही विषयासक्त । आरूढ पतित होताती ॥८७॥
एवं तव मायामोहित । दुःखार्णवामाजी पतित । उन्मज्जत निमज्जत । तें हें समस्त निरूपिलें ॥८८॥
एवं समष्टिव्यष्टिकल्प । जीवेश्वरांचें व्यवस्थारूप । निरूपूनियां अल्पस्वल्प । अभक्त निष्पाप निंदीतसे ॥८९॥

N/A

References : N/A
Last Updated : May 10, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP