सुभद्राचंपू - सर्ग पहिला

निरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे.


श्रीसुंदरकृष्णायनम: । श्रीगणेशगुरुशारदाभ्यां नम: ॥
वागोरे वामहस्तें धरुनि हय बरे पांडवस्यंदनाचे
चार्‍हीं जो नाचवितो चतुर जिणति जे वेग वातामनाचे ।
दक्षें तोत्रांगिकारी नवजलदतनू पीतकौशेयधारी
साजे सारथ्यकर्मी नमिन पदयुगीं सादरें श्रीमुरारी ॥१॥
ज्याची कथा सबळपातकशैल खाणी । उत्पन्न हे करि जनांप्रति पुण्य़खाणी ।
जो भक्तसाह्य करि केवळ पक्षपाती । रक्षी विलोकुनि सुधासम पक्षपातीं ॥२॥
तद्भक्तपुण्यचरितें हरिती अघातें, जे कां पळांत परि उद्धरिती जगातें ।
तत्रापि पांडुसुतकीर्तन या कळीतें, उच्चारितां मुखपुटें तंव निर्दळीतें ॥३॥
गातां भूपति धर्मपुत्र सुजनीं तो धर्म वाढे सदां
ध्यातां नित्य वृकोदरा स्थिति नव्हे पापासि तेथें कदा ।
कीजे अर्जुनकीर्तना तंव सहा शत्रू स्वयें नासती
माद्रीपुत्रयशासि गान करितां रोगा नव्हे तैं गती ॥४॥
ज्या सख्यभक्तिविभवें हरि शेषशायीं, स्वाधीन होउनि करी निजपादसायीं ।
तो धीर मध्यमणि पांडवरत्नहारीं, ध्यातां धनंजय महाभय घेत हारी ॥५॥
त्याच्या विवाहचरिताप्रति मीं कथितों, साहित्यसागर यथामतिनें मथीतों ।
जे श्रेष्ठ सद्‍गुण कवीश्वर वंद्य मातें, त्यांच्या मतानुसरतां न मनीं श्रमातें ॥६॥
हे पांडवी परम पुण्य कथा पवित्रा, आकर्णितांचि हरिते अतिदोषमात्रा ।
देते अनंत सुकृतासि म्हणोनि यीतें, गातां कुळांसहित पावति सद्‍गतीतें ॥७॥
याकारणें कविनिरंजन याच काजीं, वाणी मनासहित अक्षगणा नियोजी ।
श्रीकृष्णभक्तिविभवें गुरुदास्यलेशें, विघ्नाद्रि भंगुनि विराजत नित्य तोषें ॥८॥
श्रंगारमुख्य नवहीं रस मूर्तिमंत, काव्यांत या परिसतां दिसती प्रशस्त ।
भोक्ता असे यदुपती सकळां रसांचा, झाली म्हणोनि रसिका कविराजवाचा ॥९॥
कांही भागवतीं कथाक्रम असे कांही असे भारतीं
कांही अन्य पुराणभाव वरिला कांही कवीभारती ।
हे सारी ग्रथुनी यथार्थ विरचू सद्रत्नहारावळी
कंठी यीस धरील जो चतुर त्या हे शोभवी भूतळीं ॥१०॥

चूर्णिका
श्रीमद्भागवतीं । शुकमुनीस पुसे परिक्षिती ।
अस्मत्पितामही सुभद्रासती । अर्जुनें वरिली कवण्या रिती ॥
ते कथा कथन करोनि विश्रांती । मनासि द्यावी महामती
ऐसें विनविता कृपामूर्ति । महायोगी सज्जनगती ।
परम संतोषें अभिमन्युपुत्राप्रति । कथा कथी कौतुकवती ।
जी माजि वीर अर्जुन त्रिदंदीयती । होवोनि वासुदेवी सुदती ।
राक्षसविधी हरोनि निगुति ।
नेता समयीं बळीराम बलार्णव ।
क्रोधानळावेशें पवमानें क्षोभतां ।
अती सकळ सुरमंडल चक्रवर्ती ।
श्रीकृष्णें विनयें सांतवोनि विधिविधानें यथास्थिती
पाणिग्रहण करवोनि इंद्रप्रस्थाप्रती ।
पाठवी उत्सवें श्रीपती । ऐसे कथी सविस्तर ॥१॥
ऐसाचि जन्मेजय महाप्रवीण । भारत गाथा करितां श्रवण ।
व्यासशिष्य वैशंपायन । तयासि प्रेम पुर:सर करी प्रश्न ।
स्वामी अर्जुन सुभद्रापाणिग्रहण । कथा म्हणतां मुनिकुलमंडण ।
परमानंदें कथन करी ॥१२॥
सुभद्रा कृष्णाची बहिण जलजाक्षी शशिमुखी ।
जिच्या सौंदर्यातें निरखुनि शचीमुख्य सुमुखी ॥
त्यजोनी गर्वातें सतत करिती कीर्तन यिचें ।
असी नाही दूजी म्हणुनि अति लावण्य मयिचें ॥१३॥
त्यजोनि बाल्यातें तरूण पद अंगी करितसे ।
तसीं चिन्हें सारीं अभिनव शरीरीं धरितसे ॥
स्ववर्णे हे जिंती सुतनु नवजांबूनदकळा ।
कळा आदित्याच्या घडति सहसा तप्त सकळा ॥१४॥
सुनीळी भृंगाळीसम अळकजाळी शिरिं धरी ।
कपाळीं अर्धेंदूसदृश उपमा सुंदर वरी ॥
स्वनेत्रें जिंतोनी अति विमळ तें नीळकमळें ।
तया भूयुग्मानीं स्मरधनुषगर्वासि हरिलें ॥१५॥
प्रभा गल्लद्वंद्वें सहज अरशाची हरितली ।
तिळाच्या पुष्पाचें यश जिणुनि नासा मिरविली ॥
सुमुक्ताशुक्ती त्या श्रुति निरखितां मज्जति जळीं ।
मुखाब्जा लक्षोनी परम त्यजिला गर्व कमळीं ॥१६॥
कसे झाले हीरे कठिण निरखोनी रदवरा ।
प्रवाळाही दिल्ही अति अरुणिमा दिव्य अधरा ॥
सुधापात्रें दिल्हें अनुपम हनूते निजपदा ।
म्हणोनी हे झाले बुधजनमना कारण मुदा ॥१७॥
शशी या वक्रत्रातें निरखुनि घडे क्षीण सगळा ।
जिणे यीची मंदस्मित रुचि तयाची शुभकळा ॥
सुकंठें कंबूची त्रिवळि गतरेखा हरितली ।
भुजद्वंद्वीं कैसी कमळलतिका ते झकविली ॥१८॥
यिच्या वक्षोजाहीं सरस हरिल्या कंजकळिका ।
म्हणोनी कंदर्पा प्रकटविति चित्तीं सकळिका ॥
दिसे शामा पोटावरि लघुतरा रोमसरणी ।
असे कीं कामाची तरि असिलता जीवहरणी ॥१९॥
यिच्या कोशाकारें त्रिवळि दिसती सूक्ष्म उदरीं ।
युवाच्या चित्तांतें क्षण न लगतां खंडिति परी ॥
सुनिम्रत्वें नाभी वटपुटसमानोदरवरीं ।
स्वयें लीला कैसी अमृतरसवापीसम धरी ॥२०॥
नितंबातें कुंभस्थळ निरखितां मत्तकरिचे
महालज्जेनें ते श्रवति असुणी साचपरिचे ॥
तया शुंडादंडा जिणुनि उरुयुग्मीं स्वमहिमा ।
जगीं केली तेहीं प्रकट दिसते दिव्य सुषुमा ॥२१॥
स्मराच्या तूणातें हरुनि वरजंघा विरचिल्या ।
तशा माणिक्याच्या अरुणिमकळा एकवटिल्या ॥
पदद्वंद्वे टांचा रचुनि सरळा अंगुळवळी ।
विधीनें हे केली सरस धरणीमाजि पुतळी ॥२२॥
शरच्चंद्रजोस्त्रा करुनि शकलें तें नखमणी ।
घडोनीया केली स्थिति गमतसे रम्य चरणी ॥
लता हे हेमाची चतुर चतुराश्यें विरचिली ।
धरोनी देहातें अचळ चपला काय घडली ॥२३॥
जिच्या आमोदातें परिसुनि अळी गुंजति सदा ।
दिसे हेमाब्जाची विधिरचित माळा प्रसुखदा ॥
पश्यामध्यें दोनी नयन न समाती, वपुकळा ।
महा अंध:कारीं प्रकट करिते दिव्य अबळा ॥२४॥
समस्ता अंगांचीं असति जितुकीं लक्षणगणें ।
समस्तें ये स्थानीं वसति, न दिसे एकहिं उणें ॥
अशा लावण्याची कुशल जगनिर्माणकरिता ।
करी नारीमूर्धांमणि रमणि हे देवकिसुता ॥२५॥
वपू श्रीकृष्णाची रचुनि उरलें सौष्टव तया ।
दिल्हे नारीवेषा कमलभवनें आणुनि दया ॥
असें वाटे मातें म्हणुनि हरिणाक्षी नृहरिची ।
स्वसा झाली बाळी यदुवरकुळीं साचपरिची ॥२६॥
अळंकारें वस्त्राभरणपदकें दिव्यवलयें ।
उदारांगी यीच्या करुनि वसती रम्य निलयें ॥
त्रिवेणीसी वेणी मणिखचित एणाक्षिणिशिरीं ।
दिसे लावण्याच्या निधिवरिल हे नागिण बरी ॥२७॥
मयूराच्या पिच्छाकृति अळक आधींच सरळे ।
सुगंधा तैलानीं विभौनि जळें शुद्ध धुतले ॥
सुवेणीचीं लेणीं वरि विलसलीं माणिकगणीं ।
बरी मुक्ताजाळी तदुपरि विराजे बहुगुणी ॥२८॥
पहा आधीं केला सरस दिसतो भांग बरवा ।
स्मरें लावण्यांभोवनिधिंत कृतसेतू तरि नवा ॥
तया रामाहस्तें विरचुनि यशा पात्र घडती ।
रवींद्राच्या साम्यें जडित शशिभानू विरचिती ॥२९॥
बरें त्या सिंदूरें अरुणपद भांगासि दिधलें ।
स्वदीप्तीनें जैसें तम उदित सूर्ये उजळिलें ॥
तयासंगे मुक्तासर धवल काळे कच बरे ।
त्रिवेणी सौभाग्योदयसहित माथां अवतरे ॥३०॥
टिळा कस्तूरीचा रचित असतां भांग तिलकें ।
स्वमित्रा भेटाया मग करित बीजे कवतिकें ॥
कपोळीं पत्राळी विरचित दिसे केसररसें ।
स्वदीप्तीनें शोभा सहज सकळांची हरितसे ॥३१॥
पहा आधीं यीचीं नयनयुगळें नीळकमळें ।
तयातें हीं शोभे अति निबिड तें काजळ भलें ॥
स्मराच्या बाणातें गरळ बरवें माखुनि जसें ।
युवांच्या चित्ताचें दळण विधिनें निर्मित दिसे ॥३२॥
सुधांशूपूर्णांगीं अरुणसह त्या शुक्रयुगळें ।
वसावें या नाकीं मिरवत तसें ठोसर भलें ॥
जसें फुल्लाब्जातें लिगटुनि शशीमित्र वसती ।
सुताटंकें तैशीं मुखकमळसंगे मिरवती ॥३३॥
तयांच्या सामीप्यें ग्रहगण जसे व्यक्त दिसती ।
फुलें बाळ्या नाना जडित बुगड्या हीं विलसती ॥
मणी पेट्यामाळा मिरवत गळांची गळसरी ।
जगीं नाहीं द्यावी अणिक उपमा यांसि दुसरी ॥३४॥
म्हणोनी हे कंठी धरित अनुरागेंचि युवति ।
यिच्या साम्या कोणी अमरयुवती त्या न पवती ॥
गुजे हीं मोत्यांची धरित निजकंठी सुचतुरा ।
प्रपंची या नारी परमगुज हें दावित नरा ॥३५॥
बरी ल्याली बाळी नवमणियुता दिव्यपदका ।
असें दावी यीवांचुनि अणिक देवेंद्रप्रद कां ॥
धरोनी चिंता कां तरुणमनिं चिंता उपजवी ।
दिवा रात्री त्यातें नियत निजमूर्तीस भजवी ॥३६॥
दिसे मुक्ताहार स्तनगिरिशिरी शुभ्र बरवा ।
जसा स्वर्गंगेचा उतरत दिसे वोघचि नवा ॥
सुमेरुच्या शृंगी गमत मजला याच परिचें ।
घनाच्या या धारा धरिति दिसती गंड करिचे ॥३७॥
सुवर्णाची वल्ली स्तनफळभरें फार लवली ।
न मोडावी ऐशी गणुनि विधिनें युक्त रचिलीं ॥
सुरत्नाची कांची सुदृढ विरची बंधन तिला ।
सुसूक्ष्मा हे मध्यें ह्मणुनि गमलें साच मतिला ॥३८॥
झुणा दाळिंबीच्या अरूणसुमरागा वरितसे ।
सुसूक्ष्मत्वें कांही कनकतनुभा आंतुनि दिसे ॥
जसी माणिक्याच्या अमल घटिची दीप कळिका ।
सुरम्या तैशी हे दिसत अनुपम्या पुतळिका ॥३९॥
पदीं मंजीरातें मणिखचित सन्नादित धरी ।
झणत्कारें सारें सहज फिरतां मंदिर भरी ॥
मुनीचीं हीं चित्तें विकळ घडती ऐकुनि रवा ।
भरे तैं कामाचा शर हृदय भेदोनि बरवा ॥४०॥
तसे ते पोल्हारे अनवट विरोद्या लघुफुलें ।
पदाब्जाच्या संगें करिति यशविस्तार अपुलें ॥
समस्ताहोनी हीं मुखर वसती जोडविं पदीं ।
न बैसो हे देती नियमितमना निर्गुणपदीं ॥४१॥
पदाब्जें आधीं तें किसलय तशीं शोण बरवीं ।
तयातें ही आलक्तकरवसरें फार मिरवी ॥
ध्वजोर्ध्वा रेखांची दिसति तळवालक्षणगणें ।
महाराजेंद्राची घडल महिषी सांगति खुणें ॥४२॥
असी नानाभूषाभरित तरुणी कृष्णभगिनीं ॥
जिला लाजोनीयां न करि शशि संचार गगनीं ॥
सुभद्रा भद्राक्षी भुवनतिलका भर्मलतिका ।
भवाची हे मुद्रा भ्रम करित चित्ता सकळिका ॥४३॥
सुभद्रा भद्राक्षी कमलरहिता हे जलधिजा ।
विना वीणा हस्तीं परमनिपुणा काय विधिजा ॥
नसे माथा यीच्या शशिकमल हे काय गिरिजा ।
त्रिलोकीं धन्यत्वा वरिल नवरी हेच वरिजा ॥४४॥
असी कन्या धन्या त्रिजगजनमान्या सुचरिता ।
नव्हे हे सामान्या नवतरुणी कंदर्पभरिता ॥
स्पृहा यीची सारे करिति नृपती ऐकुनि गुणा ।
न आणी जे पार्थाविण अणिक तो वल्लभ मना ॥४४॥
नृपाळांची चित्रें लिहुनि सखिया दाविति तिला ।
न मानी कौंतेयाविण अणिक त्या तुच्छ पतिला ॥
सदां जे ऐकोनी विजयगुण चित्तांत रुतले ।
न जाती ते कांही सखिवचनगंगेंत धुतले ॥४५॥
हरी वेत्ता चित्तांतिल कळुनि यीच्या अभिमता ।
समर्पावी कुंतीतनुजविजया सद्‍गुणवता ॥
असें योजी, मानें विहित वसुदेवासि बरवें ।
तसी माता तेही परिसुनि सुखाब्धींत मिरवे ॥४६॥
श्वेतवाहन इला नवराहो । हाच योग्य दुसरा नव राहो ।
सर्वहीं सुहृद आप्त जनांही, बोलिजेत असलेंच सदाहीं ॥४७॥
इति श्रीमत्कविकुलतिलक निरंजनमाधवविरचिते सुभद्रास्वयंवर चंपू काव्ये
स्वरुपश्रृंगारवर्णनं नाम प्रथम: सर्ग ॥१॥
श्रीकृष्णाय नम: ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 28, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP