अध्याय ७० वा - श्लोक ४१ ते ४७
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
यक्षति त्वां मखेंद्रेण राजसूयेन पांडवः । पारमेष्ठ्यकामो नृपतिस्तद्भवाननुमोदताम् ॥४१॥
ऋतूंमाजी श्रेष्ठतर । राजसूयनामा जो मखेन्द्र । तेणें तूतें कुन्तीकुमर । कुरुनृपवर यजितसे ॥४४०॥
पारमेष्ठ्यपदाचा धरूनि काम । निष्ठापूर्वक यज्ञोत्तम । आदरिला हें जाणूनि वर्म । तुवां सप्रेम प्रशंसिजे ॥४१॥
त्याचा वांछितमनोभाव । अनुमोदावा त्वां कुरुराव । इतुकेंचि म्हणसी कार्यगौरव । तरी सहेतु सर्व अवधारीं ॥४२॥
बैसले ठायीं द्वारकेहून । करीन यज्ञप्रशंसन । धर्मा देईन अनुमोदन । तरी कार्य याहून आन ऐका ॥४३॥
येथूनि न कीजे अनुमोदंन । इंद्रप्रस्थाप्रति कीजे गमन । तव गमनाचें प्रयोजन । त्रिजगदानंदनपर ऐकें ॥४४॥
तस्मिन्देव ऋतुवरे भवंतं वै सुरादयः । दिदृक्षवः समेष्यंति राजानश्च यशस्विनः ॥४२॥
तया मखेन्द्राच्या ठायीं । देखों इछिते तुज सर्वही । सुरवर मुनिवर नृपवर पाहीं । परमयशस्वी येतील ॥४४५॥
देवा तुझिया दर्शनासाठीं । वांछा अमरादिकांच्या पोटीं । मम दर्शनाची किमर्थ गोठी । तरी जगजेठी अवधारीं ॥४६॥
श्रवणात्कीर्तनाद्ध्यानात्पूयंतेऽन्तेऽवसायिनः । तव ब्रह्मयमस्येश किमुतेक्षाऽभिमर्शिनः ॥४३॥
भो ईश्वरा ईश्वरपती । तूतें ऐकती गाती ध्याती । श्वपचादिकही ते उद्धरती । मां देखों इच्छिती ते किमुत ॥४७॥
दर्शना स्पर्शनाचे अधिकारी । उद्धरती हे नवल ना थोरी । श्रवणा कीर्तना ध्यानावरी । पवित्र होती श्वपचादि ॥४८॥
अनधिकारियां पावनकरण । मंगळायतन तुझे चरण । या वाक्याचें प्रतिपादन । करी तें वजन अवधारा ॥४९॥
यस्यामलं दिवियशः प्रथितं रसायां भूमौ च ते भुवनमंगल दिग्वितानम् ।
मंदाकिनीति दिवि भोगवतीति चाधो गंगेति चेह चरणांबु पुनाति विश्वम् ॥४४॥
भो भो त्रिभुवनमंगळकरणा । तव यश पावनकर त्रिभुवना । मर्त्यामर्त्या पन्नगसदना । माजि विस्तीर्ण यशगरिमा ॥४५०॥
ब्रह्मांडगर्भीं जीं दिग्भुवनें । तितुकीं छादिलीं यशोवितानें । तव यशाच्या विस्तीर्णवसनें । मंगळाभरणें विराजती ॥५१॥
तैसेंचि तुझें चरणोदक । पवित्र विस्तीर्ण त्रिजगदात्मक । कैसे म्हणसी तरी सम्यक । कथितों ऐक कलुषारी ॥५२॥
तव पदसलिलप्रवाहिनी । मंदाकिनी स्वर्ग पवनी । भोगवती ते पन्नगभुवनीं । पवित्रकिरणी विषायुधां ॥५३॥
इहलोकीं ते भागीरथी । प्राणिनिचया पावनकर्त्री । त्रिपथगामिनी ऐसे म्हणती । विश्वसंसृति भंजक जे ॥५४॥
तस्मात् तुझिया दर्शनासाठीं । सुर नर पन्नग सकाम पोटीं । तुज गेलिया यज्ञवाटी । कोट्यनुकोटी उद्धरती ॥४५५॥
दर्शनें स्पर्शनें गुणकीर्तनें । श्रवणें ध्यानें यशश्चिन्तनें । पावन होती समस्त भुवनें । वर्तमानें भावीही ॥५६॥
नारद इतुकें हरिसी वदला । पुढें कैसा प्रसंग झाला । तो तूं ऐकें कुरुनरपाळा । कथितों तुजला संक्षेपें ॥५७॥
श्रीशुक उवाच - तत्र तेष्वात्मपक्षेष्वगृहीत्सु विजिगीषया । वाचः पेशैः स्मयन्भृत्यमुद्धवं प्राह केशवः ॥४५॥
तिये सुधर्मा सभेआंत । यादववीर वीरश्रीमंत । कृष्णपक्षीय परमाद्भुत । प्रतापादित्य तेजस्वी ॥५८॥
मेरुधैर्याचे प्रचंड । तैसे जयांचे दोर्दंड । स्फुरती समरार्थ अखंड । कृतातदंडपरिपाडें ॥५९॥
धनुर्विद्येचे अवतार । तुम्बळ बळाचे सागर । कीं रौद्ररसाचे श्रृंगार । लेवूनि वरिले वीरश्रिया ॥४६०॥
कोपें कृतान्ता मारिती थापे । प्रळयरुद्रातें पापिती दापें । आंगींच्या वीरश्रीप्रतापें । मानिती अल्पें त्रिभुवनें ॥६१॥
आत्मपक्षीय हे समस्त । बैसले असतां सभेआंत । नृपाची ग्लानी वदला दूत । धर्मवृत्तान्त नारदही ॥६२॥
तेथ समस्त यादववीरीं । दूतविज्ञसि ऐकूनि पुरीं । आवेश उथळला अंतरीं । मागध समरीं जिणावया ॥६३॥
पूर्वीं सप्तदश संग्रामीं । प्राणावशिष्ट सोडिला आम्हीं । अद्यापि न संडी समरोर्मी । उग्रकर्मी दुष्टात्मा ॥६४॥
नारदवार्तेचा विक्षेप । मानूनि सर्वां वीरश्रीकोप । म्हणती आजीच मागधदर्प । झाडूं साटोप समरंगीं ॥४६५॥
त्यानंतरें नारदवचना । मान द्यावा हे वासना । परंतु भगवंताची आज्ञा । यंत्रकृशानासम पाहती ॥६६॥
मागधें जिंकिलें जगदीश्वरा । म्हणोनि समुद्रीं निर्मिलें नगरा । ऐसिया गोष्टीचा दरारा । न धरूनि समरा करूं पाहती ॥६७॥
ऐसें जाणूनि स्वपक्षाभीष्ट । हांसूनि सर्वज्ञ श्रीबैकुंठ । प्रधानांमाजि उद्धव श्रेष्ठ । त्यातें संतुष्ट वाक्य वदे ॥६८॥
स्वपक्षप जे यादववीर । त्यांचें रक्षावया अंतर । सर्वज्ञ असतांही श्रीधर । उद्धवा सादर नीति पुसे ॥६९॥
मधुरोत्तरीं उद्धवाप्रति । नीतिसूचक कौशल्योक्ति । तिहीं गौरवूनि श्रीपति । बोलता झाला तें ऐका ॥४७०॥
श्रीभगवानुवाच । त्वं हि नः परमं चक्षुः सुहृन्मंत्रार्थतत्ववित् । अथाऽत्र ब्रूह्यनुष्ठेयं श्रद्दध्मःकरवाम तत् ॥४६॥
षड्गुणैश्वर्यसंपन्न । भूत भविष्य वर्तमान । त्रिकाळवेत्ताही सर्वज्ञ । उद्धवालागून मंत्र पुसे ॥७१॥
अमरगुरु जो बृहस्पति । उद्धवा तच्छिष्य तूं सुमति । आमुचा सुहृद सर्वां आप्तीं । परमचक्षु मी जाणें ॥७२॥
चर्मचक्षु सर्वां असती । धिषणाचक्षु बृहस्पती । तच्छिष्य तूं तेंचि मूर्ति । हें मम प्रतीतीमाजि असे ॥७३॥
मंत्रार्थतत्त्ववचक्षण । इच्छिसी आमुचें कल्याण । तरी आम्हांसि करणीय कोण । हें विवरून बोल पां ॥७४॥
दूतें नृपांची विज्ञापना । नारदें कथिली धर्मकामना । दोहींमाजि अनुष्ठाना । योग्य कोणतें कर्म आधीं ॥४७५॥
विवरूनि वदसी जें करणीय़ । भक्तिपूर्वक तें करूं कार्य । ऐकूनि प्रभूचा अभिप्राय । उद्धव काय बोलतसे ॥७६॥
इत्युपामंत्रितो भर्त्रा सर्वज्ञेनापि मुग्धवत् । निदेशं शिरसाऽऽधाय उद्धवः प्रत्यभाषत ॥४७॥
ऐसा बहुमानपुरःसर । पुसिला स्वामीनें विचार । सर्वज्ञ असतांही साचार । मनुजाकार मुग्धवत् ॥७७॥
जाणोनि प्रभूचें मनोगत । आज्ञा मस्तकीं वंदूनि त्वरित । मंत्र विवरूनि प्रसंगोचित । कथी मंत्रार्थ उद्धव पैं ॥७८॥
पुढिले अध्यायीं उद्धव । विवरूनि कथील मंत्रार्थतत्त्व । सावध होऊनि श्रोते सर्व । कथा अपूर्व ते ऐका ॥७९॥
इतुकी कथा सप्ततितमीं । वाखाणूनि श्रीशुकस्वामी । एकसप्ततितमामाजि नियमी । धर्मदर्शना हरियात्रा ॥४८०॥
श्रीमद्भागवतींचा दशम । त्यामाजि भूभारहरणोद्यम । कौरवांकडील कथानुक्रम । तो उपक्रम येथूनी ॥८१॥
परीक्षितीतें सांगे शुक । श्रोतीं होऊनि श्रवणोन्मुख । भाषाव्याख्यान तें सम्यक । श्रवण कीजे हरिवरद ॥८२॥
एकनाथ प्रतिष्ठानीं । त्यांचें चरणप्रक्षाळवणी । गौतमीप्रवाहें लक्षूनी । दयार्णव सेवी पिपीलिके ॥८३॥
शके सोळाशें एकुणसाठीं । पिंगळाब्दीं अनावृष्टी । शुक्लहरिदिनीदिवसा घटी । द्वादश क्रमतां अश्वयुजीं ॥८४॥
भाषाव्याख्यान दयार्णवें । केलें हरिवरगौरवें । संतीं सादर तें परिसावें । जळे आघवें अघ तेणें ॥४८५॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां भगवदाह्निकनृपग्लानिकथननारदागमनयुधिष्ठिरवृत्तान्तविचारणं नाम सप्ततितमोऽध्यायः ॥७०॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥४७॥ ओवी संख्या ॥४८५॥ एवं संख्या ॥५३२॥ ( एकोणसत्तरावा अध्याय मिळून ओवीसंख्या ३२६२० )
सत्तरावा अध्याय समाप्त.
N/A
References : N/A
Last Updated : May 29, 2017
TOP