वैशाख शुद्ध १०
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
धर्मसंस्थापक शंकराचार्य !
शके ७१० च्या वैशाख शु. १० रोजीं अवघ्या बत्तीस वर्षाच्या आयुष्यांत आसेतुहिमाचल दिग्विजय करुन धर्मसंस्थापना करणारे अव्दितीय पुरुष आद्य श्रीशंकराचार्य यांचा जन्म झाला.
शंकराचार्य हे मलबारमधील एका नंवुद्री ब्राह्मणाच्या कुलांत जन्मले. त्यांच्या आजाचें नांव विद्याधिराज असून ते स्वत:, आचार्याचे वडील शिवगुरु आणि आई आर्याम्बा असे सर्व जण कालटी येथें राहत असत. हा गांव कोचीन संस्थानांत पूर्णा ऊर्फ पेरियर नदीच्या कांठीं असून त्याच्याभोंवतीं गर्द वृक्षराजि आहे. “पांचव्या वर्षी मुंज, आठव्या वर्षी संपूर्ण वेदाध्ययन, पूर्णा नदींत मगरीनें पाय धरल्याचे निमित्तानें आईकडून संन्यासग्रहणाची परवानगी, दहाव्या वर्षी नर्मदातीरीं ओंकारक्षेत्रीं गुरु गोविंदयतींच्याकडून संन्यासगहण, चार वर्षे बदरिकाश्रमीं तपश्चर्या, १६ व्या वर्षी काशीक्षेत्रीं शारीरभाष्याची रचना; माहिष्मती येथें मंडनमिश्रादिकांचा वादविवादांत पराभव, शृंगेरीस शारदा - मठ - स्थापना, भरत - खंडभर दिग्विजय, काश्मीरांत सरस्वतीपीठावर आरोहण, शृंगेरी मठावर सुरेश्वराचार्याची स्थापना,कांची येथें कामाक्षीदेवीची स्थापना व तेथेंच वैशाख शु. १५ (शके ७४२) गुहाप्रवेश” असा आचार्याचा संक्षिप्त चरित्रक्रम आहे.
भारतांत बुध्द -जैन धर्माचा उदय झाल्यापासून उपनिषदांतील ब्रह्मविद्येचा लोप झाला होता. त्या ब्रह्मविद्येचा उध्दार आचार्यांनीं केला. शंकराचार्यानीं लोकांच्यासाठीं धर्मज्ञानाची पाणपोई घातली हें त्यांचें मोठेंच धर्मकृत्य होतें. दुर्लभ ब्रह्मज्ञान त्यांनीं सुलभ केलें. ब्रह्मसूत्रें व भगबद्गीता यांवरील त्यांची भाष्यें प्रसिध्द असून ईश, केन, कठ, प्रश्न, मंडूक, माण्डुक्य, इत्यादि बारा उपनिषदांवरील त्यांच्या भाष्यांमुळें ‘आचार्य’ ही पदवी सार्थ झाली आहे. त्यांच्या स्तोत्रांतून भक्तीचा जिव्हाळा दिसून येतो. अव्दैत ब्रह्मज्ञान व कोमल भक्ति यांचा मधुर संगम आचार्याच्या स्तोत्रांतून झालेला आढळतो. त्यांचा अव्दैतबोध रुक्ष व नीरस नाहीं तर तो भक्तीनें आर्द्र झालेला आहे. ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापर:’ या श्लोकार्धात शंकराचार्याचें तत्त्वज्ञान भरुन राहिलें आहे.
- २० एप्रिल ७८८
N/A
References : N/A
Last Updated : September 19, 2018
TOP