क्व शोकमोहौ स्नेहो वा भयं वा येऽज्ञसम्भवाः । क्व चाखण्डितविज्ञानैश्वर्यस्त्वखण्डितः ॥३१॥

कोणीकदे शोक मोह । भय अथवा स्वकीय स्नेह । कोठें संभवे हा समूह । अज्ञान जीवां वांचूनी ॥१६५॥
अज्ञान जीवांच्या ठायीं यांचा । घडे संभव शोकादिकांचा । अखंडितैश्वर्य जो साचा । तेथ कैंचा संभव या ॥६६॥
असंभावनीय संभावना । करितां विरोध ये स्ववचना । पूर्वापर या अनुसंधाना । न विचारूनियां वाकाणिती ॥६७॥
जो कां अखंडैकचिद्रसमय । ज्ञानविज्ञानपूर्णैश्वर्य । तो हा स्वतःसिद्ध यदुवर्य । कीं शोकादिभय संभवे त्या ॥६८॥
अबाधित कालत्रयाचें ज्ञान । त्या केंवि दुर्निमित्तदर्शन । बहुतेक मम पुरीचें हनन । करिती म्हणोन सचिन्त तो ॥६९॥
दुर्निमित्तदर्शनें तर्क करी । जे दुर्जन भंगिती माझी पुरी । ऐसा संशय ज्या अंतरीं । तरी सर्वज्ञ हरी मग कैसा ॥१७०॥
आणि सौभस्थ शाल्वें रनचत्वरीं । सव्य बाहु कठोर प्रवाहीं । ताडूनि शार्ङ्ग पादिलें समरीं । हे भयाची लहरी अद्वैता ॥७१॥
शोकमोहभयादिकें । जीवा संभवती हीं अशेखें । ज्ञानविज्ञानसंपन्ना कें । यांचा संभव घदेल ॥७२॥
विज्ञान म्हणिजे स्वरूपनिष्ठा । ज्ञान म्हणिजे स्वविवेकचेष्टा । प्रपंचप्रवृत्ति विधिनिर्द्दिष्टा । जो उभयद्रष्टा पूर्णत्वें ॥७३॥
इत्याद्यनंतगुणपरिपूर्णा । शोकमोहादिसंभावना । जे संभवे जीवा अज्ञाना । ते सर्वज्ञा कें वदिजे ॥७४॥
सर्वज्ञता ज्या प्रतिपादिली । तेथ हे संभावना जैं केली । तैं ते आपुली वक्तृता जाली । विरोधरूपा आपणया ॥१७५॥
इत्यादि अन्वयें अनन्वित । कोण्ही ऋषि लाविती ग्रंथ । तो हा शंकेचा वृत्तान्त । सूचिला समस्त तुज राया ॥७६॥
स्पर्शें लोहाची कालिमा । तुटोनि लाहे हैम गरिमा । तो स्पर्शचि लोहधामा । पावतां महिमा कां वदिजे ॥७७॥
जे लक्ष्मीचे कृपादृष्टी । सुसंपन्न सुरासुर परमेष्ठी । ते जैं झोळिये देऊनि गांठीं । भिक्षेसाठीं भ्रमण करी ॥७८॥
तैं तें लक्ष्मीचें सामर्थ्य । बोलिलें तितुकें होय व्यर्थ । ऐसा अर्थाचा अनर्थ । विरोधार्थ न जाणतां ॥७९॥
कैसा विरोध तोही राया । या दृष्टान्तें योजूनियां । ऐकें सावध होऊनियां । महिमा अद्वय कृष्णाचा ॥१८०॥

यत्पादसेवोर्जितयात्मविद्यया हिन्वन्त्यनाद्यात्मविपर्ययग्रहम् ।
लभन्त आत्मीयमनन्तमैश्वरं कुतो नु मोहः परमस्य सद्गतैः ॥३२॥

ज्याचें सेवितां चरणकमळ । चित्त होय नितान्त अमळ । ऊर्ज्जित आत्मविद्या प्राञ्जळ । लाहती प्रेमळ पदभजनें ॥८१॥
ज्ये आत्मविद्ये अरून । अनाद्यविद्यानिरसन । करूनि आत्मत्व लाहती पूर्ण । साधक सज्जन सद्बोधें ॥८२॥
अनादि अविद्या म्हणाल कैसी । घेववी आत्मविपर्यसासी । सरतें करूनि मोहभ्रमासी । अध्यारोपासी प्रतिपादी ॥८३॥
म्हणसा कोण्हा सरते केलें । तरी चिन्मया जीवत्व आणिलें । मग तो बरले आपुल्या बोलें । तेंही कथिलें जातसे ॥८४॥
म्हणे मी सुकृती सुखसंपन्न । आजि दुष्कृती दुःखी पूर्ण । ह्रस्व दीर्घ अमांसळ पीन । देह आपण स्वयें मानी ॥१८५॥
मज जाकळिती क्षुधा तृषा । जालों पार मी यशा अपयशा । ऐसा अविद्याभ्रमाचा बळसा । चिदाभासा भ्रमवीतसे ॥८६॥
रज्जुवरी सर्पभ्रम । तैसा चिदंशा इन्द्रियग्राम । विपरीतबोधें आग्रह परम । घेऊनि श्रम अनुभविजे ॥८७॥
ऊर्जित श्रीपादसेवेच्या उर्जितीं । आत्मविद्या तो लाहे पूण । विपरीत अविद्येचें ग्रहण । तिणें खंडन करी त्याचें ॥८८॥
श्रीपदसेवेच्या उर्जितीं । आत्मविद्या लाहूनि पुरती । अविद्याग्रहण विपरीत मती । खंडूनि होती सत्स्वरूप ॥८९॥
ऐसे जयाच्या श्रीपदभजनें । जीव खंडिती अविद्यावरणें । वास्तव सन्मय प्रत्यय वयुनें । घडे समरसणें आनंदीं ॥१९०॥
मग त्या शोक मोह स्नेहभय । कोण्हीकडे हा प्रत्यय । ज्याच्या सेवनें जीवासि होय । आनंद अद्वय पूर्णत्व ॥९१॥
त्या या जगदात्मया कृष्णातें । शोकमोहादिकांचें भरतें । प्रतिपादणें हें वक्तृत्व रितें । जाण तूं निरुतें परीक्षिति ॥९२॥
कथाप्रसंगें प्रतिपादिलें । तें तूं सत्य मानिसी बोलें । तरी हें वाचारंभण केलें । श्रवणरोचनास्तव जाण ॥९३॥
जो संताची परम गति । अमृत कैवल्य ज्यातें म्हणती । तो हा केवल रुक्मिणीपति । मोहभ्रान्ति त्या कैची ॥९४॥
परीक्षिति म्हणे जी महंता । असत्य प्रमेय प्रतिपादितां । केचिदृषिमत ऐसें म्हणतां । गमे मम चित्ता आश्चर्य ॥१९५॥
ऋषि ऐसें ज्यांतें म्हणणें । तिहीं कें ऐसें प्रतिपादणें । ये शंकेचें उठवा ठाणें । अतीन्द्रियज्ञानें विवरूनियां ॥९६॥
हें ऐकूनि बोले शुक । प्राकृत दृश्य जें मायिक । तितुकें जाण दंभात्मक । करणरोचक नवरसमय ॥९७॥
या माजि एक वेदान्तशास्त्र । प्रकाशी वास्तव सच्चिन्मात्र । येर अवघें भवचरित्र । गुणकर्मतंत्र पूर्वपक्ष ॥९८॥
जे शास्त्रीं जो पतिपाद्य विषय । तें प्रतिपादक त्याचेंचि होय । वास्तव बोध या माजि काय । हे कें सोय ते ठायी ॥९९॥
सूपशास्त्रीं अमृतान्नें । हें कें वास्तवामृतनिर्वाण । ग्रासाधिक्यें वोपी मरण । तथापि शसन तच्छास्त्रीं ॥२००॥
पय दधि घृत मधु शर्करा । पंचामृतत्वें शंसी गिरा । या माजि दंभाचा उभारा । तो नृपवरा अवधारीं ॥१॥
परमामृत जें उत्तमोत्तम । त्या सापेक्ष रस कृत्रिम । लवण मिरबोंडें रामठाधम । लशुन कुष्माण्डवटकादि ॥२॥
कामशास्त्रीं प्रशंसन । श्रुत्युक्त उपस्थ आनंदायतन । केवळ निधिमिव हर्षनिधान । ऐसें प्रशंसन कवि करिती ॥३॥
कामोर्मीतें क्षोभ घडे । यूना आंगीं हव्यास चढे । ऐसें रहस्य वाडेंकोडें । प्रतिपादिती तच्छस्त्रीं ॥४॥
अज्ञातयौवना ज्ञतयौवना । मुग्धा प्रगल्भा प्रौढाङ्गना । कलहान्तरिता नाना । नायिकाचिन्हा प्रशंसिती ॥२०५॥
ष्ठीवना म्हणती अधरामृत । शशाङ्क वदनेंसीं उपमित । अस्थि चर्म रक्त मूत । विष्ठाभरित प्रशंसिती ॥६॥
एवं नवरसउभारणी । तितुकी बाह्य दंभाची भरणी । या माजि वास्तव लाहिजे कोण्हीं । शास्त्र म्हणोनी हुडकिलिया ॥७॥
याचि प्रकारें वैद्यशास्त्र । म्हणती मुख्य रक्षिजे गात्र । वदती भेषजोपाय विचित्र । स्वयें ते अमर काम नव्हती ॥८॥
एवं आयुर्वेद धनुर्वेद । ज्योतिष गान्धर्वादि हे उपवेद । प्रशंसिती प्रवृत्तिबोध । येथ वास्तव शुद्ध कैं उमजे ॥९॥
चौदा विद्या चौसष्टी कळा । रुचविती प्रपंचा टवाळा । एका वेदान्ता वेगळा । स्वबोधजिव्हाळा अनोळख त्यां ॥२१०॥
पूर्वमीमांसा कर्कश तर्क । भाट्ट प्राभ्राकर चार्वाक । न्यायवितंडा जल्प अनेक । प्रपंचरोचक प्राकृत हे ॥११॥
मूळीं असत्य प्रपंचभान । त्याचें जेथ प्रशंसन । तेथ कैचें वास्तवज्ञान । लाहती सज्जन मुमुक्षु ॥१२॥
ऐसीं प्रवृत्तिरोचकें शास्त्रें । जिहीं प्रकाशिलीं स्ववस्त्रें । तेही महर्षिच हें तूं श्रोत्रें । अवधारूनियां निर्द्धारीं ॥१३॥
ते तूं महर्षी कैसे म्हणसी । तरी अवधारें इये विशीं । अविद्याभ्रमग्रस्तां जीवांसी । तारावयासी हरि जन्मे ॥१४॥
तया हरीचें जन्मकर्म । गुणैश्वर्यरूपनाम । श्रवणें पठनें अविद्याभ्रम । तुटोनि विभम जन होती ॥२१५॥
पंचामृत जिव्हेसि न रुचे । रामठादि दुर्द्रव्यें तीं रुचे । तेंवि इत्यादि शास्त्रीं हरिगुणांचें । कथन जीवाचें मन मोही ॥१६॥
प्राकृतां तारावयाचि साठीं । कृपा उपजे ईश्वरा पोटीं । तैं तो नटूनि प्राकृतनटीं । करी रहाटी रोचक त्यां ॥१७॥
अवताररूपें जें आचरण । करी जो अनंगुणरूप परिपूर्ण । व्यासादिकें तें करूनि कथन । जगदुद्धरण आदरिलें ॥१८॥
तया हरिगुणांचिया कथना । इत्यादिशास्त्रप्ररोचना । करितां रुचती प्राकृतां जनां । मग ते श्रवणा अनुसरती ॥१९॥
हरिगुणश्रवणीं रतल्या मन । भंगूनि जाय अविद्यावरण । नित्यानित्य उमजे पूर्ण । मग होती शरण गुरुचरणा ॥२२०॥
नित्यानित्यविवेक करितां । समर्थापर्यंत अनित्यता । कळल्या नेच्छी इहामुत्रार्था । विरक्त पुरता तैं होय ॥२१॥
विरक्ति येतां अंतःकरणा । न भुले मायिका प्रपंचभाना । करी वास्तवगवेषणा । वेदान्तश्रवणा अनुसरूनी ॥२२॥
तस्मात् प्राकृतां जीवां साठीं । कृपा उपजे ईश्वरा पोटीं । त तो अवतार धरूनि सृष्टी । करी राहटी वेधक त्यां ॥२३॥
येर्‍हवीं नित्य तृप्ता आत्मरता । किमर्थ सोळा सहस्र वनिता । पुत्र भ्राता माता पिता । गृहधनममता कोण्हीकडे ॥२४॥
सुहृद आप्त मित्र स्वजन । शत्रु द्वेष्टे दुष्ट दुर्जन । अभेदबोधा कैंचे जाण । जगदुद्धरणास्तव अवगे ॥२२५॥
तस्मात त्याची अवतारलीला । वर्णितां सार्थक शाखां सकळां । येर्‍हवीं वेदान्ता वेगळा । वास्तव चिद्बोध घडेना ॥२६॥
वीररसाचें उद्दाम कथन । शत्रु जो कां हन्यमान । त्याचें शौर्य कथिजे गहन । तें यश पूर्ण हनकाचें ॥२७॥
म्हणोनि शाल्वाचा विक्रम । कथिला उत्कट पराक्रम । तितुका वरिरससंभ्रम । ऐसें निर्भ्रम तूं जाण ॥२८॥
येर्‍हवीं शोक मोह स्नेह भय । कृष्णा बाधूं शकेल काय । प्राकृत असत्यमय । सत्य सन्मय श्रीकृष्ण ॥२९॥
प्राकृत जीवांच्या उद्धरणा । प्राकृताचरणा सम हरिगुणां । वदतां केचिन्मयव्याख्याना । केलें प्राचीना ऋषींचिया ॥२३०॥
आतां वास्तव स्वमत ऐक । पूर्णेश्वर्य यदुनायक । जर्‍ही अवगला मनुष्यवेख । तर्‍ही निष्टंक अखिलात्मा ॥३१॥
सत्यशौर्यश्रीसंपन्न । सत्यसंकल्प श्रीभगवान । त्यासि शाल्व बापुडें गौण । केतुलें तृण प्रळयानळीं ॥३२॥
येथूनि सावध कुरुसत्तमा । कथितों यथार्थ हरिविक्रमा । कैसें वधिलें शाल्व अधमा । त्या संग्रामा अवधारीं ॥३३॥

तं शस्त्रपूगैः प्रहरन्तमोजसा शाल्वं शरैः शौरिरमोघविक्रमः ।
विद्ध्वाच्छिनच्चर्मधनुः शिरोमणि सौभं च शत्रोर्गदया रुरोज ह ॥३३॥

शाल्व मारावया उद्यत । जाला सक्रोध मन्मथतात । अधिज्य शार्ङ्ग वसवूनि हात । शरजीमूत वर्षतसे ॥३४॥
अग्निवातादि अनेकास्त्रें । प्रासपरिघादि विचित्र शस्त्रें । यांचे प्रहार करितां अमित्रें । कमलामित्रें न गणूनि ते ॥२३५॥
शार्ङ्गनिर्मुक्त अमोघ शर । अमोघविक्रम जो श्रेधर । तेणें विन्धूनि शाल्ववीर । केला निःशस्त्र समरंगीं ॥३६॥
अमोघविक्रम जो कां शौरे । तेणें विन्धूनि तीक्ष्णशरीं । धनुष्य छेदिलें शाल्वा करीं । मुकुट शराग्रीं भेदियला ॥३७॥
वज्रप्राय अंगत्राण । तें वर्म भेदिलें विन्धूनि बाण । केला समरंगीं वित्राण । केली उतरून वीरश्री ॥३८॥
शाल्वमस्तकींचा मुकुटमणी । वरिच्या वरी उडविला बाणीं । गदाप्रहारें चक्रपाणी । सौभ भंगूनि पाडियलें ॥३९॥
होलगडियानें पाडिती अंबा । तैसेंचि म्हणाल पाडिलें सौभा । ऐसें नव्हे तें पंकजनाभा । हस्तें भंगलें तें ऐका ॥२४०॥

तत्कृष्णहस्तेरितया विचोर्णितं पपात तोये गदया सहस्रधा ।
विस्रज्य तद्भूतलमास्थितो गदामुद्यम्य शाल्वोऽच्युतमभ्यागाद् द्रुतम् ॥३४॥

कृष्णहस्तींचा गदाप्रहार । लागतां सौभ जालें चूर । खंडविखंडें सहस्रें सहस्र । शकलें पडिलीं जलार्णवीं ॥४१॥
गदाप्रहारें करून तुकडे । सौभ समुद्रीं पडे न पडे । तंव तेथूनियां शाल्व उडे । हरिसीं भिडे तें ऐका ॥४२॥

अधावतः सगदं तस्य बाहुं भल्लेन च्छित्वाथ रथांगमद्भुतम् ।
वधाय शाल्वस्य लयार्कसन्निभं बिभ्रद्बभौ सार्क इवोदयाचलः ॥३५॥

N/A

References : N/A
Last Updated : June 02, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP