“फिरंगी यासहि मार दिला !”
शके १६६१ च्या वैशाख शु. ४ रोजीं चिमाजी आप्पाच्या सैन्यानें वसईवर निकराचा हल्ला चढविला.
शिवकालापासून पश्चिम किनार्यावर पोर्तुगीझांनीं हिंदु लोकांचा फार छळ सुरु केला होता. तेव्हां त्यांचा समाचार घेणें, त्यांच्याशीं वारंवार युध्द खेळणें हें एक मराठयांचें कर्तव्यच होऊन बसलें होतें. अनेक प्रकारच्या तक्रारी पेशव्यांकडे व शाहूमहाराज यांच्याकडे येऊं लागल्यावर या कामावर चिमाजी आप्पा यांची नेमणूक झाली. चिमाजी कोंकणांत उतरल्याबरोबर शिंदे, होळकर, बाजी भीवराव, तुकोजी व जिवाजी पवार, पिलाजी जाधव इत्यादि मराठे सरदार एकत्रित होऊन पुढील जोराच्या लढयाला सिध्द झाले. वसीचा किल्ला हल्ला चढविण्यास अवघड होता. “वसई बांकी जागा, पश्चिमेकडून समुद्र, दक्षिणेकडे खाडी, पूर्वेकडे चिखल, तिहींकडून किमपि इलाज नाहीं. एक उत्तरेकडून उपाय. तिकडेहि रेती, धर नाहीं.” अशा या अवघड जागीं मराठयांना प्रथम यश कमी मिळालें. परंतु, शेवटीं चिमाजी आप्पाच्या निर्वाणीच्या शब्दांमुळें सर्व सैनिकांनीं मोठया आवेशानें वैशाख शु. ४ या दिवशीं वसईवर हल्ला केला. मराठयांचा राष्ट्राभिमान, शौर्य, संघशक्ति इत्यादि गुण या संग्रामांत ठळकपणे दिसून येतात. या वेळीं झालेल्या हल्ल्याचें वर्णन खुद्द चिमाजी आप्पा एका पत्रांत करतात:“सुरुंगास बत्त्या दिल्या. राजश्री राणबाकडील चार सुरूंग उडाले: एक उडावयाचा होता, तोंच लोकांनीं तांतड करुन हल्ला केला. तों पांचवा सुरुंग उडाला. तेणेंकरुन बहुतकरुन दगडांनीं दडपले ... लोक जीवित्वाकडे दृष्टि न देतां चालून गेले. फिरंगी यांणीं आंतून मेढा घालून बळ धरिलें होतें. हल्ला करितांच हुक्के व गरनाळा, दारुचीं मडकीं, राळ, माशांचें तेल, बरखंदाजी ऐसा सीमेपरता मार दिला. परंतु, लोकांनीं मेला तो मेला, जळाला तो जळाला, त्याजवर दृष्टि न देतां ज्या जागीं गेले त्या जागाच कायम राहून फिरंगी यांसहि मार दिला.” तीन महिनेपर्यंत निकराचें युध्द होऊन वसई मराठयांच्या ताब्यांत आली आणि चिमाजींचें नांव अजरामर झालें.
- १ मे १७३९