पंचीकरणादी अभंग - ३१ ते ३५
समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.
३१
जडत्व कठिण ते ते पृथ्वी जाण । मृदु ओलेपण असे आप ॥१॥
आप नाना रस धातु नानारस । उष्णता तैजस तेंचि तेज ॥२॥
वायु स्तब्ध चळ आकाश निश्चळ । माईक सकळ दास म्हणे ॥३॥
३२
पृथ्वी आणि तेज वायु आणि आकाश । पांचांचे हे ऐसे पंचवीस ॥१॥
अस्थि मांस त्वचा नाडी आणि रोम । पाचांचें हें वर्म सागईन ॥२॥
शुक्लित शेणित लाळ आणि मूत्र । स्वदेहीं निश्चित पंचतत्त्वें ॥३॥
क्षुधा तृषा जाण आळस शयन । पांचवें मैथुन तेताचेंचि ॥४॥
चळण वळण आणि प्रसरण वायुनिरोधन आकुंचन ॥५॥
काम क्रोध शोक मोह आणि भये । स्थूळदेहाचिये पंचवीस ॥६॥
पंचवीस तत्त्वीं स्थूळदेह वर्तत । ऐकें सावचित्त लिंगदेह ॥७॥
अंतःकरण मन बुद्धि आणि चित्त । पांचवा निश्चित अहंकार ॥८॥
प्राण आणि अपान व्यान आणि उदान । समानही जाण पांच वायु ॥९॥
चक्षु श्रोत्र जिव्हा आणि घ्राण त्वचा । अंश हा तेजाचा ज्ञानेंद्रियें ॥१०॥
वाचा आणि पाद शिश्न आणि गुद । पांच ही प्रसिद्ध कर्मेंद्रियें ॥११॥
शब्द स्पर्श रूप रस आणि गंध । पांचहि प्रसिद्ध विषय हे ॥१२॥
ऐसे पंचवीस लिंगदेहीं असे । ऐसी पंचवीसें तत्वें जालीं ॥१३॥
३३
काम क्रोध शोक मोह आणि भय पंचधा अन्वय आकाशाचा ॥१॥
धावण चळण आणि आकुंचन । वायुप्रसरण निरोधन ॥२॥
चक्षु श्रोत्र जिव्हा मैथुन आळस तेजाचे हे अंश पंचविध ॥३॥
लाळ मूत्र शुक्र रक्त आणि मज्जा । आप जाण वोजा पंचविध ॥४॥
अस्थि त्वचा मांस नाडी रोम अंश । दास म्हणे वास देहातीत ॥५॥
३४
अंतःकरण मन बुद्धि आणि चित्त । पुढें सावचित्त अहंकार ॥१॥
व्यान तो समान उदान तो प्राण । पांचवा अपान वायु जाण ॥२॥
श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा आणि घ्राण । तेजाचेहि गुण पंचविधा ॥३॥
वाचा आणि पाद शिश्न आणि गुद । आपाचे प्रसिद्ध पांच गुण ॥४॥
शब्द स्पर्श रूप रस आणि गंध । पृथ्वीचे हे विशद दास म्हणे ॥५॥
३५
विष्णु चंद्र ब्रह्मा नारायण रूद्र । आकाशाचे थोर अंश पाहें ॥१॥
ब्रह्मांडीं व्याप लोकांक वरूण । रूद्र वायू जाण चाळक तो ॥२॥
दिशा वायु रवि वरूणाचा हेत । अश्विनी दैवत तेजअंश ॥३॥
वन्हि इंद्र तिजा जाणावा उपेंद्र । ब्रह्मा आणि सार नैरृती तो ॥४॥
शब्द स्पर्श रूप रस आणि गंध । तन्मात्रा विशद दास म्हणे ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 05, 2017
TOP