वैशाख शुद्ध ७

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


“ईश्वरें अमृतवृष्टि केली !”

शके १६९६ जयनामसंवत्सराच्या वैशाख शु. ७ रोजीं महाराष्ट्राचे लाडके पेशवे सवाई माधवराव यांचा जन्म झाला.
सवाई माधवरावाच्या जन्माकडे सर्व देशाचे डोळे लागून राहिले होते. महाराष्ट्रांतील शेंकडों देवांना नवस करण्यांत आले होते. त्या वेळची परिस्थितिच तशी होती. नारायणराव पेशव्यांचा वध झाला त्या समयीं हा पेशवा आईच्या उदरांत एक महिन्याच्या गर्भावस्थेंत होता. रघुनाथराव गादीवर येण्याच्या खटपटींत आहे असें  पाहून ‘बारभाई’ कारस्थानास सुरुवात झाली. त्यास यश येणें हें केवळ गंगाबाईच्या प्रसूतीवर - तिला मुलगा होण्यावर - अवलंबून होतें. सुरक्षितपणासाठीं शनिवारवाडयांतून गंगाबाईस हालविण्याचें काम सखारामबापूंनीं केलें. गंगाबाईस त्यांनीं पुरंदर किल्ल्यावर सुरक्षितपणें नेऊन पोचविलें. शेवटीं वैशाख शु. ७ रोजीं गंगाबाई प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. ही बातमी अखिल महाराष्ट्रास कळतांच सर्वत्र आनंदीआनंद झाला. या आनंदाचें वर्णन कोठवर करावें ! “फौजेंत वर्तमान पोचतांच निजाम, साबाजी हरिपंत व सर्व सरदार अबालवृध्द यांस संतोष झाला. सरबत्ती व नौबतखाना सुरु झाला. शर्करा पृथक्‍ पृथक्‍ वाटल्या. नृत्यादि समारंभ, गजर, उत्सव झाले; देवानें कुलदीपक लावला. देव त्यास आयुष्य यथेष्ट करील. सर्वाचें जीवन आहे. आम्हांस आधार बळकट झाला. ईश्वरें अमृतवृष्टि करुन वंशवेळी प्रफुल्लित केली. भगवंतास प्रजेचें पालन आणि धर्मसंस्थापना कर्तव्य आहे, हा नि:संदेह झाला. पुत्र झाला हा मोठा लाभ. श्रीपंढरीनाथानें राज्यास धणी दिला. साक्षात्‍ विष्णूनें राज्यरक्षणार्थ अवतार घेतला. हा एवढा हर्ष कोणता आहे ! देव सत्याकडे आहे असें पुरतें समजलें. सर्व वर्तमान लहानथोरांस, तमाम सरदारांस व राजेरजवाडयांस कळलें. इंदुवास सुदिन. विद्यानगरीं एक वेळ सुवर्णवृष्टि झाली, तीच हल्लीं आम्हांवर वारंवार देव करतो. हाच उल्हास आहे. जगदात्मा कृपावंत होऊन कुलदीप उदय केला. त्यास आयुष्यवृध्दि करो. जगन्निवास पुढें उत्तमोत्तम करील. जगन्निवासें प्रजेचें पालन करणार उभे केले.”
- १८ एप्रिल १७७४


References : N/A
Last Updated : September 19, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP