अध्याय ७१ वा - श्लोक ६ ते १०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
द्वैरथे स तु जेतव्यो मा शताक्षौहिणीयुतः । ब्रह्मण्योऽभ्यर्थितो विप्रैर्न प्रत्याख्याति कर्हिचित् ॥६॥
मागधासमान जो प्रतिरथी । तेणें येऊनि समरक्षिती । द्वंद्वयुद्धीं प्रतापशक्ति । वीरपुरुषार्थी दमावा ॥५७॥
द्वंद्वयुद्धावांचूनि कांहीं । शतशा अक्षौहिणींच्या समूहीं । मागध न जिणवे रनमही । हें निश्चयीं विधिवाक्य ॥५८॥
यालागिं द्वैरथें युद्धें दमिजे । साह्य त्रितीय पुरुषें न कीजे । ऐसीं जाणोनि रहस्यबीजें । उभय काजें साधावीं ॥५९॥
म्हणाल एकला संग्राममही । मागध सहसा येणार नाहीं । यदर्थीं उपायकौशल्य कांहीं । सांगतों तेंही अवधारा ॥६०॥
ब्राह्मणभक्त जरासंध । सहसा नुलंघी विधिवाद । विप्रयाञ्चेचा न करी छेद । सहस्रा विरुद्ध मानूनी ॥६१॥
अदेय पदार्थ याचिला असतां । विमुख नोहे प्राणान्त होतां । ऐसा निश्चय ज्याचा पुरता । अढळ सर्वथा न ढळे पैं ॥६२॥
युक्ती वधिजे हा सपत्न । यदर्थ कथितों दीर्घ प्रयत्न । ऐकोनि तैसाचि कीजे यत्न । कांहीं अनुमान न करूनी ॥६३॥
ब्रह्मवेषधरो गत्वा तं भिक्षेत वृकोदरः । हनिष्यति न संदेहो द्वैरथे तव सन्न्धौ ॥७॥
ब्राह्मणवेशें अनिळबाळें । जाऊनि वैश्वदेवाचे वेळे । भिक्षा याचितां मागधपाळें । वाक्य मानिलें जाणोनी ॥६४॥
मग मागावें द्वंद्वयुद्ध । विमुख नोहे चित्तें मागध । द्वंद्वयुद्धीं जरासंध । भीम प्रसिद्ध वधील ॥६५॥
म्हणाल मागध आणि भीम । दोघे बळिष्ठ समान सम । तरी भेम त्या वधील ऐसा नेम । कां पां विषम हो न शके ॥६६॥
तुझिया सान्निध्यें श्रीधरा । मागधकदनीं वृकोदरा । वरील विजयश्री सुंदरा । स्वंद्वसमरामाजिवडी ॥६७॥
ऐसा मंत्रार्थनिश्चय । कांहीं न धरावा संदेह । सन्निद्ध असतां यादवराय । वधील पाण्डव मगधेशा ॥६८॥
कांहीं न करितां मी साक्षी । सन्निध असतां उभय पक्षीं । मागधा वधू भीमा रक्षीं । केंवि हें लक्षीं तुज लक्षे ॥६९॥
ऐसें न म्हणावें श्रीहरी । सत्ता अरिख चराचरीं । निमित्तमात पृथगाकारीं । गुणव्यापारीं गुणकर्में ॥७०॥
निमित्तं परमीशस्य विश्वसर्गैरोधयोः। हिरण्यगर्भः शर्वश्च कालस्यारूपिणस्तव ॥८॥
तूं काळात्मा एकाकी । संतत स्थितिलयसृजनाविखीं । निमित्तमात्र कृतकौतुकीं । गुणाभिमानी विधि हर पैं ॥७१॥
अरूप अव्यय अगोचर । श्वास निमेष त्रुटि अक्षर । अखंडदंडायमान क्षिप्र । जो तूं ईश्वर काळात्मा ॥७२॥
विक्षेपरूप विश्वसर्ग । लयोपसंहर निरोध साङ्ग । एतद्विषयीं निमित्तयोग । कंजज भर्ग गुणकर्मीं ॥७३॥
काळरूपिया ते तव सत्ता । निमित्त विधिहरांच्या माथां । तव सान्निध्यें मागधहंता । निमित्तमात्र भीम तैसा ॥७४॥
अचेष्ट चेष्टे सत्तायोगें । माया दावूनि लपवी जगें । तस्मात ऐश्वर्य हें अवघें । तुझे नियोगें योगीशा ॥७५॥
यास्तव आतां विलंब न करीं । येणेंचि उपायें मागधवैरी । निमित्तमात्र भीमा करीं । शीघ्र संहारीं जनार्दना ॥७६॥
येचि विषयीं नृपांच्या सती । शिशु लालितां तव यश गाती । यश गाती ते मुक्त होती । दुर्घट आर्ति खंडूनियां ॥७७॥
दरिद्रियांच्या जैशा सुता । ओंवी गाती कांडितां दळितां । परि त्या निष्फळमनोरथा । तैसें अच्युता न कीजे ॥७८॥
शालवृक्षातळीं बैसे । सुख ना सुकृत न लाहे जैसें । कल्पतरुतळींही तैसें । तरी मग कायसें श्रेष्ठत्व ॥७९॥
यालागि जैशा नृपांच्या सती । पूर्वप्रत्ययें तव यश गाती । साफल्य त्यांचिये मनोरथीं । करूनि स्वकीर्ति विस्तारीं ॥८०॥
कशा गाती त्या मम यशा । पूर्वप्रत्यय त्यांप्रति कैसा । ऐशी प्रश्नेच्छा मानसा । तरी ते परिसा मी वदतों ॥८१॥
गायंति ते विशदकर्म गृहेषु देव्यो राजां स्वशत्रुवधमात्मविमोक्षणं च ।
गोप्यश्च कुंजरपतेर्जनकात्मजायाः पित्रोश्च लब्धशरणा मुनयो वयं च ॥९॥
राजे निग्रहिले मागधें । त्यांचिया वनिता सदैव खेदें । जाकळिल्या तव पदारविन्दें । स्मरोनि बिरुदें पढताती ॥८२॥
मनुष्यदेव म्हणिजे राजा । पट्टमहिषी तयाची भाजा । तयेसि देवीनामें सहजा । बोलती प्रजा सर्वत्र ॥८३॥
मागधरुद्धनृपांच्या देवी । आर्ता गाती तव यशःपदवी । तैसेचि त्यांचे मनोरथ पुरवीं । प्रार्थना गुर्वी हे माझी ॥८४॥
सदैव असतां आपुल्या गृहीं । दलनकंडनादिकर्मप्रवाहीं । शिशुलालनादिकांच्या ठायीं । स्मरोनि हृदयीं यश गाती ॥८५॥
कर्म म्हणिजे जे तव लीला । अवतारनाट्यें बहुत वेळा । प्रकाशिली ते गुणकर्ममाळा । गाती वेल्हाळा दुःखार्ता ॥८६॥
पूर्वीं जैसा बहुतां हरि । शत्रु वधूनि मुक्त करी । तैसाचि आम्हां ये अवसरीं । प्रनतकैवारी नोपेक्षीं ॥८७॥
देवी म्हणती पुरुषोत्तमा । स्वकीय शत्रु मागधनामा । यातें वधूनि देइजे आम्हां । नृपललामा सोडवुनी ॥८८॥
आमुचा शत्रु मागध मारीं । नृपति आमुचे मुक्त करीं । पूर्वील बिरुदें साचोकारीं । उपेक्षा न करीं प्रणतांची ॥८९॥
ऐशा नृपवनिता तव गुण । गाती इच्छूनि मागधमरण । म्हणसी पूर्वीं म्यां वधिले कोण । केलें मोक्षण कोणाचें ॥९०॥
तरी तां पूर्वीं कामवनीं । गोपींसहित चक्रपाणी । क्रीडत असतां त्यां धरूनी । नेता झाला शंखचूड ॥९१॥
तैं दुःखें स्मरती तूतें गोपी । तेव्हां वधूनि गुह्यक पापी । मुक्त केल्या कृतसंकल्पी । साफल्य वोपुनी तयांच्या ॥९२॥
तेंवि स्वशत्रु मागध मारीं । आमुचे वल्लभ मुक्त करीं । नृपवनिता हें आपुले घरीं । गाती अवधारीं आणिकांही ॥९३॥
वसुदेवदेवकी बंदिशाळे । कंसें रोधिलीं परम कुटिळें । कंसा वधूनि त्यां मोकळें । जैसें केलें गुण गातां ॥९४॥
तैसा वधूनि मागध खळ । आमुचे मुक्त करीं नृपाळ । ऐशा गाती तव यश अमळ । वनिता सुशीळ भूपांच्या ॥९५॥
पुराणान्तरींच्या ऐकूनि कथा । देवी गाती अवतारचरिता । जे गजेंद्र नक्रें त्रास देतां । झाला स्मरता तुज तो तैं ॥९६॥
उडी घालूनि गंडकीजळीं । चक्रें ताडुनि नक्रमौळीं । गजेंद्र सोडविला तत्काळीं । गाती वनमाळी तव यश हें ॥९७॥
जनकात्मजेसि रावणें लंकें । नेऊनि रोधितां दाटली दुःखें । ते सोडविली राक्षसकटकें । रावणासहित निर्दळुनी ॥९८॥
असो ऐसिया नृपांगना । गाती प्रणतक्लेशहरणा । मुनिजनभवाब्धिनिस्तरणा । तैसेचि शरण आम्हीही ॥९९॥
यालागिं नृपांगना ज्या आर्ता । तव यश गाती श्रीभगवंता । त्यांच्या पुरवीं मनोरथा । मागधा दृप्ता निर्दाळुनी ॥१००॥
आणिक ऐकें भो वनमाळी । राजसूर्यार्थ मागध बळी । वधितां साधती अर्थ सकळी । भूमंडळीं अनायासें ॥१॥
जरासन्धवधः कृष्ण भूर्यर्थायोपकल्पते । प्रायः पाकविपाकेन तव चाभिमतः ऋतुः ॥१०॥
मागध वधितां द्वंद्वयुद्धीं । बहुता अर्थांचिया सिद्धी । साधूनि येती कृपानिधि । विवरितां बुद्धिमाजि गमे ॥२॥
बहुतेक पाकविपाकें करून । सर्वप्रकारें राजसूययज्ञ । संमत आहे तुजलागून । पाहे विवरून जनार्दना ॥३॥
पचौनि पक्कता जें जें पावे । त्यालागीं पाक ऐसें म्हणावें । तस्मात शुभाशुभ कर्म आघवें । पाक जाणावें श्रुतिगदित ॥४॥
विपाक म्हणिजे कर्मफळ । पाक परिणाम तो केवळ । तोही द्विविध होऊनि सकळ । तुज अनुकूळ मख साजे ॥१०५॥
म्हणसी द्विविध विपाक कैसा । मागधें रोधिल्या नृपांची आशा । पुण्यविपाकें फळेल सहसा । मागध नाशा पावेल ॥६॥
पापविपाकें जरासंध । भीमहस्तें पावेल वध । तस्मात राजसूयाख्य मेध । तुजलागीं प्रसिद्ध अभिमत हा ॥७॥
तुज गेलिया यज्ञागारा । सर्वही साधेल जगदीश्वरा । उद्धवें इतुकिया विचारा । द्वारकेश्वराप्रति कथिलें ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : May 29, 2017
TOP