सुभद्राचंपू - सर्ग सहावा

निरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे.


वर्षाकाळ समस्तही निरसला आला शरत्साजिरा ।
झालें अंबर शुध्द मंदगतिनें वायू फिरे गोजिरा ।
तत्काळोद्भव सत्फळें सुकुसुमें भारें तरु डोलती ।
सस्यें शोभित दीसते वसुमती संफुल्लल्या मालती ॥१॥
झालीं निर्मळ तें सरोजसहितें पद्माकरें पावनें ।
येती दिव्य मरालवृंद करिती सेवावया धावनें ॥
पर्वी पूर्णराशी चकोरकगणा योजी सुधापारणें ।
आले षट्‍ पद तैं परागपर ते सत्पक्षझंकारणें ॥२॥
झाले स्तब्ध शिखी सुखी घडुनियां अर्थीजनांचेपरी  ।
पाहा शोभति शावलें हरित ते श्रीमंत तैसे गिरी ।
झाल्या त्या सरिता कृषा रसयुता स्वंछांबुसंधारणें ॥
लोका लंघनशक्य त्या विलसती शैत्यादिसर्वागुणें ॥३॥
नाना नव्यतृणें वनीं मृगगणें सेवोनियां पुष्ट ते ॥
जैसे नूतनसंपदामदभरें सानंदलें दुष्ट ते ॥
कामार्थी करिताति युध्द अपुल्या जातींत कामाथिले ॥
ते दुर्वृत्त मदोध्दतांसम पहा ग्रामीणसे मातले ॥४॥
औदार्योन्नत दंभवंत करिती देतां जन गर्जना ॥
तेव्हां पावति कृष्णता अपयशें मालित्य ये त्या जना ॥
तेहीं सज्जगसंगलाभ घडतां शुध्दाकृती पावती ॥
तैसे मेघ शरत्समागमवशें मौनें शुची राहती ॥५॥
जाती ते व्दिज निड टाकुनि तसे सव्दिप्र तीर्थाटणा ॥
राजे जैत्ररथावरोह करिती शत्रुचिया शासना ॥
वाणिज्यार्थ वणिग्जनी वृषगणीं वाहोनि वस्तू बर्‍या ॥
नेती उद्यमलाभ इच्छुनि मनीं स्वच्छंद देशांतरा ॥६॥
जाती स्वस्थकुलांगना पतिकुळा सौभाग्यकामी सती ॥
क्षत्री भूपतिसेवनार्थ निघती त्यागोनि गेहाप्रती ॥
व्यापारी रत सर्व जीव घडती येतां शरत्सांवळा ।
भिक्षू निस्पृह ते गृहस्थ वसती संत्यागिती त्या स्थळा ॥७॥
मागें अर्जुनही निरोप सहजी तोषें हळीकारणें ॥
झालें रक्षण या तनूस अपुल्या सप्रेमसंरक्षणें ।
आम्ही निस्पृह फार दीस न वसों गेहीं गृहस्थांचियां ॥
तेणे लोप अवश्यमेव घडती नेमासि संन्यासिया ॥८॥
झाले मार्ग समस्त निर्मळ, तृणें ते कोमलें वाढलीं ॥
जीवांची अतिसूक्ष्म पंक्ति समुदी सल्लीनता पावली ॥
झालें अंबरही निरभ्र सरला अंधार हा दुर्दिनीं ॥
भानूहीं स्वकळा प्रसन्न सकळा संपन्न हिंडे जनीं ॥९॥
ऐसें ऐकुनि राम त्याप्रति वदे स्वामी कृपासागरा ॥
केली मान्य गिरा म्हणॊनि घडला हा लाभ ग्रेहातुरां ॥
आहे रैवतपर्वतोत्सव उद्यां कीजे समस्ता जनीं ॥
दृष्टीं या निरखोनि साच करिजे प्रस्थान आल्या मनीं ॥१०॥
केलें मान्य यतीश्वरें बहुबरें संतोषयुक्तांतरें ॥
आज्ञापी स्वपुरीत राम सुजना आतां चला सत्वरें ॥
श्रीकृष्णाहुक देवकोद्भव तथा अक्रूर तो सात्यकी ॥
तेव्हां आनकदुंदुभीसह निघे योषिद्रणीं देवकी ॥११॥
कृष्णांत: पुर सर्व सिध्द घडले नारीमणी रेवती ॥
सार्‍या यादवदेवराज महिषी सद्भूषणीं शोभती ॥
छत्रें चामर दासिकासह महा आनंदल्या वैभवें ॥
ज्यातें देखुनि देवलोकवनिता लाजोनि जाती जवें ॥१२॥
काहीं हेममणीविराजितरथीं आरुढल्या साजिर्‍या ॥
कांहीं त्या शिबिकादि दिव्य वहनीं त्या शोभजेल्या बर्‍या ॥
भेरी झांकृति दुंदुंभी रवभरें संनाद कोंदाटला ॥
लोकाचा बहुसाल तो गलबला दाहीं दिशा व्यापला ॥१३॥
सुभद्रा भद्रांगी मणिरहिंवरी ते वळघली ॥
निघाली लक्ष्मीसी जलनिधि जळापासुनि भली ॥
समस्तालंकारें खचित दिसते हेमपुतळी ॥
जशी रत्नस्तोमीं कुशलविधिनें रम्य घडिली ॥१४॥
महावीरांचेंही निजगुणाविलासें मन हरी ॥
दिसे हें सौंदर्यांबुधिजनित लावण्यलहरी ॥
मुखांभाजीं यीच्या तरुणनयनाली झगटती ॥
तदां नासा चंपा कुसुमवर दर्पें मुरडती ॥१५॥
सुभद्रा दे सज्जीकृत रथ तया हंसमणिला ॥
असे लक्षामध्यें अनुपम महावीर गणिला ॥
स्त्रियांच्या संदोहीं यतिवर निघे दंडधर तो ॥१६॥
पुढें मागें सारे रणचतुर रे शूर निघती ॥
पदातीहीं हातीं अमित परि शस्त्रें परिजिती ॥
महासेना साजे अतुळ चतुरंगे बळवती ॥
बलाध्यक्षामागें तरुण रणवेत्ते मिरवती ॥१७॥
पुढें श्रीकृष्णासीं करि गमन तालांक गजरें ॥
तदां व्दारी व्दारावतिस तरि तो मार्ग न सरे ॥
नरांचे नारीचे गण निरखिती वैभव दिठीं ॥
जयांच्या चिताची पडलि हरिपायीं दृढ मिठी ॥१८॥
टाकोनियां नगर ते निघती जवानें ।
जे दृप्त सर्व घडले निज वैभवानें ॥
इंद्रादिकां न गणिती यदुवीर गाढे ।
ज्यांची असी हरि- परिग्रह दीप्ति वाढे ॥१९॥
कांहीं दूर पुरी त्यजोनि निघतां पाहोनि मागें पुढें ।
वीरांतें निरखोनिहीं विरळसें तैं सज्ज हाहीं घडे ॥
आणी स्यंदन तो समीप मिरवे जेथें सुभद्रा सती ।
देतां हस्त ततक्षणीं वळघली या अर्जुनाच्या रथीं ॥२०॥
दिल्हा तो ढकलोनि सारथि घडे हे वासुदेवी स्वयें ।
अश्वाचे वरदोर धारण करी जे चालवी निर्भयें ॥
तेव्हां तो रथ काढिला द्रुतगती टाकोनि सर्वां जनां ॥
झाला अर्जुन चाप बाण धरुनी सन्नध्द युध्दांगणा ॥२१॥
जैसा तो मृगराजा भाग अपुला स्वात्मप्रतापें हरी ।
तैसा तो कुरुवीर अर्जुन बळें ने तो रथीं नोवरी ॥
तेव्हां एकसरेंचि तो गलबला अंत:पुरी माजला ।
संन्यासी असतां हरोनि पळतो देवी सुभद्रा तिला ॥२२॥
आक्रोशें अति अट्टहास करिती नारी पंथी विव्हळा ।
तो कोलाहला भूमि - अंबर - दिशागर्भांत कोंदाटला ॥
नेली त्या यतिनें पहा गुणवती कैसी सुभद्रा सती ।
नारी पीटिति भाळ वक्ष म्हणती कैं राम कैं श्रीपती ॥२३॥
तेही काय म्हणोनि भिक्षुकरथीं आरुढली सांप्रती ।
जे कां शीलवती महाशुभमती मानीत होतों किती ॥
आहा स्त्रीचरितीं नव्हे परगती देवादिकांही अती ।
एकांतीं मतली तयास सुदती गेली तया संगती ॥२४॥
ऐसें ऐकुनि वीररक्षक मनीं होवोनियां घाबिरे ।
तेव्हां पाहति भोंवते तव यती नेतो सुभद्रा त्वरें ॥
पाठीं धांवति फीर फीर म्हणती शस्त्रास्त्रवेत्ते बरे ।
जैसा सागरपाट एकसर तो लोटे मही ना धरे ॥२५॥
आक्रोशें म्हणती यती कुळवधू तूं कोण नेसी असा ।
हे तूला नकळे कसी हरिसि तूं श्रीकृष्णजीची स्वसा ॥
कैसा राम तुला उपेक्षिल खळा आम्हांपुढें तूं तरीं ।
कैं जाऊं सकसील वांचुनि तरी घेवोनि हे नोवरी ॥२६॥
आतां तों तव मानभंग करणें आला अम्हां रोकडा ।
संन्यासी म्हणवोनि वंदन करुं बांधोनि नेऊं मुढा ॥
हे आहे बळिराम - कृष्ण भगिनी भिक्षू तुला हे कसी ।
कन्या प्राप्त घडेल नेणसि कसा तूं आपुल्या मानसीं ॥२७॥
हे नोहे वनिता असे बडिश रे मछापरीं भिक्षुका ॥
तूझे प्राण हरील मायिक तुला कैशी जिरे क्षुल्लका ।
आतां तूं न करी विलंब सुदती टाकोनि दे तूं पळे ॥
नाहीं तैं तुज राम दंडिल बरा दंडी म्हणे ना बळें ॥२८॥
सांगे तूं तरि नाव काय अपुलें नेसी वधू कासया ।
सोन्यासी म्हणवोनि वेषधर तूं आलासि गावास या ॥
जासी घेऊनि काय ईस हरिच्या लंघोनिया शासना ।
पृथ्वी ते तुज ठाव देइल कशी आणी विचारें मना ॥२९॥
या भूमीवरि वाव तो तुज नसे जाशील स्वर्गाप्रती ।
तेथें इंद्र करील रक्षण तुझें हें ना घडे दुर्मती ॥
तेव्हां दिक्पति काय तूज करिती ते निर्बळी रक्षणा ॥
आतां प्राणचि मात्र घेउनि पळें स्त्री- चोरटया दुर्गुणा ॥३०॥
रामानें तुज पूजिलें प्रणमिलें प्रेमें घरीं ठेविलें ।
चार्तुमास्यजळागर्मीं तुज कसें सानंद संरक्षिलें ।
त्यांचा तां उपकार शीघ्रचि तुवां निस्तारिला दीसतो ।
ऐसा दुर्मति तूं कृतघ्र तुजला जावा कसा दीसतो ॥३१॥
तेव्हा तो रणधीर अर्जुन म्हणे नोहे यती मीं सती ।
माझी म्यां हरिली वदा त्वरित जा त्या रामकृष्णाप्रति ॥
आहे पांडव - धर्मबंधु वरितों मन्मातुळाची सुता ।
माझा भाग यथार्थ हो परिसिजे आहे विधी नेमिता ॥३२॥
आहे मीं समरीं उभा जरि तुम्हां युध्दी असे वासना ॥
या सज्जोनि पहा पराक्रम तरीं लावीन मी शिक्षणा ।
आहे गौतमशिष्य मी परिसिजे शस्त्रार्थवेत्ता जगीं ।
आहे फाल्गुन मी बुझा निजमनीं शंका त्यजा वाउगी ॥३३॥
ऐशी अर्जुनभाषिता शुभ गिरा ऐकोनियां वीर ते ।
झाले कीं पुरुषार्थहीन समरीं घेतीच ना धीर ते ॥
जैसा तो मृगराज नाद करितां क्षुद्रां मृगांच्या गणा ।
प्राणा अंत घडे तसा मदगिरी यांचा घडे ठेंगणा ॥३४॥
झाले अर्जुन नांव ऐकुनि तदा साशंक चित्तांतरीं ।
याचा मित्र असे यथार्थ परिसा श्रीकृष्ण याचे शिरीं ॥
त्याच्या तों विवराविना हरिल हा हे नोवरी ना घडे ।
यासीं युध्द करुं तरी न करितां संकष्ट दोहीं कडे ॥३५॥
आतां जाणविजे त्वरेंकरुनियां त्या रामकृष्णाप्रती ।
नेताहे यति दंडधार तुमची जे कां स्वसा सन्मती ॥
आहे अर्जुन नाम हेचि कथितो सांगे पृथानंदन ।
मीं नेतों मम भाग मातुळसुता साध्वी समाना गुणें ॥३६॥
आहे तो स्थिर वीर सज्जुनि उभा अंकी असे नोवरी ।
त्याच्या प्रेमपुर: सरें धृतिमती सामथ्यकर्मा करी ॥
आतां आय तयासि जिंतुनि रणीं बांधोनियां आणिजे ।
कीजे काय उपाय यावरि तयां आज्ञा कसी पूसिजे ॥३७॥
ऐसा दीर्घ विचार वीर करुनी सांगावया पातले ।
जेथें श्रीपति - राम - मुख्य असती लज्जाभरें आतले ॥
तैं हे रैवत पावले तंव घडे आकांत मार्गीं असा ।
सांगाया प्रति धींवसा न पुरवे शूरांचिया मानसा ॥३८॥
इति श्री सुभद्रास्वयंवरे चंपुकाव्ये शरत्काळवर्णनं सुभद्राहरणं नाम षष्ठोध्याय: ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 28, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP