अध्याय ७० वा - श्लोक ११ ते १५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


आत्मानं भूषयामास नरलोकविभूषणम्‍। वासोभिर्भूषणैः स्वीयैर्दिव्यस्रग्गंधलेपनैः ॥११॥

मनुष्यलोकींचीं अळंकरणें । दिव्य वसनें दिव्याभरणें । दिव्य पीताम्बरपरिधानें । निज भूषणें स्वीकेलीं ॥८६॥
मस्तकीं मुकुट तेजःपुंज । मकरकुंदलें अतिसतेज । वज्रमणिसम वदनीं द्विज । झळकती सहज स्मितवक्त्रें ॥८७॥
केशरचंदनतिलक ललाटीं । सुरंग अक्षता लखलखाटीं । काश्मीरावरी कस्तूरी भृकुटीं । मध्यभागीं विराजित ॥८८॥
आंगीं मलयजसार पिंजरी । त्यावरी द्वादश तिलक केशरी । अंगदें बाहुवटां कार्बुरी । जडित कंकणें मणिबंधीं ॥८९॥
विचित्र रत्नखचित मुद्रिका । चतुरष्ट षोडश दळात्मका । त्रिकोण वर्तुळा चंद्रिका । अनामिका सपवित्रा ॥९०॥
जाम्बूनदात्मक मेखळा । नवरत्नाच्या फांकती किळा । बिरुदें रुळती चरणकमळा । कंथीं वनमाळा वैजयंती ॥९१॥
कौस्तुभ श्रीवत्सलाञ्छनानिकटी । प्रावरण अमोल्य क्षीरोद दुटी । मंदारसुमनें खोंविलीं मुकुटीं । ते परिपाटी अवधारी ॥९२॥

अवेक्ष्याज्य तथा दर्शं गोवृषद्विजदेवताः । कामांश्च सर्ववर्णानां पौरांतःपुरचारिणाम् ।
प्रदाप्य प्रकृतीः कामैः प्रतोष्य प्रत्यनंदत ॥१२॥

करूनि आत्मालंकरण । कनकपात्रीं आज्य भरून । स्वप्रतिबिंब तेथ लक्षून । केले अर्पण तें विप्रा ॥९३॥
आदर्श पाहिल्या त्यानंतर । धेनु वृषभ देवता विप्र । अवलोकूनि जगदीश्वर । तदुत्तर काय करी ॥९४॥
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र । पुरनिवासी वर्ण समग्र । अंतःपुरचारिजन अपर । कथिती सादर मनोरथ ॥९५॥
देऊनि त्यांचे अभिलषितार्थ । प्रधान सचिव मंत्री अमात्य । अष्टधा प्रकृति या सनाथ । करी वाञ्छित अर्पूनी ॥९६॥
करूनि प्रकृतीतें संतुष्ट । अर्पूनि जें जें ज्या अभीष्ट । स्वयें तत्तोषें उत्कृष । कमलाइष्ट आनंदें ॥९७॥
इतुकें आह्निक अंतःसदनीं । स्वयें सारूनि चक्रपाणि । मग पातले सभास्थानीं । तेंही श्रवणीं अवधारा ॥९८॥

संविभज्याग्रतो विप्रान्स्रक्तांबूलानुलेपनैः । सुहृदः प्रकृतीदारानुपायुङ्क ततः स्वयम् ॥१३॥

सभास्थानीं पार्षदगण । किङ्कर अनुचर सेवकजन । तिहीं आणिलें उपचारभरण । करी अर्पण हरि तेंही ॥९९॥
वर्णांमाज जे अग्रज । सर्वावर्णां ब्राह्मण पूज्य । त्यांसि अग्रीं अधोक्षज । उपचार सहज समर्पी ॥१००॥
मंदारसुमनांचिया माळा । आधीं घालूनि विप्रां गळां । चंदनतिलक रेखिले भाळा । परिमळउधळा वरि केला ॥१॥
फळताम्बूलसमर्पण । इत्यादि उपचारीं ब्राह्मण । आधीं पूजूनि जनार्दन । सुहृदगण अभ्यर्ची ॥२॥
त्यानंतरें राजप्रकृति । मंत्रिधुरंधर ज्यांतें म्हणती । माळा तिलक ताम्बूल निगुती । अर्पिले त्यांप्रति उपचार ॥३॥
ताम्बूल चंदन सुमनमाळा । दारांप्रति विभाग दिधला । त्यानंतरें अंगीं केला । उपचारसभुच्चय श्रीकृष्णें ॥४॥
मंदारमाळा घातल्या कंठीं । कुसुमावतंस खोविले मुकुटीं । पुष्पामोद श्रवणपुटीं । भरूनि परिमळ उधळिला ॥१०५॥
पुष्पादिउपचार सभास्थानीं । विप्रपूर्वक विभागूनीं । स्वयें घेतां चक्रपाणि । बंदिजनीं स्तव केला ॥६॥
बिरुदमाळा पढती भाट । झाला वाद्यांचा बोभाट । संकेत जाणोनि घडघडाट । रथ आणिला सारथियें ॥७॥

तावत्सूत उपानीय स्यंदनं परमाद्भुतम् । सुग्रीवदैर्हयैर्युंक्तं प्रणम्यावस्थितोऽ‍ग्रतः ॥१४॥

रत्नखचितसुवर्णरथ । गरुडध्वजविराजित । किङ्किणीज्वाळमाळामंडित । जैसा भास्वत भूनभींचा ॥८॥
शैब्य सुग्रीव बळाहक । मेघपुष्पादि तुरंगचौक । रथीं जुम्पूनियां दारुक । आला सम्यक मनोजवें ॥९॥
परमाद्भुतपदव्याख्यान । जैसें प्राकृतनृपांचे स्यंदन । तैसा नोहे जो गगनींहून । मागधसमरीं उतरला ॥११०॥
हरिसंकल्पमनोजवें । चिंतिल्या स्थानापर्यंत पावे । गगनगर्भीं स्वेच्छा धांवे । अतिलाघवें त्वाष्ट्रकृत ॥११॥
दिव्यायुधांची ज्यावरी भरण । प्रभे लोपवी हिमकर तरणि । ब्रह्मा साकल्यें न वर्णी । न शिवे धरणी रथनेमि ॥१२॥
एवं परमाद्भुत हरिरथ । दारुकें सज्जूनि आणिला त्वरित । मस्तकें जुहारूनियां नाथ । अग्रीं विनीत ठाकला ॥१३॥
घटिकायंत्रें सूचितां वेळा । उभा ठाकला पार्षदमेळा । सदस्येंसीं घनसांवळा । स्यंदनाजवळा स्वयें आला ॥१४॥
दारुकें मौळें स्पर्शोनि चरण । केलें धुरेवरी आरोहण । कैसा बैसला नारायण । हें संपूर्ण अवधारा ॥११५॥

गृहीत्वा पाणिना पाणी सारथेस्तं समारुहत् । सात्यक्युद्धवसंयुक्ताः पूर्वाद्रिमित भास्करः ॥१५॥

सारथियाचा धरूनि पाणि । रथीं बैसला चक्रपाणि । सात्यकि उद्धव दोघीं जणीं । सहित अर्क उदयाद्रीवरी जैसा ॥१६॥
दारुकें तुरंगा देतां साट । रथ चालिला घडघडाट । अंतःपुरवनिता घनदाट । गवाक्षीं स्पष्ट विलोकिती ॥१७॥

N/A

References : N/A
Last Updated : May 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP