अध्याय ७१ वा - श्लोक ११ ते १५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
श्रीशुक उवाच - इत्युद्धववचो राजसर्वतोभद्रमच्युतम् । देवर्षिर्यदुवृद्धाश्च कृष्णश्च प्रत्यपूजयन् ॥११॥
शुक म्हणे गा कुरुवरपाळा । सर्वकल्याणफळीं सफळा । उद्धवें कथिली मंत्रमाळा । अक्षय सकळा सुखदात्री ॥९॥
इतुकी उद्धवमंत्ररचना । ऐकोनि संतोष ब्रह्मनंदना । म्हणे भला रे भला दाशार्हगणा । माजि वरिष्ठ वक्ता तूं ॥११०॥
यादवांमाजि वरिष्ठ वृद्ध । श्वफल्क देवक वसुदेव प्रसिद्ध । कुकुर माधव भोज अंध । साधुवादें गौरविती ॥११॥
तैसाचि श्रीकृष्ण म्हणे भला । उद्धवा जो त्वां मंत्र कथिला । अभिमत आम्हां समस्तांला । आणि धर्ममखाला अनुकूळ ॥१२॥
राजसूययज्ञ पावेल सिद्धी । शरणनृपांची रक्षणाविधी । मागध आमुचा मुख्य दंदी । भेमें त्रिशुद्धी निवटिलिया ॥१३॥
ऐसा यदुवृद्धीं गौरविला । कृष्णें साधुवादें पूजिला । चकाराव्ययें सम्मानिला । अनिरुद्धादि अवर वीरीं ॥१४॥
सर्वीं ऐकूनि मंत्ररहस्य । हृदयीं मानिला परम तोष । परमोल्लासें द्वारकाधीश । आज्ञा नृपास मागतसे ॥११५॥
अथाऽदिशत्प्रयाणाय भगवान्देवकीसुत । भ्रृत्यान्दारुकजैत्रादीननुज्ञाप्य गुरून्विभुः ॥१२॥
आहुकराजा उग्रसेन । तया सम्मुख रुक्मिणीरमण । आज्ञा प्रार्थी कर जोडून । यज्ञार्थ प्रयाण करावया ॥१६॥
गुरु म्हणिजे वडील वृद्ध । देवकवसुदेवादि प्रबुद्ध । त्यांसि आज्ञा मागूनि सिद्ध । करवी सन्नद्ध चित्रचमू ॥१७॥
उद्धवमंत्र ऐकिल्यावरी । गुरुवरांची आज्ञा हरी । घेऊनि भृत्यांतें पाचारी । दारुकजैत्रप्रमुखांतें ॥१८॥
प्रयानसंकेतसूचक भृत्य । त्यांसि स्वमुखें प्रयाणकृत्य । सांगतां सैनिकांप्रति तें त्वरित । कथिती वृत्तांत दीर्घरवें ॥१९॥
प्रभु समर्थ जो दैत्यारी । इंद्रप्रस्था करितो स्वारी । पुत्र कलत्र सहपरिवारीं । सिद्ध दळभारीं होइजे ॥१२०॥
गज रथ तुरंग आणि पदाती । चमू चतुरंगिणी चंड निगुती । सन्नद्ध करा हे आज्ञा दूतीं । सैनिकांप्रति जाणविता ॥२१॥
सवेग ठोकिल्या प्रस्थानभेरी । गुढारें बाणलीं रथकुंजरीं । अश्व पल्याणिले वीरीं । पदाति शरीरीं वेंठले ॥२२॥
ऐकोनि प्रयाणभेरीगजर । सन्नद्ध करूनियां दळभार । सैनिकीं येऊनि यादवेश्वर । नमूनि एकाग्र तिष्ठती ॥२३॥
सन्नद्ध देखूनि प्रबळ चमु । भग आज्ञापी पुरुषोत्तमु । समस्त बंधूंचा पूर्णकामु । करावयार्थ सवें न ॥२४॥
निर्गमय्यावरोधान्स्वान्ससुतान्सपरिच्छदान् । संकर्षणमनुज्ञाप्य यदुराजं च शत्रुहन् ।
सूतोपनीतं स्वरथमारुहद् गरुडध्वजम् ॥१३॥
सात्यकिनामा सिंहकपवर । त्यासि आज्ञापी जगदीश्वर । पुढें चालों द्या अंतःपुर । सोपस्कर सन्नद्ध ॥१२५॥
षोडश सहस्र अवरोधजन । दासी दास किङ्करगण । कुमरी हरिसंतान । परिवारून निघाले ॥२६॥
प्रयाण करवूनि स्वान्तःपुरा । आज्ञा मागोनि रेवतीवरा । पुसोनि उग्रसेना नृपवरा । निघे सत्वर तेथूनि ॥२७॥
शत्रुचक्रातें संहर्त्ता । यदुचक्राचा प्रतिपालिता । त्या उग्रसेनाची आज्ञा माथां । वंदूनि निघतां हरि झाला ॥२८॥
शत्रुमथना परीक्षिति । राम द्वारकारक्षणाप्रति । संस्थापूनि रुक्मिणीपति । निघता झाला सेनेसीं ॥२९॥
सभामंडपाबाहेर हरी । येतां दारुक विनति करी । स्वामी बैसावें रहंवरीं । रथ शस्त्रास्त्रीं सिद्ध असे ॥१३०॥
गरुडध्वजा लखलखित । तुरंगचौकीं जुंपिला रथ । दारुकें समीप आणितां त्वरित । स्वरथीं भगवंत आरूढला ॥३१॥
धरूनि सारथियाचा हस्त । रथीं वळघला कमलाकान्त । जेथें सेनेचा चतुष्पथ । पातला तेथ जगज्जेता ॥३२॥
ऐकोनि रथनेमीचा गजर । सवेग वरिष्ठ सेनाधर । भंवतेमिनले अतिसत्वर । तोही प्रकार अवधार ॥३३॥
ततो रथद्विपभटसादिनायकैः करालया परिवृत आत्मसेनया ।
मृदंगभेर्यानकशंखगोमुखैः प्रघोषघोषित्ककुभो निराक्रमत् ॥१४॥
भंवते वरिष्ठ महारथी । अनेक विचित्र ध्वज शोभती । कित्तेक गजयानीं मिरविती । सन्निद्ध बद्ध शस्त्रास्त्रीं ॥३४॥
गगनगामी अश्वरत्नें । रत्नखचितें वरी पल्याणें । स्वार झाले राउत राणे । सायुधत्राणें मंडित जे ॥१३५॥
पदातिवीर महासुभट । शस्त्रास्त्रबद्ध अभ्यासनिष्ठ । एवं चतुरंगिणी उद्भट । चाले वैकुंठ वेष्टूनी ॥३६॥
चतुरंगिणीचे यथूपति । वीरनायक जे जे होती । तिहीं वेष्टूनियां श्रीपती । भवंती चालतीं चक्रवत् ॥३७॥
ऐसे सैनिक यथाविभागें । दक्षिणोत्तर पुढें मागें । नेमिले जैसे जे श्रीरंगें । ते तद्विभागें चालती ॥३८॥
कराळ म्हणिजे भयंकर । प्रचंड सेनेचा महापूर । वेष्टित निघाला यदुवीर । अपर भास्कर भूनभींचा ॥३९॥
घटिकायंत्रें मुहूर्तवेळा । सूचितां वाद्यांचा गजर झाला । पणव भेरी मृदंग काहळा । शंख गोमुख पटहादि ॥१४०॥
हस्तर्क्षींचीं मेघगर्जनें । कीं हिमगिरि दणाणी गंगापतनें । तेंवि गंभीर दुंदुभिस्वनें । काष्ठामंडळ प्रघोषित ॥४१॥
ऐस्या प्रचंड वाद्यगजरीं । मुहूर्तवेळेच्या अवसरीं । द्वारके बाहीर कैटभारी । निघता झाला शुभ शकुनें ॥४२॥
गंधाक्षता कुसुमहार । मंगळमंडित विप्रभार । पुढें देखूनि नमस्कार । करिता झाला यदुवर्य ॥४३॥
आशीर्वादांचिया श्रेणी । प्रयाणोचित सूक्तपठनीं । मंत्राक्षता वर्षतां मूर्ध्नीं । धरानिर्ज्जर जयघोषें ॥४४॥
पूर्ण कनककलश माथां । चेटिकाश्रेणी सम्मुख येतां । सव्य घालूनि मन्मथजनिता । इंद्रप्रस्था चालियला ॥१४५॥
सुपुत्र वनिता पुत्र कडे । प्रयाणी येतां देखूनि पुधें । शुभशकुनार्थ तियेतें कोडें । सव्य घालूनि चालती ॥४६॥
कुसुमेंसहित माल्यकार । अर्पिती सुमनांचे संभार । पुश्पावतंस सुमनहार । जयजय करोनि निवेदिती ॥४७॥
कावडीमाजि गोरसभरणी । पुधें भेटल्या बल्लवश्रेणी । माथां दधिदुग्धें घेऊनि । आल्या गौळणी सम्मुख ॥४८॥
सवत्स धेनु दक्षिणभागीं । चास नकुळ शिखी वामांगीं । इत्यादि शुभशकुनप्रसंगीं । निघे शार्ङ्गी शक्रप्रथा ॥४९॥
द्वारकेबाहीर जनार्दन । सेनामंडित निघतां पूर्ण । तंव तो अंतःपुर घेऊन । झाला युयुधान अनुयायी ॥१५०॥
अष्ट पट्टमहिषी प्रवर । अवर सशत षोडश सहस्र । एवं अंतःपुर समग्र । कुमरीं कुमरां समवेत ॥५१॥
पूर्वीं कृष्णाज्ञेप्रमाणें । पुढें अंतःपुर युयुधानें । नेलें होतें तें या क्षणें । केलें तेणें अनुयायी ॥५२॥
श्लोकद्वयें तें निरूपण । परीक्षितीतें शुक भगवान । कथिता झाला तें व्याख्यान । सावधान अवधारा ॥५३॥
नृवाजिकाञ्चनशिबिकाभिरच्युतं सहात्मजाः पतिमनु सुव्रता ययुः ।
वरांबराभरणविलेपनस्रजः सुसंवृता नृभिरसिचर्मपाणिभिः ॥१५॥
यानरूढ हरिकामिनी । कित्तेक मिरवती सुखासनीं । कित्तेक वरिष्ठा अश्वयानीं । काञ्चनशिबिकारूढ एकी ॥५४॥
आत्मजांसहित यानारूढा । सपूर सूक्ष्म वसनीं गूढा । पतिव्रता नियमदृढा । परम सुघडा हरिरमणी ॥१५५॥
इत्यादि मंदित नाना यानीं । अच्युतातें अनुलक्षूनी । पट्टमहिषी अनुगामिनी । तदनु श्रेणी अवरांच्या ॥५६॥
वसनाभरणीं सालंकृता । मलयजकर्दम कुकुंमीं लिप्ता । पार्यातसुमनें ग्रथिलीं माथां । कंठीं हार विराजती ॥५७॥
कृष्णरथाच्या पश्चाद्भागें । वनितायानें चालती वेगें । भंवते पुरुष खेटकें खङ्गें । धरूनि निजाङ्गें खोलती ॥५८॥
वनितायानांभंवते नर । चालती खङ्गखेटकधर । वसनाभरणीं सालंकार । सुमनहार अवतंसीं ॥५९॥
मस्तकीं सुरंग शिरोवेष्टनें । जानूपर्यंत अंगत्राणें । चरणकंचुकादि परिधानें । पादत्राणें दृढ चरणीं ॥१६०॥
इत्यादि किंकरनराची घरटी । यानें चालती घडघडाटी । अपरा विविध यानीं चेटी । शुक वाक्पुटीं वाखाणी ॥६१॥
N/A
References : N/A
Last Updated : May 29, 2017
TOP