श्रीशुक उवाच - स उपस्पृश्य सलिलं दंशितो धृतर्मुकाकः । नय मां द्युमतः पार्श्व वीरस्येत्याह सारथिम् ॥१॥

तो प्रतापी वीर मदन । उठिला मूर्च्छा निवारून । कनककलशींचें जल घेऊन । नेत्रानन परिमार्जिलें ॥८॥
गदाप्रहारें केलें विकळ । म्हणोनि अंजळी घेऊनि जल । भरूनि टाकिले द्वादश चूळ । सिद्ध ताम्बूल स्वीकेला ॥९॥
सोडिल्या होत्या सन्नाहग्रंथी । वज्रकवच तें पुढती । अधिज्य कार्मुक घेऊनि हातीं । बैसला रथीं सन्नद्ध ॥१०॥
मग आज्ञपी सारथियाला । द्युमंतपार्श्वीं नेयें मजला । तेणें समरीं प्रताप केला । तो फेडिला जाईल ॥११॥
सारथियानें ऐकूनि वचन । रथ लोटिला जैसा पवन । चार्‍ही अश्व परम जवीन । स्वपरसैन्यें अतिक्रमिलीं ॥१२॥

विधमन्तं स्वसैन्यानि द्युमन्तं रुक्मिणीसुतः । प्रतिहत्य प्रत्यविध्यन्नाराचैरष्टभिः स्मयन् ॥२॥

जैसा अग्नियंत्रींचा गोळ । अगनगर्भीं संचरे चपळ । तैसा रहंवर सुतेजाळ । भासे केवळ रवितुल्य ॥१३॥
रहंवराची प्रचंडगती । लोटा सरिसीं सैन्यें पडती । महावीरांतें जाकळी भ्रान्ती । चवंकोनि पाहती ते भंवते ॥१४॥
ऐसिया तवकें रुक्मिणीसुत । जाऊनि द्युमंता पाचारित । म्हणे तूं शाल्वाचा अमात्य । केला पुरुषार्थ समरंगीं ॥१५॥
आतां तैसाचि सज्ज होयीं । पुढतीं संघटें उशिणा धायीं । ऐसें म्हणोनि विन्धिला पाहीं । कार्मुक बाहीं ओढूनी ॥१६॥
स्मरूनि पूर्वील गदाप्रहार । म्हणे द्युमंता होयीं सधर । कृतान्तदूता समान शर । आले क्रूर अवलोकीं ॥१७॥
कठोर कार्मुक आकर्ण ओढी । काढूनि अष्ट मार्गण सोडी । हरिपद चिन्तूनि स्वशौर्यप्रौढी । दावी रोकडी ते ऐका ॥१८॥

चतुर्भिश्चतुरो वाहान्सूतमेकेन चाहनत् । द्वाभ्यां धनुश्च केतुं च शरेणान्येन वै शिरः ॥३॥

प्रळयरुद्राचा तृतीय नयन । तैशा सायकीं इषुधि पूर्ण । त्यांतील घेऊनि अष्ट मार्गण । द्युमंत लक्षून मोकलिले ॥१९॥
चार्‍ही अश्व चौं मार्गणीं । एकें सारथि पाडिला रणीं । केतु कोदंड दोहीं बाणीं । एकें छेदूनि शिर नेलें ॥२०॥
द्युमंत मारूनियां मदनें । सिंहनाद केला वदनें । ऐकूनि यादववीरराणे । भंगिती सैन्यें शाल्वाचीं ॥२१॥

गदस्यात्यकिसाम्बाद्या जघ्नुः सौभपतेर्बलम् । पेतुः समुद्रे सौभेयाः सर्वे संछिन्नकन्धराः ॥४॥

गदसात्यकिसाम्बादिक । यादववीर अक्रूरप्रमुख । प्रतापें सौभपतीचें कटक । मारिती निःशंक ते वेळीं ॥२२॥
जिकडे जिकडे सौभ पळे । तिकडे यादव मारिती बळें । रिचवती समुद्रीं कोथळे । तुटती मौळें शरघातें ॥२३॥
मस्तकें तुटोनि गगना जाती । कबंधें समुद्रीं रिचवती । शिरःकमळांची वृष्टि वरती । होय पुढती महार्णवीं ॥२४॥
शंकरवराचा होता गर्व । तो शाल्वाचा भंगला सर्व । कैसें विपरीत म्हणे अपूर्व । कां पां शर्व मज न पवे ॥२५॥
सौभाश्रयें प्रबळ कटकें । सुरनरखेचरां होती अटकें । तीं भंगिलीं न भरतां घटिके । केलें लटिकें शिववरा ॥२६॥

एवं यदूनां शाल्वानां निघ्नतामितरेतरम् । युद्धं त्रिनवरात्रं तदभूतुमुलमुल्बणम् ॥५॥

ऐसें शाल्वां यादवां रणीं । परस्परें झोंटधरणी । युद्ध झालें भो कुरुमणी । सप्तविंशतिदिनरात्रें ॥२७॥
ऐसें युद्ध महाकर्कश । अहोरात्रें सत्तावीस । तुमुल होतां द्वारकाधीश । आला नगरास अवचितां ॥२८॥
सत्तावीस दिवस वरी । कोठें गुंतला होता हरी । ऐसें राया पुससी जरी । तरी अवधारीं ते गोष्टी ॥२९॥

N/A

References : N/A
Last Updated : June 02, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP