अध्याय ७० वा - श्लोक १ ते ५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीशुक उवाच - अथोषस्युपवृत्तायां कुक्कुटान्कूजतोऽशपन् । गृहीतकंठ्यः पतिभिर्माधव्यो विरहातुराः ॥१॥

सप्ततितमीं कृष्णाह्निक । नृपग्लानी आणि धर्ममख । दूतनारदवाक्यविवेक । मंत्र निष्टंक निरूपिला ॥१०॥
ये अध्यायीं इतुकी कथा । द्वैपायनि नृपातें वक्ता । सादर होऊनि परिसिजे श्रोतां । आह्निक प्रथमतः त्यामाजी ॥११॥
नारदागमनानंतर हरि । रमणींसहित निशि अवसरीं । निद्रिस्त सोळा सहस्रां घरीं । विलासभरीं स्मररसिक ॥१२॥
अनेका सदनीं अनेक हरि । कंठ कवळूनि सप्रेम नारी । पहुडल्या असतां हरिशेजारीं । तंव शर्वरी अतिक्रमली ॥१३॥
समीप जाणोनि उषःकाळ । निसर्गे चेइला कुक्कुटमेळ । ह्रस्व दीर्घ प्लुत प्राञ्जळ । करिती कोल्हाळ स्वकूजिती ॥१४॥
माधवपत्न्या त्या माधवी । सप्रेमभरें रत माधवीं । वियोग सूचितां कुक्कुटरवीं । सक्षोभ जीवीं विरहर्ता ॥१५॥
कुक्कुटा निंदिती धिक्कारें । म्हणती तुमची जळोत वक्त्रें । आमुचा विघड करितां स्वरें । दीर्घगजरें स्वकूजितें ॥१६॥
तुमचें परिसोनियां कूजित । उषःकाळीं आह्निकार्थ । आमुचा सांडोनि रतिएकान्त । उठेल भगवंत उताविळा ॥१७॥
ऐशा विरहातुरा माधवी । क्षोभें कुक्कुटा शापित स्वजीवीं । तंव शकुन्तवर्ग हरि बोधवी । ते व्याख्यानपदवी अवधारा ॥१८॥

वयांस्यरूरुवन्कृष्णं बोधयंतीव बंदिनः । गायत्स्वलिष्वनिद्राणि मंदारवनवायुभिः ॥२॥

स्वप्रभूतें बंदिजन । प्रबोध करिती गायनें करून । भैरव बीभास आळवून । बिलावल भूपाळ इत्यादि ॥१९॥
कीं विष्णूतें वैकुण्ठभुवनी । नारदप्रमुख स्वभक्तगणीं । जागृत कीजे सामगायनीं । द्विजीं कूजूनि तेंवि हरीतें ॥२०॥
पूर्वींच जागृत बयांसिगण । आसन्न उषःकाळ जाणून । करूनि अतिशयें कूजन । श्रीभगवान जागविती ॥२१॥
अंडजजागरानिमित्त काय । प्रश्न करील हा कुरुराय । ऐसें जाणोनि व्यासतनय । कथिता होय प्रश्नादौ ॥२२॥
कृष्णें अमरभुवनीहून । सत्यभामेच्या प्रीतीकरून । सुरतरूचें केलें हरण । लाविलें तद्वन निजभवनीं ॥२३॥
तया मंदारसुमन गंधें । रोलंब रुञ्जती परमानंदें । म्हणोनि अनिद्र पक्षिवृन्दें । गायनवेधें भ्रमराच्या ॥२४॥
मंदारवनवायूच्या झुळका । मंदसुगंधशीतळ देखा । षट्पद पक्षी सेविती सुखा । तुच्छ पीयूषा मानूनी ॥२५॥
श्रीकृष्णचरणपंकजामोद । संमिश्र मंदारपवनगंध । लोपूनि विषयसुखाचा स्वाद । परमानंद हरिभजनीं ॥२६॥

मुहर्तं तं तु वैदर्भी नामृष्यदतिशोभनम् । परिरंभणविश्लेषात्प्रियबाह्वंतरं गता ॥३॥

वैदर्भीं हें उपलक्षण । परंतु सर्व हरिवनिता समान । प्रियपरिरंभणाचा क्षण । अतिशोभन मानिती ॥२७॥
प्राणेश्वराचें बाह्वंतर । जें कां हरिहृदय गंभीर । तेथें स्वहृदयें संलग्नतर । विश्लेषभीरु रतिरसिका ॥२८॥
हरिपरिरंभविश्लेषास्तव । शोभनमुहूर्तगौरव । भीमकीप्रमुख वनिता सर्व । लब्धानुभव न साहती ॥२९॥
प्रियतमाच्या बाह्वंतरीं । गाढालिङ्गनें संलग्न नारी । काळ क्रमला त्याची थोरी । मुहूर्तावारी उमाणिती ॥३०॥
गाढालिङ्गनें हरिहृदयासी । संलग्न असतां योषितांसी । मुहूर्तातें अवघी निशी । तुल्य विलासीं अवगमिती ॥३१॥
वैदर्भी हें उपलक्षण । परंतु सर्वा विरहिणी जाण । त्रियामा मानिती जैसा क्षण । परिरंभणास्तव कृष्णाच्या ॥३२॥
स्मराक्त परिरंभप्रेमपडिभरीं । कृष्णकंठीं संलग्न नारी । तंव कुक्कुटद्विजालिकूजितगजरीं । उषसि मुरारि जागविला ॥३३॥
रुक्मिणीप्रमुख समस्त वनिता । कृष्णालिङ्गनीं विघड होतां । वियोग न साहती तत्त्वता । मानिती मुहूर्ता युगसाम्यें ॥३४॥

बाह्ये मुहूर्त उत्थाय वार्युपस्पृश्य माधवः । दध्यौ प्रसन्नकरण आत्मानं तमसः परम् ॥४॥

कुक्कुटद्विजालिगजरें हरि । ब्राह्म मुहूर्तीं जागरावसरीं । उठोनि स्पर्शता झाला वारी । शौचाचारीं साचमनें ॥३५॥
फेडूनि रात्रींचें परिधानवसन । सुधौत दिव्याम्बर वेष्टून । उत्तराभिमुख घालूनि आसन । आत्मचिंतनीं उपविष्ट ॥३६॥
स्वस्तिक किंवा पद्मासन । ईषत् पृष्ठवंश उत्तान । चिबुक वक्षीं असंलग्न । संवृतवदन भ्रू लक्षी ॥३७॥
अनास्य प्राणांचा संचार । तोही परम नियमित मात्र । वर्णरचना मुद्रापर । मनोव्यापार निरसूनी ॥३८॥
तेथ मायान्धकाराती । जो कां आत्मा सदोदित । त्या आत्म्यातें ध्यानीं धृत । दीप निर्वात ज्यापरी ॥३९॥
कोण आत्मा कैसें चिन्तन । तें संक्षेपें करूं कथन । राया ऐकें सावधान । म्हणे नंदन व्यासाचा ॥४०॥

एकं स्वयंज्योतिरनन्यमव्ययं स्वसंस्थया न्त्यनिरस्तकल्मषम् ।
ब्रह्माख्यमस्योद्भवनाशहेतुभिः स्वशक्तिभिर्लक्षितभावनिर्वृतिम् ॥५॥

जो एकचि द्वैतातीत । अखंड एकात्मा संतत । अखंडत्वाचा ऐकें हेत । अनन्यपदार्थ प्रतिपादी ॥४१॥
अन्य नाहीं तो अनन्य । अन्यरूपिणी प्रकृति भिन्न । भूतगुणांचें अधिष्ठान । जे प्रसवोन रूढ करी ॥४२॥
हे उपाधि जेथ नाहीं । त्यातें निरुपाधि म्हणिजे पाहीं । यालागीं अनन्यपदनिश्चयीं । श्रुतिनिर्वाहीं प्रतिपाद्य ॥४३॥
उपाधिमात्र भासे नासे । अखंड अनन्य अव्यय असे । म्हणोनि श्रुतींहीं नित्य ऐसें । प्रबोधवशें बोधियलें ॥४४॥
आम्ही स्वयंज्योति ऐसें म्हणती । हेतु ऐकावा यदर्थीं । जे कां अविद्या कल्मषबुद्धि । तिची निवृत्ति ज्या स्वरूपीं ॥४५॥
जेथूनि अविद्यावरणा नाश । तेंचि नित्य निवृत्तकल्मष । उपलक्षण बोलतों यास । जें या विश्वास गुणहेतु ॥४६॥
म्हणसी माया गुणा प्रसवली । तरी मायाप्रकाशक जें का मुळीं । सृजनावनान्तमय सृष्टि झाली । तीमाजि पहिली आस्तिक्यता ॥४७॥
मायागुणात्मक विश्व सहज । भावनिर्वृति मुळींचें बीज । याचें व्याख्यान राया उमज । कथितों तुज प्रकटार्थें ॥४८॥
सत्ताशब्दार्थ बोलिजे भाव । आनंद निर्वृतिशब्दा नांव । एवं सदानंद ब्रह्म स्वमेव । ज्यावरी माव भवभ्रम हा ॥४९॥
मुळीं सन्मात्र जोंधळा । विश्वाकारें विरूढला । दंडपत्रावयवीं झाला । अंतीं निवडला सदूपें ॥५०॥
विश्वासाद्यंतीं सन्मात्र । सदैव श्रुत्युक्त आनंदप्रचुर । सहजानंद शब्दाधार । केवळ सन्मात्र सदानंद ॥५१॥
ऐसें नित्यनिवृत्तकल्मष । ब्रह्म ऐसें नाम ज्यास । बृहत्त्वास्तव बोलती विदुष । नित्य निर्दोष स्वयंज्योति ॥५२॥
ऐसिया अत्मयातें ध्यानीं । पूर्वोक्त मुदाबद्ध आसनीं । तादात्म्य पावे आत्मचिन्तनीं । तुजलागुनी हें कथिलें ॥५३॥
राजा म्हणे योगीश्वरा । कृष्ण सन्मात्रचि ऐसें विवरा । तो कां शारीर आसन मुद्रा । ध्यानव्यापारा अवलंबी ॥५४॥
मुनि म्हणे भो परीक्षिति । पूर्वींच कथिलें म्यां तुजप्रति । आह्निक लोकसंग्राहार्थीं । प्रकटी श्रीपति आचरोनी ॥५५॥
कृष्ण परब्रह्मांचे केवळ । त्यासि न बाधी कर्ममळ । जरी प्रकाशी अनेक शीळ । तरी तो अमळ स्वयंज्योति ॥५६॥
झाली शंकेची निवृत्ति । पुढें कृष्णाह्निकपद्धति । शुक निरूपी रायाप्रति । तें व्याख्यान श्रोतीं परिसावें ॥५७॥

N/A

References : N/A
Last Updated : May 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP