अध्याय ७१ वा - श्लोक १६ ते २०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


नरोष्ट्रगोमहिषखराश्वतर्यनः करेणुभिः परिजनवारयोषितः ।
स्वलंकृताः कटकुटिकंबलांबराद्युपस्करा ययुरधियुज्य सर्वतः ॥१६॥

दासि किंकरी वारांगना । दिव्यनटिनी स्वर्गभूषणा । आरूढोनियां विविध याना । कृष्णाङ्गनानुगा ज्या ॥६२॥
विविध यानांची ऐका रीती । एक नरयानीं शोभती । क्रमेळपृष्ठीं विराजती । एक वळघती बलीवर्दीं ॥६३॥
महिशारूढा कित्येक दासी । शोभती खरयानें एकीसी । अश्वापासोनि खरींच्या कुसीं । जन्मल्या त्या अश्वतरी ॥६४॥
कित्येक वाहिल्या तयांच्या पृष्ठीं । अपरा राजती हस्तिनीपाठीं । एक किंकरी बैसल्या शकटीं । धडधडाटीं पथ क्रमिती ॥१६५॥
सालंकृता वसनाभरणीं । उशीरमूळिकादी विविध तृणीं । कठ निर्मिले तिंहींकरूनी । विविधा यानीं गुढारिल्या ॥६६॥
आंत बैसल्या बाहिर दिसे । बाह्य जनांतें अंतस्थ न दिसे । कटकुटिकादि आवरणविशेषें । गुप्ता संवृता निजयानीं ॥६७॥
कित्तेक कंबळजा तिपट । अंतर्धानीं योजिले स्पष्ट । कित्तेक सूक्ष्म वसनें धुवट । योजिल्या निघोंट जवनिका ॥६८॥
सुरंगें विस्तीर्ण चित्रासनें । वसनाप्रकार बृहद्वितानें । विशाळ शिबिरें विविध वर्णे । शकटीं उष्ट्रीं गजपृष्ठी ॥६९॥
कनकरत्नरजतपात्रें । ग्रंथितें नरनारींचीं वस्त्रें । सुगंध द्रव्यें चित्रविचित्रें । वोझीं अपरें चालविती ॥१७०॥
प्राकारभित्ति जैशा सदनीं । तैशा वसनकंबळात्मका यानीं । कुंड्यात्मकीं शिबिरावरणीं । शकटीं वाहूनि चालवती ॥७१॥
बळिष्ठ बळीवर्द जुंथिले शकटीं । सन्नद्ध बद्ध सज्जिले करटी । रथगजाश्वां झोडिती साठीं । चालती थाटीं अनुयायी ॥७२॥
ऐसे कृष्णाचे अवरोध । कृष्णानुलक्षें सन्नद्भ बद्ध । विचित्रयानीं कथिले विविध । सेना साद्यंत अवधारा ॥७३॥

बलं बृहद्ध्वजपटछत्रचामरैर्वरायुधाभरणकिरीटवर्मभिः ।
दिवांशुभिस्तुमुलरवं बभौ रवेर्यथाऽर्णवः क्षुभिततिमिंगिलोर्मिभिः ॥१७॥

प्राक् प्रत्यक् दक्षिणोत्तर । बृहत्सेनांचा विस्तार । रचूनि चालिला वीरभार । गमे सागर संक्षुब्ध ॥७४॥
कनकदंडी पताकाछत्रें । मेघडंबरें आतपत्रें । रत्नजडितें कार्तस्वरें । कलशशिखरें लखलखिती ॥१७५॥
गजादि वरयानीं यूथप । मुख्य जे जे सामंतभूप । चामरें तळपती या समीप । रत्नकल्प प्रकाशती ॥७६॥
उत्तमोत्तमें शस्त्रें विविधें । ज्यांतें बोलुजे वरायुधें । सूर्यकिरणांच्या संबंधें । तेजें समुदें भारती ॥७७॥
खङ्गमुष्टी रत्नखचिता । चर्मपृष्ठीं चन्द्रान्विता । भल्लफलकावली निशिता । तीक्ष्णीकृता कर्म्मारी ॥७८॥
अश्वगजरथादि आभरणें । तीं लोपिती रविकिरणें । वीरा अंगींचें विविध लेणें । दिव्यभूषणें लखलखती ॥७९॥
कुंडलें कटकें करमुद्रिका । विचित्र बाहुभूषणें देखा । मुक्ताफळादि अनेका । कंठमाळिका रत्नमया ॥१८०॥
कटिप्रदेशी शस्त्रधारणें । चर्मनिर्मित कटिवेष्टणें । रत्नखचितें दिव्यसुवर्णें । बद्ध कृपाणयमदंष्टा ॥८१॥
वज्रकिरीट लखलखिती । वर्मे कनकोदकीं झळकती । एवमादिकीं प्रतिबिंबती । प्रचंड किरण तरणीचे ॥८२॥
त्यांमाजी दुंदुभीचे घनरव । विविध वाद्यें वाजती सर्व । तेणें तुंबळ चमूगौरव । क्षुब्धार्णवसम शोभे ॥८३॥
तिमिंगिलादि यादोगणीं । क्षुब्ध तळपतां झळकती किरणीं । पाच वजेंद्र रत्नमणी । सलील चलनीं लखलखिती ॥८४॥
तिमिंगळादि महाविशाळ । उल्लाळ्घेती जळचरमेळ । तेणें चंडोर्मिकल्लोळ । गमती केवळ दळश्रेणी ॥१८५॥
ऊर्मींमागें धांवती ऊर्मी । जवीन सेना तैसी भूमी । सिंधुगर्जनान्यायें व्योमीं । कुंजरभेरी दणाणिती ॥८६॥
एवं संक्षुब्ध सलिलराशी । बृहत्सेना भासे तैसी । यानंतर तो नारदासी । कृष्ण विसर्जी तें ऐका ॥८७॥

अथो मुनिर्यदुपतिना सभाजितः प्रणम्य तं हृदि विदधद्विहायसा ।
निशम्य तद्व्यवसितमाहृतार्हणो मुकुंदसंदर्शननिर्वृतेंद्रियः ॥१८॥

यदुपती जो कां श्रीभगवान । तेणें नारद सभामान्य । अत्यादरें नमस्कारून । अंगीकारून तत्प्रणीत ॥८८॥
निघता झाला इंद्रप्रस्था । उद्योग देखूनि मुनीच्या चित्ता । सर्वेन्द्रियीं आल्हादसरिता । हरिदर्शनें तुंबळली ॥८९॥
नारदें घेऊनि हरिकृत पूजा । ऐकूनि व्यवसित मंत्रबीजा । हृदयीं चिंतूनि गरुडध्वजा । जाता झाला नभःपथें ॥१९०॥
ऐसा विसर्जून नारद । राजदूतातें गोविन्द । आश्वासिता झाला विशद । तो अनुवाद अवधारा ॥९१॥

राजदूतमुवाचेदं भगवान्प्रीणयन्गिरी । मां भैष्ट दूत भद्रं वो घातयिष्यामि मागधम् ॥१९॥

अमृतापरिस मधुरोत्तरीं । राजदूतातें श्रीहरी । अश्वासोनि नाभीकारीं । म्हणे अवधारीं प्रतिवचन ॥९२॥
जाय नृपांतें कथीं मात । मागधाचा मी करीन घात । तुम्हां कल्याण इत्थंभूत । झालों विमुक्त हें माना ॥९३॥
भेऊं नका येथूनि आतां । मागध मारूनि तुम्हां समस्तां । मुक्त करीन ऐसी वार्ता । कथी दुःखिता नृपवर्गा ॥९४॥
ऐसें बोलिला जगदीश्वर । ऐकूनि दूतासि आल्हाद थोर । म्हणे साधला शुभावसर । केला निर्धार हृत्कमळीं ॥१९५॥

इत्युक्तः प्रस्थितो दूतो यथावदवदन्नृपान् । तेऽपि संदर्शनं शौरेः प्रत्यैक्षन्यन्मुमुक्षवः ॥२०॥

ऐसा बोलिला असतां दूत । आज्ञा घेऊनि निघाला त्वरित । सर्व नृपांतें यथावृत्त । कथिलावृत्तान्त अभयाचा ॥९६॥
दूतमुखें ते अभयवाणी । ऐकोनि भूभुज हरिदर्शनीं । सप्रेम उत्सुक अंतःकरणं । निजमोक्षणीं मुमुक्षु जे ॥९७॥
प्रतीक्षा करिती त्या समयाची । मुक्तता होईल कैं आमुची । शांति करुनि मागधाची । आम्हां सुखाची हरिप्राप्ति ॥९८॥
दूतवचनें उत्साहभरित । नृपति झाले ते समस्त । त्यावरी सेनेसीं श्रीकांत । लंघी पथ तें ऐका ॥९९॥

N/A

References : N/A
Last Updated : May 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP