हाहाकारो महानासीद्भूतानां तत्र पश्यताम् । निनद्य सौभराडुच्चैरिदमाह जनार्दनम् ॥१६॥

कृष्णपक्षीप जितुके वीर । आणि भूतभौतिकांचा निकर । करिते जाले हाहाकार । सचाप हरिकर भेदिलिया ॥८०॥
म्हणती शाल्वाचा प्रताप गाढा । कृष्णहस्तींचा पडिला मेढा । याशीं कोण भिडेल होडा । केला पवाडा हरिसमरीं ॥८१॥
ऐसे सचिन्त हरिपक्षीय । शाल्वा मानूनि साधिला विजय । उच्चस्वरें गर्जना होय । बोले काय कृष्णातें ॥८२॥

यत्त्वया मूढ नः सख्युर्भ्रातुर्भार्या हृतेक्षताम् । प्रमत्तः स सभामध्ये त्वया व्यापादितः सखा ॥१७॥

म्हणे रे मूढा यदुनायका । शिशुपाळ जो कां आमुचा सखा । त्याची भार्या तां हरिली मूर्खा । कांहीं विवेका न करूनी ॥८३॥
हा तों अपराध तुझा पहिला । आम्हीं आजिवरी क्षमा केला । प्रस्तुत राजसूर्यार्थ आला । तेथ तां वधिला पापिष्ठें ॥८४॥
असावधान सभेच्या ठायीं । नीतिनिर्णय वदतां पाहीं । पाहत असतां नृप सर्वही । प्राणें तोही तां वधिला ॥८५॥
शिशुपाळ मित्र सखा भ्राता । जिवलग प्राणांहूनही परता । मारिला त्याच्या प्रतीकारार्था । आलों तत्त्वता मी जाण ॥८६॥
म्हणसी येऊनि काय तां करणें । ऐसें वदसी मूर्खपणें । तरी तें ऐकें कथितों वचनें । जाण हें आवंतणें काळाचें ॥८७॥

तंत्वाद्य निशितैर्बाणैह्रपराजितमानिनम् । नयाम्यपुनरावृत्तिं यदि तिष्ठेर्ममाग्रतः ॥१८॥

जिङ्कूं न शकती मजला कोण्ही । अपराजित मी त्रिभुवनीं । ऐसा गर्व वाहसी मनीं । त्याची झाडणी करीन मी ॥८८॥
आजि माझिया तिखटां बाणीं । ऐसिया तूतें समराङ्गणीं । भेदूनि धाडीन कृतान्तभुंवनीं । मग परतूनि न येसी तूं ॥८९॥
कार्मार शाननिशित शर । माझे अत्यंत तीक्ष्णतर । तिहीं खंडूनि तव शरीर । दावीन घर मृत्यूचें ॥९०॥
जरी तूं मम समरीं ठाकसी । तरी तुज मारीन निश्चयेंसीं । प्राणभयें तूं पळोनि जासी । तरी नगरासी भंगीन ॥९१॥
धरून नेईन तावकांप्रति । भोगवीन बहु विपत्ति । तैं मग तुझिया अश्रुपातीं । वोपीन तृप्ति शिशुपाळा ॥९२॥
ऐसी बहुधा अचागळी । सौभाश्रयें शाल्व बळी । बोलता जाला तिये काळीं । त्या वनमाळी काये वदे ॥९३॥

श्रीभगवानुवाच - वृथा त्वं कथ्यसे मंद न पश्यस्यंतिकेऽन्तकम् । पौरुषं दर्शयन्ति स्म शूरा न बहुभाषिणः ॥१५॥

कृष्ण म्हणे रे शाल्वा मूर्खा । दावितां न लजसी पुढती मुखा । भीमकीसयंवरींच्या लोका । असे ठाउका तव महिमा ॥९४॥
पिशाच मूर्ख द्रव्योन्मत्त । किंवा जालिया सन्निपात । त्याचें बोलणें अवघें व्यर्थ । सर्वज्ञ पंडित नादरिती ॥९५॥
मृत्यु न पाहसी पातला जवळी । म्हणोनि तोंडा सुटली बरळी । सन्निपाताची अचागळी । ज्ञाते आगळी न मानिती ॥९६॥
अंतक समीप हें नेणसी । यास्तव विकत्थन हें करिसी । मंदा प्रताप आंगीं वाहसी । तरी समरासी दृढ होयीं ॥९७॥
शूर प्रताप वाहती आंगीं । पुरुषार्थ दाविती ते समरंगीं । न करिती बडबड हे वाउगी । जे तुज जोगी विकत्थना ॥९८॥

इत्युक्त्वा भगवान्शाल्वं गदया भीमवेगया । तताड जत्रौ संरब्धः स चकंपे वमन्नसृक् ॥२०॥

ऐसें बोलूनियां श्रीपती । गदा घेऊनि दक्षिणहस्तीं । शाल्व ताडिला सक्रोधवृत्ती । जत्रुप्रांन्तीं दृढप्रहारें ॥९९॥
बाहुकंठांचा अग्रसंधी । तया अवयवा यत्रुशब्दीं । अवयववेत्ते विशालबुद्धी । वदती निबंधीं ग्रंथान्तरीं ॥१००॥
महाराष्ट्र म्हणती सुताटीहाट । त्यावरी गदेचा प्रहार दृढ । बैसतां झाले खंड विखंड । मग विचकिलें तोंड शाल्ववीरें ॥१॥
सकंप जालें शरीर । मुखें भडभडां वमी रुधिर । म्हणे मज कोपला ईश्वर । यास्तव दुस्तर ओढवलें ॥२॥
कृष्णें वोपूनि गदाप्रहार । चूर्ण केलें शाल्वजत्र । तेणें विकळ पडिलें गात्र । विचकिलें वक्त्र अतिदुःखें ॥३॥
पडिली डोळां झांपडी । राहों राहों कर पद खोडी । शरीरीं मूर्च्छना दाटली गाढी । भडभडां तोंडीं रुधिर वमी ॥४॥
एवं घटिकाचतुष्टय । शाल्वें भोगिला मूर्च्छाप्रळय । सावध होतां स्मरूनि मय । केलें काय तें ऐका ॥१०५॥

N/A

References : N/A
Last Updated : June 02, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP